ग्रीक सत्ता, भारतातील : अलेक्झांडरच्या भारतावरील इ.स.पू. ३२६ च्या आक्रमणानंतर भारतामध्ये काही प्रदेशांनी त्याचे मांडलिकत्व पतकरले, तर काही भागांवर त्याने आपले अधिकारी (क्षत्रप) नेमले. अशा प्रकारे ग्रीक सत्तेचा भारतात प्रारंभ झाला.
भारताच्या वायव्येस ऑक्सस नदीच्या दक्षिणेस बॅक्ट्रिया हा देश पुरातन काळापासून प्रसिद्ध असून भारतीय वाङ्मयात त्याचे नाव बाल्हीक असे येते. हा प्रदेश प्रथम इराणी साम्राज्यात मोडत होता. अलेक्झांडरने इराणी साम्राज्य जिंकल्यावर बॅक्ट्रियाचा राजा ऑक्सियार्टस याच्या कन्येशी विवाह करून त्याला त्या प्रांताचा अधिपती नेमले. नंतर त्याच्या पुष्कळ ग्रीक अनुयायांनी बॅक्ट्रियन स्त्रियांशी विवाह करून तेथे वसती केली. अशा रीतीने बॅक्ट्रियामध्ये ग्रीक आणि इराणी संस्कृतींचे मिश्रण झाले.
अलेक्झांडरने वायव्य प्रांत आणि पंजाबचा काही भाग जिंकून तेथे आपले क्षत्रप नेमले होते. पण इ.स.पू. ३२३ मध्ये त्याचे निधन झाल्यानंतर त्या त्या प्रांतांतील लोकांनी बंडे करून त्यांना हाकून लावले. अलेक्झांडरच्या साम्राज्याचा पूर्वेकडील भाग सिरियापासून अफगाणिस्तानपर्यंतचा त्याच्या सील्यूकस नामक प्रबळ सेनापतीच्या वाट्यास आला होता. त्याने अलेक्झांडरप्रमाणे पंजाब प्रांत जिंकण्याचा प्रयत्न केला. पण त्या काळी तेथील राजकीय परिस्थिती बदलली होती. अलेक्झांडरच्या वेळी त्या प्रदेशात लहान गणराज्ये होती. त्यांना जिंकणे त्यास फार कठीण गेले नाही. पण आता तो प्रदेश शक्तिशाली मौर्य साम्राज्यात अंतर्भूत झाला होता. सील्यूकसने आक्रमण करताच चंद्रगुप्त मौर्याने त्याचा मोठ्या शौर्याने प्रतिकार करून विजय मिळविला. सील्यूकसला पंजाब जिंकण्याची आशा सोडावी लागली, एवढेच नव्हे तर आपल्या साम्राज्याचे पॅरोपमिसस (काबूल प्रदेश), ॲराकोझिया (कंदाहार) व एरिआ (हेरात), जिड्रोझिया हे प्रांत चंद्रगुप्ताला द्यावे लागले. चंद्रगुप्ताने त्याच्या मुलीशी विवाह करून त्याला इतरत्र युद्धात उपयोगी पडावे, म्हणून पाचशे हत्ती दिले. काबूल-कंदाहारचा भाग तेव्हापासून निदान अशोकाच्या राजवटीअखेर मौर्य साम्राज्यात मोडत होता. कंदाहार प्रांतात ग्रीक व ॲरेमाइक भाषांत लिहिलेले अशोकाचे व इतर शिलालेख अलीकडे उपलब्ध झाले आहेत.
सील्यूकसच्या साम्राज्यात बॅक्ट्रिया देश अंतर्भूत होता. सील्यूकसचा वंशज दुसरा अँटायओकस याच्या कारकीर्दीत इ.स.पू. २५o च्या सुमारास बॅक्ट्रियाने बंड करून स्वातंत्र्य पुकारले. त्या वेळी तेथील राज्याधिकारी डायॉडोटस होता. त्याचे जवळच्या पार्थियाच्या राज्याधिकाऱ्यांशी वैर होते पण पुढे त्याच्या मुलाने ही नीती बदलून त्याच्याशी सख्य केले. नंतर पार्थियाच्या राजाने सील्यूकसवंशी सत्ताधाऱ्याचा पराभव करून आपल्या व बॅक्ट्रियाच्या राजाच्या स्वातंत्र्याचे रक्षण केले.
