गोविंद वल्लभ पंत कृषि आणि तंत्रविद्या विद्यापीठ : उत्तर प्रदेश राज्यातील एक विद्यापीठ. ते १९६० मध्ये पंतनगर, नैनिताल जिल्हा येथे स्थापन झाले. याची क्षेत्रमर्यादा अद्यापि निश्चित नाही. मात्र पाच घटक महाविद्यालये, विज्ञाने व मानव्यविद्या यांचे एक महाविद्यालय आणि २१ अध्यापन विभाग एवढे विद्यापीठाच्या कक्षेत अंतर्भूत होतात.
कुलगुरू हा पूर्ण वेळ काम करणारा सवेतन प्रशासकीय प्रमुख अधिकारी असून तो चार वर्षे काम पाहतो. याची पुनर्नियुक्ती आणखी एका सत्राकरिता होऊ शकते.
हे एकात्म विद्यापीठ असून शैक्षणिक वर्ष तीन सत्रांचे असते. कृषी व पशुवैद्यक या दोन विषयांची महाविद्यालये पंतनगर येथे आहेत. १९७१ मध्ये गृहशिक्षण देणारे महाविद्यालयही येथे सुरू करण्यात आले. महाविद्यालयाच्या ग्रंथालयात १,०३,०५५ पुस्तके व १,२०० नियतकालिके १९७२ मध्ये होती. याशिवाय चित्रपट, नकाशा वगैरे स्वतंत्र विभाग विद्यापीठात आहेत. महाविद्यालयीन अध्यापनाव्यतिरिक्त विद्यार्थांना विस्तार योजनेद्वारे प्रत्यक्ष कृषिक्षेत्रांवर प्रयोगांनी शिक्षण देण्यात येते. उत्तर प्रदेशातील १६ जिल्ह्यांतून विद्यापीठाचे विद्यार्थी कृषिविषयक विस्तार योजनेनुसार प्रयोग करतात.
हे विद्यापीठ अमेरिकेतील संयुक्त संस्थानांच्या लँड ग्रँट महाविद्यालयाच्या धर्तीवर शिक्षण देत आहे. ग्रामीण जनतेला बहुविध अभ्यासशाखांची विशेषतः कृषी, ग्रामोद्योग व ग्रामव्यवसाय आणि संबंधित विषयांची सोय उपलब्ध करून देणे, हे या विद्यापीठाचे मूळ उद्दिष्ट आहे.
विद्यापीठाचे १९७१-७२ मध्ये २१६·२८ लाख रु. उत्पन्न होते आणि सु. १,९४४ विद्यार्थी शिकत होते.
घाणेकर, मु. मा.