ग्रीअर्सन, सर जॉर्ज एब्राहॅम : (७ जानेवारी १८५१–९ मार्च १९४१). प्रख्यात आयरिश प्राच्यविद्यापंडित. जन्म डब्लिनजवळ ग्लेनेजरी येथे. ट्रिनिटी कॉलेज, डब्लिन येथे भारतीय भाषांचे शिक्षण. १८७३ मध्ये ते ‘इंडियन सिव्हिल सर्व्हिस’ मध्ये आले. पुढील तीस वर्षे त्यांनी हिंदुस्थानात वेगवेगळ्या हुद्यांवर कामे केली. १८९८ ते १९o२ या काळात त्यांनी भाषिक पाहणीचे प्रमुख म्हणून काम केले. पुढे हे काम त्यांच्याच मार्गदर्शनाखाली १९२७ पर्यंत चालले. या काळात त्यांनी भारतीय भाषा व साहित्य यांवर अनेक ग्रंथ लिहिले. लिग्विंस्टिक सर्व्हे ऑफ इंडिया (१९ खंड, १८९४–१९२७) या महान ग्रंथाखेरीज ॲन इंट्रोडक्शन टू द मैथिली डायलेक्ट ऑफ द बिहारी लँग्वेज (१९१o), अ मॅन्युअल ऑफ काश्मीरी लँग्वेज (१९११), लल्ला-वाक्यानि (१९२o) वगैरे अनेक पुस्तके आणि लेख त्यांनी लिहिले असून भारतीय भाषांचे त्यांनी केलेले वर्गीकरण अद्यापही बऱ्याच अंशी मान्य आहे. १९१२ साली त्यांना ‘नाइटहूड’ व १९२८ मध्ये इंग्लंडचा ‘द ऑर्डर ऑफ मेरिट’ हा सर्वोच्च बहुमान मिळाला. ते कँबर्ली (सरे) येथे निधन पावले.
कालेलकर, ना. गो.