गोपाळपंडित : (?  — १२०५). एक महानुभाव ग्रंथकार. प्रख्यात महानुभाव ग्रंथकार ⇨ केशवराज सूरी किंवा केसोबास ह्याचा ज्येष्ठ बंधू. गोपाळपंडिताचे घराणे पैठणजवळील वरखेडचे. केसोबासानंतर ह्याने महानुभाव पंथाची दीक्षा घेतली. केसोबासाप्रमाणेच त्याने नागदेवाचार्यांचे शिष्यत्व स्वीकारले होते. महानुभाव पंथातील पारमांडल्य आम्नायाचा हा प्रणेता. रामदेवराव यादवाची राणी कामाइसा किंवा कामाई हिचा तो कारभारी आणि पुराणिक असून त्याच्यामार्फतच कामाईने पुढे नागदेवाचार्यांकडून उपदेश घेतला. चौपद्या, निर्वचन स्तोत्र  आणि सुभाषित अंताक्षरी  हे त्याचे पद्यग्रंथ. दृष्टांत लक्षण  आणि दृष्टांतव्याख्या  हे गद्यग्रंथही त्याने लिहिले. यांशिवाय द्वात्रिंशल्लक्षण  हा संस्कृत ग्रंथही त्याच्या नावावर आढळतो. ⇨सिद्धांतसुत्रपाठ  ह्या केसोबासाच्या ग्रंथात काही भर घालून तो त्याने नव्याने लिहिला. 

सुर्वे, भा. ग.