गुळवेल : (गुडूची हिं. गुलंचा गु. गुळो क. उगणी बळ्ळी सं. अमृतवल्ली, ज्वरनाशिनी इं. हार्टलीव्हड मूनसीड. लॅ. टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया कुल-मेनिस्पर्मेसी). आयुर्वेदीय औषधांत प्रसिद्ध असलेली ही वेल महाराष्ट्रात सर्वत्र मुबलक सापडते ब्रह्मदेश, पाकिस्तान, अंदमान, श्रीलंका व भारतातील इतर उष्ण ठिकाणे येथे ही आढळते. हिचे खोड जाडजूड व रसाळ असून इतर झाडांवर किंवा मांडवावर वेटोळे घालीत पसरते याची अंतर्रचना अनियमित व वैशिष्ट्यपूर्ण असते. साल फिकट करडी, प्रथम पातळ पण नंतर त्वक्षायुक्त (एका प्रकारच्या मृत पेशींच्या थराने युक्त) बनते. आडव्या पसरलेल्या खोडापासून अनेक मुळे दोऱ्याप्रमाणे निघून नंतर खाली जमिनीत जातात. पानांचा आकार हृदयाकृती असल्याने लॅटिन नावातील जातिवाचक शब्द त्याअर्थी वापरला आहे. जुन्या खोडावर, पानांच्या बगलेतून लहान पिवळट फुलांच्या मंजऱ्या एप्रिलमध्ये येतात. फुले एकलिंगी व भिन्न वेलींवर येतात. स्त्री-पुष्पे एकटी पण पुं-पुष्पे झुबक्यांनी असतात. फुलांची संरचना ⇨ मेनिस्पर्मेसी कुलात वर्णिल्याप्रमाणे फळे लाल, गोलसर व वाटाण्याएवढी असतात. गुळवेलीची खोडे तमिळनाडू-कर्नाटकच्या जंगलात हत्ती आवडीने खातात. खोड व मूळ औषधी आहेत. मूत्ररोग, संधिवात, अग्निमांद्य, चर्मरोग, पित्तविकार, मूळव्याध, कावीळ, खोकला, प्रमेह, उपदंश, ताप इत्यादींवर गुणकारी गुळवेलीचे सत्त्व काढून किंवा ताजा रस काढून दिला जातो. सत्त्व फार शक्तिवर्धक असून अनेक रोगांवर उपयुक्त आहे.
पाटील, शा. दा.
“