ग्रॅमिनी : (इं. ग्रास फॅमिली सं. तृण कुल). फुलझाडांपैकी (एकदलिकित, आवृतबीजी) या वनस्पती ⇨ग्रॅमिनेलीझ
या गणात अंतर्भूत असून ⇨गवते किंवा ‘तृण’ या नावाने सुपरिचित आहेत. या जगभर पसरलेल्या असून उष्ण व समशीतोष्ण कटिबंधांत विशेष प्रमाणात आढळतात. त्या वर्षायू किंवा बहुवर्षायू (एक किंवा अनेक वर्षे जगणाऱ्या) असून बहुधा ⇨ओषधी, क्वचित क्षुपे (झुडपे) किंवा वृक्ष [→ वासा कळक] असतात वंश सु. ६२० आणि जाती ५,०००. खोड बहुधा पोकळ, संधियुक्त (पेरेदार) किंवा संधिक्षोड [→ खोड] पण सांध्यात भरीव असते. पाने साधी, एकांतरित (एकाआड एक), दोन रांगांत असून आवरक (खोडास वेढणारे) पर्णतल खोडाभोवती बंद किंवा चिरलेले व साधारण नळीसारखे असते. पाते लांब, फार अरुंद आवरकाच्या संधीजवळ पातळ पापुद्र्यासारखे किंवा केसाळ उपांग (जिव्हिका) असते. फुलोरा कणिशकांचा बनलेला असून प्रत्येकात तुषे व पुष्पके विविध प्रकारे रचलेली आढळतात. फुले बहुधा द्विलिंगी, क्वचित एकलिंगी असतात तसेच पुं-पुष्पे व स्त्री-पुष्पे एकाच झाडावर पण भिन्न कणिशात (उदा., मका) किंवा एकाच कणिशात (उदा., बाजरी) असतात. स्पिनिफेक्स वंशातील जाती विभक्तलिंगी असतात. प्रत्येक पुष्पकास बाहेरच्या बाजूस परितुष व आत अंतस्तुष अशी शुष्क व बहुधा पातळ छदे संरक्षण देतात. याशिवाय ज्या कणिशात अशी एक किंवा दोन पुष्पके असतात त्यांनाही एक दोन मोकळी बाह्यतुषे असतात. कणिशकेही विविध प्रकारे (मंजरी, परिमंजरी, कणिश इ.) फुलोऱ्याच्या अक्षावर मांडलेली असतात [→ पुष्पबंध]. परिदलांच्या अभावी पुष्पकात २-३ लहान खवल्यासारखी पातळ किंवा मांसल ‘लघुतुषे’ असतात केसरदले बहुधा ३ किंवा ३ + ३, परागकोश सहज हलणारे (विलोल) किंजदले तत्त्वतः ३ पण दोनांचा ऱ्हास होऊन एकच शिल्लक राहते किंजपुटातील एकाच कप्प्यात एक वक्रमुख बीजक व दोन केसाळ किंजल्के असतात [→ फूल]. फळ शुष्क, न तडकणारे, एकबीजी, फलावरणास बीजावरण चिकटलेले असे ‘सस्यफल’ प्रकारचे असते [→ फळ]. बीजात पुष्क (विकासावस्थेतील बीजातील गर्भाच्या पोषणास मदत करणारा भाग) भरपूर व गर्भ एका टोकास असतो फळास कधी तुसे चिकटलेली व तुसाचे टोक कमीजास्त प्रमाणात लांब (प्रशूक) असते.
मनुष्यप्राणी स्वतःकरिता व आपल्या पाळीव जनावरांकरिता गवताचा उपयोग विशेषेकरून अन्न व घरबांधणी यांकरिता फार प्राचीन काळापासून करीत आला असून त्यांत सुधारणा करून ती अधिक उपयुक्त बनवीत आला आहे. औषधे, सुगंधिद्रव्ये तसेच चटयांसारखी अंथरणी, बुट्ट्या, झाडण्या अशा अनेक किरकोळ वस्तू आणि कागद, साखर व गूळ यांसारख्या अत्यंत उपयुक्त वस्तूही त्याला गवतांपासून मिळतात.
पहा : ऊस कळक गहू चिवरी ज्वारी दुर्वा बांबू भात मका रोहिश वासा.
ठोंबरे, म. वा.
“