गूडेरिआन, हाइन्ट्स : (१७ जून १८८८–१४ मे १९५४). जर्मन युद्धतंत्रज्ञ व सेनाधिकारी. चिलखती रणगाड्यांच्या युद्धतंत्रात तो निपुण होता. प्रशियात (आता पोलंड) केल्मनॉ येथे जन्म. २७ जानेवारी १९०८ रोजी जर्मन लष्करात कमिशन. हार्ट, फुलर व मार्टेल या ब्रिटिश युद्धशास्त्रज्ञांच्या नव्या विचारांचा त्याच्यावर अत्यंत प्रभाव पडला. पहिल्या महायुद्धानंतर त्याने जर्मन सेनेत ⇨ तडित् युद्धतंत्राचा पाया घालून त्याला मूर्तस्वरूप दिले. १९३८ मध्ये चिलखती दलाचा जनरल म्हणून नियुक्ती. १९४१ अखेर मॉस्कोवरील चढाईत आलेल्या अपयशाचे खापर त्याच्यावर फोडून हिटलरने त्यास निवृत्त केले. परंतु १९४३ पासून आधुनिक रणगाड्यांची निकड भासू लागल्यामुळे चिलखती दल निरीक्षक म्हणून हिटलरने त्यास पुन्हा नियुक्त केले. २१ जुलै १९४४ रोजी लष्कराचा जनरल स्टाफचा मुख्य व रशियाविरुद्ध आघाडीचा तो सरसेनापती झाला. हिटलरची युद्धनीती चुकीची आहे, असे तो हिटलरला सतत बजावत असे. त्यामुळे हिटलरने त्यास २८ मार्च १९४५ रोजी निवृत्त केले. १० मे १९४५ या दिवशी त्याला युद्धकैदी म्हणून पकडण्यात येऊन त्याच्यावर युद्ध गुन्हेगार म्हणून खटला भरण्यात आला. पण त्यातून त्याची सुटका झाली. तो आदर्श योद्धा असून त्यास उच्च लष्करी सन्मान पदके मिळाली होती. पँझर लीडर (१९५२) हे त्याचे आत्मचरित्र.
दीक्षित, हे. वि.