गोबेल्स, योझेफ पाउल : (२९ ऑक्टोबर १८९७–१ मे १९४५). जर्मनीतील नाझी पक्षाचा प्रमुख प्रचारक व मुत्सद्दी. ऱ्हाइनलँडमधील राइट ह्या गावी एका मजूर कुटुंबात जन्म. लहानपणी अंगवधाच्या झटक्यामुळे तो एका पायाने अधू झाला, त्यामुळे त्यास लष्करी शिक्षण घेता आले नाही तथापि शालेय शिक्षण घेऊन त्याने पुढे १९२१ मध्ये डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी ही पदवी फ्रीड्रिख गुंडोल्फ या ज्यू प्राध्यापकाच्या मार्गदर्शनाखाली संपादिली आणि वृत्तपत्रव्यवसाय स्वीकारला. ह्या सुमारास बव्हेरियामधील नाझी पक्षाने त्याचे लक्ष वेधले. १९२५ साली तो त्या पक्षाचा सचिव आणि श्ट्रासर बंधूंच्या वृतपत्राचा संपादक झाला. उत्तर जर्मनीतील विद्यार्थी चळवळींत त्याने हिरिरीने भाग घेतला. शिवाय बर्लिन येथून प्रसिद्ध होणाऱ्या नाझी वृतपत्रांतून तो वेळोवेळी लेखन करी. श्ट्रासर व हिटलर ह्यांत मतभेद झाले, तेव्हा हिटलरच्या व्यक्तिमत्त्वाने दिपून जाऊन त्याने हिटलरची बाजू घेतली. १९२६ मध्ये हिटलरने त्यास बर्लिन येथे शाखाप्रमुख नेमले. ह्या वेळी त्याने आपल्या डेर अँग्रीफ  या वृत्तपत्रातून, तसेच सार्वजनिक सभांतून आपले प्रचारतंत्र व चळवळीचे कौशल्य दाखविले. त्यामुळे हिटलरने १९२९ मध्ये त्यास नाझी पक्षाचा प्रचार-प्रमुख नेमले. तत्पूर्वी १९२८ मध्ये तो जर्मन संसदेचा सभासद म्हणून निवडून आला. १९३३ मध्ये नाझी पक्ष सत्तेवर आरूढ होण्यास त्याचे हिटलरला साहाय्य झाले म्हणून हिटलरने त्यास प्रचारमंत्री हे पद दिले. दुसऱ्या महायुद्धात आपल्या देशाचे लक्ष युद्धावर केंद्रीत करण्यात, तसेच सैनिकांचे व नागरिकांचे मनोधैर्य वृद्धिंगत करण्यात व अंतर्गत व्यवस्था राखण्यात त्याच्या प्रचारयंत्रणेचा फार मोठा उपयोग झाला. त्याच्या प्रभावी प्रचारयंत्रणेमुळे सर्वत्र दरारा व भीती निर्माण झाली. त्याने आपली रोजनिशी गोबेल्स डायरीज (१९४२-४३) ह्या नावाने लिहिली असून तिचे इंग्रजीत भाषांतर झाले (१९४८). ती तत्कालीन घडामोडींच्या इतिहासाचे एक विश्वसनीय साधन आहे. त्याचे Vom Kaiserhof zur Reichskanzlei  हे पुस्तक नाझी पक्षाचा उदय व सत्ताग्रहण यांवर आहे आणि Tagebucher  हे युद्धकालीन नाझी मनोवृत्तीवर प्रकाश टाकणारे आहे. या ग्रंथांशिवाय त्याने इतरही बरेच स्फुट लेखन केले. 

गोबेल्स हिटलरखालोखाल क्रूर होता. तो आपल्या सहकाऱ्यांशी तसेच हाताखालील अधिकाऱ्यांशी तिरस्काराने वागे. खासगी जीवनात चारित्र्यहीन अशीच त्याची कुप्रसिद्धी होती, म्हणून इतर नाझी पुढाऱ्यांना तो अप्रिय वाटे. १९३१ मध्ये माग्दा क्वाना ह्या विधवेशी त्याने विवाह केला. जहाल शब्दांत विषारी प्रचार करण्याची त्याची हातोटी नाझी पक्षास अतिशय उपयुक्त व उपकारक ठरली. पुनरुक्तीने असत्यही सत्य भासते, या तत्त्वावर त्याचा विश्वास होता. ज्यूंना तो तुच्छ लेखी. बर्लिनच्या पाडावाच्या वेळी हिटलरप्रमाणेच मृत्यूनंतर त्याने आपल्या सर्व कुटुंबियांसह आत्महत्या केली.

संदर्भ : Manvell, R. Fraenkel, H. Dr. Goebbels: His Life and Death, New York, 1960. 

देशपांडे, अरविंद