गोंडवनभूमि : दक्षिण गोलार्धातील एका कल्पित खंडाला एडूआर्ट झ्यूस या ऑस्ट्रियन भूवैज्ञानिकांनी दिलेले नाव (१८८५). पुराजीव महाकल्पाच्या (सु. ६० ते २४·५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळाच्या) उत्तरार्धापासून तो मध्यजीव महाकल्पाच्या (सु. २३ ते ९ कोटी वर्षांपूर्वीच्या काळाच्या) जवळजवळ अखेरीपर्यंत मुख्यतः जमिनीवर गाळ साचून तयार झालेल्या खडकांच्या प्रचंड राशी भारताच्या द्वीपकल्पात, दक्षिण आफ्रिकेत, ऑस्ट्रेलियात व दक्षिण अमेरिकेत आढळतात. भारतातील राशींना गोंडवन संघ, दक्षिण आफ्रिकेतील राशींना कारू संघ अशी व इतर खंडांतील राशींना इतर नावे दिली जातात. वरील सर्व प्रदेशांतील प्रारंभीच्या म्हणजे कार्बॉनिफेरस ते पर्मियन (सु. ३५ ते २४·५ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळात तयार झालेल्या खडकांत दगडी कोळशाचे थर व ग्लॉसोप्टेरीस वनश्रीचे जीवाश्म (अवशेष) आढळतात. अंटार्क्टिकाविषयी सविस्तर माहिती नाही, पण दक्षिण ध्रुवापासून ५०० किमी.पेक्षा दूर नसलेल्या त्याच्या खडकांत ग्लॉसोप्टेरिसाचे जीवाश्म सापडलेले आहेत. म्हणजे त्या काळी दक्षिण गोलार्धातील सर्व जमिनीवर व भारताच्या द्वीपकल्पात ग्लॉसोप्टेरीस वनश्री पसरलेली होती. त्याच काळात तयार झालेल्या उत्तर गोलार्धातील खडकांमधील जीवाश्मांवरून उत्तर गोलार्धात अगदी वेगळ्या प्रकारची वनश्री होती असे दिसून येते. काही थोडे अपवाद वगळले, तर उत्तरेकडील खंडांत ग्लॉसोप्टेरीस वनश्रीचे जीवाश्म आढळत नाहीत. ती वनश्री उत्तरेकडून दक्षिणेकडे गेलेली नाही व तिचा प्रसार कसा झाला असेल हे सांगता येत नाही. जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पती विस्तीर्ण महासागर ओलांडून एका खंडातून दुसऱ्या खंडात जाणे व त्यांचा प्रसार इतक्या विस्तृत क्षेत्रात होणे जवळजवळ अशक्य आहे. म्हणून वर उल्लेख केलेली दक्षिणेतील खंडे व भारताचे द्वीपकल्प ही पूर्वी कोणत्या तरी जमिनींनी जोडली गेली असावीत व त्यामुळे त्यांच्यावर राहणाऱ्या वनस्पतींचा व जीवांचा असा प्रसार झाला असावा. झ्यूस यांची कल्पना अशी की, दक्षिण गोलार्धाचा बराचसा भाग व्यापणारे एक विस्तीर्ण खंड पूर्वी (पुराजीव महाकल्पाच्या उत्तरार्धात) होते आणि त्याचा एक फाटा भारताच्या द्वीपकल्पास जोडला गेला होता. भारताच्या गोंडवनी संघावरून त्या कल्पित खंडाला त्यांनी गोंडवनभूमी हे नाव दिले. पुढे मध्यजीव महाकल्पाच्या उत्तरार्धापासून तो नवजीव महाकल्पाच्या (सु. ६·५ कोटी वर्षांपूर्वीपासूनच्या) प्रारंभीच्या काळापर्यंतच्या अवधीत गोंडवनभूमी भंग पावली. तिचे काही भाग खचून खाली गेले. खचलेल्या भागात दक्षिण अटलांटिक व हिंदी महासागर तयार झाले. गोंडवनभूमीचे न खचलेले भाग म्हणजे दक्षिणेतील आजची खंडे व भारताचे द्विपकल्प हे होत.
खंडाचे विस्तीर्ण भाग खचून अटलांटिक किंवा हिंदी महासागरांच्या खळग्यांसारखे खळगे निर्माण होणे अशक्य आहे, हे लौकरच कळून आले. म्हणून वर उल्लेख केलेली खंडे जमिनीच्या चिंचोळ्या पट्ट्यांनी किंवा बेटांच्या रांगांनी जोडली गेली होती व पुढे ते पट्टे किंवा बेटांच्या रांगा खचून महासागरांच्या तळाशी गेल्या असे सुचविण्यात आले. खंडांचे विस्तीर्ण भाग खचू न शकले तरी चिंचोळे पट्टे खचू शकतील, अशा कल्पनेने ही सूचना करण्यात आलेली होती. पण असे चिंचोळे पट्टेही खचून महासागरांच्या तळाशी जाणे अशक्य आहे, असे कळून आले [→ समस्थायित्व]. खंडांच्या विस्तीर्ण जमिनी किंवा त्यांना जोडणारे जमिनीचे पट्टे खचून महासागरांच्या तळाशी गेले असतील, असे दाखविणारा कोणताही पुरावा मिळालेला नाही.
