गुच्छ : (हिं.गंज्नी इं. सीलोन सिट्रोनेला ग्रास लॅ. सिंबोपोगॉन नार्डस कुल-ग्रॅमिनी). हे गुच्छाप्रमाणे वाढणारे उंच, बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारे) गवत आहे. याचे मूलस्थान आग्नेय आशिया मानतात तथापि भारतात सर्वसाधारणपणे रुक्ष प्रदेशांत रानटी स्थितीत आढळते. लागवडीत असलेला याचा प्रकार भारतात डेहराडूनमध्ये प्रयोगादाखल उपयोगात आणला असून श्रीलंका व जावा येथे मोठ्या प्रमाणावर त्याची लागवड केली आहे, कारण त्यापासून व्यापारी महत्त्वाचे ‘सिट्रोनेला तेल’ काढले जाते. अलीकडे अमेरिकेत हाँडुरस व ग्वातेमाला येथेही याची मोठी लागवड केलेली आहे. याची पाने अरुंद व सु. एक मी. लांब असून मुख्यतः त्यांचा उपयोग तेल काढण्याकरिता होतो. या गवताची सर्वसामान्य शारीरिक लक्षणे ⇨ग्रॅमिनी कुलात व ⇨ग्रॅमिनेलीझ गणात वर्णिल्याप्रमाणे आहेत. फुलोरा (परिमंजरी) लांबट व खोडाच्या टोकास व महाच्छदासारख्या (फुले वा फुलोरे ज्यांच्या बगलेत येतात अशा मोठ्या पानासारख्या) आवरकांच्या बगलेत येणाऱ्या मंजऱ्यांनी भरलेला असतो. भिन्नलिंगी कणिशके विषम प्रकारची, अनेक व प्रशूकयुक्त (कुसळयुक्त) असतात. एक अवृंत्त (बिनदेठाचे) व दुसरे संवृत्त (देठ असलेले) पहिल्यात एक फूल पण संख्येने दुसऱ्यापेक्षा ती कणिशके अधिक असतात. लघुतुषे (लहान तुसे) दोनच असून संवृत्त कणिशके लहान असतात.
हे गवत ओलसर व उष्ण हवेत आणि भरपूर सूर्यप्रकाशात चांगले वाढते कसलीही जमीन चालते पण खत घातल्यास वाढ अधिक चांगली होते. बिया व भूमिस्थित (जमिनीतील) खोडाचे तुकडे लावून नवीन लागवड करतात प्रथम ६-८ महिन्यांनी कापणी व मळणी करतात पुढे दरवर्षी तीनदा कापणी होते. दहा वर्षांनंतर लागवड पुन्हा करणे अधिक फायदेशीर असते. तीन वर्षांनी जास्तीत जास्त पीक मिळते डेहराडूनमध्ये दर हेक्टरी हिरवे गवत ८४,००० किग्रॅ. मिळाले होते. हे पीक एक दोन दिवस सुकल्यावर त्यापासून वाफेच्या साहाय्याने (ऊर्ध्वपातनाने) तेल काढतात. दर हेक्टरी सु. ७६—१०८ किग्रॅ. तेल दरवर्षी मिळते. हे तेल प्रथम पिवळट असते पण पुढे फिकट हिरवे होते यात ४० टक्के जिरॅनिऑल व ७ —
१५ टक्के सिट्रोनेलॉल असते. इंडोनेशिया, फॉर्मोसा व चीन येथे बनविले जाणारे सिट्रोनेला तेल (जावा प्रकार) सिंबोपोगॉन विंटरियानुस या दुसऱ्या जातीपासून काढलेले असते यात वरील द्रव्ये अधिक प्रमाणात असतात.
ह्या सिट्रोनेला तेलाचा मुख्य उपयोग साबण, सुगंधी तेले, रोगणे, फवारे, जंतुनाशके, पॉलिश करण्याची द्रव्ये, कीटकनाशके ह्यांसाठी करतात डासांविरुद्ध उपयोग करण्यास मोहरीच्या किंवा खोबऱ्याच्या तेलात हे तेल मिसळून वापरतात. सार व कढी व मासळीचे पदार्थ ह्यांना स्वाद येण्यास या गवताची पाने उपयोगात आणतात. चहाच्या पत्तीप्रमाणेही ती वापरतात. भारतात सिट्रोनेला तेलाची वर्षाला सु. १,७७,०००—२,४३,००० किग्रॅ. आयात होते यापैकी बराच भाग श्रीलंका-प्रकारचा व थोडा भाग जावा-प्रकारचा असतो. भारतात उत्तर प्रदेश व केरळ येथे सोईस्कर ठिकाणी मोठ्या प्रमाणात लागवड करून आयात कमी करणे शक्य आहे असे आढळले आहे.
ठोंबरे, म. वा.
“