ग्रामदैवते :  ग्रामसंस्थेला भारतात विशेष महत्त्व असून ह्या ग्रामांची जी संरक्षक दैवते आहेत, त्यांना ग्रामदैवते म्हणतात. ग्रामसंस्थेत ह्या ग्रामदैवतांनाही प्राचीन काळापासून फार महत्त्व असल्याचे दिसून येते. भारतात आर्यांच्या वसाहती होण्यापूर्वीपासून भारतातील मूळ रहिवाशांच्या ह्या देवता असाव्यात कारण वैदिक साहित्यात येणाऱ्या देवदेवतांहून त्यांचे स्वरूप वेगळे आहे. वैदिक दैवते सात्त्विक व राजस आहेत, तर ही ग्रामदैवते तामस प्रकृतीची आहेत. त्यांची मंदिरे व मूर्ती वैदिक दैवतांसारखी कोरीव व आकर्षक नसून ती ओबडधोबड, तर काही केवळ प्रतीकात्मक आहेत. त्यांना पंचपक्वान्नांचे नैवेद्य चालत नाहीत, तर कोंबडा, बकरा, रेडा, बैल, नरबली तसेच अफू, मद्य, भांग लागते. तात्पर्य वैदिक देवतांहून त्यांचे स्वरूप व प्रकृती सर्वस्वी भिन्न असल्याकारणाने, ती आर्यपूर्व मूळ भारतीयांची दैवते असावीत, असे म्हणावयास हरकत नाही. अर्थातच आर्य भारतात स्थायिक झाल्यावर स्वतःच्या दैवतांसोबतच त्यांनी येथील आर्यपूर्वांच्या दैवतांचाही बऱ्याच प्रमाणात स्वीकार केला असावा.

ग्रामदैवतांच्या यात्रा व उत्सव यांत कुंभार, लोहार, धोबी, धनगर, सुतार, महारादी जातींच्या लोकांना विशेष मान असतो. ही ग्रामदैवते त्यांच्यात व्यवसायस्थानी किंवा घरात स्थानापन्न झालेली असतात. ही ग्रामदैवते समाजातील खालच्या स्तरातील व्यक्तींच्या घरात व व्यवसायस्थानी असण्याचे आणि त्या दैवतांच्या यात्रा व उत्सव यांत, त्या त्या जातीतील व्यक्तींना मान असण्याचे कारण पाहू गेल्यास, ही ग्रामदैवते आर्यपूर्व भारतीयांची असावीत असे मानावे लागते. आर्य हे जेते असून आर्यपूर्व हे जित आहेत. जेत्या आर्यांनी जित आर्यपूर्वांना आपला सामाजिक दर्जा अर्थातच दिला नाही आणि त्यांना हीन लेखले. अर्थातच हीन समजल्या गेलेल्या ह्या जातिजमातींतच त्यांची दैवतेही राहिली आणि त्यांच्या पूजादी उपचारांचा व उत्सवांचा मानही त्यांच्याकडे परंपरेने चालत राहिला. पुढे संस्कृतिसंगमात आर्य व आर्यपूर्वांनी एकमेकांच्या दैवतांना विशिष्ट मर्यादेपर्यंत मान्यता दिली व ते परस्परांच्या दैवतांचे उपासक बनले.

