गौतमी महाप्रजापती : (इ. स. पू. सहावे-पाचवे शतक). गौतमी बुद्धाची सावत्र माता. गौतम बुद्धाची माता मायादेवी ही गौतम बुद्धाच्या जन्मानंतर थोड्याच दिवसांत मरण पावली. तेव्हा मायादेवीची धाकटी बहीण महाप्रतापी गौतमी (महापजापती गोतमी) हिने त्याचे पालनपोषण करून त्याला वाढविले.

गौतम बुद्धाने भिक्षुसंघ स्थापन केल्यानंतर महाप्रजापती गौतमीला वाटले, की जर बुद्धाने पुरुषांना संघटित धार्मिक जीवन व्यतीत करण्याची संधी दिली, तर तशाच प्रकारची संधी स्त्रियांनाही का मिळू नये ? तिने त्याचप्रमाणे भगवान बुद्धाला विनवणी केली. भगवान बुद्ध ह्या गोष्टीला प्रथम कबूल नव्हते पण आनंद भिक्षूने ह्या बाबतीत बुद्धाजवळ रदबदली केली व शेवटी आठ प्रकारच्या अटी घालून बुद्धाने भिक्षुणीसंघाच्या स्थापनेला संमती दिली. त्याचप्रमाणे ५०० शाक्य स्त्रियांसह तिने बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. ह्या अटींमुळे भिक्षुणीसंघातील स्त्रियांना भिक्षुसंघातील पुरुषांच्या मानाने गौण स्थान मान्य करावे लागले. त्यांच्यावर जास्त कडक निर्बंध घालण्यात आले. भिक्षुसंघातील अगदी तरुण नवागतापुढेही भिक्षुणी भिक्षुसंघातील अत्यंत वृद्ध व श्रेष्ठ पदवीला पोहोचलेल्या भिक्षुणीला मान तुकवावी लागून त्याला वंदन करावे लागे. अशा रीतीने भिक्षुणीसंघाच्या स्थापनेची जबाबदारी महाप्रजापती गौतमीकडे जाते. जातकांमध्ये तिच्या नावाचा अनेक वेळा उल्लेख आढळतो. 

बापट, पु. वि.