गुरु-१ : हा सूर्यकुलातील सूर्यापासून क्रमाने पाचवा पण सर्वांत मोठा ग्रह म्हणून त्याचे गुरू हे नाव सार्थ आहे. त्याचा सरासरी व्यास (१,३८,४०० किमी.) पृथ्वीच्या व्यासाच्या १०·०८ पट आहे. त्याचा ध्रुवीय व्यास १,३४,००० किमी. आणि विषुववृत्तीय व्यास १,४२,००० किमी. आहे. हा ध्रुवाकडील चपटेपणा (विवृत्तता) दूरदर्शकातून स्पष्टपणे जाणवतो. हा चपटेपणा [म्हणजे (विषुववृत्तीय व्यास – ध्रुवीय व्यास) ÷ विषुववृत्तीय व्यास] ०·०६५ इतका (शनीच्या खालोखाल) आहे. गुरूचे घनफळ पृथ्वीच्या १,३१२ पट व वस्तुमान ३१८ पट आहे, तरीही हे वस्तुमान सूर्यकुलातील इतर सर्व ग्रहांच्या वस्तुमानांच्या बेरजेच्या दुप्पटीहून मोठे आहे. पृथ्वीच्या घनतेच्या (५·५२ ग्रॅ./घ. सेंमी.) मानाने त्याची घनता (१·३४ ग्रॅ./घ.सेंमी.) फार कमी आहे. त्याच्या पृष्ठभागावरील आकर्षण पृथ्वीवरील आकर्षणाच्या २·६४ पट आहे. गुरूच्या अक्षीय परिभ्रमणाचा काळ सरासरी ९ ता. ५३ मि. असून तो इतर कोणत्याही ग्रहाच्या काळाहून सर्वांत कमी आहे, म्हणून त्याचा दिवसही सर्वांत लहान असतो. याचा अक्ष त्याच्या कक्षेच्या पातळीशी सु. ८७० चा कोन करतो, त्यामुळे गुरूच्या दिनमानात व ऋतुमानात होणारा बदल अगदी अल्प असतो. गुरूच्या कक्षेची पातळी व पृथ्वीच्या कक्षेची पातळी यांत फक्त १० १८’ एवढाच कोन असतो. त्याच्या विवृत्ताकार (लंबवर्तुळाकार) कक्षेची विकेंद्रता (कक्षेवरील कोणत्याही बिंदूचे नाभीपासूनचे अंतर व एका स्थिर रेषेपासूनचे अंतर यांचे नेहमी स्थिरांक असणारे गुणोत्तर) ०·०४८४ इतकी आहे. त्याच्या कक्षेत तो उपसूर्यबिंदूत (सूर्यापासून सर्वांत जवळ) असताना सूर्यापासून ७३,८०,००,००० किमी. व अपसूर्यबिंदूत (सूर्यापासून सर्वांत दूर) असताना ८१,४०,००,००० किमी. इतका दूर असतो. पृथ्वीपासून त्याचे कमीत कमी अंतर अंतर्योगाच्या वेळी (सूर्य व गुरू पृथ्वीच्या एकाच बाजूस असताना) ५८,६०,००,००० किमी. व जास्तीत जास्त अंतर बहिर्योगाच्या वेळी (सूर्य व गुरू पृथ्वीच्या विरुद्ध बाजूंस असताना) ९६,४०,००,००० किमी. असते. म्हणून त्याच्या बिंबाचा व्यास ३०″ ते ५०″ पर्यंत बदलतो. नक्षत्रसापेक्ष सूर्याभोवती एक प्रदक्षिणा करण्यास त्याला ११ वर्षे ३१५ दिवस म्हणजे सु. १२ वर्षे लागतात. त्याचा सांवासिक काल (सूर्यसापेक्ष प्रदक्षिणेचा काळ) ३९९ दिवसांचा आहे. एका राशीत तो सु. एक वर्ष राहतो. फलज्योतिषात धनु व मीन या राशींचा हा अधिपती असून तो कर्क राशीत असताना उच्चीचा समजतात. तसेच कन्या राशीत गुरू असताना ‘कन्यागत’, सिंह राशीत असताना ‘सिंहस्थ’ आणि कुंभ राशीत असताना ‘कुंभमेळा’ अशा तीन मोठ्या पर्वण्या हिंदुधर्मदृष्ट्या समजल्या जातात.