बहुतांश ग्रामदैवते स्त्रीरूपी आहेत. मोहें-जो-दडो व इतर अनेक ठिकाणी झालेल्या उत्खननांत मातृदेवतेच्या मूर्ती वैपुल्याने सापडल्या आहेत. मातृदेवता ही सृजनाची देवता होय. भारताबाहेरही कृषिदेवता ह्या स्त्रीरूपीच मानल्या गेल्या आहेत. शेतीचा आरंभ प्रथम स्त्रीने कला, असे मानले जाते. जमीन आपल्या उदरात बीज धारण करून धान्य पिकविते. स्त्रीने भूमीच्या ठायी आत्मत्वाची कल्पना केली. विपुल धान्य पिकवून सर्वांचे संभरण व पोषण करणारी भूमी देवतास्वरूप आहे, अशी कल्पना तत्कालीन मानवास सुचणे स्वाभाविक आहे. भूमिदेवता मनात आणेल, तर विपुल पिकवेल किंवा दुष्काळ पाडेल किंवा रोगराई, भूकंप, महापूर, आगीसारखी संकटे आणून सर्वनाशही घडवेल, असे तत्कालीन मानवास वाटल्यावरून त्याने भूमिदेवतेची पूजा बांधली असावी. ‘धरतीमाता’ किंवा ‘काळी’ ह्या देवतेचा उगम ह्या कल्पनेतून झाला असणे संभवते. वारुळाच्या प्रतीकात भूमीची पूजा होऊ लागली. दक्षिण भारतात व महाराष्ट्रात वारुळाची पूजा सर्वत्र आढळते. शिव-शक्ती, पुरुष-प्रकृती  ह्या आद्य तत्त्वांच्या जोड्यांतील शक्ती, प्रकृती ही तत्त्वे स्त्रीरूपी मानली असून त्यांचा सृष्टीच्या उत्पत्तीशी किंवा सृजनाशी संबंध आहे.

ही ग्रामदैवते स्थान आणि जातिजमातींपरत्वे भिन्न भिन्न नावाची आहेत व त्या प्रत्येक नावामागे काही दंतकथा आणि आख्यायिका आहेत. त्यांची स्थाने गावाबाहेर किंवा गावातील एखाद्या कोपऱ्यात कुठे तरी डामडौलाशिवाय असतात. त्यातही त्यांची मूर्ती असतेच, असे नाही आणि असली तरी ती अत्यंत ओबडधोबड असते. एखाद्या वृक्षाखाली, निसर्गरम्य ठिकाणी, जलाशयाजवळ, साध्या फांद्यांच्या मांडवाखाली किंवा एखाद्या चौथऱ्यावर ही ग्रामदैवते विराजमान झालेली असतात. एखादा दगड, खुंट, वृक्षाची जमिनीबाहेर आलेली मुळे किंवा दगडाचा ओबडधोबड मुखवटा अथवा एखाद्या मडक्यात कडुलिंबासारख्या एखाद्या वृक्षाची डहाळी, असे ह्या दैवतांचे स्वरूप असते. काही उत्सवप्रसंगी कुंभार ह्या दैवतांच्या मातीच्या मूर्तीही तयार करतो. उत्सव संपताच गावशिवेवर नेऊन त्या मूर्तीचे विसर्जन करतात. ह्या दैवतांचे पुजारी सर्वसामान्यतः शूद्र किंवा वैश्य वर्गातील असतात.

ग्रामदेवतांची कृपा असेल तर रोगराई, दुष्काळादी नैसर्गिक आपत्ती येत नाहीत तसेच धनधान्याची विपुलता होऊन सर्वांचे कल्याण होते, अशी भाबडी पण ठाम समजूत ग्रामीण जनतेत आहे. ग्रामदैवते ही तामस प्रवृत्तीची व शीघ्रकोपी आहेत. त्यांचा कोप झाला तर सर्वांनाच पीडा होते. गावावर विघ्न, रोगराई किंवा नैसर्गिक आपत्ती येऊ नये, म्हणून ह्या ग्रामदैवतांना नवस बोलतात व तो फेडतात. दरवर्षी जत्रा-उत्सवादी करून त्यांना संतुष्ट करतात. ग्रामदैवतांपुढे पशु-पक्ष्यांचे बली देण्यात येतात. पूर्वी नरबली देण्याचीही प्रथा होती परंतु आता ती कायद्याने बंद आहे.

