ग्रंथालय : ग्रंथालय म्हणजे ग्रंथसंग्रहाचे स्थान. ग्रंथालय ही प्राचीन सामाजिक संस्था असून तिला मोठा इतिहास आहे आणि तो मानवसंस्कृतीशी समांतर आहे. ग्रंथ, वाचक आणि ग्रंथालयातील सेवक हे ग्रंथालयाचे तीन प्रमुख घटक होत. या घटकांचे स्वरूप व त्याविषयाच्या कल्पना कालमानानुसार बदलत गेल्याचे आढळून येते. याबरोबरच ग्रंथालयाची वास्तू, ग्रंथालयीन प्रशासन, आंतरग्रंथालयीन सहकार्य व आंतरराष्ट्रीय ग्रंथालयीन संघटना इ. घटकही आधुनिक ग्रंथालयविचारात येतात. ग्रंथालयाचे प्रकार आणि कार्य यांचाही विचार या संदर्भात महत्त्वाचा असतो.
प्राचीन ग्रंथालयांत इष्टिका,पपायरस व चामडे यांवर लिहिलेले ग्रंथ असत. त्यात पुढे हस्तलिखित ग्रंथांची व नंतर मुद्रित ग्रंथांची भर पडली. आधुनिक ग्रंथालयांत ग्रंथांबरोबर नियतकालिके, कागदपत्रे, हस्तलिखिते, नकाशे, छायाचित्रे, शिल्पाकृती, शिलालेख, नाणी, तिकीटे, ध्वनिमुद्रिका, मुद्रित फीती, सूक्ष्मपट (मायक्रोफिल्म), सूक्ष्मपत्र (मायक्रोकार्ड), लेखछायाचित्रे, कात्रणे इ. प्रकारचे दृक्श्राव्य ज्ञानसाहीत्य संग्रहीत केले जाते. प्राचीन ग्रंथालयातील इष्टिका, शिला, चर्म अथवा तत्सम साधनांद्वारे तयार केलेले ग्रंथ दुर्मिळ असल्यामुळे त्यांचे रक्षण करणे एवढेच कार्य ग्रंथपालाला यापूर्वी असे परंतु आधुनिक युगात ग्रंथ सुलभ झाल्यामुळे ग्रंथपालाच्या कार्याची व्याप्ती वाढली आहे. वाचकांना ग्रंथांचा अधिकाअधिक उपयोग करू देऊन ज्ञानाचा प्रसार समाजात कसा करता येईल, वाचकांशी आपुलकीने वागून त्यांच्या जिज्ञासा व गरजा तत्परतेने कशा पुऱ्या करता येतील, जिज्ञासूंना यथायोग्य मार्गदर्शन करून ज्ञान, मनोरंजन तसेच नागरिकत्वाची व सुसंस्कृतपणाची जाणीव त्यांच्यात कशी वाढेल, त्यांचे व्यक्तिमत्त्व सुसंपन्न कसे होईल यांसाठी सदैव सिद्ध राहणारा ग्रंथपाल आजच्या ग्रंथालयाचा प्रमुख घटक मानला गेला आहे.
रम्य व सोयीची जागा, तज्ञ व तत्पर ग्रंथपाल, उपयुक्त ग्रंथांचा संग्रह, ग्रंथांची शास्त्रशुद्ध रचना व आर्थिक सुस्थिरता ही आदर्श ग्रंथालयाची पाच महत्त्वाची अंगे मानली जातात. अशा ग्रंथालयाकडून पुढील कार्याची अपेक्षा करण्यात येते : (१) शैक्षणिक कार्य : समाजातील कोणत्याही लहान-मोठ्या, स्त्री-पुरुष, गरीब-श्रीमंत व्यक्तीला स्वतः ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी ज्ञान-साहित्य उपलब्ध करून देणे. (२) संशोधनात्मक कार्य : प्रत्येक विषयावर संशोधनयोग्य असे अद्ययावत ज्ञानसाहित्य संग्रहित करणे. (३) राजकीय कार्य : स्थानिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रश्नांवरील माहिती कोणताही पूर्वग्रह न बाळगता सर्वांना उपलब्ध करून देणे. (४) औद्योगिक कार्य : उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी आवश्यक ती माहिती, नवे विचार, वैज्ञानिक व तांत्रिक संशोधन यांची अद्ययावत माहिती संशोधक, संयोजक व तंत्रज्ञ यांना उपलब्ध करून देणे. (५) सांस्कृतिक कार्य : भावी पिढ्यांसाठी ज्ञान जतन करून ठेवणे. या गोष्टी लक्षात घेता ग्रंथालय म्हणजे समाजाच्या सर्वांगीण प्रगतीचा मानदंड होय, असे म्हणावे लागेल.
ग्रंथालयांचा इतिहास : जागतिक ग्रंथालये : अलीकडील उत्खननांत प्राचीन काळातील शहरांचे जे अवशेष सापडले त्यांवरून जगातील सर्वांत प्राचीन ग्रंथालये सुमेरियन व बॅबिलोनियन संस्कृतींच्या काळात अस्तित्वात होती, असे सिद्ध होते. उदा., ख्रि. पू. २७०० वर्षे धार्मिक व शासकीय ग्रंथालये होती. टेयो येथील एका ग्रंथालयात तीस हजार ग्रंथ होते. चुनखडीपासून तयार केलेल्या विटांवर, धातू अथवा लाकूड यांपासून तयार केलेल्या लेखणीने क्यूनिफॉर्म लिपीत लिहिलेल्या इष्टिकाग्रंथांचा संग्रह म्हणजे जगातील पहिला ग्रंथसंग्रह होय. धार्मिक वचने, प्रार्थना, मंत्रतंत्र, लोककथा, न्यायनिवाडे यांबरोबरच तत्कालीन सामाजिक, राजकीय व तात्त्विक वाङ्मयाचे नमुनेही या इष्टिकाग्रंथात आढळले आहेत.
बॅबिलोनियन संस्कृतीला सुमेरियन संस्कृतीचा वारसा मिळालेला होता. ह्या काळी देवालये व राजवाडे यांमधून ग्रंथसंग्रह केला जाई. बॉर्सिपा येथे एक महत्त्वाचे ग्रंथालय होते. व्यापार, दैनंदिन घटनांच्या नोंदी, राजकीय व धार्मिक आदेश यांच्यासाठी इष्टिकांचा वापर होई. जगातील कायद्याची पहिली संहिता हामुराबी या राजाने निर्माण केली. ती इष्टिकाग्रंथावर लिहिलेली असून सध्या ती पॅरीसमधील ग्रंथालयात उपलब्ध आहे.
ॲसिरियन राजघराणे बॅबिलोनियन संस्कृतीच्या काळात अस्तित्वात होते. ग्रंथपालन हा व्यवसाय या काळाइतका पुरातन आहे, असे मानले जाते. असुरबनिपाल (इ. स. पू. ६६८ ते ६२७) या राजाने निनेव्ह येथील एका मंदिराजवळ एक मोठे ग्रंथालय स्थापन केले होते. बॉर्सिपा येथील ग्रंथालयातील ग्रंथांच्या नकला त्याने करवून घेतल्या, अनेकांची भाषांतरे केली व सुमेरियन भाषेतील सु. वीस हजार ग्रंथ एकत्रित केले. १८५० साली ऑस्टिन लेअर्ड याने उत्खनन केले तेव्हा त्याला निनेव्ह येथे हे ग्रंथालय सापडले. या ग्रंथालयातील इष्टिकाग्रंथांत प्राचीन आर्ष ग्रंथांच्या प्रती होत्या. या ग्रंथांचे वर्गीकरण व सूचिलेखनही केलेले होते. हे ग्रंथ बाहेर वाचावयास दिले जात. तसेच ते मुक्तद्वार ग्रंथालय होते. या ग्रंथालयातील काही इष्टिकाग्रंथ ब्रिटीश म्यूझीयममध्ये ठेवलेले आहेत.
प्राचीन ईजिप्तमधील लेखनसाहित्य व ग्रंथ मात्र अगदी निराळे होते. हे ग्रंथ पपायरसवर लिहिलेले होते. हायरोग्लिफिक लिपीत लिहिलेले हे ग्रंथ गुंडाळून मातीची भांडी किंवा धातूंची नळकांडी यांमधून सुरक्षित ठेवले जात. भांड्यांवर आतील ग्रंथांची माहिती लिहिलेली असे. खाजगी व मंदिरांतील ग्रंथालयांप्रमाणेच ईजिप्तमध्ये त्या काळात सरकारी ग्रंथालयेही होती. गीझा येथे इ. स. पू. २५०० मध्ये एक मोठे ग्रंथालय अस्तित्वात होते. इ. स. पू. १२५० च्या सुमारास थीब्झ येथे दुसरा रॅमर्सीझ यानेही एक ग्रंथालय स्थापन केले होते. इ. स. पू. २८०० च्या सुमाराचे ईजिप्तमधील सर्वांत प्राचीन पुस्तक प्रीसि पपायरस हे सध्या पॅरीस येथील बिब्लिओथेक नॅशनले या ग्रंथालयात उपलब्ध आहे. इद्फू, मेंडीझ, मेंफिस आणि हीलिऑपोलिस या ठिकाणी ग्रंथालये अस्तित्वात होती.
ईजिप्तमधील सर्वांत महत्त्वाचे ग्रंथालय ॲलेक्झांड्रिया येथे होते. ग्रीक राजा पहिला टॉलेमी याने इ.स.पू. २९० मध्ये ते स्थापन केले. फिलाडेल्फस व तिसरा टॉलेमी या राजांनी हे ग्रंथालय अधिक समृद्ध केले होते. सीझरने ज्यावेळी या ग्रंथालयाचा नाश केला त्यावेळी या ग्रंथालयात सात लाख ग्रंथ होते. त्या काळी पपायरससारखे दुर्मिळ लेखनसाहित्य आणि लेखनविसांची मर्यादित संख्या असतानादेखील इतक्या मोठ्या प्रमाणावर केलेला हा ग्रंथसंग्रह पाहून आश्चर्य वाटते. डीमीट्रिअस, झिनॉडोटस, अपोलोनियस, ॲरिस्टोफेनीस आदि नामवंत विद्वानांनी या ग्रंथालयाचे ग्रंथपालपद भूषविले होते. त्यांनी अनेक ग्रंथ जमविले, त्यांची भाषांतरे केली व १२० विषयांत त्यांचे वर्गीकरण करून सूचीही तयार केली होती.
ॲलेक्झांड्रियाप्रमाणेच पर्गामम येथेही एक ग्रंथालय दुसऱ्या यूमीनीझ याने स्थापन केले होते. विद्याप्रसार व कलाक्रीडा यांबाबत या दोन ग्रंथालयांत नेहमीच स्पर्धा चाले. पर्गामम येथील ग्रंथनिर्मिती इतकी वेगवान होती, की ईजिप्शियनांनी मत्सरामुळे त्यांना पपायरस वनस्पतीचा पुरवठा करण्याचे बंद करून टाकले. या चुरशीतूनच पुढे चामड्यावरील ग्रंथांची निर्मिती झाली. इ. स. ४८ मध्ये ॲलेक्झांड्रियाच्या ग्रंथालयाचा सीझरच्या स्वारीत नाश झाला होता, त्याचे परिमार्जन म्हणून अँटोनीने पर्गाममचे ग्रंथालय क्लिओपात्राला भेट म्हणून दिले. त्यावेळी या ग्रंथालयात दोन लाख ग्रंथ होते, असे प्लिनी हा इतिहासकार म्हणतो. जर्मन संशोधक अलेक्झांडर कोंज याने १८७६ ते १८८६ या काळात जेव्हा उत्खनन केले, तेव्हा त्याला पर्गामम ग्रंथालयाची चार दालने सापडली होती. ईजिप्तमधील पपायरस हे ग्रंथसाधन फारसे टिकाऊ नव्हते, त्यामुळे व ख्रिश्चन धर्मवेड्यांनी आणि खलीफा उमर याने ग्रंथालयाचा नाश केल्यामुळे त्यांपैकी फारच थोडे अवशेष आज मिळत आहेत.
याच काळात फिनिशियन या नाविक व व्यापारी जमातीने इतर वस्तूंबरोबरच पपायरसद्वारा लेखनकला व तत्कालीन ज्ञान यूरोपात प्रसृत केले. प्राचीन हिब्रू लोकांच्या ग्रंथालयाविषयी फारशी माहिती मात्र मिळत नाही.
सु. १,२०० वर्षांच्या ग्रीक संस्कृतीच्या कालखंडातील पहिल्या ६०० वर्षांतील ग्रंथ उपलब्ध नाहीत. इ. स. पू. पाचव्या शतकात खाजगी ग्रंथालयेही अस्तित्वात होती. त्यांत युरिपिडीझ, ॲरिस्टॉटल व प्लेटो यांच्या ग्रंथालयांचा उल्लेख करण्यात येतो. अकादमीच्या स्थापनेमुळे तेथेही ग्रंथसंग्रह असावा, असे दिसते.
