गुप्त, मैथिलीशरण : (३ ऑगस्ट १८८६ – ११ डिसेंबर १९६४). प्रख्यात हिंदी महाकवी. जन्म उत्तर प्रदेशात चिरगाव येथे. त्यांचे माध्यमिक शिक्षण झांशी येथे झाले पण ते पुरे होऊ शकले नाही. मैथिलीशरणांचे वडील धार्मिक वृत्तीचे होते. त्यामुळे हिंदू धर्म आणि संस्कृतीचा, तसेच भक्तीचा खोल संस्कार मैथिलीशरणांच्या मनावर झाला. त्याचप्रमाणे सभोवतालच्या सामाजिक-राजकीय घडामोडींचा आणि
वैचारिक आंदोलनांचाही प्रभाव त्यांच्यावर पडल्यामुळे, राष्ट्रीय भावनेने ओतप्रोत भरलेली विपुल कविता त्यांनी लिहिली. त्यांना ‘राष्ट्रकवी’ म्हणून मानाने संबोधिले जाते. १९४१ मध्ये राष्ट्रीय आंदोलनात भाग घेतल्यामुळे त्यांना कारावासही भोगावा लागला. वयाच्या सोळाव्या वर्षापासूनच त्यांनी काव्यरचनेस सुरुवात केली. सु. चाळीस स्वतंत्र ग्रंथ आणि सहा अनुवादित ग्रंथ त्यांनी प्रकाशित केले. दोन महाकाव्ये, सु. वीस खंडकाव्ये, स्फुट कवितासंग्रह, नाटके इत्यादींचा त्यांत समावेश आहे. त्यांची सुरुवातीची काव्यरचना ⇨महावीरप्रसाद द्विवेदी यांच्या उत्तेजनाने झाली असून ती सरस्वती नावाच्या दर्जेदार मासिकात प्रकाशित झाली. प्रसिद्ध हिंदी लेखक सियारामशरण गुप्त हे मैथिलीशरणांचे धाकटे बंधू.
मैथिलीशरण हे मुख्यतः रामभक्त कवी. त्यांनी १९३२ मध्ये साकेत हे प्रख्यात महाकाव्य लिहून त्यात आपली रामाविषयीची भक्तिभावना व्यक्त केली आहे. ⇨तुलसीदासांच्या रामचरितमानसानंतर साकेत हेच हिंदीतील रामभक्तिपर असे लोकप्रिय व काव्यगुणदृष्ट्या श्रेष्ठ महाकाव्य मानले जाते. पंचवटी (१९२५) हे रामचरित्रातील शूर्पणखाप्रसंगावर त्यांनी लिहिलेले सुंदर खंडकाव्य आहे. महाभारत, पुराणे, इतिहास, भारतीय संस्कृती, संस्कृत साहित्य इत्यादींतून प्रेरणा घेऊन मैथिलीशरणांनी सु. वीस खंडकाव्ये लिहिली आहेत. जयभारत (१९५२) हे महाभारतातील अनेक आख्याने घेऊन लिहिलेले प्रचंड काव्य आहे. जयद्रथवध (१९१०), शंकुतला (१९१४), सैरंध्री (१९२८), बकसंहार (१९२८), वन वैभव (१९२८), नहुष (१९४०), हिडिंबा (१९५७) वगैरे काव्यांची प्रेरणा महाभारतच आहे. सिद्धराज (१९३६), कुणाल गीत (१९४२) ही इतिहासाच्या प्रेरणेतून लिहिलेली त्यांची काव्ये होत. त्यांना ‘राष्ट्रकवी’ म्हणून मान्यता मिळाली, ती भारतभारती (१९१२) या प्रसिद्ध काव्यग्रंथामुळे. कलात्मक दृष्ट्या तो दर्जेदार नसला, तरी भारतीयांच्या सद्यस्थितीचे. त्यांच्या अवनतीचे चित्रण करून गतकालातील वैभवाचे गुणगान यात त्यांनी केल्यामुळे हा ग्रंथ फार लोकप्रिय झाला. पुढे वेळोवेळी तत्कालीन परिस्थितीवरही त्यांनी काव्यरचना केली आहे. उदा., स्वदेश संगीत (१९२५), हिंदू (१९२७), मंगल घाट (१९३४), काबा और कर्बला (१९४२). मैथिलीशरणांच्या विपुल काव्यनिर्मितीत साकेत, पंचवटी, यशोधरा (१९३३), द्वापर (१९३६) आणि विष्णुप्रिया (१९५७) ह्या रचना त्यांच्या कीर्तीच्या आधारस्तंभ ठरतील.