अनेक ग्रामदैवतांचा पुरोहित वर्ग ‘भगत’ ह्या नावाने ओळखला जातो. ‘भगत’वृत्ती वंशपरंपरेने अने कुटुंबात चालत आलेली असते. भज्-‘भक्त’चेच ‘भगत’ हे रूप आहे. भवानीचे निष्ठावत भगत (भक्त) अनेक असल्याचे आपण पाहतोच. बंजारा (लमाणी) लोकांतही त्यांच्या ‘शिवामाया’ ह्या देवाच्या पुरोहितास भगत म्हणूनच ओळखतात आणि ही वृत्ती वंशपरंपरेने त्या त्या घराण्यात चालत आलेली असते. ग्रामदैवतांच्या उपासनेचा मूळ उगम कदाचित भयातून झालेला असणे शक्य आहे तथापि भक्तीलाही त्यांच्या उपासनेत महत्त्वाचे स्थान आहे. अनेक वन्य जमातींत त्यांच्या त्या त्या दैवताची, तसेच ग्रामीण समाजातही त्या त्या ग्रामदैवताची निष्ठापूर्वक केली जाणारी भक्ती आढळून येते.

ह्या ग्रामदैवतांत जरी, मरी, म्हसोबा, जोतिबा कोकणातील रवळनाथ, सांतेरी, भुमका विदर्भातील आसरा, सुपोबा, शिवाभाया, भैरोबा (भैरव, बहिरोबा) पश्चिम महाराष्ट्रातील खामजाई, सोनजाई, मांढरदेवी, काली, मातृका दक्षिण भारतातील पेडुम्मा, पोलेरम्मा किंवा महाराष्ट्रातील इतर ठिकाणी आढळणारे मुंजा, वेताळ (आग्या व रुद्र) ही ग्रामदैवते विशेष प्रसिद्ध आहेत. दुर्गम ठिकाणी तसेच मोठमोठ्या घाटांतील रस्त्यांवर त्या त्या क्षेत्राचे एखादे दैवत असते व ते त्या त्या क्षेत्रापुरते आपला प्रभाव दाखविते. उत्तर भारतातील बहुतांश ग्रामदैवते पुरुषरूप आहेत. भूमिया, दातनदेव, गंगानाथ, सेंदुबीर, जठेरा, घनसाम, राजा लाखन, राजा चंडोल, दुल्हादेव, गूगाजी इ. त्यांतील प्रमुख होत.

विदर्भातील खेड्यांत गावाबाहेर एखाद्या दुर्लक्षित ठिकाणी एक-दोन झेंडे उभारलेले असतात. तेथे पडक्या-झडक्या जागेत मरीमाय, म्हसोबा किंवा आसरा यांसारख्या दैवतांचे स्थान असते. आसरा बहुधा विहीर, तलाव, डोह अशा जलाशयांच्या ठिकाणी असतात. सात दगडांना शेंदूर फासून आसरांची प्रतिष्ठापना केलेली आढळते. त्यांच्यापुढे तसेच मरीमायपुढेही हिरवा खण, नारळ व हिरव्या बांगड्या आढळतात. त्या भाविकांनी वाहिलेल्या असतात. मरीमाय किंवा देवीपुढे लोकांनी आपापल्या मुलामुलींचे जावळ कुलाचार परंपरेनुसार वाहिलेले असते. देवीची मूर्ती सर्वसामान्यतः संपूर्ण नसते, तर तो एक फार मोठा दगडी मुखवटा असतो. त्यास शेंदूर फासून डोळे तेवढे पांढरे दाखविलेले असतात. लग्नकार्यादी मंगल प्रसंगी सुरुवातीस त्या त्या ग्रामदैवताची कुलाचार म्हणून पूजा केली जाते व त्या त्या दैवतास संतुष्ट केले जाते. फिरत्या वन्य टोळ्यांचा ज्या ठिकाणी मुक्काम असेल, तेथे त्यांच्या वसतीजवळ त्यांच्या दैवताची स्थापना केलेली असते. तेथे काही झेंडे उभारलेले असतात व उदबत्ती, हळदकुंकू वाहिलेले आढळते. त्या टोळीचे हे संरक्षक दैवत होय. ह्या ग्रामदैवतांना लोक वेगवेगळ्या उद्दिष्टांनी नवस बोलतात व फेडतात. नवस बोलण्यात अघोरी व आत्मक्लेशपर प्रकारही असतात. उदा., विस्तवावरून चालत जाणे, साष्टांग नमस्कार किंवा लोळण घेत दैवतासमोर जाणे, स्वतःच्या केसास बांधून रथ ओढणे किंवा ‘बगाड’ घेणे इ. नवस ह्या दैवतांना बोलले जातात व फेडले जातात. संकटनिवारण, रोगनिवारण, पुत्रप्राप्ती, विवाह, पर्जन्यवृष्टी इ. हेतूंनी हे नवस बोलले जातात.