रोमन सम्राटांनी सार्वजनिक ग्रंथालये स्थापन केली होती. पपायरस, कातडे या माध्यमांवरच ग्रंथ लिहिले जात. कोडेक्स व्हॅटिकेनस हे सर्वांत प्राचीन रोमन हस्तलिखित चौथ्या शतकातील आहे. इ. स. पू. दुसऱ्या शतकापासून रोमन सरदार ग्रीसमधील ग्रंथसंग्रह युद्धप्रसंगी लुटून आणीत असत. हीच गुंडगिरी पुढे या सरदारांच्या ग्रंथविषयक आवडीचे भूषण बनले. सिसेरो (इ. स. पू. १०६–४३) याचा खाजगी ग्रंथसंग्रह मोठा होता. असिनिअस पोलिओ या सम्राटाने पहिले सार्वजनिक ग्रंथालय स्थापले. ल्युकल्सचे (इ. स. पू. ११४–५७) ग्रंथालयही वैशिष्ट्यपूर्ण होते. रोमन ग्रंथालयांतून ग्रीक व लॅटिन ग्रंथ विषयवार वेगवेगळे लावून ठेवलेले असत. त्याचबरोबर पपायरसच्या असंख्य गुंडाळ्याही ग्रंथालयातील वाचनगृहात ठेवलेल्या असत. हे सर्व ग्रंथ तेथेच वाचावे लागत. चौथ्या शतकाच्या मध्याला रोम या एकाच शहरात अठ्ठावीस सार्वजनिक ग्रंथालये होती. इटलीमधील अन्य शहरांतून अशीच सार्वजनिक ग्रंथालये स्थापन झाली होती. या ग्रंथालयांची व्यवस्था धर्माधिकाऱ्यांकडे सोपविलेली असे. रोमन ग्रंथालयांचा विशेष म्हणजे ग्रंथालये व वस्तुसंग्रहालये यांमधील भेद स्पष्ट होऊन ग्रंथांची मांडणी व संरक्षण स्वतंत्रपणे होऊ लागले. कॉन्स्टँटिनोपल या शहरात थीओडोशियसच्या कारकिर्दीत ख्रिस्ती धर्मग्रंथांचा भरणा असलेले व सु. एक लाखाहून अधिक ग्रंथसंख्या असलेले एक ग्रंथालय होते. रोमवर सुरू झालेल्या रानटी टोळ्यांच्या हल्ल्यात रोमन संस्कृतीबरोबर ही सर्व ग्रंथालयेही नष्ट झाली. सु. पाचवे शतक ते सु. पंधरावे शतक या कालखंडात ग्रंथसंग्रह जतन करण्याचे फार मोठे कार्य धर्ममठांनी केले. कातड्यावरील ग्रंथ (पार्चमेंट) हे या काळच्या ग्रंथसंग्रहांचे वैशिष्ट्य होय. कोडेक्स या ग्रंथांनी ख्रिश्चन धर्माचा फार मोठा प्रसार केला. या काळी ग्रंथांच्या नकला करण्यासाठी नकलनवीसांचा एक फार मोठा ताफाच बाळगला जाई. या काळातील कातड्यावरील ग्रंथ विविध रंगांच्या शाईत लिहिलेले असून त्यांवर कलाकुसर केलेली आढळते. अशा प्रकारचे एक हस्तलिखित बुक ऑफ केल्स या नावाने प्रसिद्ध असून ते आठव्या शतकातील आहे. ग्रंथ चोरले जाऊ नयेत म्हणून ते एका साखळीने बांधून ठेवलेले असत व त्यांचा वापर धर्मगुरुंपुरताच मर्यादित असे. कॉन्स्टँटिनोपलच्या कारकिर्दीत या धर्ममठांतील ग्रंथालयांना शासकीय ग्रंथालयांचे स्वरूप प्राप्त झाले होते. कॅसिओडरस याने माँटी कासीनो (इटली) येथे मठस्थापना करून बायबल, होमर व व्हर्जिल यांची काव्ये, ग्रीक नाटके आणि अन्य प्राचीन शास्त्र व तत्त्वज्ञानविषयक ग्रंथांच्या प्रती करवून घेऊन तेथील ग्रंथालयात संग्रहीत केल्या. दहाव्या शतकापासून यूरोपमध्ये विद्यापीठांची स्थापना होऊ लागली व विद्यार्थ्यांची संख्या जसजशी वाढू लागली, तसतसे विद्यापीठांतून ग्रंथसंग्रह वाढू लागले. १८२९ च्या सुमारास पॅरीसच्या सोरबोन येथील ग्रंथालयांत १,७२२ हस्तलिखित ग्रंथ होते व त्यांपैकी १,०९० ग्रंथांची देवाणघेवाण होत असे, अशी माहिती उपलब्ध आहे. पॅरिस, प्राग, हायड्लबर्ग, ऑक्सफर्ड आणि केंब्रिज या विद्यापीठीय ग्रंथालयांव्यतिरिक्त पिट्रार्क (१३०४ ते १३७४) व रिचर्ड डे बेरी (१२८९–१३४५) यांचे व्यक्तिगत संग्रह उल्लेखनीय होते.
यूरोपात सोळाव्या शतकाच्या सुमारास प्रबोधनकाळ अवतरला. कागदाचा शोध, देशी भाषांचा उदय व मुद्रणकलेचा शोध या तीन क्रांतिकारक गोष्टींनी सांस्कृतिक प्रबोधनाला गती मिळाली. ग्रंथसंख्येत प्रचंड वाढ होऊ लागली. विद्यापीठांची ग्रंथालये समृद्ध झाली व ग्रंथसंग्रह असणे, हे भूषणावह वाटू लागले. १५६० मध्ये पलोरियन ट्रेफल याने ग्रंथालयांवर एक प्रबंध लिहून सूची कशी करावी, याचे मार्गदर्शन केले आहे. यावरून तत्कालीन ग्रंथालये व ग्रंथपालनाचे स्वरूप लक्षात येते.
सतराव्या शतकात पाश्चिमात्त्य देशांत ग्रंथालयांचे नवयुग अवतरले. ज्ञानाबरोबर मनोरंजन हा ग्रंथालयाचा हेतू मान्य झाला. ग्रंथालये सर्वांसाठी खुली झाली. दैनिके, मासिके छापण्यास प्रथमच सुरुवात झाली. स्वित्झर्लंडमध्ये पहिला कोश १६३० मध्ये छापला गेला. ग्रंथसूचीचा जनक कोनराट गेस्नर (१५९५–१६८०), गेब्रिअल नोडे (१६०० ते १६५३), जॉन ड्युरी (१५९६ ते १६८०) व गोटफ्रीट व्हिल्हेल्म (१६४६–१७१६) या नामवंत ग्रंथपालांनी ग्रंथालयांना व ग्रंथपालांना महत्त्वाचे स्थान प्राप्त करून दिले. ग्रंथसूचीच्या छपाईस प्रारंभ झाला तो याच काळात. बॉडलेअन व केंब्रिज विद्यापीठ-ग्रंथालये ही या काळात भरभराटीस आली. १६०२ मध्ये ऑक्सफर्ड येथील बॉडलेअन ग्रंथालयाची दोन हजार ग्रंथांनिशी सुरुवात झाली व सतराव्या शतकाच्या अखेरीस या ग्रंथालयाची ग्रंथसंख्या पंचवीस हजारांवर गेली. चौदाव्या शतकात स्थापन झालेल्या केंब्रिज विद्यापीठ-ग्रंथालयाचे या काळातच पुनरुज्जीवन झाले. कोणालाही ग्रंथ उसनवार देणे, हे केंब्रिज ग्रंथालयाचे सुरुवातीपासूनचे वैशिष्ट्य तर बॉडलेअन ग्रंथालयाने खुद्द राजाला म्हणजे पहिला चार्ल्स व क्रॉमवेल यांनाही काही ग्रंथ देण्याचे नाकारले होते, असे सांगतात.
यूरोपातील ग्रंथालय-विश्वावर फ्रेंच राज्यक्रांतीचा मोठाच परिणाम झाला. क्रांतिवाद्यांनी सर्व खाजगी देवालयांतील ग्रंथालये नाहीशी करून तेथील सर्व ग्रंथसंग्रह पॅरिस येथील राष्ट्रीय ग्रंथालयात नेले. अशा रीतीने राजा व महाधिपती यांची ग्रंथालयांवरील मक्तेदारी संपून ग्रंथालये सर्व जनतेला खुली झाली.
एकोणिसाव्या शतकात पाश्चिमात्य देशांत औद्योगिक क्रांतीनंतर शिक्षणाचा झपाट्याने प्रसार झाला. ग्रंथांची जरूरी भासू लागली व ती गरज भागविणाऱ्या संस्थाही निर्माण झाल्या. साहजिकच ग्रंथसंख्या व ग्रंथालये यांत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. या संग्रहांची सुसूत्र व्यवस्था कशी ठेवावी याचा विचार सुरू झाला व या गरजेतून ग्रंथालयशास्त्राची निर्मिती झाली. बव्हेरियन स्टेट लायब्ररी या संस्थेचा प्रमुख मार्टिन श्रेटिंजर, ब्रिटीश म्यूझीयम, लंडन या ग्रंथालयाचा प्रमुख अँटोनी पानीत्सी व त्याचा समकालीन एडवर्ड एडवर्ड्झ या कर्तबगार ग्रंथपालांनी ग्रंथालयशास्त्राचे पायाभूत कार्य केले. केवळ ग्रंथसंग्रह करणे व त्याचे जतन करणे हेच आपले कार्य होय , असे न मानता ग्रंथपालाने स्वतः बहुश्रुत व्हावे, व्यासंग करावा व अनेक भाषांचा परिचय करून घ्यावा, असे प्रतिपादन
एफ्. ए. एबर्ट याने केले आहे. अँटोनी पानीत्सी याने ग्रंथालयसूची कशी करावी याची पहिली नियमावली तयार करून ब्रिटिश म्यूझीयममधील सर्व इंग्रजी ग्रंथांची सूची छापून प्रसिद्ध केली. एडवर्ड एडवर्ड्झ हा ग्रंथालयसेवेचा प्रवर्तक होय. त्याने केलेल्या प्रयत्नांमुळेच इंग्लंड आणि अमेरिका या देशांत निःशुल्क सार्वजनिक वाचनालयांची निर्मिती झाली.
ग्रंथमुद्रणकलेतील प्रगती, ग्रंथबांधणीतील कलात्मकता आणि ग्रंथोत्पादनातील यांत्रिक प्रगती यांमुळे ग्रंथ आकर्षक झाले. ग्रंथांची किंमत सर्वसामान्यांच्या आटोक्यात आली व लेखाधिकाराच्या कायद्यामुळे अधिकृत ग्रंथालयांना ग्रंथाचा सतत व नियमित पुरवठा होऊ लागला. या काळात प्रत्येक राष्ट्रात राष्ट्रीय ग्रंथालये स्थापन झाली. सार्वजनिक ग्रंथालयांच्या कल्पनेचा उगम झाला व शहर, जिल्हा, राज्य आदी पातळ्यांवर शासनाद्वारा ग्रंथालये स्थापन झाली. विशेष ग्रंथालयेही स्थापन करण्यात आली. बिब्लिओथेक नॅशनले, पॅरिस (१४८०), ब्रिटिश म्युझियम, लंडन (१७५९), लायब्ररी ऑफ काँग्रेस, वॉशिंग्टन (१८००), लेनिन स्टेट लायब्ररी, मॉस्को (१८६२) ही पाश्चात्त्य देशांतील प्रमुख राष्ट्रीय ग्रंथालये होत.
इंग्लंडमध्ये १७३१ साली जेम्स कर्कवुडच्या प्रेरणेने सु. पंधरा हजार ग्रंथसंग्रह असलेले पहिले सार्वजनिक ग्रंथालय स्थापन होऊन त्या कामी डॉ. टॉमस ब्रे व नार्सिसस मार्श यांचे प्रयत्न कारणीभूत झाले. पुढे त्याचे रूपांतर डब्लिन सार्वजनिक ग्रंथालयात झाले. १८५० मध्ये ग्रंथालय कायदा झाल्यामुळे सर्व खेडी, शहरे व औद्योगिक केंद्रे यांमधून सार्वजनिक मोफत ग्रंथालयांची स्थापना झाली. १९१४ मध्ये अशी सहाशे ग्रंथालये होती. टॉमस ग्रीनवुड, जॉन पासमोर एडवर्ड व अँड्रू कार्नेगी या दानशूर गृहस्थांनी दिलेल्या देणग्यांमधून देशभर अनेक ग्रंथालयांचे एक जाळेच निर्माण झाले.
अमेरिकेत सार्वजनिक ग्रंथालयांच्या कल्पनेचा उगम झाला तो बेंजामिन फ्रँकलिन याने १७३१ मध्ये स्थापन केलेल्या लायब्ररी कंपनी या संस्थेच्या कार्यातून. तत्पूर्वी हार्व्हर्ड विद्यापीठ ग्रंथालय (१६८३), येल विद्यपीठ ग्रंथालय (१७०१) ही त्या काळातील अमेरिकेमधील उल्लेखनीय ग्रंथालये होती. १८७५ पर्यंत बरीच खाजगी मालकीची व वर्गणीग्रंथालये अस्तित्वात होती. बोस्टन ॲथिनियम हे ग्रंथालय १८०७ मध्ये स्थापन झाले होते. अँड्रू कार्नेगी व जॉन रायलंडझ यांच्यासारख्या देणगीदारांच्या मदतीने अनेक वर्गणी-ग्रंथालये स्थापन झाली होती. १८५४ मध्ये सी. सी. जोवेट यांच्या संचालनत्वाखाली पहिले मोफत सार्वजनिक ग्रंथालय सुरू झाले. त्यानंतर अमेरिकेतील विविध राज्यांनी ग्रंथालये स्थापन करण्यासाठी स्वतंत्र समित्या नेमल्या व थोड्याच अवधीत प्रत्येक शहरात, खेड्यात स्थानिक संस्थांच्या द्वारा ग्रंथालये निर्माण झाली. एकोणिसाव्या शतकात व्यापार, उद्योग व वैज्ञानिक क्षेत्रांत झपाट्याने प्रगती झाल्यामुळे तेथे काम करणाऱ्या लोकांसाठी विशेष ग्रंथालयांची स्थापना अनिवार्य ठरली. इंग्लडात शेफील्ड, मँचेस्टर, ब्रिस्टल व कार्डिफ या औद्योगिक क्षेत्रांतून नमुनेदार आणि विशेष ग्रंथालये स्थापन झाली. अमेरिकेतीलही हार्व्हर्ड लॉ स्कूल लायब्ररी (१८१७), पेटंट ऑफिस लायब्ररी (१८३९), केंब्रिज म्यूझीयम ऑफ कंपॅरेटिव्ह झूलॉजी (१८५८) इ. विशेष ग्रंथालये उल्लेखनीय आहेत.