गुरूचा परिभ्रमणकाल सु. १२ वर्षांचा आहे. यावरून बार्हस्पत्य संवत्सर झाले. गुरूच्या ५ वर्षांचे एक युग कल्पिले, त्यात ६० सौरवर्षे झाली आणि म्हणून प्रभवादी ६० नावे संवत्सरांना दिली गेली. फार पूर्वी चिनी कालचक्रही बारा वर्षांचे होते आणि या वर्षाला गुरू त्या वर्षी ज्या राशीत असेल त्या राशीचे नाव देण्यात येई. कित्येक वर्षांनी सौरवर्षाला असे नाव देणे जमत नाही असे आढळून आले. कारण गुरूचा परिभ्रमण काल ११·८६ वर्षांचा म्हणजे १२ सौरवर्षांपेक्षा थोडा कमी आहे. अशा वेळी एखादे राशिनावच वगळण्यात येई कारण त्यावेळी गुरू पुढच्या राशीत आढळे. गुरू हा बहिर्ग्रह असल्याने आणि पृथ्वीपासून फार दूर असल्याने त्याला चंद्र, शुक्र व बुध यांच्यासारख्या लक्षात येण्याजोग्या कला नाहीत. तो सूर्यापासून त्रिभांतरी (९००) असताना त्याच्या बिंबाचा जास्तीत जास्त १/१५ इतका क्षय होतो. याचा परिणाम बिंबाची एक बाजू थोडीशी काळवंडण्यापलीकडे विशेष दिसून येत नाही. शुक्र व काही वेळा मंगळ हे दोन ग्रह सोडल्यास गुरू हा सर्व ग्रहांत तेजस्वी आहे. सर्वांत तेजस्वी तारा व्याध, त्याच्या पाचपट हा तेजस्वी दिसतो [प्रत – २·५ ते – २·३,
⟶ प्रत]. त्याची परावर्तनशक्ती ४४% आहे. पृथ्वीला प्रकाश व उष्णता सूर्यापासून मिळते त्याच्या ०·०३७ इतकीच गुरूला मिळते.
संरचना : रूपर्ट विल्ट या ज्योतिर्विदांनी पुष्कळ निरीक्षणांच्या साहाय्याने गुरूची संरचना पुढीलप्रमाणे ठरविली. (१) ३०,००० किमी. त्रिज्येचा मध्यभाग धातुसदृश हायड्रोजन, २०% ऑक्सिजन व इतर ग्रहांप्रमाणे लोखंड व निकेल यांचा असावा. (२) त्याच्याभोवती २७,००० किमी. जाडीचा बर्फाचा थर असावा. (३) अगदी वरचा थर १३,००० किमी. जाडीचा घन हायड्रोजनाचा असावा. या थराचे तापमान –१४०० से. असावे. यामध्येच गोठलेला अमोनिया व वायुरूप मिथेनही असावा. (४) पृष्ठभागावरील वातावरण बहुतेक सर्व मिथेन व अमोनिया यांचे बनलेले असले पाहिजे. तसेच हायड्रोजन व हीलियम या हलक्या वायूंचेही अस्तित्व त्यात असावे.
