गोरखनाथ : (सु. नववे-दहावे शतक). नाथ संप्रदायाचा एक प्रवर्तक व प्रभावी प्रसारक. गोरखनाथाच्या (गोरक्षनाथाच्या) जन्मस्थळाबाबत तसेच काळाबाबत विद्वानांत विविध मते आहेत. दक्षिणेकडे गोदातीरी
चंद्रगिरी, दक्षिणेतील ‘बडव’ देश, काठेवाडात गोरखमठी आणि पंजाब अशी त्याची विविध जन्मस्थाने विद्वान सांगतात. हजारीप्रसाद द्विवेदी त्याचा काळ नवव्या शतकाचा उत्तरार्ध, तर रा. चिं. ढेरे तो १०५० ते ११५० च्या दरम्यानचा मानतात. काही दंतकथांत कबीर (सु. १४८८–१५१२) व गुरू नानक (१४६९– सु. १५३८) यांच्याबरोबर गोरखनाथाचा संवाद झाल्याचे उल्लेख आढळतात. ‘गोरखनाथ’ ह्या नावासंबंधी दोन मते प्रामुख्याने मांडली जातात : ‘गो’ म्हणजे इंद्रिये. इंद्रिये ताब्यात ठेवणारा तो गोरक्षनाथ. दुसरे मत असे, की गोरखनाथाचा जन्म मच्छिंद्रनाथाच्या अनुग्रहाने ‘गोबरा’तून झाला म्हणून गोरक्षनाथ. हजारीप्रसाद गोरखनाथाची जात ब्राह्मण मानतात, तर श्री. ढेरे तो दक्षिणेत स्थायिक झालेल्या काश्मीरी ब्राह्मण कुलात जन्मल्याचे सांगतात. मोहनसिंग तो एका हिंदू विधवेचा अवैध पुत्र असावा, असे म्हणतात. समाजाच्या खालच्या स्तरात त्याचा जन्म झाला असावा, असेही एक मत आहे.
नाथ संप्रदायाच्या नवनाथांमध्ये तसेच चौऱ्याऐंशी सिद्धांमध्येही गोरखनाथाचा समावेश आहे. नाथ संप्रदायाचे आदिप्रवर्तक चार महायोगी मानले जातात. आदिनाथ म्हणजे प्रत्यक्ष शिवच. त्याचे दोन शिष्य : जालंधरनाथ आणि ⇨ मच्छिंद्रनाथ (मत्स्येंद्रनाथ). जालंधरनाथाचा शिष्य कृष्णपाद (कानीफा, कण्हपा, कान्हपाद) व मच्छिंद्रनाथाचा गोरखनाथ. जालंधर, मच्छिंद्र, कृष्णपाद व गोरख या चार सिद्ध योगीश्वरांनी मूळ पंथप्रवर्तन केल्याबाबत परंपरेत एकमत आहे. जालंधर आणि कृष्णपाद यांचा संबंध ⇨कापालिक साधनेशी विशेष असून नाथ संप्रदायात मच्छिंद्र व गोरख यांचाच उल्लेख प्रामुख्याने येतो. अमरनाथ, गहिनीनाथ, भर्तृहरी, गोपीचंद व विमलादेवी हे गोरखनाथाचे प्रमुख व प्रसिद्ध शिष्य होत. गोरखगुरू मच्छिंद्राचा कल वामाचारी कौलमार्गाकडे झुकला. या मार्गात स्त्रियांचा संग आवश्यक मानला जातो. मच्छिंद्राचा या मार्गापासून उद्धार करण्याचे श्रेय गोरखनाथास दिले जाते. पंच ‘म’कारावर आधारलेली विवेकशून्य व आचरणभ्रष्ट साधना त्या काळी विशेष बोकाळलेली होती. गोरखनाथाला ती मान्य नव्हती. त्याने योगमार्गाचा अवलंब केला. पतंजलीच्या अष्टांग योगाऐवजी त्याने षडंग योग (आरंभीची यम व नियम ही दोन अंगे गौण व इतर सहा अंगे प्रमुख) स्वीकारला. तो ⇨ हठयोग म्हणून ओळखला जातो. गोरखनाथाच्या ग्रंथांत या साधनामार्गालाच अधिक महत्त्व दिलेले आहे. त्याच्या काही ग्रंथांत तात्त्विक चर्चा आहे (उदा., अवरोध शासन, सिद्धसिद्धांत पद्धति, महार्थमंजरी इ. ग्रंथांत). गोरखनाथाने प्रवर्तित केलेल्या योगमार्गाच्या वा ⇨ नाथ संप्रदायाच्या बारा शाखा वा पंथ आहेत. म्हणून ‘बारहपंथी’ असेही नाव या संप्रदायास आहे. या संप्रदायाचे अनुयायी कानफाटा [→ कानफाटे] वा दरसनी साधू म्हणून ओळखले जातात. या बारा शाखांपैकी पहिल्या सहा शाखा प्रत्यक्ष शिवाने व शेवटच्या सहा गोरखनाथाने प्रवर्तित केल्याचे मानतात. ह्या बारा शाखा अशा : (१) भूजची (कच्छ) कंठरनाथी, (२) पंजाब, पेशावर व रोहटकची पागलनाथी, (३) पेशावर व अफगाणिस्तानची रावल, (४) पुरी, मेवास्थानेश्वर (थानेसर) व कर्णालची पंख किंवा पंक, (५) मारवाडची बन, (६) जोधपूरची गोपाल किंवा रामके, (७) बंगालची चांदनाथ कपिलानी, (८) टिला, अंबाला, कर्णाल येथील हेठनाथी, (९) बंगालच्या दिनाजपूर जिल्ह्यातील चोलीनाथ आईपंथी, (१०) रतढोंडा मारवाडची बैरागपंथी, (११) जयपूरची पावनाथी व (१२) धजनाथी. ह्या सर्व शाखांत पूर्वीचे अनेक पंथोपपंथ (उदा., कपिलाचा योगमार्ग, लकुलीश मत, कापालिक मत, वाममार्ग इ.) समाविष्ट झालेले आढळतात. यांखेरीज आणखीही पंथोपपंथ आहेत तथापि त्या सर्वांची नावे व गावे ज्ञात नाहीत.