विसाव्या शतकात पाश्चात्त्य देशांतील ग्रंथालयांतून ग्रंथसंख्येत जी वाढ झाली ती लक्षावधींच्या संख्येने. कार्नेगी, रॉकफेलर, फोर्ड या दानशूर गृहस्थांनी दिलेल्या देणग्यांतून अनेक ग्रंथालये उभी राहिली. पियरपॉट मॉर्गन लायब्ररी, न्यूयॉर्क हंटिंग्टन लायब्ररी, सान मारीनो फोल्जर शेक्सपिअर लायब्ररी, वॉशिंग्टन यांसारख्या दुर्मिळ ग्रंथसंग्रह करणाऱ्या विशेष ग्रंथालयांची स्थापना झाली. ग्रंथसंग्रह वाढला, एवढेच नव्हे तर ग्रंथालयांचे प्रकारही वाढले. सार्वजनिक, राष्ट्रीय, शासकीय, शैक्षणिक, संशोधन, तांत्रिक, बाल अशी अनेक प्रकारची ग्रंथालये निर्माण झाली. अमेरिकेत १९६० मध्ये १०,८३२ सार्वजनिक ग्रंथालये होती आणि त्यांतून एकशेत्र्याहत्तर दशलक्ष ग्रंथसंग्रह होता. त्यावर वार्षिक ३,१०,००,००० डॉलर इतका खर्च होत होता, इंग्लंडमधील १९६२ मध्ये स्थापन झालेल्या नॅशनल लेंडिंग लायब्ररीमध्ये ५५,००० ग्रंथ, ३,७०,००० नियतकालिके आणि ५०,००० भाषांतरिते आहेत. पूर्व यूरोपात समृद्ध ग्रंथालयांची परंपरा आहे. चेकोस्लोव्हाकियात प्रागमधील चार्ल्स विद्यापीठ आणि पोलंडात क्राकौमधील जागिलोनियन विद्यापीठ यांची ग्रंथालये चौदाव्या शतकात स्थापन झाली आहेत, तसेच प्रागमधील चेकोस्लोव्हाकियाच्या आणि लाइपसिकमधील पूर्व जर्मनीच्या राष्ट्रीय ग्रंथालयांत तीस लक्षांहून अधिक आणि बूडापेस्टमधील हंगेरीच्या राष्ट्रीय ग्रंथालयात पंधरा लक्षांहून अधिक ग्रंथ आहेत. पूर्व यूरोपात बहुतेक देशांत कम्युनिस्ट राजसत्ता असल्यामुळे तेथे शिक्षणप्रसारात ग्रंथालयांना प्राधान्य देण्यात येते. या सर्व देशांतील प्रत्येक लहानमोठ्या शहरात व गावात ग्रंथालये व वाचनालये आहेत. पोलंडमध्ये ७,६०० हंगेरीत ५,००० बल्गेरियात ८,५०० रूमानियात १२,००० चेकोस्लोव्हाकियात ५६,००० व अल्बेनियात १,५०० सार्वजनिक ग्रंथालये आहेत. रशियात जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा अधिक म्हणजे सु. चार लक्ष ग्रंथालये असून, त्यांपैकी एक लक्ष पस्तीस हजार सार्वजनिक ग्रंथालये व बाकीची विशेष आणि विद्यापीठ-ग्रंथालये आहेत. मॉस्कोमधील लेनीन स्टेट लायब्ररीत सव्वा दोन कोटी ग्रंथ व इतर वाचनीय साहित्य आहे, तर लेनिनग्राडमधील अकादेमी ऑफ सायन्सेसच्या ग्रंथालयात साठ लक्ष व सार्वजनिक ग्रंथालयात एक कोटी चाळीस लक्ष ग्रंथ आहेत. पूर्व यूरोपातील देशांत व रशियात ग्रंथालयसंघ, ग्रंथालयविषयक नियतकालिके आणि ग्रंथपालनशास्त्राच्या शिक्षणाचीही सोय आहे.
मध्यपूर्वेत ग्रंथालयांची परिस्थिती विशेष समाधानकारक नाही. मध्यपूर्वेतील सर्वांत मोठे ग्रंथालय म्हणजे इझ्राएलमधील जेरूसलेम येथे असलेली ज्यूइश नॅशनल अँड युनिव्हर्सिटी लायब्ररी होय. येथे दहा लक्ष ग्रंथ आहेत. त्याच्या खालोखाल तुर्कस्तान आणि लेबाननची राष्ट्रीय ग्रंथालये, बेरूतच्या अमेरिकन विद्यापीठाचे, तेहेरान विद्यापीठाचे आणि तुर्कस्तानमधील अंकारा विद्यापीठाचे ग्रंथालय ही होत. मध्यपूर्वेत सार्वजनिक ग्रंथालये फारच कमी आहेत. त्यांतल्या त्यांत चांगली व अद्ययावत अशी ग्रंथालये जेरूसलेम व तेल आवीव्ह या इझ्राएलच्या प्रांतांत आहेत. जॉर्डनमध्येही सार्वजनिक ग्रंथालयाची सुरुवात होऊ घातली आहे. ग्रंथालयशास्त्राचे शिक्षण हिब्रू विद्यापीठ, तेहेरान विद्यापीठ, अंकारा विद्यापीठ आणि बेरूतच्या महिला महाविद्यालयात दिले जाते. तसेच इराक, इझ्राएल, जॉर्डन, लेबानन, आणि तुर्कस्तानमध्ये ग्रंथालयसंघ स्थापन झालेले आहेत.
अफगाणिस्तान आणि श्रीलंकेखेरीज इतर आशियाई देशांत राष्ट्रीय आणि विद्यापीठ ग्रंथालयेही आहेत. त्यांपैकी फिलिपीन्स, मलेशिया व भारत ह्या देशांतील राष्ट्रीय ग्रंथालये तसेच विद्यापीठ ग्रंथालयांपैकी फिलिपीन्स, सिंगापूर आणि भारतातील अलाहाबाद, बडोदे, मुंबई, कलकत्ता, दिल्ली आणि वाराणशी ह्या विद्यापीठांची ग्रंथालये उल्लेखनीय आहेत. ऑस्ट्रेलियाचे कॅनबरा येथे असलेले राष्ट्रीय ग्रंथालयही उल्लेखनीय असून त्यात सु. साडेसात लक्ष ग्रंथ आहेत. शिवाय त्या खंडातील सहाही राज्यांत आणि राजधानीत किमान एकेक तरी विद्यापीठ असून तेथे ग्रंथालय आहे. यांपैकी सिडनी विद्यापीठाच्या ग्रंथालयात साडेआठ लक्ष ग्रंथ आहेत. प्रत्येक राज्याच्या प्रमुख शहरी सार्वजनिक ग्रंथालये असून शासकीय, व्यावसायिक, संशोधन आणि व्यापार संस्थांचीही ग्रंथालये ठिकठिकाणी आहेत. ऑस्ट्रेलियात ग्रंथालयसंघ, ग्रंथालयविषयक नियतकालिके आणि ग्रंथालय-शिक्षण देणारी अनेक विद्यालये आहेत.
जपानची ग्रंथालयसंघटना अद्ययावत व पूर्णविकसित आहे. टोकिओ येथे असलेल्या पार्लमेंटच्या ग्रंथालयात तीस लक्ष ग्रंथ आहेत. त्याच्या ३० शाखा असून त्यांत अडीच लक्ष ग्रंथ आहेत. जपानमध्ये ८० विद्यापीठ-ग्रंथालये असून त्यांपैकी टोकिओ व क्योटो या विद्यापीठांच्या ग्रंथालयांत प्रत्येकी वीस लक्षांपेक्षा अधिक ग्रंथ आहेत. जपानमध्ये सर्वत्र सार्वजनिक ग्रंथालये आहेत. काही ठिकाणी तर फिरत्या ग्रंथालयांद्वारे कारखान्यांना ग्रंथालयसेवा उपलब्ध करून दिली जाते.
लेखनकला, कागद व छपाई या संशोधनाच्या बाबतीत जगात चीन अग्रेसर असला, तरी सातव्या शतकापूर्वीच्या चिनी ग्रंथालयांची माहिती उपलब्ध होत नाही. तत्त्वज्ञ लाउद्झ हा चौ राजघराण्याच्या कारकीर्दीत सातव्या शतकात लोयँग येथे असलेल्या ग्रंथालयाचा अधिकारी होता, असे सांगितले जाते. चीनमधील प्राचीन ग्रंथसंग्रहांचे वैशिष्ट्य म्हणजे त्या संग्रहांच्या केलेल्या सूची हे होय. हान राजघराण्याच्या कारकीर्दीत (इ. स. पू. २०६ ते इ. स. २३) तयार झालेली ग्रंथांची सूची ही सर्वांत प्राचीन असून त्यानंतरच्या राजघराण्यांतून केलेल्या ग्रंथसंग्रहांच्या सूच्याही उपलब्ध आहेत. चीनमध्ये प्राचीन काळी ग्रंथालये अस्तित्वात होती, त्याचा हा भरभक्कम पुरावाच होय. काळाच्या ओघात ग्रंथसंग्रह नष्ट झाले असावेत. सध्या पीकिंगमधील राष्ट्रीय ग्रंथालयात चाळीस लक्षांहून अधिक व नानकिंग ग्रंथालयात तेवीस लक्ष ग्रंथ आहेत, असे सांगण्यात येते. प्रत्येक प्रांतात किमान एक मध्यवर्ती ग्रंथालय आहे. शांघाय नगरपालिका ग्रंथालयाच्या बारा शाखा असून त्यांचा एकूण ग्रंथसंग्रह नऊ लक्षांहून अधिक आहे. चीनमध्ये कम्युनिस्ट राजवट आल्यापासून अनेक विद्यापीठे, महाविद्यालये आणि तंत्रशिक्षण संस्था स्थापन झाल्या असून प्रत्येकाला समृद्ध ग्रंथालयाची जोड आहे. त्याशिवाय शाळा व कारखाने यांतून व सार्वजनिक ग्रंथालयांद्वारे जनतेला ग्रंथांची व वाचनाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. अतिदूर पूर्वेतील इतर देशांत मात्र ग्रंथालयसेवा अगदीच अल्प प्रमाणात उपलब्ध आहे.
आफ्रिकेतील लक्षावधी लोकांना सार्वजनिक ग्रंथालयांची सेवा उपलब्ध नाही. काही महत्त्वाच्या देशांत उच्चशिक्षणसंस्थांतच ग्रंथालयाचे अस्तित्व आहे. घाना, नायजेरिया, आयव्हरी कोस्ट, केन्या, युगांडा, ट्युनिशिया व मोरोक्को या राज्यांनी मात्र ग्रंथालयाबाबत चांगली प्रगती केली आहे. या खंडातील उल्लेखनीय ग्रंथालये उत्तर व दक्षिण आफ्रिकेत आहेत. त्यांपैकी कैरो येथे असलेले ईजिप्तचे राष्ट्रीय ग्रंथालय व विद्यापीठ-ग्रंथालय, अल्जीरियाचे राष्ट्रीय तसेच विद्यापीठ-ग्रंथालय व ट्युनिशियाचे राष्ट्रीय ग्रंथालय ही महत्त्वाची आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या प्रजासत्ताक राष्ट्रात अनेक मोठी ग्रंथालये असून त्यांत जोहानिसबर्गचे सार्वजनिक ग्रंथालय, प्रिटोरिआ येथील ट्रान्सव्हाल प्रांतीय ग्रंथालय, केपटाउनचे सार्वजनिक ग्रंथालय तसेच प्रिटोरिआ, केपटाउन आणि विट्वॉटर्झरँडच्या विद्यापीठांची ग्रंथालये समृद्ध आहेत. ग्रंथपालनाचे शिक्षण कैरो, केपटाउन, डाकार, ईबादान आणि प्रिटोरिया येथील विद्यापीठांत दिले जाते. ईजिप्त, लायबीरिया, नायजेरिया, दक्षिण आफ्रिका, टोगो व ट्युनिशिया येथे ग्रंथालयसंघही स्थापन झाले आहेत.
अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संघटनांकडून विकसनशील देशांत ग्रंथालयसेवा दिली जाते. त्यांपैकी महत्त्वाच्या संघटना म्हणजे द युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन (यूनेस्को), युनायटेड स्टेट्स इन्फर्मेशन सेंटर (युसिस), युनायटेड स्टेट्स इन्फर्मेशन एजन्सी, एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट (ए.आय्.डी.) व ब्रिटिश कौन्सिल या होत. यांशिवाय एशिया फाउंडेशन व फोर्ड फाउंडेशन यांसारख्या संस्थाही ग्रंथालयाच्या विकासासाठी साहाय्य करीत आहेत.
मानवी समाजाने केलेल्या वैज्ञानिक व तांत्रिक प्रगतीमुळे जागतिक ग्रंथालयाच्या इतिहासात नवे पर्व येऊ पहात आहे. पाश्चात्त्य देशांतील ग्रंथनिर्मितीचा प्रचंड वेग, जगाची वाढती लोकसंख्या, ज्ञान अद्ययावत ठेवण्याची निकड व संशोधनाचे व्यापक क्षेत्र यांच्या गरजा भागविण्यासाठी ग्रंथालयांचेही यांत्रिकीकरण होणे अपरिहार्य आहे. अलीकडे सूक्ष्मपत्रे व फिल्म यांवरील ग्रंथसंग्रह आणि संगणकाच्या साहाय्याने ग्रंथालयसेवा इत्यादींचा अवलंब केला जात आहे.