इ. स. १९५१ मध्ये रॅम्झी यांनी या संघटनेत बदल सुचविला. त्यांच्या मतानुसार गुरूच्या मध्यापर्यंत हायड्रोजनच आहे. पण मधला हायड्रोजन आपणास अपरिचित अशा स्वरूपात असावा. वातावरणात हीलियम, हायड्रोजन आणि हायड्रोजनाची अमोनिया व मिथेन ही संयुगे असावीत, दृश्य भागाखाली तीव्र दाबामुळे हायड्रोजन घट्ट होतो, ३,००० किमी.च्या खालील दाब पृथ्वीवरच्या समुद्रसपाटीवरील दाबाच्या २ लक्षपट व त्यामुळे हायड्रोजनाची घनता पाण्याच्या एकतृतीयांश असेल, ८,००० किमी.च्या खाली दाब ८ लक्षपट होऊन घट्ट हायड्रोजन धातुरूप असेल, हा अधिक संकोचनशील असल्याने मध्यभागी गुरूची घनता पाण्याच्या ३·७ पट असेल, असे रॅम्झी यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांच्या मते गुरूची संरचना १,२१,६०० किमी. व्यासाचा मध्यभाग (यात गुरूचे ९०% वस्तुमान सामावलेले), नंतर ८,००० किमी. जाडीचा घट्ट हायड्रोजनाचा थर आणि नंतर कमी जाडीचे वातावरण, अशी आहे.
गुरू अतिशय मोठा आणि त्याचे गुरुत्वाकर्षण जास्त असल्यामुळे हायड्रोजन व हीलियम यांसारखे अगदी हलके वायू त्यावर टिकून राहिले.
पृष्ठभाग व वातावरण : गुरूचा पृष्ठभाग त्याच्या ढगाळ व दाट वातावरणामुळे स्पष्ट दिसत नाही. परंतु दूरदर्शकातून गुरूच्या बिंबावर काहीशा नित्य स्वरूपाचे पट्टे व डाग दिसतात. हे पट्टे त्याच्या विषुववृत्ताला समांतर दोन्ही अंगांस असतात. त्या पलीकडील दोन्ही ध्रुवांपर्यंतचा भाग एकाच करड्या रंगाचा दिसतो. दोन पट्ट्यांमधील भाग तेजस्वी पांढरा-पिवळसर दिसतो. गुरूवर निरनिराळे कटिबंधही मानण्यात येतात. १६३० साली हे पट्टे बार्टोली यांना दिसून आले. हे पट्टे एकसंधी फिरत नसून त्यांचा प्रदक्षिणा काल विषुववृत्तावर ९ ता. ५५ मि. ३० से. तर ध्रुवाकडे ९ ता. ५५ मि. ९ से. असा आढळला. या पट्ट्यांमध्ये वेगवेगळ्या आकाराचे डाग दिसतात. यांपैकी काही डाग ९ ता. ४८ मि. तर काही ९ ता. ५९ मि. इतक्या कालावधीने प्रदक्षिणा करतात. गुरूच्या दक्षिण गोलार्धात सु. २० अक्षांशावर एक मोठा तांबडा डाग प्रामुख्याने दिसतो. हा डाग प्रथम रॉबर्ट हुक यांनी १६६४ साली व कासीनी यांनी १६६५ साली पाहिला. त्याचा रंग गडद तपकिरी असून तो सु. ४८,००० किमी. लांब व १६,००० किमी. रुंद असा लंबगोलाकार आहे. १७१३ मध्ये एकदा नाहीसा झाल्यानंतर तो पुन्हा १८३१ साली दिसला. याला पूर्व-पश्चिम गती असावी. कारण १८९४ साली जेथे त्याचा मध्य दिसला ते ० रेखांश समजले, तर १९०२ मध्ये तो ४६० वर, तर १९११ मध्ये ३२८० वर दिसला. हा डाग घनरूपात असला पाहिजे असे विल्ट म्हणतात. याचा प्रदक्षिणा काल साधारणमानाने ९ ता. ५५ मि. ३८ से. आहे. आणखी एक प्रकार ‘दक्षिण कटिबंधीय विक्षोभ’ या नावाने प्रसिद्ध आहे. हा दक्षिणेसच तांबड्या डागाच्या कटिबंधात आहे. कधी हा विक्षोभ आडवा बिंबभर १८०० पसरतो. कधी तांबड्या डागाला ओढत नेल्यासारखा वाटतो पण तांबडा डाग मागे पडतो. विक्षोभ व तांबडा डाग १९१९ आणि १९२६ साली अदृश्य झाले होते. या विक्षोभाचा प्रदक्षिणा काल ९ ता. ५५ मि. ३० से. इतका आहे. हे चमत्कार गुरूच्या वातावरणातीलच होत. गुरूच्या पृष्ठभागाविषयी कोणताच तर्क बांधता येत नाही.
