गुलबॅर, काटो माकसीमिलीआन : (११ ऑगस्ट १८३६ – १४ जानेवारी १९०२). नॉर्वेजियन रसायनशास्त्रज्ञ. यांचा जन्म क्रिस्तियाना (ऑस्लो) येथे झाला. १८६० मध्ये ‘रॉयल मिलिटरी स्कूल’ मध्ये त्यांची शिक्षक म्हणून नेमणूक झाली. ऑस्लो येथील रॉयल मिलिटरी ॲकॅडेमीमध्ये १८६२ मध्ये ते अनुप्रयुक्त गणिताचे प्राध्यापक, १८६७ मध्ये क्रिस्तियाना विद्यापीठात अध्यापक व त्याच विद्यापीठात १८६९ मध्ये प्राध्यापक झाले.
व्हॉगे यांच्या सहकार्याने त्यांनी १८६४ मध्ये वस्तुमान समतोलाचा नियम हा एक अत्यंत मूलभूत नियम शोधून काढला. यालाच गुलबॅरव्हॉगे नियम असेही म्हणतात. तापमान कायम असता विक्रिया-घटक आणि विक्रियाफले यांच्या संहतींचा (एकक घनफळातील प्रमाणांचा) विक्रियेच्या वेगावर कसा परिणाम होतो हे त्यावरून कळते. निरपेक्ष तापमानात [→ केल्व्हिन निरपेक्ष तापक्रम] दर्शविलेला एखाद्या द्रव्याचा उकळबिंदू हा त्याच्या क्रांतिक तापमानाच्या (ज्या तापमानापेक्षा जास्त तापमानास ते द्रव्य वायू अवस्थेतच राहू शकते व कितीही दाब वाढविला असता त्याचे द्रवीभवन होऊ शकत नाही त्या तापमानाच्या ) २/३ असतो, हेही त्यांनी दाखवून दिले. हा त्यांमधील परस्परसंबंध गुलबॅर नियम या संज्ञेने प्रसिद्ध आहे.
भौतिक रसायनशास्त्रात त्यांनी अनेक मूलभूत लेख लिहिले. त्यांमध्ये घनावस्थेची रेणवीय उपपत्ती, विषमांगी पद्धती आणि विद्रावांची ऊष्मागतिकी [→ ऊष्मागतिकी] हे फार प्रसिद्ध आहेत.
पहा : रासायनिक गतिविज्ञान.
कानिटकर, बा. मो.