गुप्त, महेंद्रनाथ : (१४ जुलै १८५४ – ४ जून १९३२). रामकृष्ण परमहंसांचे एक परमभक्त आणि श्रीरामकृष्ण-कथामृत ह्या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक. महेंद्रनाथ गुप्त हे रामकृष्णांच्या शिष्यपरिवारात ‘मास्तरमहाशय’ ह्या नावाने ओळखले जातात. त्यांच्या शिक्षकाच्या पेशावरून हे नाव त्यांना पडले होते. ते बरीच वर्षे कलकत्त्यातील निरनिराळ्या शाळांचे मुख्याध्यापक होते. काही वर्षे त्यांनी सिटी, रिपन व मेट्रोपॉलिटन ह्या महाविद्यालयांत इंग्रजी व इतिहास ह्या विषयांचे प्राध्यापक म्हणून काम केले. रामकृष्णांचे प्रथम दर्शन घडल्यापासून तो रामकृष्णांनी १८८६ साली महासमाधी घेईपर्यंत, त्यांच्या सान्निध्यात महेद्रनाथांनी जास्तीत जास्त काळ घालविला. ह्या काळात त्यांनी दैनंदिनीचे लेखन चालू ठेवले होते. रामकृष्णांच्या देहावसानानंतर जवळजवळ दहा वर्षांनी, त्यांनी ह्या आपल्या टिप्पणांवरून श्रीरामकृष्ण-कथामृत हा ग्रंथ लिहिण्यास सुरुवात केली. आयुष्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत त्यांचे हे लेखन चालू होते. कथामृत पाच खंडांत प्रसिद्ध झाले. त्यांपैकी शेवटचा खंड १९३२ साली, त्यांच्या देहावसानानंतर प्रसिद्ध झाला.
श्रीरामकृष्ण-कथामृताच्या तोडीचा शांतीचा व शाश्वत सुखाचा मार्ग दाखविणारा संवादात्मक ग्रंथ, बंगाली भाषेतच नव्हे, तर कोणत्याही भाषेत आजवर रचला गेला नाही. गॉस्पेल ऑफ श्रीरामकृष्ण (१९४४) ह्या नावाने त्याचा इंग्रजीत स्वामी निखिलानंदांनी अनुवादही केलेला आहे. भारतातील बहुतेक सर्व प्रमुख प्रादेशिक भाषांतही त्याचे अनुवाद झाले आहेत. ह्या ग्रंथाचा एक अल्पसा भाग प्रारंभी जेव्हा इंग्रजीत प्रसिद्ध झाला, तेव्हा स्वामी विवेकानंदांनी महेंद्रनाथांना एका पत्रातून लिहिले होते : ‘पुस्तिका अपूर्व आहे. तुमचे कार्य नावीन्यपूर्ण आहे. लेखकाने एखाद्या थोर आचार्याचे चरित्र, आपल्या मतांचा रंग त्यात न मिसळता, लोकांसमोर मांडले आहे, असे ह्यापूर्वी कधीच घडले नव्हते पण तुम्ही मात्र हे कार्य सुंदर रीतीने केले आहे. तुमची भाषासरणी प्रसन्न, सरस आणि समर्पक असूनही अतिशय साधी आणि सुगम आहे. तिची वाखाणणी जितकी करावी तितकी थोडीच. ह्या पुस्तिकेच्या वाचनाने मला किती आनंद झालेला आहे, तो मला शब्दांनी वर्णन करून सांगता येणार नाही. ती जेव्हा जेव्हा मी वाचतो, तेव्हा तेव्हा माझे देहभान हरपते…. ह्यापूर्वी आपल्यापैकी कोणीच त्यांचे (रामकृष्णांचे) चरित्र का लिहिले नाही, ते मला आता उमगले. ते महत्कार्य तुमच्याकरिता राखून ठेवण्यात आलेले होते. रामकृष्ण हे निश्चितच तुमच्या पाठीशी उभे आहेत. …. सॉक्रेटिसच्या संवादात येथून-तेथून सर्वत्र प्लेटोच आहे पण ह्या पुस्तिकेमध्ये तुम्ही स्वतःला पूर्णपणे झाकून ठेवले आहे. त्यातील नाट्यपूर्ण भाग अत्यंत सुंदर आहे’.
महेंद्रनाथ गुप्त ह्यांनी श्रीरामकृष्ण–कथामृताखेरीज आयुष्यात अन्य कोणतेही लेखन केले नाही. कथामृतलेखन हेच त्यांचे एकमेव जीवितकार्य बनले होते.
खानोलकर, गं. दे.
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..