दुसऱ्या डायॉडोटसचा पराभव करून बॅक्ट्रियाची गादी युथिडीमस नामक ग्रीकाने बळकावली. पण सील्यूकसवंशी तिसरा अँटायओकस याने पार्थियाच्या राजाचा पराभव करून बॅक्ट्रियावर स्वारी केली आणि त्याची राजधानी बॅक्ट्रा (बाल्ख)ला वेढा दिला. दोन वर्षांच्या वेढ्यानंतर युथिडीमसचा पुत्र डीमीट्रिअस याने संधी घडवून आणला. अँटायओकसने त्याच्या रूपाने आणि रुबाबाने आकृष्ट होऊन त्याला आपली कन्या दिली व नंतर तो भारतावर स्वारी करण्यास निघाला. या वेळी अशोकाच्या निधनानंतर अनेक प्रांताधिपतींनी मौर्यांचे स्वामित्व झुगारून स्वातंत्र्य पुकारले होते. वायव्य प्रांतात सुभगसेन नामक लहान प्रांताधिपती राज्य करीत होता. त्याच्यापासून काही खंडणी घेऊन अँटायओकस मेसोपोटेमियाला परत गेला.
चंद्रगुप्त मौर्य आणि अशोक यांच्या काळी सील्यूकस व त्याचा पुत्र पहिला अँटायओकस यांचे मौर्य सम्राटांशी सख्य होते. सील्यूकसने चंद्रगुप्ताच्या दरबारी मीगॅस्थीनीझ याला आपला दूत नेमले होते. अशोकाच्या शिलालेखांत यवनराज अँटायओकसचा उल्लेख आहे. पण अशोकाच्या निधनानंतर केंद्रीय मौर्यसत्ता दुर्बळ झाल्याने ग्रीकांच्या भारतावर स्वाऱ्या होऊ लागल्या. सिरियाच्या तिसऱ्या अँटायओकसच्या स्वारीचा उल्लेख मागे आला आहे. त्यानंतर युथिडीमसचा पुत्र डीमीट्रिअस याने इ.स.पू. दुसऱ्या शतकाच्या आरंभी भारतावर आक्रमण केले. त्याचा उल्लेख युगपुराणाच्या गार्गी संहितेत आला आहे. तीत म्हटले आहे की, दुष्ट आणि पराक्रमी यवन साकेत (अयोध्या), पेशावर (रोहिलखंड) आणि मथुरा या प्रदेशांवर आक्रमण करून कुसुमध्वज (पाटलिपुत्र) पर्यंत पोहोचतील. तेथे घनघोर युद्ध होईल. पण यवन फार काळ भारतात रहाणार नाहीत. युगपुराणातील हे वर्णन ग्रीक लेखकांच्या उल्लेखांशी जुळते. ते सांगतात की डीमीट्रिअस भारताच्या स्वारीत गुंतला असताना त्याच्या पश्चात युक्रेटिडीस नामक शूर ग्रीकाने बंड करून बॅक्ट्रियाची गादी बळकावली हे वृत्त समजताच डीमीट्रिअसला मध्य भारतातील काम सोडून बॅक्ट्रियाला परतावे लागले. त्याने बॅक्ट्रियाला वेढा घातला, युक्रेटिडिसने शौर्याची शिकस्त करून आपल्या राजधानीचे रक्षण केले. शेवटी डीमीट्रिअसला वेढा उठवून भारतात परतावे लागले.
डीमीट्रिअसने काही द्वैभाषिक नाणी पाडली. त्यांवर ‘महाराज अपराजित देमेत्रिक’ या अर्थाचा मजकूर पुढील बाजूवर ग्रीक भाषेत व लिपीत आणि मागील बाजूवर प्राकृत भाषेत व खर्राष्ठी लिपीत आढळतो. ही नाणी त्याच्या अंमलाखाली असलेल्या प्रदेशांकरिता चलन म्हणून पाडली होती. डीमीट्रिअसचा उल्लेख महाभारतात दत्तमित्र या नावे आला आहे. पतंजलीच्या महाभाष्यावरील टीकेतील दत्तमित्राने दक्षिण सिंधमध्ये स्थापिलेला तो दात्तामित्री डीमीट्रिअसच असावा. या वाक्यखंडातील डीमीट्रिअस भारताचा राजा होता, असा उल्लेख चॉसरच्या कँटरबरी टेल्समध्येही आला आहे.