भारतातील ग्रंथालये : प्राचीन काळी भारतात वेगवेगळ्या पद्धती अस्तित्वात होत्या. आश्रमसंस्था ही त्यांतील अतिप्राचीन संस्था होय. बौद्ध मठातून सुरुवातीला धार्मिक शिक्षणास प्रारंभ झाला आणि सम्राट अशोकाच्या काळानंतर हळूहळू विद्यापीठे निर्माण होऊ लागली. इ. स. ४०० च्या सुमारास नालंदा विद्यापीठ स्थापन झाले होते व थोड्याच अवधीत ते बौद्ध संस्कृतीचे केंद्र बनले. ग्रंथालयाविना धर्ममठ म्हणजे शस्त्रागाराविना किल्ला होय, अशी नालंदा विद्यापीठाच्या प्रमुखाची कल्पना होती. या विद्यापीठात असलेले दहा हजार भिक्षू, विद्यार्थी व अभ्यासक यांना उपयोगी पडेल असा विपुल ग्रंथसंग्रह येथे होता. इसवी सनाच्या चौथ्या शतकात फाहियान व सातव्या शतकात यूआन च्वांग या चिनी प्रवाशांनी या विद्यापीठास भेट दिली होती. इत्सिंग हा चिनी पंडित बौद्ध धर्माच्या अध्ययनासाठी दहा वर्षे या विद्यापीठात राहिला होता. त्याने या ग्रंथालयाचे मनोवेधक वर्णन केले आहे. या सर्व अभ्यासकांनी बौद्ध ग्रंथांच्या नकला करून त्या चीनला नेल्या.
गुप्त घराण्याचे राजे हिंदू असूनही त्यांनी बौद्ध विद्यापीठांचा विकास करण्याचे कार्य पुढे चालू ठेवले. त्यांसाठी त्यांनी विद्यापीठांभोवती मोठमोठे स्तूप, दिवाणखाने व सभागृहे उभारली. ग्रंथालय विभागास धर्मगंज असे नाव देऊन रत्नसागर, रत्नोदधी व रत्नरंजक या तीन इमारतींत ग्रंथसंग्रह ठेवला. या इमारतींपैकी दोन सहा मजली होत्या, तर एक नऊ मजली होती. या ग्रंथालयांच्या प्रचंड व्यापाची कल्पना यावरून येण्यासारखी आहे. येथील ग्रंथ ताडपत्रांवर लिहिलेले होते. अर्थात बौद्ध धर्माचे ग्रंथ त्यांत अधिक होते. नालंदा विद्यापीठाची कीर्ती त्या काळात सर्वत्र पसरलेली होती.
नालंदाप्रमाणे वल्लभी, तक्षशिला, विक्रमशिला, ओदंतपुरी, मिथिला आणि वाराणसी येथील विद्यापीठांतही ग्रंथसंग्रह होते. परंतु त्यांची माहिती फारशी उपलब्ध नाही. तक्षशिला ही गंधार प्रांताची राजधानी होती व सिंधू खोऱ्यातील एक प्रमुख शैक्षणिक केंद्र म्हणून या ठिकाणी वेदाच्या अध्ययनासाठी मिथिला, उज्जैन, वाराणसी या दूरदूरच्या ठिकाणांहून विद्यार्थी येत. येथील ग्रंथालयांसंबधीदेखील अधिक माहिती मिळत नाही.
पाल राजांच्या कारकीर्दीत गंगेच्या उत्तर तीरावर विक्रमशिला व ओदंतपुरी ही विद्यापीठे होती. तिबेटी बौद्ध भिक्षूंनी येथील ग्रंथालयांना विशेष मदत केली होती. तसेच त्यांनी या ग्रंथालयांतील संस्कृत व पाली धर्मग्रंथ तिबेटातील बौद्धधर्मीय अभ्यासकांसाठी नकलून घेतले होते. मुसलमानांच्या धाडीतून ग्रंथ वाचविण्यासाठी तेथील भिक्षू हाती येतील ते ग्रंथ घेऊन तिबेट व नेपाळात पळाले. नेवार लोकांनी तेथे या ग्रंथांचे जतन केले परंतु पुढे गुरख्यांनी त्यांच्यावर धाड घातली. त्यांपैकी पंधराव्या शतकापूर्वीचे ताडपत्रांवरील काही हस्तलिखित ग्रंथ नेपाळमध्ये अलीकडे उपलब्ध झाले आहेत.
या काळात भारतामध्ये अन्य विद्यापीठांचीही ग्रंथालये अस्तित्वात असावीत. अयोध्या (इ. स. पू. पहिले ते इ. स. सहावे शतक), गुणशिला (इ. स. पू. सहावे शतक) ही जैन विद्यापीठे व कुंडिनपूर (इ. स. पू. सहावे शतक), कांची (इ. स. पू. दुसरे ते इ. स. तेरावे शतक), मथुरा (इ. स. पू. पाचवे शतक) इ. हिंदू विद्यापीठे अस्तित्वात होती परंतु या विद्यापीठांतून असलेल्या ग्रंथसंग्रहांची माहिती अद्यापि उपलब्ध झाली नाही.
दक्षिण भारतात कृष्णा नदीच्या काठी असलेले बौद्ध धर्माचे एक क्षेत्र नागार्जुन विद्यापीठ हे सातव्या शतकापर्यंत प्रसिद्ध होते. आंध्र प्रदेशातील गुंतूर जिल्ह्यात एका टेकडीवर या विद्यापीठाची स्थापना झालेली होती. येथील एका पाच मजली इमारतीत ग्रंथसंग्रह ठेवण्यात आला होता. एक स्वतंत्र प्रयोगशाळाही येथे होती. येथील ग्रंथालयात बौद्ध धर्मावरील अनेक ग्रंथ होते. भारताला भेट देणाऱ्या चिनी प्रवाशांनी या ग्रंथालयाचा मोठा गौरवपूर्वक उल्लेख केलेला असून चीन, ब्रह्मदेश, श्रीलंका या ठिकाणांहूनही विद्वान अभ्यासक या ग्रंथालयास भेट देत. देवालयासाठी ग्रंथ दिले जात, तसेच ग्रंथ घेण्यासाठी देणग्या दिल्या जात, असा उल्लेख वल्लभी शिलालेखात (इ. स. ५६८) आढळतो. हस्तलिखित ग्रंथांची देणगी देवालयाला देणे ही गोष्ट देवालय बांधण्याइतकी वा त्यात मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याइतकी पुण्यप्रद मानली जाई.
मध्ययुगीन ग्रंथालये : मुसलमानी अंमलापूर्वी भारतातील शिक्षणसंस्थांना राजाश्रय असे. अशा काही शिक्षणसंस्थांतून ग्रंथालये अस्तित्वात होती, असे उल्लेख शिलालेखांतून आढळले आहेत. चालुक्य राजा राजनारायण (१०५८) याचा कर्तबगार सेनापती मधुसूदन याने स्थापन केलेल्या विद्यालयात २५२ विद्यार्थी वेदाचा अभ्यास करीत. येथील ग्रंथालयात सहा ग्रंथपाल होते आणि विद्यार्थी व शिक्षकांप्रमाणे ग्रंथपालही संस्थेच्या आवारात राहत असत. विशेष असे, की या ग्रंथपालांना शिक्षकांच्या बरोबरीने मान व पैसा मिळे. शिक्षकांप्रमाणे ग्रंथपालांच्या उदरनिर्वाहासाठी जमीनही लावून दिली जात असे.
तेराव्या व चौदाव्या शतकांत भारतात खल्जी व तुघलक या राजघराण्यांनी राज्य केले. त्यांना विद्येबद्दल आस्था होती व जवळजवळ प्रत्येक राजाने स्वतःचा ग्रंथसंग्रह बाळगला होता. हा संग्रह राजवाड्यातील एखाद्या दालनात असे. हे बादशहा दिवसातील काही वेळ या ग्रंथालयात घालवीत असत. क्वचित मशिदींतूनही ग्रंथसंग्रह ठेवले जात. जलालुद्दीन सुलतानाच्या कारकीर्दीत अमीर खुसरौ हा विद्वान कवी दिल्लीच्या बादशहाच्या संग्रहाची व्यवस्था बघत असे. शेख निझामुद्दिन अवलिया याने देणग्या घेऊन एक ग्रंथालय स्थापन केले होते. त्यात सर्वांना प्रवेश असे. काश्मीरचा राजा झैन-उल्-अबदीन (१४२० ते १४७०) याच्या ग्रंथसंग्रहात राजतरंगिणी व महाभारत यांची पर्शियन भाषांतरे होती. विजापूर, गोवळकोंडा, गुजरात, खानदेश येथील राजेही ग्रंथसंग्रह बाळगून होते.
मध्ययुगात कागद दुर्मिळ व महाग असल्यामुळे भारतात प्रामुख्याने भूर्जपत्र व कातडे हीच ग्रंथलेखनाची माध्यमे होती. त्यामुळे मूल्यवान ग्रंथ सर्वसामान्यांच्या आटोक्याबाहेरचे होते. ज्यांना अभ्यास करावयाचा असेल, त्यांना राजेरजवाड्यांच्या संग्रहाकडे वळावे लागे. काही दरबारी मानकरी, विद्वान पंडित अशा निवडक व्यक्तींनाच ग्रंथालयांत प्रवेश असे.
सोळाव्या शतकातील ग्रंथालये : विद्वत्ता व शिक्षण यांसंबंधी आदर असणाऱ्या मोगल बादशहांनी स्वतःचे ग्रंथसंग्रह बाळगले होते. आपल्या ग्रंथालयात बसून बाबराने स्वतःच्या आठवणी लिहिल्या आहेत. हुमायून हादेखील साहित्यप्रेमी होता व त्याने आपले ग्रंथालय शेरशाहच्या महालात थाटले होते. दिल्लीचे राजग्रंथालय आग्र्यास हलविण्याच्या कामी त्याने पुढाकार घेतला होता. ग्रंथालयांच्या बाबतीत अकबराने केलेले कार्य महनीय आहे. त्याने आपल्या ग्रंथसंग्रहात भर घातली, इतकेच नव्हे तर राजधानीतील इतर ग्रंथालयांची व्यवस्था पाहण्यासाठी एक स्वतंत्र खाते निर्माण केले होते. नझीम हा त्या खात्याचा प्रमुख असे व दुय्यम अधिकाऱ्याला दरोगा-इ-किताबखाना असे म्हटले जाई. ग्रंथालयासाठी सेवक नेमणे, अंदाजपत्रक तयार करणे इ. कामे नझीम हा स्वतः करीत असे व तो राजाला जबाबदार असे तर ग्रंथ निवडणे, विकत घेणे, त्यांची निगा राखणे इ. कामे ग्रंथपाल या नात्याने दरोगा करी. राजघराण्यातील व्यक्ती व दरबारांतील मानकरी यांच्यासाठीच असलेल्या या ग्रंथालयांत अन्य अभ्यासूंनाही प्रवेश मिळे. ग्रंथालयांत नकलनवीस, बांधणीकार, भाषांतरकार व कुशल कारागीर यांचाही सेवक म्हणून समावेश होत असे . अकबराने व्यासंगपूर्णतेने जमविलेला ग्रंथसंग्रह अजोड असा होता. तो मरण पावला, त्यावेळी त्याच्या संग्रहात २४,००० ग्रंथ होते, असे इतिहासकार व्हिन्सेट स्मिथ याने म्हटले आहे.
जहांगीर बादशहाच्या कारकीर्दीत मक्तुबखान हा ग्रंथालयप्रमुख होता. त्याला बादशहाबरोबर ग्रंथसंग्रहासह गुजरातेत जावे लागले. दारा शुकोह याने स्वतःच अनेक संस्कृत ग्रंथांची भाषांतरे करून आपल्या ग्रंथसंग्रहात भर घातली होती.
मोगल बादशहांप्रमाणे त्यांच्या दरबारांतील सरदार आणि म्हैसूर, जयपूर येथील राजे यांनीही ग्रंथसंग्रह बाळगले होते.
मोगल काळातील ग्रंथालयांच्या इमारतींचे शिल्प तत्कालीन भव्य शिल्पाला साजेसे होते. संगमरवरी जमिनी, मोकळ्या हवेची जागा, मोठमोठ्या घडवंच्या असे ग्रंथालयांचे स्वरूप होते व त्यांत भूर्जपत्र, कातडे यांवरील ग्रंथ नीट विषयवार लावून ठेवले जात. या काळातील ग्रंथालयांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांद्वारे स्त्रीशिक्षणास मिळालेली चालना. बाबराची मुलगी गुलबदन हिचे स्वतःचे ग्रंथालय होते. औरंगजेबाची मुलगी झेबुन्निसा हिचाही ग्रंथसंग्रह होता. अकबराने तर स्त्रीशिक्षणास वाव मिळावा म्हणून फतेपुर सीक्री येथे एक स्वतंत्र ग्रंथालय स्थापन केले होते.
महमूदशाहच्या (१७१९ – ४८) कारकीर्दीत नादिरशाहने मोगलांचा पाडाव केला व या बादशहांनी मोठ्या आवडीने जतन केलेला हा दुर्मिळ ग्रंथांचा संग्रह लुटून इराणला नेला व कवडीमोलाने तो विकून टाकला.
सतराव्या व अठराव्या शतकांतील ग्रंथालये : अकबराच्या मृत्यूनंतर मोगल सत्ता प्रबळ राहिली नाही. मराठे, राजपूत, मुसलमान वगैरे राजांच्या राज्यविस्ताराच्या ईर्षेमुळे सर्व भारतभर अशांत वातावरण होते व सांस्कृतिक जीवन अस्थिर झाले होते. दुसरीकडे ब्रिटिश सत्ता हळूहळू पसरत होती. अशा धामधुमीच्या व अंदाधुंदीच्या काळातही धार्मिक व शैक्षणिक संस्थांनी ज्ञान व संस्कृती जतन करण्याचे चालूच ठेवले होते. भारतीयांची विद्या व ज्ञान या विषयींची आस्था आणि तत्कालीन पंडित आणि विद्याप्रेमी राजे यांचे ग्रंथप्रेम यांमुळे ग्रंथसंग्रह टिकून राहण्यास मदत झाली. वाराणसीचे कवींद्राचार्य, राजा भोज, जयसिंह, बिकानेरचा राजा अनूपसिंह यांचे व जैसलमीर येथील राजग्रंथालयातील संग्रह हे उल्लेखनीय होते. धार येथील भोजराजाच्या सरस्वतीभवन देवालयातील सु. तीस हजार हस्तलिखित ग्रंथसंग्रहांची माहिती जर्मन पंडित ब्यूलर याने दिली आहे.