दक्षिण गोलार्धात एक विस्तीर्ण खंड पूर्वी होते व त्याचे काही भाग पुढे बुडाले किंवा वर उल्लेख केलेल्या भूमींना जोडणारे जमिनीचे पट्टे पूर्वी होते व नंतर ते बुडाले असे मानून पूर्वीच्या जीवांच्या प्रसाराचे स्पष्टीकरण करता येते. तरी पूर्वीच्या जलवायुमानाच्या (दीर्घकालीन सरासरी हवामानाच्या) वाटणीचा उलगडा करता येत नाही. उदा., दक्षिण गोलार्धातील अंटार्क्टिकासकट सर्व जमिनी व भारताचे द्वीपकल्प एवढ्या विस्तीर्ण क्षेत्रात ग्लॉसोप्टेरीस वनश्रीला मानवेल असे एकाच प्रकारचे जलवायुमान कसे असू शकेल, हा प्रश्नच आहे. आणखी असे की भारताचे द्वीपकल्प, दक्षिण अमेरिका, फॉकलंड बेटे, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ग्लॉसोप्टेरिसाचे जीवाश्म असणाऱ्या थरांच्या खाली, त्यांच्या किंचित आधी तयार झालेले गोलाश्म संस्तर (हिमनद्यांनी तयार झालेले एका विशिष्ट प्रकारचे गाळाचे खडक) आढळतात. ते हिमाच्या प्रवाहांनी आणून टाकलेल्या धोंडे-मातीच्या मिश्रणाचे आहेत आणि वरील प्रदेशातील काही ठिकाणी गोलाश्म संस्तर रेखांकित पृष्ठ असलेल्या भूमीवर वसलेले आढळतात. हे गोलाश्म संस्तर तयार झाले त्या काळी वरील सर्व प्रदेशांचे हवामान शीत असले पाहिजे व त्यांचे बरेचसे भाग हिम-बर्फाने झाकले गेले असले पाहिजेत, असे त्या संस्तरांवरून दिसून येते. त्याच काळी उत्तर गोलार्धातील जमिनीचे हवामान उबदार व दमट होते असे तेथल्या खडकांतील जीवाश्मांवरून व दगडी कोळशाच्या थरांवरून दिसून येते. दक्षिण गोलार्धात शीत हवामान व उत्तर गोलार्धात उबदार हवामान अशी वाटणी कशी होऊ शकली, हेही कोडेच आहे.
भारतातील गोंडवन संघ आणि दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया व दक्षिण अमेरिका या खंडातील तसेच संघ यांच्यातील साम्याची ठळक उदाहरणेच वर दिली आहेत. त्या संघांच्या इतिहासात, रचनांत व जीवाश्मांत अनेक साम्ये आहेत. त्यामुळे निकट संबंध असलेल्या प्रदेशातच ते निर्माण झाले असावेत, असे दिसते. आजची खंडे आणि महासागर आहेत त्या जागीच राहिलेली आहेत असे मानून गतकालीन जीवांच्या किंवा हवामानाच्या वाटणीचा खुलासा करता येत नाही. पण त्यांची स्थाने बदललेली आहेत अशी कल्पना केली, तर त्या दोन्हींचा व इतर साम्यांचा उलगडा होऊ शकतो. म्हणून खंडविप्लवाची म्हणजे खंडे पूर्वीच्या जागेपासून सरकली आहेत, अशी कल्पना सुचविण्यात आलेली आहे. त्या कल्पनेचे सार असे : आजची सर्व खंडे जुळून तयार झालेले एकच खंड पूर्वी, पुराजीव महाकल्पाच्या उत्तरार्धात होते. पुढे ते भंग पावून त्याचे तुकडे झाले व ते तुकडे (म्हणजे आताची खंडे) एकमेकांपासून दूर सरकत गेले व कालांतराने त्यांना आजची स्थाने प्राप्त झाली. गोंडवनभूमीचे वर उल्लेख केलेले घटक एकत्र जुळून झालेला जो भाग प्रारंभी होता, तो दक्षिण ध्रुवाजवळ होता. या कल्पनेने गोलाश्म संस्तरांच्या व हवामानाच्या वाटणीचा व जीवांच्या प्रसाराचा उलगडा होतो. पण खंडे सरकविण्याला आवश्यक तेवढी शक्ती कशी पुरविली गेली, हे मात्र सांगता आलेले नाही. पण खंडविप्लव घडून आला असावा असे सुचविणारे काही पुरावे अलीकडे मिळालेले आहेत.
पहा : खंडविप्लव.
संदर्भ : Holmes, A. Principles of Physical Geology, London, 1965.
केळकर, क. वा.