डीमीट्रिअसला मध्य देशातून माघार घ्यावी लागली पण त्याच्या अंमलाखाली उत्तरापथ व सिंध यांचा बराचसा भाग होता असे दिसते.
डीमीट्रिअसनंतर पँटेलिऑन आणि आगॅथोक्लिझ या राजांनी बॅक्ट्रिया व भारत या दोन्ही देशांतील काही प्रदेशावर राज्य केले, असे त्याच्या नाण्यांवरून दिसते. हे दोन्ही डीमीट्रिअसचे पुत्र होते असे अनुमान आहे. डीमीट्रिअसने भारतावर स्वारी केली, त्या काळात त्याने बॅक्ट्रिया जिंकून घेतला. युक्रेटिडीसचीही काही द्वैभाषिक नाणी सापडली आहेत. त्यांवरून त्यानेही भारताचा काही भाग जिंकून तेथे काही काळ राज्य केले असावे असे दिसते. त्याने युथिडीमसच्या वंशातील ॲपोलोडोटस याच्या काही नाण्यांवर पुन्हा आपले छाप मारले आहेत. त्यांवरून ह्याने त्याच्याकडून काही प्रदेश जिंकून घेतला होता असे दिसते. ही नाणी कपिशा (सध्याचा काफिरीस्तान) प्रदेशाकरिता पाडली होती. तेव्हा तो प्रदेश युक्रेटिडीसने जिंकला होता असे दिसते.
युक्रेटिडीसला ठार मारून त्याचा पुत्र हेलिओक्लीस हा गादीवर आला पण त्याला ऑक्सस नदीच्या उत्तरेकडून आलेल्या रानटी शकांच्या आक्रमणामुळे बॅक्ट्रिया सोडून भारतात यावे लागले. बॅक्ट्रिया व भारताचा काही प्रदेश या दोन्हींवर राज्य करणारा हा शेवटचा ग्रीक राजा होय. याच्या नाण्यांच्या प्रकारावरून याच्या अंमलाखाली कपिशा व गांधार हे दोनही प्रदेश होते असे दिसते. चिनी साधन ग्रंथांप्रमाणे शकांनी बॅक्ट्रिया प्रदेश इ.स.पू. १३५ च्या सुमारास काबीज केला होता.
भारताच्या वायव्य व पंजाब प्रांतांत युथिडीमस आणि युक्रेटिडीस या दोघांचेही वंशज राज्य करीत होते. त्यांची नावे बहुतांशी त्यांच्या नाण्यांवरूनच माहीत झाली. या राजांची संख्या सु. तीस आहे. पण त्यांचा अनुक्रम व त्यांच्या अंमलाखालील प्रदेश यांविषयी निश्चित माहिती नाही. फक्त त्यांच्या नाण्यांच्या प्रकारांवरून काही माहिती ज्ञान होते.
युथिडीमसचे घराणे : डीमीट्रिअस, ॲपोलोडोटस आणि ⇨मीनांदर या तिघांनी भारताचा काही भाग जिंकला होता, असे ग्रीक ग्रंथकार सांगतात. ॲपोलोडोटस हा डीमीट्रिअसचा पुत्र होता, असा तर्क आहे. त्याच्या अंमलाखाली कपिशा, गांधार, पंजाबचा पश्चिम आणि दक्षिण भाग, सिंध व उत्तर गुजरातचा भडोचपर्यंतचा भाग हे प्रदेश होते, असे ग्रीक ग्रंथकारांचे उल्लेख आणि त्यांची नाणी यांवरून अनुमान करता येते.