वाराणसीचे कवींद्राचार्य यांच्या सतराव्या शतकातील ग्रंथसंग्रहांचे सूक्ष्म वर्णन फ्रेंच प्रवासी फ्रॅन्सिस बर्नियर
याने लिहून ठेवलेले आहे. शहराच्या एका दूरवरच्या ठिकाणी सुंदर व प्रशांत अशा इमारतीत कवींद्राचार्यांचा हा ग्रंथसंग्रह होता. त्यात प्रामुख्याने प्राचीन संस्कृत ग्रंथांचा भरणा होता. या ग्रंथालयाचा लाभ घेण्यासाठी अनेक पंडित येत असत. शहाजहान बादशहा कवींद्राचार्यांना मान देत असे. राजपुत्र दारा याने तर त्यांना शंकराचार्यांचा अवतार मानून आपले गुरू केले होते. अंबरचा राजा दुसरा जयसिंह याने १७२४ च्या सुमारास जयपूर या शहराची उभारणी करून तेथे ग्रंथालयाची स्थापना केली. या ग्रंथालयाचे वैशिष्ट्य असे, की ज्योतिषशास्त्रावरील संस्कृत ग्रंथांप्रमाणे अरबी, ग्रीक या भाषांतील ग्रंथही त्यात संग्रहीत केले होते. या विद्याव्यासंगी राजाने जगाच्या कानाकोपऱ्यांतून ज्योतिषावरील अद्ययावत ग्रंथ आपल्या संग्रहात आणविले होते.
तंजावर येथील सरस्वती महाल ग्रंथालयाची सतराव्या शतकात स्थापना झाली असून हे भारतात सध्या अस्तित्वात असलेले सर्वात प्राचीन ग्रंथालय होय. जगातील महत्त्वाच्या ग्रंथालयांत याची गणना केली जाते. या ग्रंथसंग्रहाचे वैशिष्ट्य म्हणजे भिन्नवंशीय राजांनी त्याचे आपुलकीने संवर्धन केले आहे. मूळच्या चोल राजांच्या ग्रंथसंग्रहात नायक राजांनी १५३२ ते १६७३ या कालावधीत भर घातली. त्यानंतर मराठ्यांची सत्ता तंजावरला प्रस्थापित झाली, तेव्हा मराठी राजांनीही आपापल्यापरी या ग्रंथसंग्रहात भर घातली. राजे सरफोजी यांचा काल १७९८ ते १८३२ हा होता. त्यांना स्वतःला अनेक भाषा येत होत्या. मराठी व संस्कृत भाषांवर त्यांचे विशेष प्रभुत्व होते. सदासर्वकाळ ते वाचन, लेखन व संशोधन यांत व्यग्र असत. या ग्रंथालयाच्या वैभवास त्यांचा फार मोठा हातभार लागला आहे. या ग्रंथालयाच्या संग्रहात नायक राजांनी रचलेले अनेक ग्रंथ आजही उपलब्ध आहेत. राजे सरफोजी यांनी या ग्रंथालयात तमिळ, संस्कृत, प्राकृत, मराठी व मोडी हस्तलिखितांचा व ग्रंथांचा अपूर्व असा संग्रह केलेला आहे. त्याच्या जोडीला इंग्रजी व फ्रेंच भाषेतील दुर्मिळ ग्रंथ आणि अनेक ग्रंथांच्या पहिल्या आवृत्त्याही त्यांनी जमा केल्या. महाराजांच्या स्वाक्षऱ्या अनेक ग्रंथांत आढळतात. ग्रंथांबरोबर चित्रे, नाणी, पोशाख व युद्धसामग्री यांचाही मूल्यवान संग्रह येथे आढळतो. १९१८ मध्ये या ग्रंथालयाचा कारभार विश्वस्तांकरवी होऊ लागला. त्याच्या व्यवस्थेसाठी एक लाख रुपयांचे अनुदानही राजांनी दिले. हे ग्रंथालय सध्या तमिळनाडू सरकारच्या ताब्यात असून अनेक अभ्यासक या ग्रंथालयाचा लाभ घेत असतात.
प्राचीन मराठी ग्रंथसंग्रह : भारतात मुद्रणकलेचा प्रवेश सोळाव्या शतकात झाला परंतु त्याचा फारसा प्रसार न झाल्यामुळे बहुतेक ग्रंथ हस्तलिखित स्वरूपातच होते. एका पुस्तकाच्या अनेक प्रती तयार करावयास लागणारा वेळ, पैसा यामुळे सर्वसामान्य व्यक्तींना ग्रंथसंग्रह करणे शक्य नव्हते. विद्येचा प्रसारही समाजातील काही वर्गांपुरताच मर्यादित असल्यामुळे कवी, पंडित, त्यांचे वंशज, संत-महंत व त्यांचे मठ, त्यांचा शिष्यपरिवार, तीर्थोपाध्ये, शास्त्री, कीर्तनकार, पुराणिक या व्यक्तींकडूनच ग्रंथसंग्रह केला जाई. यांशिवाय राजे-महाराजे, सरदार, जहागिरदार यांचेही व्यक्तिगत संग्रह असत.
विजापूरचा ग्रंथप्रेमी बादशहा पहिला अली आदिलशहा (१५५८ ते १५८०) याने आपल्या शाही किताबखान्याचा ग्रंथपाल म्हणून नांदेडच्या शेष घराण्यातील वामन अनंत यांची १५६५ मध्ये नेमणूक केली होती. सुप्रसिद्ध मराठी कवी वामन पंडित यांचे हे आजोबा होत, असे म्हटले जाते.
ग्रंथसंग्रहाच्या बाबतीत समर्थ रामदासस्वामी यांचा मुद्दाम उल्लेख केला पाहिजे. त्यांनी धर्मकारणाबरोबर राजकारण व ग्रंथकारणही केले. ते तीर्थयात्रेसमयी ग्रंथांच्या प्रती मिळवीत असत. सर्व भारतभर त्यांनी स्थापन केलेले मठ ही जणू ग्रंथालयेच होती. प्रत्येक मठात समर्थांचे संपूर्ण वाङ्मय असे. याशिवाय परंपरेने होणारे मठाधिपती व त्यांचे शिष्य अन्य प्राचीन ग्रंथांच्या नकला करून त्यांचाही संग्रह करीत. चाफळचा मठ, बीड येथील गिरिधरांचा मठ, आत्माराममहाराजांचा येवकेहेळी मठ, तंजावरचा भीमस्वामींचा मठ, दिनकर-तीसगाव मठ, कल्याणस्वामींचा डोमगाव मठ या प्रमुख मठांतून उपलब्ध झालेल्या ग्रंथसंग्रहांची वर्णनात्मक यादी श्रीरामदासी संशोधन या ग्रंथात दिलेली आहे. त्यावरून या मठांतून असलेल्या ग्रंथसंग्रहाचे स्वरूप स्पष्ट होते. धुळे येथील श्रीसमर्थ वाग्देवता मंदिरात हे सर्व ग्रंथसंग्रह सध्या जतन करण्यात आले आहेत.
पेशवे स्वतः विद्याप्रेमी असल्यामुळे त्यांनी स्वतःचा ग्रंथसंग्रह केला होता. पहिले बाजीराव पेशवे हे विद्याव्यासंगी होते. फुरसतीच्या वेळी नव्हे, तर स्वारीवर असतानाही ते ग्रंथ बरोबर बाळगीत आणि त्यांचे वाचनही करीत असत. राज्यकारभाराच्या अठरा खात्यांपैकी पुस्तकशाळा हेही एक त्यांचे खाते होते. शनवारवाडा बांधल्यावर तेथे पुस्तकशाळेची व्यवस्था करण्यात आली होती. नानासाहेब पेशवे यांचा ग्रंथसंग्रहदेखील मोठा होता. गोविंदराव आपटे हे त्या पुस्तकशाळेचे प्रमुख होते. हस्तलिखिते जमा करणे, त्यांच्या प्रती तयार करणे, ग्रंथांची देवघेव करणे, त्यांचे हिशोब ठेवणे ही कामे त्यांच्याकडे असत. पेशव्यांच्या काही स्त्रिया साक्षर व सुसंस्कृत होत्या. त्याही या ग्रंथसंग्रहाचा लाभ घेत असत, असा उल्लेख आढळतो. या पुस्तकशाळेच्या संबंधात नारो शंकर, गोविंद कृष्ण, संभाजी जाधव, पिलाजी जाधव, सदाशिव कृष्ण आंबेकर, गोविंदभट बर्वे आदींचे उल्लेख पेशवे दप्तरांत केलेले आढळतात. पेशवाई नष्ट झाल्यानंतर पेशव्यांचा हा सर्व हस्तलिखित ग्रंथसंग्रह इंग्रजांनी दक्षिणा फंडातून चालविलेल्या संस्कृत पाठशाळेकडे दिला. कालांतराने तो डेक्कन कॉलेजकडे आला व १९३४ मध्ये डेक्कन कॉलेज बंद झाल्यानंतर भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरात तो संग्रहीत करण्यात आला.
बौद्ध-भिक्षू, जैनाचार्य आणि कुमारपाल यांसारखे धर्माभिमानी राजे यांनी संस्कृत व प्राकृत भाषांतील आपले ग्रंथ संग्रहीत करून धर्म व अध्यात्मज्ञान यांची परंपरा टिकविली. त्याप्रमाणे महाराष्ट्रातील महानुभाव, नाथ, वारकरी, दत्त, रामदासी वा अन्य पंथीय साधुसंत आणि त्यांचे असंख्य अनुयायी यांनीही घरोघरी, देवालयांतून व मठांतून प्राचीन संतवाङ्मयाचा संग्रह करून त्यांचे जतन केले.
अर्वाचीन काळातील ग्रंथालये : पाश्चात्त्यांच्या प्रेरणेने आणि ब्रिटिश शासनाच्या प्रोत्साहनाने भारतात ग्रंथालयांची स्थापना होऊ लागली. अर्वाचीन काळात भारतातील सर्वांत पहिले ग्रंथालय स्थापन करण्याचा मान यूरोपीय ख्रिस्ती धर्मोपदेशकांकडे जातो. सोसायटी फॉर प्रमोशन ऑफ ख्रिश्चन नॉलेज या १६९८ मध्ये स्थापन केलेल्या संस्थेने मद्रास व बंगालमध्ये ग्रंथालयाच्या बाबतीत भरीव असे कार्य केले. रेव्ह. जे. लाँग व बेंजामिन ॲडम्स ही दोन नावे या संदर्भात उल्लेखनीय आहेत. ब्रिटिश सनदी नोकरांत धर्मोपदेशक, विद्वान पंडित, भाषाशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ या सर्वाचा समावेश होता. १७८४ मध्ये कलकत्ता येथे एशियाटिक सोसायटीची स्थापना झाली. कलकत्त्याचे न्यायाधीश व एक भाषातज्ञ सर विल्यम जोन्स हे या संस्थेचे अध्यक्ष होते. पाश्चात्त्य व पौर्वात्य पंडितांनी एकत्र येऊन स्थापना केलेली ही संस्था होती. या संस्थेच्या ग्रंथालयात संस्कृत, अरबी, इटालियन, नेपाळी इ. भाषांतील दुर्मिळ ग्रंथ व हस्तलिखिते जमा झाली. एशियाटिक रिसर्चेस व बिब्लिओथेका इंडिका या संस्थांच्या दोन मासिकांना संशोधनक्षेत्रात महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले. मद्रासच्या सर विल्यम कॉलेजच्या संग्रहात असलेला टिपू सुलतानाचा ग्रंथसंग्रह १८५४ मध्ये एशियाटिक सोसायटीच्या ग्रंथालयात विलीन झाला. डॉ. राजेंद्रलाल मित्र व महामहोपाध्याय हरप्रसाद शास्त्री यांनी या ग्रंथालयाच्या उभारणीस महत्त्वाचा हातभार लावला.
भारतातील पहिले सार्वजनिक ग्रंथालयही कलकत्ता येथेच स्थापन झाले. १८३५ मध्ये खाजगी व्यक्तींनी एकत्र येऊन कलकत्ता पब्लिक लायब्ररी या ग्रंथालयाची स्थापना केली. त्याच्या अनुकरणाने भारतातील प्रमुख शहरांतून सार्वजनिक सार्वजनिक ग्रंथालयांची स्थापना झाली. खऱ्या अर्थाने ही वर्गणी-ग्रंथालयेच होती कारण समाजातील सर्वांना तेथे मोफत प्रवेश नव्हता. कलकत्त्याच्या पब्लिक लायब्ररीचे १८४४ मध्ये मेट्काफ हॉल येथे स्थलांतर झाले. प्यारेचंद मित्र हे सुप्रसिद्ध बंगाली कादंबरीकार या ग्रंथालयाचे पहिले हिंदी ग्रंथपाल होते. पुढे १९०२ मध्ये या ग्रंथालयाचे इंपीरियल लायब्ररीत रूपांतर झाले. ब्रिटिश म्यूझीयम ग्रंथालयाचा
साहाय्यक ग्रंथपाल जॉन मॅकफर्लेन व बंगाली भाषातज्ञ हरिनाथ डे हे या ग्रंथालयाचे ग्रंथपाल होते. याच ग्रंथालयाचे रूपांतर पुढे भारताच्या राष्ट्रीय ग्रंथालयात झाले. २६ नोव्हेंबर १८०४ रोजी मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर जोनाथन डंकन यांच्या निवासस्थानी सतरा पौर्वात्य विद्याप्रेमी ब्रिटिश नागरिकांच्या भरलेल्या सभेत लिटररी सोसायटी ऑफ बॉम्बे या संस्थेची स्थापना झाली. या बैठकीत संस्थेच्या अध्यक्षपदी सरन्यायाधीश जेम्स मॅकिंटाश व चिटणीस म्हणून सुप्रसिद्ध इतिहासकार विल्यम अर्स्किन यांची नियुक्ती झाली. भारतीय भाषा, विद्या व कला यांचा अभ्यास व संशोधन व्हावे या उद्देशाने स्थापन झालेल्या या संस्थेच्या त्रैमासिक बैठकीत तत्संबंधी निबंधवाचन व चर्चा करण्याचेही ठरले. अभ्यासास उपयुक्त अशा ग्रंथालयाची आवश्यकता वाटू लागल्यामुळे १८०५ साली मुंबईच्या एका बंद पडलेल्या संस्थेचा ग्रंथसंग्रह विकत घेण्यात आला. १८२७ साली संस्थेचे नामांतर होऊन तिला रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटन अँड आयर्लंड (मुंबई शाखा) असे संबोधण्यात येऊ लागले. १८३१ साली प्रस्तुत संस्था व तिचे ग्रंथालय नवीनच बांधलेल्या टाउन हॉलच्या इमारतीत आले व गेली १६८ वर्षे हे त्याच ठिकाणी आहे. संस्थेने वेळोवेळी केलेली खरेदी व मिळालेल्या ग्रंथांच्या देणग्या यांमुळे हे ग्रंथालय आज समृद्ध झाले आहे व त्याचा ग्रंथसंग्रह दोन लाखांवर गेलेला आहे. संस्थेजवळ विविध विषयांवरचे आणि विशेषतः भारतीय इतिहास, विद्या व संस्कृती यांसंबंधीचे हजारो व दुर्मिळ व मूल्यवान ग्रंथ, हस्तलिखिते व पुरातन नाण्यांचा अमोल संग्रहही आहे. कवी दान्ते याच्या डिव्हाइन कॉमेडी (इं. शी. ) या ग्रंथाचे चौदाव्या शतकातील आकर्षक हस्तलिखित हे या संस्थेच्या ग्रंथसंग्रहाचे अपूर्व लेणे आहे.
