गोळे, महादेव शिवराम : (१८५८–१९०६). मराठी ग्रंथकार. जन्म सातारा जिल्हातील मर्ढे येथे. शिक्षण पुणे येथे, एम.ए.पर्यंत. ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’चे ते आजीव सदस्य होते. ‘न्यू इंग्लिश स्कूल’ व ‘फर्ग्युसन कॉलेज’ ह्या संस्थांत त्यांनी अध्यापनकार्य केले. आगरकरांच्या मृत्यूनंतर ‘फर्ग्युसन कॉलेज’चे ते प्राचार्य झाले (१८९५).

ब्राह्मण आणि त्यांची विद्या (१८९५) व हिंदुधर्म आणि सुधारणा (१८९८) हे त्यांचे महत्त्वाचे ग्रंथ. ब्राह्मण आणि त्यांची विद्या  या ग्रंथात ब्राह्मणवर्गातील विद्यार्थांच्या शारीरिक-मानसिक ऱ्हासास व त्यांच्या अकाल मृत्यूस तत्कालीन शिक्षणपद्धतीच कारणीभूत असल्याचे दाखवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. तसेच त्या अनुरोधाने नव्या शिक्षणाचे हेतू आणि दिशा ह्यांविषयी सविस्तर चर्चा केलेली आहे. ह्या ग्रंथात ‘ब्राह्मण’ हा शब्द ‘सर्वसाधारण पांढरपेशे’ अशा अर्थाने वापरण्यात आलेला आहे. हिंदुधर्म आणि सुधारणा  ह्या ग्रंथात ‘विद्याधर’ ह्या कल्पित व्यक्तीच्या चित्तशोधनाच्या मिषाने बालविवाह, विधवाविवाहप्रतिबंध, जातिभेद ह्यांसारख्या रूढींचे समर्थन केले आहे. गोळे ह्यांची मते कालबाह्य असली, तरी त्यांची तळमळ आणि ठसकेबाज लेखनशैली उल्लेखनीय आहे. नासिक येथे ते निधन पावले.  

अदवंत, म. ना.