दुसरा ग्रीक राजा मीनांदर किंवा मिलिंद याविषयी जास्त माहिती मिळते. मीनांदरचा युथिडीमस घराण्याशी संबंध होता, पण त्याची निश्चित माहिती नाही. रॅप्सनच्या मते डीमीट्रिअसची मुलगी ॲगोथेक्लिया त्याला दिली होती. मीनांदरच्या निधनानंतर तिने आपला पुत्र पहिला स्ट्रेटो याच्या वतीने राज्य केले. तिच्या आणि स्ट्रेटोच्या नावाने काही नाणी पाडली होती. पुढे पहिला स्ट्रेटो वयात आल्यानंतर स्वतंत्रपणे राज्य करू लागला. नंतर त्याचा पुत्र दुसरा स्ट्रेटा गादीवर आला, असे त्यांच्या नाण्यांवरून दिसते.
मीनांदरची नाणी काबूलपासून मथुरेपर्यंत सापडली आहेत. ती मुख्यतः चांदीची व तांब्याची असून विविध प्रकारची आहेत. अपोलोडोटसच्या निधनानंतर त्याने आपल्या राज्याचा जास्तच विस्तार केला.
याशिवाय युथिडीमस घराण्याच्या आणखी काही राजांची नाणी सापडली आहेत. त्यांपैकी कित्येक लहानलहान प्रदेशांवर एकाच काळी राज्य करीत असावेत. त्यांमध्ये अँटिमाक्स, फिलॉक्सेनस, निशिअस, हिप्पोस्ट्रेटस इ. आहेत. हिप्पोस्ट्रेटसनंतर भारतीय ग्रीक राजांचा उच्छेद करून शकाधिपतींनी त्यांची सत्ता बळकावलेली दिसते.
युक्रेटिडीसच घराणे : या घराण्यातही अनेक राजे होऊन गेले. त्यांत हेलिओक्लीसनंतर गादीवर आलेला अँटिआल्किडस हा सुप्रसिद्ध आहे. हा तक्षशिला येथे राज्य करीत होता. पण त्याचा अंमल कपिशा (काफिरीस्तान) पर्यंत पसरला होता, असे त्याच्या नाण्यांवरून दिसते. याने आपला हिलिओडोरस नामक दूत विदिशाच्या शुंगवंशी भागभद्र राजाच्या दरबारी ठेवला होता. हीलिओडोरसने भागवत पंथ स्वीकारून विदिशा (भिलसा) येथे भगवान विष्णूच्या देवालयासमोर एक गरुडस्तंभ उभारला होता. त्यावरील ब्राह्मी लेखांवरूनही माहिती मिळते.
याशिवाय या घराण्याचे आर्केबियस, डायोमीझीझ, इपँडर, प्यूकोलाऊस इ. राजे नाण्यांवरून ज्ञात झाले आहेत. पण त्यांच्याविषयी इतर माहिती मिळत नाही.
हर्मिअस हा शेवटचा ज्ञात ग्रीक राजा होय. हा काबूलवर राज्य करीत होता. याच्या सभोवारचा प्रदेश शकपहलवांनी काबीज केला होता. इतरत्र लहानलहान ग्रीक राज्ये होती. त्या सर्वांचे संरक्षण व्हावे, म्हणून याने दोन्ही घराण्यांचे एकीकरण करण्याचा प्रयत्न केला. तो स्वतः युक्रेटिडीसचा वंशज होता. त्याने युथिडीमसच्या घराण्यातील कॅलिओप या ग्रीक स्त्रीशी विवाह करून दोघांच्या नावे नाणी पाडली. पण ही नीती यशस्वी झाली नाही. लवकरच कंदाहारच्या पार्थियन (पहलव) राजांनी आक्रमण करून त्याचे राज्य काबीज केले. ही घटना इ.स.पू. पहिल्या शतकाच्या उत्तरार्धात घडली असावी.
विजेत्या पार्थियनांनी हर्मिअसच्या नावाने नाणी पाडणे चालू ठेवले. पण ही नंतरची नाणी हलक्या प्रतीची आहेत. शेवटी कुशाणवंशी कुझूल कडफीससने तो प्रदेश पार्थियनांपासून जिंकून घेतला. त्याने यापूर्वीप्रमाणे हर्मिअसच्या नावे नाणी पाडून त्यांवर आपलेही नाव घातले. या नाण्यांवरून काही विद्वानांनी असा तर्क केला होता की, हर्मिअस कुझूल कडफीससच्या काळापर्यंत काबूलच्या प्रदेशावर राज्य करीत होता पण वस्तुस्थिती तशी नव्हती.
