गोकाक, विनायक कृष्ण : (९ ऑगस्ट १९०९— ). प्रसिद्ध कन्नड कवी, नाटककार, साहित्यसमीक्षक व शिक्षणतज्ञ. जन्म धारवाड जिल्ह्यातील सावनूर येथे. काव्यलेखन ‘विनायक’ ह्या नावाने. मुंबई आणि ऑक्सफर्ड विद्यापीठांचे ते एम्.ए. (इंग्रजी) आहेत. इंग्रजीचे नाणावलेले प्राध्यापक व शिक्षणतज्ञ म्हणूनही त्यांची ख्याती आहे. इंग्रजीतील त्यांची ग्रंथनिर्मितीही विपुल आहे. पुणे, सांगली, हैदराबाद, वीसनगर, कोल्हापूर, धारवाड येथे ते इंग्रजीचे प्राध्यापक वा प्राचार्य म्हणून होते. त्यांनी अनेक मानाच्या व जबाबदारीच्या जागी काम केले. हैदराबाद येथील ‘सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंग्लिश’ चे संचालक (१९५९—६६), बंगलोर विद्यापीठाचे उपकुलगुरू (१९६६—६९), सिमल्याच्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्सड स्टडी’चे संचालक (१९७०-७१), ‘ऑल इंडिया सत्य साई एज्युकेशनल ऑर्गनायझेशन’चे अध्यक्ष, ‘बोर्ड ऑफ गव्हर्नर्स ऑफ सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ इंग्लिश’चे सभासद, भारतीय ज्ञानपीठाचे सभासद इ. मानाची पदे त्यांनी भूषविली.
कन्नड साहित्य संमेलनाचे (बेल्लारी, १९५८) अध्यक्ष, ‘ऑल इंडिया इंग्लिश टीचर्स कॉन्फरन्स’चे अध्यक्ष (१९६०), ‘कॉमनवेल्थ कॉन्फरन्स ऑन टीचिंग ऑफ इंग्लिश’चे उपाध्यक्ष (युगांडा, १९६०), ‘पेन’ च्या (पी.ई.एन्.) टोकिओ येथील जागतिक मेळाव्यास भारताचे प्रतिनिधी (१९५६), बेल्जियम येथील आंतरराष्ट्रीय कविसंमेलनास भारताचे प्रतिनिधी (१९६०), ‘केंब्रिज कॉन्फरन्स ऑन टीचिंग ऑफ इंग्लिश लिटरेचर’ला भारताचे प्रतिनिधी (१९६६) इ. बहुमानही त्यांना लाभले.
त्यांच्या द्यावापृथिवी ह्या कन्नड काव्यसंग्रहास साहित्य अकादेमीचे पारितोषिक मिळाले (१९६०). १९६० मध्येच भारत सरकारने ‘पद्मश्री’ देऊन त्यांचा गौरव केला. कर्नाटक विद्यापीठ (१९६७) तसेच पॅसिफिक विद्यापीठाने (कॅलिफोर्निया, १९६९) त्यांना सन्मान्य डी.लिट्. देऊन त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव केला.
प्रतिभासंपन्न कन्नड नवकवींत त्यांचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. त्यांनी कन्नड काव्यात काही प्रवाह आणले व विविध प्रयोगही केले. त्यांच्या भावकवितेतून त्यांच्या अंतर्मुख, विकसनशील व समन्वयवादी व्यक्तिमत्त्वाचा कलात्मक आविष्कार आढळतो. भारतीय संस्कृतीचे भक्कम अधिष्ठान त्यांच्या कवितेस आहे.
कलोपासक (१९३४) हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. यानंतर त्यांचे अठरा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. पयण (१९३७), समुद्रगीतगळु (१९४०), त्रिविक्रमर आकाशगंगे (१९४५), नव्यकवितेगळु (१९५०), द्यावापृथिवी (१९५७), इंदिल्लनोळ (१९६५) हे त्यांचे छंदवैविध्याने नटलेले महत्त्वपूर्ण काव्यसंग्रह होत. काव्यातील नवतेचा अवलंब आणि पुरस्कार करणारे आघाडीचे कवी म्हणून त्यांची गणना केली जाते.
जननायक (१९३९), युगांतर (१९४७) आणि विमर्शक वैद्य (१९४७) ही तीनच नाटके जरी त्यांनी लिहिली असली, तरी त्यांतून त्यांचा जीवनाकडे व साहित्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन व्यक्त होतो. समरसवे जीवन (१९६७) ही कन्नड कादंबरी व नरहरि ही इंग्रजी कादंबरी त्यांनी लिहिली. या दोन्हीही कादंबऱ्यांतून त्यांनी मानवतेचा पुरस्कार केला.
कवि काव्य महोन्नति (१९३५), इंदिन कन्नड गोत्तु गुरी (१९४६), नव्यते, हागु काव्य जीवन (१९५५) इ. साहित्यसमीक्षापर ग्रंथांमुळे त्यांचा एक समर्थ व साक्षेपी समीक्षक म्हणून लौकिक झाला. समुद्रदाचे यिंद (१९३८) हे त्यांचे प्रवासवर्णन पाश्वात्त्य संस्कृती व तेथील रीतिरिवाजांवर चांगला प्रकाश टाकते.
‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड स्टडी’चे संचालक असतानाच इंडियन सिव्हिलिझेशन —द फर्स्ट फेज (१९७२) ह्या ग्रंथाचे ते प्रमुख संपादक होते. ह्या काळातच त्यांनी महर्षी अरविंदांवर दोन ग्रंथ लिहिले. त्यांच्या इंग्रजी ग्रंथनिर्मितीतील पुढील ग्रंथ महत्त्वाचे होत : द साँग ऑफ लाइफ (१९४२), द पोएटिक ॲप्रोच टू लँग्वेज (१९४२), इंग्लिश इन इंडिया, इट्स प्रेझेंट अँड फ्यूचर (१९६४), इन लाइफ्स टेंपल (१९६५), डी. आर्. बेंद्रे — पोएट अँड सीअर (१९७०), द गोल्डन ट्रेझरी ऑफ इंडो-अँग्लिअन पोएट्री (१९७०) व इंडिया अँड वर्ल्ड कल्चर (१९७२).
गोकाक सध्या बंगलोर विद्यापीठात विद्यापीठ अनुदान मंडळ नियुक्त प्राध्यापक असून, श्री सत्य साईबाबा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत. महर्षी अरविंद आणि सत्य साईबाबा यांच्या तात्त्विक दृष्टिकोनांचा ते तुलनात्मक अभ्यास करीत आहेत.
साहित्य व शिक्षण ह्या दोन्हीही क्षेत्रांत गोकाकांचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. १९६९ मध्ये त्यांच्यासंबंधी विनायक वाङ्मय, विनायक व सिद्धिविनायक मोदक हे तीन गौरवग्रंथ प्रसिद्ध झाले.
बेंद्रे. वा. द.
“