मुंबई सरकारने ग्रंथालय-चळवळीचा आढावा घेण्यासाठी नियुक्त केलेल्या फैजी समितीच्या शिफारशीप्रमाणे १९४७ साली राज्याच्या मध्यवर्ती ग्रंथालय संस्थेशी हे संलग्न करून टाउन हॉलच्या इमारतीत ते स्थापन करण्यात आले. तेव्हापासून लेखाधिकार कायद्यान्वये प्राप्त झालेले व पुढे होणारे ग्रंथ या मध्यवर्ती ग्रंथालयाच्या स्वाधीन करण्यात आले व येतील. याशिवाय १९५४ च्या डिलिव्हरी ऑफ बुक्स कायद्यान्वये भारतात प्रकाशित होणाऱ्या प्रत्येक ग्रंथ व वृत्तपत्र यांच्या प्रतीही या ग्रंथालयाकङे येत असतात़ . कोणाही नागरिकाला या ग्रंथालयात वाचनाभ्यासासाठी मुक्त प्रवेश मिळू शकतो. संस्थेला महाराष्ट्र शासन व भारत सरकारकडून अनुक्रमे मध्यवर्ती ग्रंथालय व डिलिव्हरी ऑफ बुक्स ग्रंथसंग्रह यांच्या व्यवस्थेसाठी अनुदान मिळत असते. एशियाटिक सोसायटीचा सदस्य होणाऱ्या व्यक्तीला तिच्या ग्रंथालयातील ग्रंथ वाचनासाठी बाहेर नेता येतात. भारतातील अर्वाचीन काळचे हे सर्वांत जुने ग्रंथालय आज अत्यंत उपयुक्त कार्य करीत आहे.
कलकत्ता संस्कृत कॉलेज (१८२४), रूडकी एंजिनिअरिंग कॉलेज ग्रंथालय (१८४७), जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया (१८५१), कलकत्ता विद्यापीठ ग्रंथालय (१८५७), अलाहाबाद पब्लिक लायब्ररी (१८६३), इंडियन असोसिएशन फॉर कल्टिव्हेशन ऑफ सायन्स (१८७६), मुंबई विद्यापीठ ग्रंथालय (१८७९), खुदाबक्ष ग्रंथालय, पाटणा (१८९१), व कोन्नेमारा पब्लिक लायब्ररी, मद्रास (१८९६) ही या काळातील महत्त्वाची ग्रंथालये होत.
पाटणा येथील खुदाबक्ष ग्रंथालय वैशिष्ट्यपूर्ण आहे. एका पर्शियन पंडिताने आपल्या पित्याचा मूळचा १,५०० हस्तलिखितांचा संग्रह पाच हजारांपर्यंत वाढविला व आपल्या पित्याच्या मरणसमयी ग्रंथसंग्रह समृद्ध
करण्याचे दिलेले वचन आयुष्यभराच्या परिश्रमाने पुरे केले. १८९१ मध्ये या ग्रंथालयाचे विश्वस्त संस्थेत रूपांतर करण्यात आले व सर्वांसाठी ग्रंथालय खुले करण्यात येऊन त्याला ओरिएंटल अँड पब्लिक लायब्ररी असे नाव देण्यात आले. खुदाबक्ष यांनी या ग्रंथालयांतील हस्तलिखितांची सूची प्रसिद्ध केली असून त्यांनी अन्य देणगीदारांना आपले खाजगी हस्तलिखितसंग्रह या ग्रंथालयाला देण्यासाठी प्रवृत्त केले. ग्रंथालयविषयक त्यांचे कार्य इतके मोठे आहे, की जदुनाथ सरकार या इतिहासकाराने त्यांना भारताचे बॉडले असे संबोधले आहे. हे ग्रंथालय अद्यापि खुदाबक्ष ग्रंथालय या नावानेच ओळखले जाते.
पेशवाई नष्ट झाल्यानंतर इंग्रजांनी पुढाकार घेऊन राज्यपाल, जिल्हाधिकारी, मामलेदार, न्यायाधीश, शिक्षणाधिकारी यांसारख्या अधिकाऱ्यांमार्फत नेटिव्ह जनरल लायब्रऱ्या स्थापन केल्या आणि त्यांच्या विकासासाठी प्रयत्न केले. त्याचप्रमाणे मुंबई प्रांतात १८६७ चा रजिस्ट्रेशनचा कायदा मंजूर करवून घेतला. आणखी एक महत्त्वाचा प्रयत्न ग्रंथालयांच्या दृष्टीने उल्लेखनीय आहे, तो म्हणजे हस्तलिखित ग्रंथांचा शोध. पीटर पीटरसन, रा. गो. भांडारकर, आबाजी विष्णू काथवटे या पंडितांनी ठिकठिकाणी विखुरलेली वीस हजार हस्तलिखिते जमा केली. आज ही हस्तलिखिते भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरात संग्रहीत केलेली आहेत.
अहमदनगर (१८३६), नासिक (१८४०), मुंबई (१८४६), पुणे (१८४८), कोल्हापूर (१८५०), सातारा (१८५२), सोलापूर (१८५२) या नेटिव्ह जनरल लायब्रऱ्यांच्या जोडीने एका महत्त्वपूर्ण ग्रंथालयाचा उल्लेख करावयास हवा, ते म्हणजे ठाणे येथील मराठी ग्रंथसंग्रहालय. केवळ मराठी भाषेतील ग्रंथांचा संग्रह करण्याच्या हेतूने १ जून १८९३ रोजी महाराष्ट्र सारस्वतकार वि. ल. भावे यांनी स्थापन केलेले ग्रंथालय अपूर्व होते. नेटिव्ह जनरल लायब्ररींना प्रेरणा व प्रत्यक्ष साह्य होते ते सनदी नोकरांचे परंतु मराठी ग्रंथसंग्रहालयाची स्थापना झाली होती ती न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक यांच्या प्रेरणेने. पुणतांबेकर प्रभृतींनी मराठी ग्रंथांचा संग्रह करण्यासाठी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची १८९८ मध्ये स्थापना केली. शंकर श्रीकृष्ण देव यांनीही धुळे येथे सत्कार्योत्तेजक सभेची १८९३ मध्ये स्थापना करून तेथे रामदासी वाङ्मयाचा संग्रह केला. याशिवाय माशेल (गोवा) येथे नाईक व करंडेशास्त्री यांनी १८८९ मध्ये गोवा हिंदु वाचनालय या ग्रंथालयाची स्थापना केली होती. एकीकडे नेटिव्ह जनरल लायब्रऱ्यांची स्थापना होत असताना दुसरीकडे देशाभिमानाने प्रेरित होऊन समाजशिक्षण देण्याच्या उद्देशाने स्थापन केलेली ही ग्रंथालये म्हणजे स्वातंत्र्यप्रेमाची व जागृतीची प्रतीकेच होती.
विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात बडोदे संस्थानात सार्वजनिक ग्रंथालयाचा पाया घातला गेला. त्याचे पडसाद शेजारच्या प्रांतांतून उठले व तेथेही ग्रंथालयांची नव्याने स्थापना झाली. कलकत्ता येथेही १९४८ मध्ये राष्ट्रीय ग्रंथालय स्थापन करण्यात आले. विद्यापीठ अनुदान मंडळाच्या साहाय्याने बहुतेक राज्यांत विद्यापीठ ग्रंथालयाची नव्या धर्तीवर स्थापना होऊन त्यांची प्रगती होऊ लागली. १९५८ पासून राष्ट्रीय ग्रंथसूची प्रसिद्ध होऊ लागली, देशातील प्रत्येक राज्यात ग्रंथालयसंघ स्थापन झाले. ग्रंथपालनशास्रविषयक नियतकालिके प्रसिद्ध होऊ लागली व सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वसामान्य जनतेत मुक्तद्वार सार्वजनिक ग्रंथालयाबद्दलची जाणीव निर्माण झाली. या सर्व गोष्टी ग्रंथालयप्रगतीच्या निदर्शक म्हणता येतील.
बडोदे संस्थानचे विद्याप्रेमी व दानशूर राजे सयाजीराव गायकवाड यांनी बॉर्डन या अमेरिकन तज्ञास मुद्दाम आणवून १९१० मध्ये आदर्श अशी सार्वजनिक ग्रंथालय-पद्धती उभारली. बडोदे येथे एक मध्यवर्ती ग्रंथालय स्थापन करून संस्थानातील प्रत्येक गावात व खेड्यात ग्रंथालय राहील, अशी व्यवस्था केली. १९३० पर्यंत ग्रंथालयाचे लोण पंच्याऐंशी टक्के जनतेपर्यंत पोहोचले. बॉर्डन, मोतीभाई अमिन, न्यूटन, मोहन दत्त, ज. स. कुडाळकर व त्यांच्यानंतर त्र्यं. दि. वाकनीस हे संस्थानच्या मध्यवर्ती ग्रंथालयाचे प्रमुख होते. ग्रंथालय क्षेत्रात जे जे नाविन्यपूर्ण उपक्रम भारतात सुरू झाले त्यांचे उगमस्थान बडोदे हे होते. ग्रंथपालनशिक्षणाची सोय, मुलांचे ग्रंथालय, स्त्रियांसाठी स्वतंत्र विभाग, फिरते वाचनालय, ग्रंथपालन शिक्षण व लायब्ररी क्लब या गोष्टी प्रथम बडोदे संस्थानातच सुरू झाल्या. संस्थानातील सर्व ग्रंथालयाची व्यवस्था साहाय्यक ग्रंथालयाधिकारी यांच्यामार्फत होई. जिल्हा बोर्ड, म्युनिसिपालटी यांच्यामार्फत ग्रंथालयांना अनुदान मिळे. खाजगी व्यक्ती व संस्था यांना ग्रंथालय स्थापन करण्यास उत्तेजन देण्यासाठी सरकार निम्मा खर्च तर सोसत असेच, पण त्याशिवाय सुरुवातीच्या ग्रंथसंग्रहासाठी सु. ७५ टक्के अनुदान मिळे. भारतीय ग्रंथालयाच्या इतिहासात बडोदे संस्थानातील ग्रंथालये व त्यांचे जनक सयाजीराव गायकवाड यांना फार मोठे स्थान आहे.
राष्ट्रीय ग्रंथालय : १८३५ मध्ये स्थापन केलेल्या कलकत्ता पब्लिक लायब्ररीचे रूपांतर १९०२ मध्ये इंपीरियल लायब्ररीत झाले. त्याचेच पुनर्रूपांतर होऊन भारताच्या राष्ट्रीय ग्रंथालयाची १९४८ साली स्थापना झाली. जॉन मॅकफर्लेन, के. एम्. असादुल्ला यांच्यानंतर ⇨ बी. एस्. केशवन् व यादवराव मुळे यांनी या ग्रंथालयाच्या प्रगतीस हातभार लावला. या ग्रंथालयात आज सु. तेरा लाख ग्रंथ असून दहा हजार नियतकालिके व संस्कृत, अरेबिक, इराणी, उर्दू इ. भाषांतील अनेक हस्तलिखिते आहेत. वार्षिक अंदाजपत्रक चार लाखांचे असून प्रतिवर्षी सु. बहात्तर हजार नागरिक या ग्रंथालयाचा फायदा घेतात. सध्या लेखाधिकार कायद्याप्रमाणे देशातील प्रत्येक भाषेतील प्रत्येक पुस्तकाची एक प्रत या ग्रंथालयात येते. भारतीय राष्ट्रीय ग्रंथसूची तयार करण्याचे काम याच ग्रंथालयाच्या सहकार्याने होत असते.
दिल्ली पब्लिक लायब्ररी : युनेस्को या जागतिक संस्थेच्या सहकार्याने भारत सरकारने १९५० मध्ये अद्ययावत व आदर्श अशा प्रायोगिक ग्रंथालयाची स्थापना केली. या ग्रंथालयाची रचना पाश्चात्त्य धर्तीवर केलेली असून सर्वांना मुक्तप्रवेश संदर्भ, नियतकालिके हे स्वतंत्र विभाग मुले व अंधांसाठी सोयी तसेच फिरते वाचनालय इ. वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम या ग्रंथालयाने प्रांरभापासूनच सुरू केले आहेत.