याप्रमाणे भारतातील ग्रीक सत्तेची कथा आहे. अलेक्झांडरची स्वारी झंझावातासारखी होती. तिच्यामुळे भारतीय सामाजिक जीवनावर व संस्कृतीवर फारसा परिणाम झाला नाही. पण या ग्रीकांची राज्ये सु. दोन शतके टिकली व त्यामुळे भारतीयांचा आणि ग्रीकांचा घनिष्ठ संबंध येऊन दोघांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनावर तसेच कलांवर बराच परिणाम घडून आला. अनेक ग्रीकांनी हिंदू किंवा बौद्ध धर्म स्वीकारला. तक्षशिलेच्या राजाचा दूत हिलिओडोरस या ग्रीक भागवताचे उदाहरण मागे दिले आहे. मीनांदरने बौद्ध धर्म स्वीकारला होता. दुसऱ्या एका थीओडोरस नामक ग्रीकाने उद्यान (स्वात नदीचे खोरे) येथे बुद्धाच्या अवशेषांवर स्तूप उभारला होता. महाराष्ट्रात व इतरत्र अनेक ग्रीक (यवन) येऊन राहिले होते. त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारून कार्ले येथील व इतर ठिकाणच्या चैत्यादिकांस दाने दिलेली कोरीव लेखांत उल्लेखिली आहेत.
याच्या उलट ग्रीकांच्या कलांचा भारतीय कलांवर मोठा परिणाम झाला. ग्रीकांच्या आगमनापर्यंत भारतीय नाणी आहत (पंच-मार्क्ड) प्रकारची होती त्यांवर ते नाणे पाडणाऱ्याचे नाव नसे. ग्रीकांनी नाणकशास्त्रात प्रगती केली. बॅक्ट्रियन राजांच्या नाण्यांवर त्यांचे मुखवटे सुंदर प्रकारे उमटवलेले आढळतात. भारतात आल्यावर या ग्रीक कलाकारांचे कसब पूर्वीइतके राहिलेले दिसत नाही. तथापि ते बरेच वरच्या दर्जाचे आहे. काही भारतीय गणांच्या – उदा., कुणिंद व औदुंबर – यांच्या नाण्यांवर ग्रीक नाण्यांचा प्रभाव पडलेला दिसतो. याच्या उलट भारतीय ग्रीक राजांनी भारतीय नाण्यांचे, आकारादिकांच्या बाबतीत अनुकरण केलेले आढळते. बॅक्ट्रियातून ग्रीक कलाकार भारतात आले आणि त्यांनी शिल्पाच्या ग्रांधारनामक शैलीचा पाया घातला या गांधार शैलीचा परमोत्कर्ष नंतर शकपहलव आणि कुशाण राजांच्या काळी घडून आला [→ गांधार शैली].
इतर काही बाबतींत मात्र ग्रीक संस्कृतीचा भारतीय संस्कृतीवरील प्रभाव विवादास्पद आहे. उदा., काही विद्वानांनी भारतीयांनी नाट्यकला ग्रीकांपासून घेतली असे विधान केले आहे, पण त्याला प्रमाण नाही. भारतात नाट्यकलेचा उगम इ.स.पू. कित्येक शतके झाला होता. पाणिनीच्या अष्टाध्यायीत नटसूत्रांचा निर्देश आहे. पतंजलीच्या महाभाष्यांत रंगभूमीवर केलेल्या नाटकांच्या प्रयोगांचा उल्लेख आहे. तेव्हा संस्कृत नाट्यकलेवर ग्रीक नाट्यकलेचा काही परिणाम झाला होता असे दिसत नाही.
संदर्भ : 1. Sastri, K. A. N. Comprehensive History of India, Vol. II, Madras, 1957.
2. Tarn, W. W. The Greeks in Bactria and India, Cambridge, 1966.
3. Woodcock, George, The Greeks in India, London, 1966.
मिराशी, वा. वि.
“