गोखले, अरविंद : (१९ फेब्रुवारी १९१९– ). दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळातील एक श्रेष्ठ मराठी कथाकार. जन्म सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे. शिक्षण पुणे व मुंबई येथे बी.एस्सी.पर्यंत (१९४०). १९४१ मध्ये ‘दक्षिणा फेलो’ होण्याचा बहुमान त्यांस प्राप्त झाला. पुढे त्यांनी दिल्लीच्या ‘इंपीरिअल ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट’मधून सायटोजेनिटिक्सचा अभ्यासक्रम पुरा केला. अमेरिकेतील विस्कॉन्सिन विद्यापीठात तांत्रिक वृत्तपत्रविद्येचा अभ्यास करून एम्.एस्. ही पदवी त्यांनी मिळविली. १९४३ पासून त्यांनी पुण्याच्या शासकीय कृषी महाविद्यालयात संशोधन आणि अध्यापन केले. १९६३ पासून मुंबईच्या धरमसी कंपनीत ते नोकरी करीत आहेत.
‘हेअर कटिंग सलून’ ही त्यांची पहिली कथा पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या नियतकालिकात प्रसिद्ध झाली (१९३५). त्यानंतर लिहिलेल्या सु. साडेतीनशे कथा नजराणा (१९४४) ते दागिना (१९७२) पर्यंत प्रसिद्ध झालेल्या पंचवीस कथासंग्रहांत समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. ‘कातरखेळ’, ‘मंजुळा’, ‘रिक्ता’, ‘कॅक्टस’, ‘विघ्नहर्ती’ ह्या त्यांच्या काही विशेष उल्लेखनीय कथा होत.
गोखल्यांचे कथाविश्व नव्या प्रवृत्तींचा वेध घेणारी आहे. पुष्कळदा त्यांच्या कथांना चमत्कृतिप्रवण घाट प्राप्त होतो त्या नाट्यात्म घटनाचित्रणात रंगतात तसेच त्यांच्या कथा खऱ्याखुऱ्या मध्यमवर्गीय संसारकथा आहेत. वेगवेगळ्या प्रकृतीच्या माणसांच्या मनांचा शोध घेणाऱ्या त्यांच्या कथा संथ लयीत उमलतात. मिथिला (१९५९), शुभा (१९६०), अनामिका (१९६१) ह्या त्यांच्या कथासंग्रहांना महाराष्ट्र शासनाची पारितोषिके लाभली तसेच ‘गंधवार्ता’ ह्या कथेस एन्काउंटर ह्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या इंग्रजी मासिकाचे आशियाई-अरबी-आफ्रिका कथास्पर्धेचे पारितोषिक मिळाले. त्यांच्या अनेक कथांचे यूरोपीय व भारतीय भाषांतून अनुवाद झालेले आहेत.
स्वतंत्र कथालेखनाखेरीज काही वेचक अमेरिकन कथांचे अनुवाद त्यांनी केलेले आहेत तसेच ना. सी. फडके, वामन चोरघडे, व्यंकटेश माडगूळकर ह्यांच्या निवडक कथांचे संपादन केले आहे. १९५९ ते १९६३ मधील निवडक कथांची वार्षिकेही त्यांनी प्रसिद्ध केली आहेत. अमेरिकेस पहावे जाऊन हे त्यांचे प्रवासवर्णनपर पुस्तक.
व्रतस्थ वृत्तीने कथालेखन करणाऱ्या गोखल्यांनी स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी लघुकथा समृद्ध केली आहे.
फडके, भालचंद्र