ग्रीन, ग्रेअम : (२ ऑक्टोबर १९o४– ). इंग्रज कादंबरीकार. जन्म हार्टफर्डशरमधील बर्कमस्टिड येथे. उच्च शिक्षण ऑक्सफर्ड येथे. काही वर्षे पत्रव्यवसायात घालवल्यानंतर द मॅन विदिन (१९२९) ही कादंबरी लिहून त्याने साहित्यक्षेत्रात प्रवेश केला. त्यानंतर त्याने कादंबऱ्या, नाटके प्रवासवर्णने, निबंध असे अनेक साहित्यप्रकार हाताळले असले, तरी मुख्यतः कादंबरीकार म्हणूनच त्याचा लौकिक आहे. गंभीर कादंबऱ्या (नॉव्हेल्स) आणि रंजनकथा (एंटरटेन्मेंट्स) असे आपल्या कादंबऱ्यांचे त्याने स्वतःच दोन वर्ग पाडले आहेत. द पॉवर अँड द ग्लोरी (१९४o), द हार्ट ऑफ द मॅटर (१९४८), द एंड ऑफ द अफेअर (१९५१), द बर्न्ट आउट केस (१९६१) आणि द कॉमेडिअन्स (१९६६) ह्या त्याच्या गंभीर कादंबऱ्यांपैकी काही असून अ गन फॉर सेल (१९३६), कॉन्फिडेन्शल एजंट (१९३९), अवर मॅन इन हॅवाना (१९५८) ह्या त्याच्या काही रंजनकथा होत.
आपल्या कादंबऱ्यांची कथानके क्यूबा, बेल्जिअन काँगो, हैती, पश्चिम आफ्रिका ह्यांसारख्या देशांच्या पार्श्वभूमीवर उभी करून ग्रीनने तेथील अस्थिर व स्फोटक राजकीय परिस्थितीचे चित्रण केले आहे. तो कॅथलिक पंथाचा असल्यामुळे आजच्या जगातील सामाजिक आणि नैतिक दुरवस्थेचे चित्रण पाप, पुण्य व प्रायश्चित्त ह्या संकल्पनांच्या चौकटीत बसवण्याकडे त्याचा कल आहे. मानवाचे ईश्वराशी असलेले नाते, तसेच एकतंत्री व अन्यायमूलक समाजव्यवस्थेत व्यक्तीची होणारी ससेहोलपट हे विषय त्याच्या लेखनात सातत्याने आलेले आहेत. त्या संदर्भात सुखासीन, स्वच्छंदी व प्रतिष्ठित जीवनाची हाव, आंतरराष्ट्रीय भांडवलदारीचे खेळ, रसहीन लैंगिकतेचा पाठपुरावा व सांस्कृतिक ऱ्हास ह्यांचे दर्शन तो आपल्या कादंबऱ्यांतून घडवितो पण गुन्हेगारांच्या जगातच त्याला अलौकिक अशा शक्तीची चाहूल लागते लब्धप्रतिष्ठितांच्या आणि पांढरपेशांच्या जगतात तिचा मागमूस दिसत नाही. अनिकेतपणा हीच मानवाची मूलभूत अवस्था, असे तो मानतो.
ग्रीन ह्याचे कथनकौशल्य व आधुनिक शहरी जीवनाचे तपशील साकार करण्याचे सामर्थ्य मोठे आहे. त्याच्या कादंबऱ्यांवर प्रचलित समाजजीवनाची छाया असली, तरी सर्व सामाजिक जाणिवांचा एकसंध आलेख नाही त्यामुळे ह्या युगाचे समाधानकारक सामाजिक दर्शन त्याच्या कादंबऱ्यांतून घडत नाही त्याच्या कादंबऱ्यांतील व्यक्तिरेखा तत्त्वदर्शनासाठी निर्माण करण्यात आल्यामुळे पुरेशा जिवंत वाटत नाहीत त्यांवर चित्रपटीय तंत्राचा प्रभाव आहे, अशी टीका केली जाते.
द लिव्हिंग रूम (१९५३) व द पॉटिंग शेड (१९५७) ही त्याची काही उल्लेखनीय नाटके. यांशिवाय जर्नी विदाउट मॅप्स (१९३६) आणि द लॉलेस रोड्स (१९३९) ही त्याची प्रवासवर्णने तसेच द लॉस्ट चाइल्डहूड … (१९५१) हा टीकालेखसंग्रह प्रसिद्ध झालेला आहे. ट्वेंटिवन स्टोरीज (१९५४) व अ सेन्स ऑफ रिॲलिटी (१९६३) हे त्याचे काही कथासंग्रह. काही चित्रपटकथाही त्याने लिहिल्या आहेत.
संदर्भ : 1. Allot, K. Farris, M. The Art of Graham Greene, London, 1951,
2. Madaule, J. Graham Greene, Paris, 1949.
हातकणंगलेकर, म. द.