गुलाब, जेरिकोचा : (इं. रोझ ऑफ जेरिको, रिसरेक्शन प्लॅंट; लॅ. ॲनॅस्टॅटिका हीरोशुंटिका; कुल-क्रुसिफेरी). सु. १५–२० सेंमी. उंचीची ही लहान वर्षायू (एक वर्ष जगणारी) ओषधी [→ओषधी] अरबस्तान, इराण व ईजिप्त येथील रुक्ष प्रदेशांत आढळते. उन्हाळ्याच्या आरंभी हिची सर्व बारीक पाने गळून जाऊन बारीक शेंगांसह (सार्षपांसह) सर्व फांद्या आतील बाजूस वळून परस्परांत गुंतून त्यांचा एक लहान चेंडूएवढा गोळा बनतो. हा नंतर त्या रुक्ष जमिनीतून मुळासकट उपटून निघतो व वाऱ्याने दूरवर चेंडूप्रमाणे फिरत जातो. तो पाणथळ जागी गेल्यास किंवा पुढे पावसाच्या सरी आल्यावर ते पाणी ताबडतोब शोषून घेऊन फांद्या पूर्वीप्रमाणे पसरट होतात, शेंगा तडकून बी बाहेर पडते व रुजून नवीन रोपे उगवतात. येथे मूळची वनस्पती एकदा वाळून मृतप्राय होऊन जणू पुन्हा जिवंत होते, म्हणून तिला पुनर्जीवी (रिसरेक्शन) वनस्पती म्हणतात. गुलाबाची कळी उमलून फूल बनते, त्याप्रमाणे येथे फांद्या परत वळून पसरतात म्हणून जेरिकोचा गुलाब म्हणतात. जेरिको हे पॅलेस्टाइनमधले प्राचीन शहर असून त्या मूलस्थानावरून इंग्रजी नाव पडले आहे. अशीच प्रतिक्रिया आणखी काही वनस्पतींत [उदा., प्लीओपेल्टिस लीनिॲरिस हे नेचे, सिलाजिनेला इ., → नेचे; सिलाजिनेलेलीझ] आढळते. या वैचित्र्यामुळे त्या वनस्पती ‘अपूर्व’ म्हणून विकल्या जातात. जेरिकोचा गुलाब ही वनस्पती फुलझाडांपैकी ⇨ क्रुसिफेरी कुलात अंतर्भूत असून तिची सामान्य शारीरिक लक्षणे त्या कुलात वर्णिल्याप्रमाणे आहेत.
परांडेकर, शं. आ.