त्याच्या उच्च स्थितांबरापासून (तापमान जवळजवळ कायम राहणाऱ्या वातावरणाच्या भागापासून) १० सेंमी. तरंगलांबीचे औष्णिक प्रारण (तरंगरूपी ऊर्जा) मिळते त्यावरून तेथील तापमान -१४०० ते -१७३० से. असावे असे सूचित होते. दुसरे सूक्ष्म तरंग-अनौष्णिक प्रारण हे ३ ते ७० सेंमी. तरंगलांबीवर मिळते. या प्रारणांचा उगम, ज्याप्रमाणे पृथ्वीभोवती व्हॅन ॲलन पट्टे (उच्च ऊर्जेच्या विद्युत् भारित कणांनी युक्त असलेले व्हॅन ॲलन यांनी शोधून काढलेले पट्टे) आहेत तशाच स्वरूपाच्या गुरूभोवतालच्या पट्ट्यांच्या बाह्यांगातील सापेक्षीय इलेक्ट्रॉनांद्वारे (ज्या इलेक्ट्रॉनांचा वेग इतका मोठा आहे की, त्यांचे अशा गतीतील वस्तुमान त्यांच्या स्थिर स्थितीत असणाऱ्या वस्तुमानापेक्षा लक्षात घेण्याइतके जास्त असते अशा इलेक्ट्रॉनांद्वारे) होणाऱ्या सिंक्रोट्रॉन प्रारणातून (सिंक्रोट्रॉन नावाच्या उपकरणात विद्युत् भारित कणांना चुंबकीय क्षेत्रात प्रचंड वेग प्राप्त करून दिल्याने मिळणाऱ्या प्रारणाशी साम्य असलेल्या प्रारणातून) होतो. तिसऱ्या प्रकारचे प्रारण डेसीमीटर तरंगलांबीच्या मर्यादेतील असून ते रेडिओ गोंगाटाच्या स्वरूपात ८ मीटरपेक्षा जास्त तरंगलांबीवर ऐकू येते. त्याचा उद्गम गुरूच्या ध्रुवप्रदेशात असावा. या सर्व निरीक्षणांवरून गुरूच्या पृष्ठभागावर चुंबकीय क्षेत्र १० ते ५० गौस (चुंबकीय क्षेत्र मोजण्याचे एकक, गौस यांच्या नावावरून नाव पडले) शक्तीचे असावे (ते पृथ्वीच्या पृष्ठभागावर ०·५ गौस असते). १९५५ मध्ये २२·२ मेगॅहर्ट्झ (कंप्रतेचे म्हणजे दर सेकंदास होणाऱ्या कंपन संख्येचे एकक, हर्ट्झ यांच्या नावावरून नाव पडले) कंप्रतेचे म्हणजे १३·५ मी. तरंगलांबीचे रेडिओ प्रारण गुरू उत्सर्जित करतो, असे आढळले.
अमेरिकेने पाठविलेल्या पायोनियर–१०, पायोनियर–११ इ. अवकाशयानांच्या द्वारे गुरूबद्दलची अधिक माहिती मिळविण्यात येत आहे.