मैथिलीशरणांना उपेक्षितांचे कवी म्हणून गौरविले जाते. भारतीय वाङ्मयात ज्या त्यागी, निःस्वार्थी व चारित्र्यसंपन्न स्त्रियांची साहित्यिकांनी उपेक्षा केली, त्यांच्या चरित्रांचे आलेख काढून मैथिलीशरणांनी त्यांना न्याय दिला. लक्ष्मणाची पत्नी उर्मिला (साकेतमध्ये नायिकेच्या जागी प्रतिष्ठापना), गौतम बुद्धाची पत्नी यशोधरा (यशोधरा काव्याची नायिका), चैतन्य महाप्रभूंची पत्नी विष्णुप्रिया (विष्णुप्रिया काव्याची नायिका) यांची जीवनचित्रे अतिशय तन्मयतेने त्यांनी रंगविलेली आहेत. त्यांच्या सर्वच काव्यांत स्त्रीजीवनाबद्दल वाटणारी अथांग सहानुभूती व्यक्त झालेली आहे. द्वापरमध्ये स्त्रीजीवनाबद्दलची त्यांची पुरोगामी मते प्रकट झाली आहेत.
भारतीय संस्कृती व परंपरा यांचे ते अभिमानी होते तथापि संपूर्ण परलोकपरतेचा त्यांनी कधीच पुरस्कार केला नाही. कर्तव्यतत्पर, धर्मभीरू, मर्यादाशील व संयमी जीवन जगणारा, परोपकारी गृहस्थ हा त्यांचा आदर्श होता. एकत्र कुटुंबपद्धती आणि वर्णव्यवस्था त्यांना मान्य होती पण वर्णव्यवस्थेत आलेली अमानुषता मात्र त्यांना मान्य नव्हती. अर्थ आणि काम या पुरुषार्थांचे नियंत्रण करून तसेच नैतिक नियमांचे पालन करून जीवन जगावे, असा त्यांचा आग्रह होता. ते नेहमीच काळाच्या बरोबर राहिले आणि उत्तरोत्तर त्यांच्या विचारांत औदार्य, सहिष्णुता व व्यापकता येत गेली. त्यांनी काही आध्यात्मिक आणि वैचारिक स्वरूपाची कविताही लिहिली आहे.
त्यांनी हिंदी खडी बोलीची फार मोठी सेवा केली. भाषेचा स्वभाव आणि आशयाची अनुकूलता यांनुसार त्यांनी विविध छंदांचा उपयोग केला. आपली काव्यभाषा अधिकाधिक शुद्ध व सामर्थ्यसंपन्न करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. खडी बोलीला सामर्थ्यसंपन्न बनविण्याचे श्रेय मैथिलीशरणांना दिले जाते. महाकाव्य, खंडकाव्य, मुक्तक, गीतकाव्य इ. काव्यप्रकार त्यांनी यशस्वीपणे हाताळले आहेत.
साकेत काव्याबद्दल प्रयाग येथील ‘हिंदुस्थानी ॲकॅडेमी’ ने १९३५ मध्ये त्यांना पारितोषिक दिले. १९३७ मध्ये हिंदी साहित्य संमेलनाकडूनही त्यांना ‘मंगलप्रसाद पारितोषिक’ मिळाले. पुढे त्यांच्या अनेक काव्यग्रंथांना बहुमानाचे पुरस्कार लाभले. १९४६ मध्ये त्यांना कराची हिंदी साहित्य संमेलनात ‘साहित्य वाचस्पती’ हा किताब मिळाला. १९४८ मध्ये आग्रा विद्यापीठाने त्यांना डी.लिट्. देऊन त्यांचा गौरव केला. १९५२ मध्ये राष्ट्रपतींनी त्यांची राज्यसभेवर नियुक्ती केली आणि १९५४ मध्ये ते बनारस हिंदू विद्यापीठाचे सन्माननीय प्राध्यापक झाले. हिंदी साहित्यातील त्यांचे स्थान विशेष महत्त्वाचे आहे. चिरगाव येथे ते निधन पावले.
संदर्भ : १. अग्रवाल, वासुदेवशरण, संपा. राष्ट्रकवि मैथिलीशरण गुप्त अभिनंदन ग्रंथ, बनारस, १९५९.
२. गोयल, उमाकांत, मैथिलीशरण गुप्त : कवि और भारतीय संस्कृतीके आख्याता, दिल्ली, १९५८.
३. नगेंद्र, साकेत–एक अध्ययन, आग्रा, १९४०.
४. पाठक, कमलाकांत, मैथिलीशरण गुप्त : व्यक्ति और काव्य, दिल्ली, १९६०.
५. पाठक, दानबहादुर, मैथिलीशरण गुप्त और उनका साहित्य, आग्रा, १९६९.
६. रामधारी सिंह ‘दिनकर’, पंत, प्रसाद और मैथिलीशरण, पाटणा, १९५८.
बांदिवडेकर, चंद्रकांत
“
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..