इन्सडॉक : भारत सरकारने युनेस्कोच्या सहकार्याने इंडियन नॅशनल सायंटिफिक डॉक्युमेंटेशन सेंटर या संस्थेची १९५२ साली स्थापना केल्याने ग्रंथालय क्षेत्रात प्रगतीचे पुढचे पाऊल पडले आहे. प्रथम नॅशनल फिजिकल लॅबोरेटरीच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेचे कार्य चालू होते. परंतु १९६२ पासून कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च या संस्थेच्या नियंत्रणाखाली या संस्थेचे कार्य चालू असून बी. एस्. केशवन् हे या संस्थेचे पहिले संचालक होत. देशातील संशोधनासाठी आवश्यक अशी शास्त्रीय नियतकालिके जमविणे व त्यांचे जतन करणे नवीन अद्ययावत लेखांची माहिती वैज्ञानिक, शास्त्रज्ञ, संशोधक यांना देणे परभाषेतील लेखांची इंग्रजी भाषांतरे उपलब्ध करून देणे प्रकाशित वा हस्तलिखित शास्त्रीय ग्रंथ व लेख जतन करणे आणि जागतिक संशोधन संस्थांशी संपर्क राखणे ही या संस्थेची उद्दिष्टे आहेत. दक्षिण व नैर्ऋत्य आशियातील वैज्ञानिक नियतकालिकांचे ॲनल्स ऑफ लायब्ररी सायन्स अँड डॉक्युमेंटेशन हे त्रैमासिक व अन्य प्रकाशने प्रकाशित करणे आणि प्रलेखपोषणाचा (डॉक्युमेंटेशनचा) शिक्षण वर्ग चालविणे ही या संस्थेची वैशिष्ट्ये होत.
विसाव्या शतकाच्या सुरुवातीस महाराष्ट्रात लोकमान्य टिळक यांच्या नेतृत्वाने स्वातंत्र्य चळवळीस सुरुवात झालेली होती. या काळात राजकीय कार्याचे व्यासपीठ या दृष्टीने पुढाऱ्यांनी सार्वजनिक ग्रंथालयांचा उपयोग करून घेतला. त्यावेळच्या मुंबई सरकारच्या ध्यानात ही गोष्ट आल्यानंतर १९०९ मध्ये ही ग्रंथालये सरकारकडे नोंदविण्यासाठी सरकारने नियमावली तयार केली. तीत सरकारने निषिद्ध ठरविलेले वाङ्मय ग्रंथालयात ठेवू नये तसेच ग्रंथालयाची जागा राजकीय कारणासाठी वापरू नये अशा अटी होत्या. लोकमान्य टिळक यांच्या मृत्यूनंतर त्यांचे स्मारक म्हणून महाराष्ट्रात ग्रंथालयांची स्थापना करण्यात आली. या काळात स्थापन झालेली महाराष्ट्रातील काही ग्रंथालये अशी : भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे (१९१०) विदर्भ साहित्य संघ, श्री. शिवाजी (गडकरी) ग्रंथालय, नागपूर (१९२३) कैवल्यधाम ग्रंथालय, लोणावळा (१९२४) प्राज्ञपाठशाळा मंडळ, वाई (१९२५) भोसला वेदशास्त्र महाविद्यालय, नागपूर (१९३०) राजवाडे संशोधन मंदिर, धुळे (१९३२) शारदाश्रम ग्रंथालय, यवतमाळ (१९३२) श्रीरामकृष्ण आश्रम ग्रंथालय, नागपूर (१९३२) केसरी-मराठा ग्रंथशाळा, पुणे (१९३२) श्रीसमर्थ वाग्देवता मंदिर, धुळे (१९३६) भारतीय विद्याभवन मुंबई (१९३९) ही त्यांपैकी काही प्रमुख ग्रंथालये होत.
स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्रात पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर येथे स्थापन झालेल्या विद्यापीठांची ग्रंथालयेही उल्लेखनीय आहेत.
बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड यांच्याप्रमाणे भोर, औंध, फलटण, मिरज, जमखंडी, इचलकरंजी येथील संस्थानिकांनीही आपापल्या संस्थानांत ग्रंथालये स्थापन केली. संस्थाने विलीन झाल्यानंतर ती सर्व ग्रंथालये इतर मोठ्या ग्रंथालयांत समाविष्ट झाली. लो. टिळक, रँ. परांजपे, डॉ. जयकर, डॉ. भांडारकर, डॉ. आंबेडकर व शं. ग. दाते या विद्वान व्यक्तींचे ग्रंथसंग्रह महाराष्ट्रातील ख्यातनाम ग्रंथालयांत देणगी म्हणून दाखल झाले असून या निवडक व मूल्यवान ग्रंथांची भर पडल्याने संबंधित ग्रंथालये समृद्ध आहेत.
मुंबई सरकारने १९३९ मध्ये नेमलेल्या फैजी समितीच्या शिफारशीप्रमाणे पुणे, मुबंई येथे मध्यवर्ती व अहमदाबाद आणि धारवाड येथे प्रादेशिक ग्रंथालये स्थापन झाली. जिल्हा, तालुका या ठिकाणच्या काही जुन्या ग्रंथालयांना अनुदाने मिळू लागली, तर काहींची स्थापना नव्याने झाली. शासनाच्या प्रयत्नाबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांनीही ठिकठिकाणी मोफत वाचनालये सुरू केली आहेत. याशिवाय या काळात विविध संस्था, शाळा, महाविद्यालये, तांत्रिक शिक्षणसंस्था व संशोधन संस्था यांमधून ग्रंथालयांची मोठ्या प्रमाणावर स्थापना झाली. महाराष्ट्र राज्याचा ग्रंथालय कायदा डिसेंबर १९६७ मध्ये मंजूर झाला व त्याची कार्यवाही १ मे १९६८ पासून सुरू झाली. या कायद्यान्वये स्वतंत्र ग्रंथालय संचालनालय अस्तित्वात आले. महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालय योजनेचे नियोजन, व्यवस्थापन, संघटन व प्रगती यांची संपूर्ण जबाबदारी ग्रंथालय संचालनालयावर सोपविण्यात आली आहे. जुन्या आणि दुर्मिळ ग्रंथांचा, नियतकालिकांचा तसेच हस्तलिखितांचा संग्रह करणे व तो जतन करणे, ग्रंथालयशास्त्रांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था करणे, राज्यात प्रकाशित होणाऱ्या ग्रंथांची सूची तयार करणे इ. महत्त्वाची कामेही संचालनालयाकडून केली जातात. या कायद्याप्रमाणे शिक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ग्रंथालय परिषद (सल्लागार समिती) नेमण्यात आलेली असून तीत राज्य ग्रंथालयसंघ, साहित्य महामंडळ, महापालिका, जिल्हा परिषदा व नगरपालिकांचे प्रतिनिधी असून विधानसभा – विधानपरिषदांचे प्रतिनिधी, शिक्षणसंचालक, शिक्षण खात्याचे सचिव, धर्मादाय आयुक्त व काही ग्रंथालयशास्त्रतज्ञ यांचीही नियुक्ती या समितीवर करण्यात आली आहे. या कायद्याच्या नियमान्वये राज्यात आज एक मध्यवर्ती ग्रंथालय (मुंबई), चार शासकीय विभागीय ग्रंथालये (पुणे, नागपूर, नासिक व औरंगाबाद), २६ जिल्हा ग्रंथालये, १७६ तालुका ग्रंथालये, ५१८ इतर ग्रंथालये आणि यांशिवाय सु. ४,५०० ग्राम ग्रंथालये अनुदानासाठी मान्यतापात्र ठरलेली असून लोकसंख्येच्या प्रमाणात आणखी ग्रंथालये स्थापन करण्याची किंवा प्रस्थापित ग्रंथालयांना मान्यता देण्याची योजना आहे. या सर्व ग्रंथालयांना त्यांच्या स्थानिक दर्जाप्रमाणे नियुक्त अनुदान देण्यात येते, मात्र या मान्य ग्रंथालयांनी आपल्या वास्तूत स्थानिक नागरिकाला ग्रंथ, वृत्तपत्रे व मासिके निःशुल्क वाचावयास देण्याची त्यांवर सक्ती असते. ग्रंथालयांनी संग्रहित करावयाच्या ग्रंथांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी शासनाने एक ग्रंथनिवड समितीही नियुक्त केली आहे. तसेच इमारतबांधणी, साधनसामग्री व तिच्या वाढीसाठी अनुदान देण्याचीही तरतूद ह्या कायद्यात करण्यात आल्यामुळे अनेक ग्रंथालयांना आकर्षक, विस्तृत व पक्क्या इमारतींचा लाभ झाला आहे. या कायद्याचा प्रमुख विशेष म्हणजे ग्रंथालयकायद्यांप्रमाणे यात ग्रंथालय कराचा अवलंब केलेला नसून शासनाने वार्षिक पंचवीस लक्ष रुपयांचा स्वतंत्र ग्रंथालयनिधी राखून ठेवलेला आहे व त्यातून या योजनेतील ग्रंथालयांना अनुदाने देण्यात येत आहेत. या कायद्यान्वये पाश्चात्त्य देशांप्रमाणे सार्वजनिक निःशुल्क ग्रंथालयाची संपूर्ण सेवा जरी आज येथे जनतेला उपलब्ध होत नसली, तरी गरजू वाचकाला ग्रंथालयाच्या इमारतीत वाचनाची सवलत मिळू शकते.
ग्रंथालयाचे प्रकार : ग्रंथालयांच्या मालकीनुसार, विशिष्ट उपयोगानुसार व ग्रंथसंग्रहाच्या स्वरूपानुसार ग्रंथालयाचे स्थूलमानाने निरनिराळे प्रकार पडतात. शैक्षणिक, सार्वजनिक व विशेष किंवा संशोधनात्मक असे तीन प्रमुख प्रकार होत. अक्षरओळख झालेल्या बालकांना वाचनाची गोडी लावून त्यांचे मनोरंजन करू शकतील असे ग्रंथ असणारी बालग्रंथालये, अभ्यासक्रमाला पूरक अशा ग्रंथांचा संग्रह करणारी शालेय ग्रंथालये, ज्ञानाच्या विविध शाखांची विद्यार्थ्यांना ओळख करून देणारी व आवड निर्माण करणारी महाविद्यालयीन ग्रंथालये आणि पदव्युत्तर अभ्यासक व संशोधक यांची ज्ञानविषयक सर्वांगीण जिज्ञासा तृप्त करणारी विद्यापीठ ग्रंथालये, यांचा शैक्षणिक ग्रंथालयात समावेश केला जातो. सार्वजनिक ग्रंथालयाचे क्षेत्र त्यामानाने व्यापक असते. समाजाच्या सर्व थरांतील स्त्रीपुरुष, आबालवृद्ध, नवसाक्षर, सुशिक्षित, अभ्यासू, संशोधक अशा अनेकांच्या उपयोगासाठी सार्वजनिक ग्रंथालयांचे अस्तित्व असते. त्यामुळे येथे सर्वांनाच मुक्त प्रवेश असतो. सार्वजनिक ग्रंथालयांचे राष्ट्रीय, प्रादेशिक, शहर, तालुका, ग्राम आणि फिरती वाचनालये असे प्रकार होतात. अलीकडच्या काळात शहरातून आणि खेड्यातून चौकातील रस्त्याच्या कडेला एखाद्या कपाटात काही मासिकांचे व वृत्तपत्रांचे अंक ठेवतात. तेथेच शेजारी आडोसा व बाके ठेवून जाता-येता वाचनाची सोय केलेली आढळते परंतु अशा वाचनालयांना मर्यादा पडत असून त्यांना कायम स्वरूप लाभलेले नसते. विशेष प्रकारच्या किंवा संशोधन-ग्रंथालयांची स्थापना मात्र संशोधकांना ज्ञानविश्वाच्या विविध शाखांच्या प्रगतीची सूक्ष्म व अद्ययावत माहिती उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने होत असते. शासकीय खात्यांची ग्रंथालये या प्रकारात मोडतात. काहींच्या मते विद्यापीठ ग्रंथालये हीही विशेष ग्रंथालयेच होत.