उपग्रह : सर्व ग्रहांपेक्षा गुरूला सर्वांत जास्त म्हणजे १२ उपग्रह आहेत [ → उपग्रह]. आणखीही पुढे सापडण्याची शक्यता आहे. सर्वांत मोठे चार उपग्रह म्हणजे आयो, यूरोपा, गॅनिमीड व कॅलिस्टो हे प्रथम गॅलिलीओ यांना १६१० साली दिसले. लहानशा दूरदर्शकातूनसुद्धा हे दिसू शकतात. हे सर्व साधारणपणे गुरूच्या विषुववृत्त पातळीतच फिरतात. यूरोपाखेरीज हे सर्व पृथ्वीच्या चंद्राहून मोठे असून त्यांपैकी गॅनिमीड व कॅलिस्टो हे बुधाहूनही मोठे आहेत. यांना १, २, ३ व ४ असे क्रमांक दिले आहेत. १८९२ मध्ये बर्नार्ड यांस ५ वा उपग्रह आयो व गुरू यांच्या मध्ये सापडला. हा १६० किमी. व्यासाचासुद्धा नाही. त्यानंतर ६ वा १९०४ मध्ये आणि ७ वा १९०५ साली सापडला. हे कॅलिस्टोच्या कक्षेच्या बाहेरून फिरतात. या दोघांच्या कक्षेच्या पातळ्या मात्र गुरूच्या कक्षेच्या पातळीशी २९० व २८० चे कोन करतात. १९३८ मध्ये सापडलेला १० वा यांच्याचसारखा आहे. परंतु १९०८ साली ८ वा, १९१४ साली ९ वा, १९३८ साली ११ वा आणि १९५१ साली सापडलेला १२ वा हे चार उपग्रह उलट म्हणजे अपसव्य गतीने (घड्याळाच्या काट्यांच्या गतीच्या विरुद्ध दिशेने) गुरूभोवती फिरतात. हे आपापल्या कक्षाही थोडथोड्या बदलत असतात. ६ ते १२ हे सात उपग्रह त्याचे स्वतःचे उपग्रह नसून जवळ आले असताना पकडलेले लघुग्रह (मंगळ आणि गुरू यांच्या कक्षांच्या मध्ये असणारे छोटे ग्रह) असावेत, असा अंदाज आहे. सर्वांत बाहेरचे ८, ९, ११, १२ हे उलट गतीने फिरत असल्याने ते गुरूने पकडलेले धूमकेतू असावेत असाही कयास आहे. मोठे चार व जवळचा पाचवा हे गुरूकडे एकच अंग करून फिरतात. ५ ते १२ हे उपग्रहांचे क्रमांक त्यांच्या संशोधनाच्या क्रमाने आहेत. त्यांना काही नावेही सुचविण्यात आली आहेत, परंतु ती सर्वमान्य झालेली नाहीत.
गुरूच्या उपग्रहांमुळे चार प्रकारची दृश्ये दूरदर्शकातून दिसू शकतात. उपग्रह गुरूच्या सावलीत गेल्यामुळे त्यांना लागलेली ग्रहणे, ते पृथ्वीच्या दृष्टीने गुरूच्या आड गेल्याने गुरूने त्यांची केलेली पिधाने (निरीक्षक आणि एखादा खस्थ गोल यांमध्ये दुसरा खस्थ गोल आल्याने पहिला दिसेनासा होणे याला पिधान म्हणतात), गुरूच्या बिंबावरून होणारी त्यांची अधिक्रमणे (एखाद्या मोठ्या खस्थ गोलाच्या बिंबावरून दुसऱ्या लहान खस्थ गोलाच्या होणाऱ्या मार्गक्रमणास अधिक्रमण म्हणतात) व त्यांच्या गुरूवर पडलेल्या छायांची अधिक्रमणे असे प्रकार दिसतात. आयो, यूरोपा व गॅनिमीड यांना प्रत्येक प्रदक्षिणेत ग्रहणे लागतात. कॅलिस्टो दूर असल्याने व कक्षांमधील कोनामुळे कधीकधी एखाद्या प्रदक्षिणेत तो गुरूच्या सावलीतून निसटतो. गुरूच्या अंतर्योगात अगर बहिर्योगात ही ग्रहणे लागली, तर ती पृथ्वीवरून दिसत नाहीत. परंतु गुरू सूर्याशी त्रिभांतरी असताना ही गुरूच्या एका बाजूस दिसू शकतात, एरवी पिधानात ती निसटून जातात. आयो गुरूच्या फार जवळ असल्याने, ग्रहणाचा व पिधानाचा एकूण अवधी २ १/४ तास असल्याने त्याचे सर्व ग्रहण येथून दिसू शकत नाही. पहिल्यातील उपग्रहांची अधिक्रमणे, ग्रहणे व पिधाने ही प्रत्येक प्रदक्षिणेत होतात. त्यांच्यामध्ये केव्हा तरी सावलीचे अधिक्रमण होऊन जाते. या दृश्यांमुळे दूरदर्शकातून नेहमीच चारही उपग्रह दिसतील असे नाही. कोणी कधी पिधानात तर कोणी अधिक्रमणात असतील. कधीकधी चारही मोठे उपग्रह दिसत नाहीत असेही होते.