गोरखनाथाचे कार्य व्यापक व विविध प्रकारचे आहे. कुल, जात, वर्ण, धर्म इत्यादींच्या पलीकडे ईश्वरतत्त्व आहे, असे त्याने प्रतिपादन केले. प्रखर वैराग्य, विशुद्ध चारित्र्य, सदाचार व ब्रह्मचर्य यांना त्याने स्वतःच्या
आचरणाने महत्त्व देऊन तत्कालीन समाजातील अनैतिक, अविवेकी व अनाचारी वृत्तींना पायबंद घातला. तो महान संघटक होता. त्याने भारतीय आध्यात्मिक साधनेचे शुद्धीकरण केले आणि नंतरच्या अनेक महापुरुषांना कार्याची प्रेरणी दिली. त्याने योगमार्गाला सुसंघटित रूप देऊन योगसाधनांचे व्यवस्थापन केले. स्त्रिया व शुद्रांच्याही उद्धाराचा मार्ग त्याने मोकळा करून दिला. हिंदू-मुस्लिम ऐक्याचा पायाही प्रथम त्यानेच घातला. रावल शाखेत आजही मुसलमानांचा भरणा विशेष आहे. शब्दप्रामाण्यापेक्षा आत्मानुभूतीच्या प्रत्यक्ष ज्ञानाला तो महत्त्व देतो. तो शिवोपासक व योगमार्गी होता. त्याचे मठ व अनुयायी भारतात सर्वत्र तसेच नेपाळ आणि श्रीलंकेतही आढळतात. त्याचा प्रभाव नंतरच्या सर्व निर्गुणपंथी अनुयायांवर पडला. कबीरावरही त्याचा प्रभाव आहे. ज्ञानेश्वरांनीही त्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. आद्य शंकराचार्यांनंतर अखिल भारतीय जनमताला प्रभावित करणारा एवढा मोठा आचार्य मध्ययुगात झाले नाही, असे हजारीप्रसाद द्विवेदी यांनी म्हटले आहे.
त्याच्या नावावर संस्कृत, अपभ्रंश, हिंदी व इतर भारतीय भाषांतील विपुल ग्रंथरचना आहे. देशी भाषांत ग्रंथरचना करून त्याने त्या भाषांना प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. त्याच्या संस्कृत आणि अपभ्रंश ग्रंथांतील अमनस्क, अमरौघशासनम्, गोरक्ष-पद्धति, गोरक्ष शतक, गोरक्ष संहिता, महार्थ-मंजरी (अपभ्रंश), सिद्धसिद्धांत पध्दति, योगमार्तंड इ. ग्रंथ महत्त्वाचे होत. हिंदीत लहानमोठे सु. ४० ग्रंथ त्याचे सांगतात परंतु त्यांपैकी निश्चित किती ग्रंथ गोरखनाथाचे आहेत, हे सांगणे कठीण आहे. त्याचे हे सर्व हिंदी ग्रंथ पीतांबरदत्त बडथ्वाल यांनी गोरखबानी (१९४२) नावाने संकलित केले आहेत.
संदर्भ : 1. Briggs, G. W. Gorakhnath and the Kanphata Yogis, Calcutta, 1938.
2. Mohan Singh, Gorakhnath and the Medieval Hindu Mysticism, Lahor, 1937.
३. ढेरे, रा. चिं. श्रीगुरु गोरक्षनाथ चरित्र आणि परंपरा, मुंबई, १९५९.
४. द्विवेदी, हजारीप्रसाद, नाथ संप्रदाय, अलाहाबाद, १९५०.
बांदिवडेकर, चंद्रकांत
“