महाराष्ट्रातील वेताळासारखाच दक्षिणेत शास्ता किंवा अय्यनार हा ग्रामदेव असून त्याला तेथे विशेष महत्त्व आहे. चामुंडा, शीतलादेवी (माता) किंवा दुर्गा, कालम्मा हे मातृदेवतेचे रूप असून गुजरात, राजस्थान व बंगालमध्ये त्यांना विशेष मानतात. गोंगा हे गारो लोकांचे पुरुषदैवत आहे. गोंटी ही दक्षिण भारतातील माल जमातीची देवता असून ती दुष्काळनिवारण करते, अशी त्यांची समजूत आहे. गोंड जमातीत दुल्हादेव व बडादेव ह्या ग्रामदैवतांना फार मानतात. दक्षिण भारतातील जमातींमध्ये कालिरम्म, पिडारी, मुत्तयालम्म, गंगम्म, चाऊदम्म, दुर्गम्म, नेलरम्म, हुलिअम्म, बिसलमरी ह्या स्त्री देवतांना महत्त्व आहे. ग्रामसिरी ही ओरिसातील चस जमातीची देवता होय. तसेच चामुंडा किंवा चामडदेवी हीदेखील ओरिसातील ग्रामदेवता होय. कोकणात गिरमाई, गोलांबिका, जाखाई, नवलाई, पावणाई, केळाई, केडजाई ही स्त्रीरूपी ग्रामदैवते प्रामुख्याने आढळतात. बिहार—ओरिसातील चेरो जमातीचा दुआठ हा ग्रामदेव आहे. जरा, गृहदेवी किंवा हारिती नावाची एक राक्षसी आणि देवता बिहारमध्ये बालकांची संरक्षक देवता मानली जाते. तसेच छाछीदेवी किंवा चर्चिकादेवी किंवा जातमातृदेवता ही उत्तर प्रदेशात बालसंरक्षक देवता म्हणून मानतात. नेफातील आदिवासी जमातींत वेगवेगळ्या प्रकारच्या ‘वियू’ देवतेस महत्त्व आहे.

पौराणिक व वैदिक देवतांत ज्यांचा समावेश होत नाही, पण समाजाच्या खालच्या स्तरांत जी दैवते उपासनेत असतात, त्यांना क्षुद्रदैवते म्हटले जाते. ही दैवते वीर स्त्रीपुरुषांचे अथवा पूर्वजांचे आत्मे मानली जातात. नैसर्गिक आपत्ती, रोगराई इ. त्यांच्याच कोपामुळे उद्‌भवतात व पूजा-बलिदानादीने त्यांचा कोप शमविल्यास त्यांचे निवारण होते, अशी समजूत आहे. धातू, लाकूड वा शिळा यांपासून त्यांच्या मूर्ती केलेल्या असतात. गावशिवेवर अथवा घुमटीतही त्यांच्या मूर्ती स्थानापन्न करतात. त्यांच्या पूजेचा व नैवेद्याचा वर्षातील दिवस ठराविक असतो. रोडगा, भात, खिचडी, तेलपोळी इ. पदार्थ तसेच पशु-पक्ष्यांचा बली त्यांना प्रिय असतो.

संदर्भ : 

1. Crooke, W. The Popular Religion and Folk-lore of Northern India, 2 Vols.,      Delhi, 1968.

2. Elmore, W. T. Dravidian Gods in Modern Hinduism, Madras, 1925.

3. Spratt, P. Hindu Culture and Personality, Bombay, 1966.

4. Whitehead, H. The Village Gods of South India, Calcutta, 1921.

सुर्वे, भा. ग.

 

शितळादेवी मुंजा श्रीनाथ म्हस्कोबा
आसऱ्या मरीआई वेताळ
भैरव जरीमरी