९ एप्रिल १९८० (दोन वेळा), १५ जून १९९०, २ जानेवारी १९९१ आणि २७ ऑगस्ट १९९७ या दिवशी चारही उपग्रह एकदम न दिसण्याचे प्रसंग येतील.
उपग्रहांच्या ग्रहणांचे वेध घेताना रोमर या शास्त्रज्ञांना १६७५ साली प्रकाशाला निश्चित वेग असतो, हा महत्त्वाचा शोध लागला. गुरू पृथ्वीच्या जवळ असताना लागलेली ग्रहणे गणिताने काढलेल्या वेळेपेक्षा अगोदर लागतात, तर गुरू पृथ्वीपासून दूर असताना गणिताने काढलेल्या वेळेपेक्षा उशिरा लागतात. हे प्रकाशाला वेग असल्याशिवाय होणार नाही, असे त्यांना वाटले आणि त्यांनी अंदाजलेला प्रकाशाचा वेग पुष्कळसा बरोबरही होता.
उपग्रहांना एकमेंकाचीही ग्रहणे असतात. इतके उपग्रह असले तरी त्यांचे सर्वांचे चांदणे पृथ्वीच्या चंद्राच्या चांदण्याहून अतिशय कमी असते.
धूमकेतू, लघुग्रह आणि गुरू : गुरू हा सर्वांत मोठा ग्रह असल्यामुळे त्याच्या आकर्षणाचा धूमकेतूवर होणारा परिणाम सूर्याच्या खालोखाल असतो. अशा धूमकेतूंचे अपबिंदू गुरुकक्षेच्या आसपास असतात. त्यामुळे त्यांचा प्रदक्षिणाकाल व कक्षा यांवर गुरूचा परिणाम होतो. यांना गुरुगटातील धूमकेतू म्हणतात. असे सु. ५० धूमकेतू आहेत. याचप्रमाणे काही लघुग्रहांवरही गुरूचे वर्चस्व असते. गुरूच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतरावर परंतु गुरूच्या आगेमागे ६०° असे लघुग्रह असतात. त्यांचा प्रदक्षिणाकाल गुरूच्या एवढाच असतो. लघुग्रहांच्या अशा गटाला ट्रोजन गट म्हणतात. या गटात १३ ते १५ लघुग्रह आहेत [→ ट्रोजन ग्रह].
एकंदरीत पृथ्वीसदृश मंगळ, शुक्र व बुध या ग्रहांपेक्षा गुरूचे स्वरूप अगदी भिन्न आहे. दाट वातावरण, अतिशय कमी घनता, मोठा आकार, त्वरेने होणारे परिभ्रमण, उपग्रहांची संख्या वगैरे गोष्टींच्या बाबतीत त्याचे शनी, प्रजापती आणि वरुण या मोठ्या ग्रहांशी अधिक साधर्म्य आहे.
संदर्भ : 1. Inglis, S. J. Planets, Stars and Galaxies, New York, 1961.
2. Moore, Patrick, The Planets, London, 1962.
3. Rudaux, L. De Vaucouleurs, G. Larousse Encyclopedia of Astronomy, London, 1959.
4. Statterthwaite, G. E. Encyclopedia of Astronomy, London, 1970.
5. Weigert, A. Zimmermann, H. ABC of Astronomy, London, 1967.
मराठे, स. चिं. कोळेकर, वा. मो.
“