गोकर्ण — १ : गोकर्ण महाबळेश्वर. कर्नाटक राज्याच्या उत्तर कानडा जिल्ह्यातील, कुमठा तालुक्यातील प्रसिद्ध प्राचीन तीर्थक्षेत्र, हे समुद्रकाठी, कारवारपासून सु. ३६ किमी. व कुमठा बंदरापासून १६ किमी. आहे. याचे माहात्म्य रामायण, महाभारत, भागवतपुराण, शिवपुराण  इ. ग्रंथांत वर्णिले असून गोकर्णमाहात्म्य  नावाचा एक स्वतंत्र ग्रंथही आहे. येथील महाबळेश्वराचे मंदिर द्राविड शैलीचे असून ते बारा ज्योतिर्लिगांपैकी एक आहे. या मंदिरातील भव्य गाभारा व सभामंडप प्रेक्षणीय असून येथे ब्रह्मा, विष्णू, शिव, अगस्ती, राम, रावण, ताम्रगौरी, गणपती इ. अनेक देवदेवतांची लहान मोठी मंदिरे आहेत. स्मार्त व लिंगायत यांस हे स्थान विशेष महत्त्वाचे वाटते. येथे शंभरांहून अधिक नंदादीप अखंड तेवत असतात.

गोकर्णाच्या निर्मितीबाबत अनेक कथा प्रचलित आहेत. रावणाने घोर तपश्चर्येने शंकराकडून मिळविलेले आत्मलिंग सूर्यास्तसमयी अर्घ्य देताना जमिनीवर ठेवल्यास शंकराज्ञेप्रमाणे गुप्त होऊ नये, म्हणून गुराखी वेषधारी गणपतीजवळ दिले. त्याचे वजन तोलेना म्हणून गणपतीने रावणाला दोनचार हाका मारून ते जमिनीवर टाकले ते गुप्त झाले. त्याच जागी गोकर्ण महाबळेश्वराचे मंदिर उभारलेले असून रावणाने रागाने डोक्यावर ठोसा मारलेली गणपतीची मूर्तीही तेथे आहे. ब्रह्मदेवाने स्वतःच सृष्टी निर्माण केल्याच्या रागाने पाण्यातून पृथ्वीला धक्के मारणारा शंकर गोरूप पृथ्वीच्या विनंतीवरून तिच्या कानातून बाहेर आला. तेच गोकर्ण अशीही एक कथा आहे.

समुद्राच्या बाजूने गावाकडे पाहिले असता गावाचा आकार गोकर्णासारखा दिसतो, म्हणून गोकर्ण नाव पडले असावे, अशीही एक व्युत्पत्ती.

माघ वद्य दशमीपासून फाल्गुन शुद्ध द्वितीयेपर्यंत चालणाऱ्या उत्सवातील महाशिवरात्र हा विशेष महोत्सवाचा दिवस होय. दर चाळीस वर्षांनी होणाऱ्या अष्टबंध महोत्सवात आधीची पिंडी काढून नवीन बसवितात. त्यावेळी जमिनीतील गुप्त शिवलिंग पहावयास सापडते. 

कापडी, सुलभा