गोंडल संस्थान : पूर्वीच्या काठेवाडातील (गुजरात) एक जुने संस्थान. क्षेत्रफळ २,६४८ चौ. किमी. लोकसंख्या सु. पावणेदोन लाख (१९४१). ओसम टेकड्यांव्यतिरिक्त सर्व भाग सपाट आहे. जाडेजा राजपुतांपैकी कुंभोजीने (पहिला) सतराव्या शतकात मेरामनजी या बापाकडून मिळालेल्या अर्डोई वगैरे गावांचे स्वतंत्र राज्य स्थापले. तत्पूर्वी हा भाग वाघेल्यांच्या अंमलाखाली होता. आईन-इ-अकबरी व मिरात-इ-अहमदी यांतून तत्संबंधी माहिती मिळते. चौथा राजपुरुष दुसरा कुंभोजी याने धोराजी, उपलेटा, सरसई वगैरे संपन्न परगणे जिंकून काठेवाडच्या मध्य भागात राज्यविस्तार केला. काही दिवस जुनागढचा नबाब व बडोद्याचे गायकवाड यांना खंडणी कबूल करून संस्थानने स्वायत्तता टिकविली. १८०७ मध्ये संस्थान इंग्रजांचे मांडलिक बनले. पंधरा लाख रुपयांवर असलेल्या उत्पन्नापैकी रु. १,१०,७२१ खंडणी ठरली. संस्थानिकाला थोरला मुलगा गादीवर बसविणे वा तो नसल्यास दत्तक घेणे यांची परवानगी होती. सर्व राजांची उपाधी ठाकूरसाहेब होती. ठाकूरसाहेबांना स्वतःच्या प्रजेवरच्या खटल्यांबाबत ब्रिटिशांनी पूर्ण अधिकार दिले होते त्यांची अकरा न्यायालये होती. संस्थानातून जाणाऱ्या पोरबंदर — भावनगर रेल्वेत ठाकूरसाहेबांचा हिस्सा होता. राजकोटपर्यंत पक्की सडक होती. विसाव्या शतकाच्या सुरूवातीस ७ सुताच्या गिरण्या, ८५ शाळा, १ महाविद्यालय, २ रुग्णालये, ५ नगरपालिका आणि शेताच्या व पिण्याच्या पाण्यासाठी साडेपाच लाखांची योजना होती. गोंडल या राजधानीव्यतिरिक्त ५ शहरे आणि १६९ खेडी होती. १५ फेब्रुवारी १९४८ रोजी सौराष्ट्र संघात (‘क’ राज्य) ते विलीन झाले, पुढे १ नोव्हेंबर १९५६ रोजी द्विभाषिक मुंबई राज्यात व १ मे १९६० पासून गुजरात राज्यात समाविष्ट करण्यात आले.
कुलकर्णी, ना. ह.