ग्रंथालयाची वास्तू : एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत ग्रंथालयाची वेगळी अशी वास्तु-कल्पना नव्हती, अगदी प्राचीन काळी देवालये, मठ यांसारख्या ठिकाणचे ग्रंथसंग्रह असे ग्रंथालयाचे स्वरूप होते व हा ग्रंथसंग्रह जतन करणे एवढेच ग्रंथालयाचे कार्य होते. लहानसा हस्तलिखित ग्रंथसंग्रह इमारतीतील एखाद्या खोलीच्या कोपऱ्यात सोयीने ठेवता येई व त्याचे दमट हवेपासून संरक्षण करण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जाई. यापुढील काळात राजेरजवाडे, सरदार, हौशी श्रीमंत आणि विद्वान अभ्यासक यांनी स्वतःच्या उपयोगासाठी जमविलेला ग्रंथसंग्रह असे स्वरूप ग्रंथालयाला प्राप्त झाले. हा संग्रह सुशोभित लाकडी कपाटांतून दिवाणखान्यात मांडला जाई. या ठिकाणी तो संग्रह पाहता येण्याइतपत उजेड असे. हा दिवाणखाना मात्र तत्कालीन ⇨ गृहशोभनाच्या तत्त्वानुसार सजविलेला असे. दिवाणखान्याच्या भिंती, त्याचे छत यांवर विविधरंगी नक्षीकाम आणि कलाकुसर केलेली असल्यामुळे ग्रंथसंग्रहापेक्षा दिवाणखान्यातील कलाकुसर पाहूनच प्रेक्षक मोहून जात. रोम येथील व्हॅटिकन ग्रंथालय, फ्लॉरेन्स येथील लॉरेन्शियन ग्रंथालय ही अशा सुशोभित दालनांसाठी प्रसिद्ध आहेत. भारतातील तंजावरचा सरस्वती महाल ग्रंथालयाचाही या संदर्भात उल्लेख करता येईल. मुद्रणकलेच्या संशोधनानंतर ग्रंथसंख्या वाढू लागली. शिक्षणाच्या प्रसारामुळे ग्रंथालयाचे वाचकही वाढू लागले. ग्रंथालयांच्या वास्तूंवर त्याचा परिणाम झाला. ग्रंथ चोरीस जाऊ नयेत, म्हणून वाचकांसाठी ठेवलेल्या मेजांना ते साखळीने बांधून ठेवलेले असत. त्यानंतरच्या काळात दिवाणखान्यातील तळमजल्यांची जागा पुरेनाशी झाली. नुसत्या भिंतीला लावलेल्या कपाटांची रचना सोयीची वाटेनाशी झाली. त्याच दिवाणखान्यात अर्ध्या मजल्यावर गच्ची बांधून वाढता ग्रंथसंग्रह सामावला जाऊ लागला. भिंतीजवळील कपाटांना पुढे काटकोनी कपाटांची जोड देऊन वाचकांची सोय करण्यात येऊ लागली. ग्रंथसंग्रह आणि वाचनाची सोय एकत्र करण्याची कल्पना ही ग्रंथालयवास्तुरचनेच्या दृष्टीने मूलभूत स्वरूपाची असून आधुनिक काळातही काही प्रमाणात तशी रचना दृष्टीस पडते. अशा अल्कोव्ह पद्धतीची काहीशी रचना भारतातील प्राचीन बौद्ध मठांतून आढळते. १८५२ मध्ये इटालियन ग्रंथपाल पानीत्सी याने ब्रिटिश म्युझीयमसाठी वर्तुळाकार रचना सुचविली. ती रचना म्हणजे ग्रंथालयवास्तुरचनेतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा होय. या पद्धतीचे अनुकरण करून बिब्लिओथेक नॅशनले, पॅरिस, लायब्ररी ऑफ काँग्रेस, वॉशिंग्टन या जगद्विख्यात ग्रंथालयांच्या ग्रंथइमारती बांधण्यात आल्या. फ्रेंच आर्किटेक्ट लाब्रूस्त याने संग्रहासाठी कमी उंची व अनेक मजले असलेले संग्रहदालन आणि भरपूर उंची असलेले वाचनदालन करण्याची कल्पना मांडली. १९४० पर्यंत या कल्पनेचा प्रभाव जगातील बहुतेक ग्रंथालयांच्या वास्तुरचनेवर दिसत होता. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात, विशेषतः पहिल्या महायुद्धानंतर, इमारतीच्या भव्यतेपेक्षा त्या इमारतीत सामाविलेल्या ग्रंथसंग्रहाचा उपयोग जनतेला अधिकाधिक कसा होईल, या दृष्टीने इमारतीच्या रचनेत फेरफार होऊ लागले. ग्रंथसंग्रहाचे कोठीवजा स्वरूप जाऊन मुक्त प्रवेश, ग्रंथांची देवघेव व वाचकांच्या सुखसोई लक्षात घेण्यात आल्या. दुसऱ्या महायुद्धानंतर सार्वजनिक ग्रंथालयाला तर सांस्कृतिक केंद्राचेच स्वरूप प्राप्त झाले आहे. ग्रंथालयांतील ज्ञानसाधनांच्या प्रकारांतही विविधता येऊ लागली आहे. ध्वनिमुद्रिका, चित्रपट्टी (फिल्म्स), फिता इ. नव्या साधनांचे जतन करणे, ती साधने वाचकांना कमीतकमी वेळात उपलब्ध करून देणे, या दृष्टीने ग्रंथालयांच्या इमारतीमध्ये रचनात्मक बदल होऊ लागले. वाचनविभागाच्या जोडीला चर्चा, परिसंवाद, भाषणे व ध्वनिमुद्रिकाश्रवण यांसाठी आवाजबंद खोली, सूक्ष्मपत्रादी पाहण्यासाठी योग्य त्या साधनांनी सुसज्ज असे दालन या स्वरूपांच्या नव्या विभागांची भर त्यात पडू लागली. ग्रंथालयाच्या वास्तुरचनेत दुसऱ्या महायुद्धोत्तर काळात प्रमाणित रचना (मॉड्युलर कन्स्ट्रक्शन) हे तत्त्व प्रभावी ठरले. या रचनेमध्ये कायम स्वरूपाच्या कमीतकमी भिंती व गरजेनुसार आवश्यक तो मांडणीतील बदल करण्याची क्षमता असल्यामुळे ही रचना उपयुक्त आणि लोकप्रिय झाली. परिणामत: आज ग्रंथालयाचे नेमके कार्य कोणते याचा विचार करूनच ते कार्य वास्तुरचनेच्या द्वारा साकार करणे, हे ग्रंथालयवास्तुरचनेचे प्रधान कार्य होऊन बसते.
ग्रंथालयांच्या इमारतींचा आराखडा ठरविताना सर्वसाधारणपणे खालील गोष्टींचा विचार केला जातो. (१) ग्रंथालय ही वर्धिष्णू संस्था आहे. ग्रंथसंग्रह, सेवक व वाचक या तीनही अंगांनी ग्रंथालयाची वाढ होत असते. हे लक्षात घेता ग्रंथालयाच्या भावी विस्तारासाठी तरतूद करावी लागते व त्यासाठी गोल किंवा चौकोनी इमारतीपेक्षा समचतुष्कोणाकृती इमारत सोयीची ठरते. (२) इमारतीचे बाह्य स्वरूप सभोवतालच्या इमारतीचे जसे वास्तुशिल्प असेल, त्यास अनुसरून त्यात सामावून जाईल अशा स्वरूपाचे असते. (३) विशिष्ट भौगोलिक परिस्थिती व हवामान यांना अनुरूप रचना केली जाते. (४) ग्रंथालयातील विविध विभाग व त्यांचे कार्य तत्परतेने होऊ शकेल या दृष्टीने त्यांची रचना करावी लागते. वाचनदालनाची उंची साधारणपणे ४·५ ते ४·६ मी., प्रत्येक वाचकासाठी किमान २·२५ चौ. मी. जागा, अध्यापक-प्राध्यापक यांच्यासाठी सु. १·८ मी.× १·८ मी. अशा आकाराची स्वतंत्र जागा, ग्रंथसंग्रहदालनाची उंची किमान २ मी. व ०·०२ चौ. मी. जागेत १५ पुस्तकांचा समावेश, अशा प्रकारची काही प्रमाणे ग्रंथालयवास्तुरचनेत मानली जातात. अशा बदलत्या स्वरूपाचे दर्शन कलकत्त्याचे राष्ट्रीय ग्रंथालय, विद्यापीठ अनुदान मंडळाच्या आर्थिक साहाय्याने बांधलेल्या विद्यापीठ ग्रंथालयांच्या नव्या इमारती यांतून घडून येते.
ग्रंथालयक्षेत्रातील आंतरराष्ट्रीय संघटना : ग्रंथालयक्षेत्रात ज्या विविध आंतरराष्ट्रीय संघटना कार्य करीत आहेत त्यांची माहिती खालीलप्रमाणे आहे :
(१) इंटरनॅशनल फेडरेशन फॉर डॉक्युमेंटेशन : (एफ्. आय्. डी. फेडरेशन इंटरनॅशनल डॉक्युमेंटेशन). इन्स्टिट्यूट इंटरनॅशनल बिब्लिओग्राफी या नावाने २ सप्टेंबर १८९५ रोजी ब्रूसेल्स येथे स्थापन झालेल्या संस्थेला १९२४ मध्ये फेडरेशनचे स्वरूप प्राप्त झाले व १९३८ मध्ये त्यास इंटरनॅशनल फेडरेशन फॉर डॉक्युमेंटेशन हे नाव प्राप्त झाले. मि. पॉल ऑटलेट आणि मि. हेन्री ल्फॉटेन यांच्या प्रयत्नामुळे वरील फेडरेशन अस्तित्वात आले.
आंतरराष्ट्रीय पातळीवर सूची तयार करण्याच्या कल्पनेमधून या संस्थेच्या कार्याचा विकास झाला. दुसऱ्या महायुद्धानंतरची ग्रंथनिर्मितीची प्रचंड वाढ आणि विविधता यांमुळे प्रलेखपोषण (डॉक्युमेंटेशन) कार्याला वेग आला व त्याला महत्त्वही प्राप्त झाले. या संस्थांची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत : (१) प्रलेखपोषण-क्षेत्रात ज्या व्यक्ती व संस्था कार्य करीत आहेत त्यांमध्ये समन्वय निर्माण करणे, (२) प्रलेखपोषण-विषयाच्या अभ्यासासाठी संघटना निर्माण करणे व (३) जगातील निरनिराळ्या देशांत प्रलेखपोषण-कार्याचा प्रसार करणे इत्यादी.
वरील उद्दीष्टे साध्य करण्याच्या दृष्टीने वॉर्सा येथे १९५९ मध्ये पुढील कार्यक्रम मान्य करण्यात आला : (१) प्रलेखपोषण-विषयासंबंधी प्रकाशने प्रसिद्ध करणे. (२) वर्गीकरणासंबंधी संशोधन करणे. (३) प्रलेखपोषणासंबंधी शिक्षण देणे. (४) माहिती केंद्रे स्थापणे व त्यांच्याद्वारा विविध विषयांवर माहिती पुरविणे. (५) सार्वत्रिक दशांश वर्गीकरण पद्धतीत वेळोवेळी सुधारणा करणे आणि (६) प्रलेखपोषण-कार्यात उद्भवलेल्या भाषाविषयक समस्यांचा विचार करणे.
वरील कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी एफ्. आय्. डी.ला. युनेस्को इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ लायब्ररी असोसिएशन्स, ॲब्स्टाक्टिंग बोर्ड ऑफ इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ सायंटिफिक युनिअन्स यांसारख्या संस्थांचे सहकार्य मिळत असते.
या संघटनेचे सभासदत्व दोन प्रकारचे आहे. पहिल्या प्रकारात राष्ट्रीय पातळीवर प्रलेखपोषणाचे कार्य करणाऱ्या संघटनांचा समावेश होतो, तर दुसऱ्या प्रकारामध्ये निवडून आलेल्या तज्ञांचा अथवा संस्थांचा अंतर्भाव असतो. संघटनेतर्फे अनेक नियतकालिके व विशेष प्रकारची प्रकाशने प्रसिद्ध होत असतात.
(२) इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ लायब्ररी असोसिएशन्स : (इंफ्ला). जगातील ग्रंथालये, ग्रंथालय संघटना, सूचिकार यांच्यामध्ये सहकार्य निर्माण करण्याच्या हेतूने १९२६ मध्ये प्राग येथे ग्रंथपाल व ग्रंथप्रेमी लोकांची एक आंतरराष्ट्रीय परिषद भरली होती. या परिषदेने जगातील ग्रंथालये, ग्रंथालय संघटना, सूचिकार यांच्यामध्ये सहकार्य निर्माण करण्याच्या हेतूने एक संघटना स्थापण्यात यावी, अशी शिफारस केली. या शिफारशीस ऑक्टोबर १९२६ मध्ये अटलांटिक सिटी येथे अमेरिकन लायब्ररी असोसिएशनतर्फे भरलेल्या परिषदेने पाठिंबा दिला व ती कार्यान्वित करण्यासाठी पुढील वर्षी एडिंबरो येथे इंटरनॅशनल लायब्ररी ऑफ बिब्लिओग्राफिकल कमिटी नेमण्यात आली. या कमिटीचे रूपांतर नंतर वरील संघटनेत झाले.
या संस्थेची स्थापना १९२९ मध्ये झाली. विविध प्रकारच्या ग्रंथालयांच्या कार्यांचा अभ्यास व तत्संबंधी संशोधन करण्याचे महत्त्वाचे कार्य या संस्थेमार्फत होत असते. या कामाची अंमलबजावणी पुढील विभागांमार्फत होत असते : (१) राष्ट्रीय आणि विद्यापीठ ग्रंथालये, (२) सार्वजनिक ग्रंथालये, (३) विशिष्ट ग्रंथालये व (४) आंतरराष्ट्रीय ग्रंथालये.
ग्रंथपालन शिक्षण, ग्रंथालयांच्या इमारती, प्रकाशनांची देवघेव, तालिकीकरणाच्या नियमावली, संयुक्त तालिका, ग्रंथालयांसंबंधी आकडेवारी, नियतकालिके इ. विषयांचा अभ्यास करण्यासाठी व तत्संबंधी शिफारशी करण्यासाठी या संस्थेतर्फे स्वतंत्र समित्या नेमल्या आहेत. मान्य झालेल्या शिफारशी पुस्तकांद्वारे प्रसिद्ध केल्या जातात.
(३) इंटरनॅशनल अँड कम्पॅरेटिव्ह लायब्रेरिअनशिप ग्रुप : वेगवेगळ्या देशांतील ग्रंथालय संघटनांनी एकत्र येऊन ऑक्टोबर १९६७ मध्ये ही संघटना स्थापन केली. ग्रंथालयीन सेवेचा अभ्यास करणे हे या संघटनेचे उद्दिष्ट आहे. या संस्थेचे एक त्रैमासिक प्रकाशनही आहे.
पहा : ग्रंथालयशास्त्र.
संदर्भ : 1. Gates, J. K. Guide to the Use of Books and Libraries, New York, 1962.
2. Johnson, K. D. A Concise Introduction to the History of the Alphabet, Writing, Printing,
Books and Libraries, New York, 1955.
3. Mookerjee, S. K. Development of Libraries and Library Science in India, Calcutta, 1969.
4. Oldedar, A. K. The growth of the Library in Modern India, 1498-1836. Calcutta, 1966.
5. Olle, J. G. Library History, London, 1967.
६. कानडे, स. गो. प्राचीन अर्वाचीन ग्रंथालये, पुणे, १९३८.
७. महाजन, शां. ग. महाराष्ट्रातील ग्रंथालयांची सूचि, मुंबई, १९६५.
पेठे, म. प.
“