गौहाती : आसाम राज्यातील सर्वांत मोठे शहर व कामरूप जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या उपनगरांसह २,००,३७७ (१९७१). हे ब्रह्मपुत्रेच्या दोन्ही तीरांवर वसले असले, तरी शहराचा मुख्य भाग नदीच्या डाव्या तीरावर आहे. हे कलकत्त्याच्या ईशान्येस सु. ५३९ किमी. व शिलाँगच्या उत्तरेस सु. ६७·५ किमी. आहे. भगदत्ताची राजधानी प्रागज्योतिषपूर ती हीच. सोळाव्या शतकात कोच राज्यामध्ये याचा समावेश होता. १६८१–१८२६ पर्यंत आहोम राजांची ही राजधानी होती. १८२६ ते १८७४ पर्यंत ते ब्रिटिशांच्या आसाम विभागाचे मुख्य ठिकाण होते.
यांच्या आसपासचा भाग मोठा रमणीय असून एकीकडे दाट जंगल व एकीकडे दीड किमी. रुंदीची नदी असा मनोहर देखावा दिसतो. १८९७ च्या भूकंपाने याची मोठीच हानी झाली होती. हे आसाममधील व्यापाराचे मुख्य केंद्र असून शेतमालाचीही बाजारपेठ आहे. याच्या आसमंतात भात, मोहरी, ताग, कापूस, लाख व इतर जंगली पदार्थ इत्यादींचे उत्पादन होते. येथे चहावरील प्रक्रिया, सरकी काढणे व साबण इत्यादींचे कारखाने असून पिठाच्या, भात सडण्याच्या व तेलाच्या गिरण्या आहेत. बृहन्-गौहाती हे झपाट्याने विकास पावलेले औद्योगिक शहर असून शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्रही आहे. गौहाती विद्यापीठाची स्थापना १९४८ साली झाली.
हे एक उत्कृष्ट नदीबंदर असून कलकत्ता, शिलाँग व सदिया यांस राष्ट्रीय महामार्गांनी जोडलेले आहे. तसेच हे ईशान्य सीमा रेल्वेवरील प्रस्थानक आहे. बोरझार येथे प्रमुख विमानतळ असून तेझपूर, जोरहाट, दिब्रुगड, लखिमपूर, सिल्चर, धुब्री इ. ठाण्यांकडे नियमित विमानवाहतूक होते. गौहातीजवळील नूनमती येथे तेलशुद्धीकरणाचा कारखाना आहे. तेथे १८७८ मध्ये स्थापन झालेली नगरपालिका, आसाम वस्तुसंग्रहालय, आकाशवाणी केंद्र, राज्यप्राणिसंग्रहालय, राष्ट्रीय क्रीडाप्रेक्षागृह व उच्च न्यायालय आहे. प्राचीन कामाख्या देवीचे मंदिर व ब्रह्मपुत्रेच्या पात्रातील उमानंद बेट ही हिंदूंच्या अनेक पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी आहेत.
कांबळे, य. रा.