ग्रॅहॅम, टॉमस : (२o डिसेंबर १८o५ —११ सप्टेंबर १८६९). ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ. त्यांनी कलिलीय (अतिसूक्ष्म कण लोंबकळत्या स्थितीत असलेल्या द्रव मिश्रणासंबंधीच्या) रसायनशास्त्रात मूलभूत महत्त्वाचे कार्य केले. त्यांचा जन्म ग्लासगो येथे झाला व तेथेच विद्यापीठात शिक्षण घेऊन त्यांनी ‘मास्टर ऑफ आर्ट्स’ ही पदवी १८२६ मध्ये मिळविली. त्यानंतर एडिंबरो येथे टॉमस होप यांच्या प्रयोगशाळेत त्यांनी संशोधनकार्य केले. तेथील ‘अँडरसन इन्स्टिट्यूट’ मध्ये ते १८३o—३७ पर्यंत रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. १८३७—६९ या कालखंडात ते लंडनमधील युनिव्हर्सिटी कॉलेजात प्राध्यापक होते. १८५५—६९ या काळात ते टांकसाळीचे मुख्याधिकारीही होते.
द्रव्यामध्ये वायूचे शोषण या विषयावर त्यांचा संशोधनात्मक लेख १८२६ मध्ये प्रसिद्ध झाला. त्यानंतर १८२९ मध्ये वायूंच्या विसरणासंबंधी (रेणू एकमेकांत मिसळण्यासंबंधी) त्यांनी असे प्रतिपादिले की, वायूंच्या विसरणाचा वेग त्यांच्या घनतेच्या वर्गमुळाच्या व्यस्त प्रमाणात असतो. हा महत्त्वाचा नियम त्यांच्याच नावाने प्रसिद्ध आहे. मिठासारख्या पदार्थांचा एक वर्ग (स्फटिकाभ) आणि डिंकासारख्या पदार्थांचा एक वर्ग (कलिल) असे पदार्थांचे दोन वर्ग पडतात, असे त्यांनी प्रतिपादन केले. या दोन्ही वर्गांतील घटक असलेले मिश्रण पार्चमेंट (पाणी व तेलकट पदार्थ यांना रोध करणाऱ्या) कागदातून पार जाऊ दिले, तर त्यांचे घटक वेगळे करता येतात हे त्यांनी दाखविले व विलगीकरणाची अपोहन (पार्चमेंट इ. अर्धपार्य पटलांचा उपयोग करून स्फटिकाभ व कलिल वेगळे करणे) ही पद्धती बसविली.
ऑर्थो, मेटा आणि पायरो व फॉस्फोरिक अम्लाच्या प्रकारांचा त्यांनी अभ्यास केला आणि त्यावरून फॉस्फोरिक ॲनहायड्राइडाशी पाणी वेगवेगळ्या प्रमाणात संयोग पावल्यामुळे त्यात भेद निर्माण होतो असे प्रतिपादिले. लंडन केमिकल सोसायटीचे ते पहिले अध्यक्ष होते (१८४१). कॅव्हेंडिश सोसायटीचेही १८४६ मध्ये ते अध्यक्ष होते. रॉयल सोसायटीचेही ते सदस्य होते. संशोधनाबद्दल त्यांना अनेक पदके मिळाली. एलेमेंट्स ऑफ केमिस्ट्री हा ग्रंथ त्यांनी १८३३ मध्ये लिहिला व त्याच्या अनेक आवृत्त्याही नंतर प्रसिद्ध झाल्या. ते लंडन येथे मृत्यू पावले.
जमदाडे, ज. वि.