गुंडी : सदरा, विजार, पँट, कोट, मॅनिला, पोलके, झगा इत्यादींसारख्या वस्त्रांचे दोन भाग जरूरीप्रमाणे जोडण्यासाठी व परत सोडण्यासाठी, तसेच वस्त्रांच्या सुशोभनासाठी वापरण्यात येणारे एक साधन. गुंड्या केव्हा वापरात आल्या व त्यांचा जनक कोण हे निश्चितपणे सांगता येत नाही. सोन्याच्या चकत्यांचा उपयोग गुंडी म्हणून ग्रीक लोक ४,००० वर्षांपूर्वी करीत असत. गुंडीसारख्या चकत्या व मुठी यांचा उपयोग फार पूर्वीपासून अलंकार म्हणून करीत. इ.स. पू. २५०० मध्ये ईजिप्शियन लोक गळ्याभोवती गुंड्यांची पदके लावीत. पुढे पुढे ग्रीक व रोमन लोक गुंड्यांचा उपयोग सुशोभनासाठी व पदकासाठी करीत. यूरोप खंडात अकराव्या शतकात गुंडीचा उपयोग अलंकार म्हणून करीत. तेराव्या शतकात गोल चेंडूसारख्या व चपट्या गुंड्या वापरत, सोळाव्या शतकात त्या मोठ्या प्रमाणात वापरात आल्या. चौदाव्या शतकात कोपर ते मनगट आणि गळा ते कंबर या भागांवरील वस्त्रांवर जोडण्यासाठी तसेच अलंकार म्हणून गुंड्या मोठ्या प्रमाणात वापरत. सोने, चांदी व हस्तिदंत यांपासून केलेल्या गुंड्या श्रीमंत लोक वापरत. त्याकाळी तांबे व त्याच्या मिश्रधातूंपासूनही सुरेख व मौल्यवान गुंड्या बनवीत. अठराव्या शतकापर्यंत गुंड्यांची निर्मिती फक्त खास कारागीर करीत. त्यांवर रत्ने, हस्तिदंत इत्यादींचे जडावकाम केलेले असे. सामान्य लोक लाकडांच्या व हाडांच्या गुंड्या वापरत. काही गुंड्यांवर कापडाचे आवरण असे. तसेच भरड दोऱ्याच्याही गुंड्या तारेच्या कडीवर विणून करीत. सतराव्या-अठराव्या शतकांत प्यूटर या मिश्रधातूपासून साच्याच्या साहाय्याने गुंड्या करीत. महाग पोलादापासून केलेल्या पैलूदार गुंड्या अठराव्या शतकाच्या मध्याला इंग्लंडमध्ये तयार होऊ लागल्या. फ्रान्समध्ये अशा गुंड्यांवर नाजूक नक्षी करीत. एकोणिसाव्या शतकात काशाच्या गुंड्या पारदमेलात (पाऱ्याच्या मिश्रधातूच्या विद्रावात) किंवा सोन्यात बुडवून तयार करीत. एकोणिसाव्या शतकाच्या मध्याला कापड गुंडाळलेल्या गुंड्या यांत्रिक पद्धतीने बनविण्यास सुरुवात झाली. या काळात
प्राण्यांची शिंगे तसेच खूरही वापरण्यास सुरुवात झाली. शिंगे व खूर यांवर प्लॅस्टिकीकरण (आकार देता येईल अशा स्वरूपात पदार्थाचे रूपांतर करणारी प्रक्रिया) करून, कापून रंगवून मग त्यापासून गुंड्या तयार करीत. मृत्तिका व काच यांच्याही गुंड्या बनवीत. पोर्सेलिनाच्या गुंड्यांवर रंगीत चित्रे काढलेली असत. रंगीत काचेपासून फ्रान्स आणि झेकोस्लोव्हाकिया येथे गुंड्या तयार करत. जपानमध्ये मृत्तिकांच्या गुंड्यांवर हाताने चित्रे काढीत. चीनमध्ये लाकडी गुंड्यांवर लाखेचा थर देत. कागदाच्या लगद्यापासून केलेल्या सुशोभित व लाखेचा थर असलेल्या गुंड्या एकोणिसाव्या शतकात लोकप्रिय होत्या. याच शतकात शिंपल्यापासूनही गुंड्या करीत असत. तसेच कोरोझो फळाच्या गरापासून गुंड्या करण्यास या शतकाच्या मध्यास सुरुवात झाली. या फळाच्या गराच्या गुंड्या करून भट्टीत भाजून वाळवीत. ह्यांना वनस्पतिजन्य हस्तिदंतांच्या गुंड्या म्हणत. विसाव्या शतकात ॲल्युमिनियमाच्या गुंड्या करण्यात येऊ लागल्या. प्लॅस्टिकच्या शोधानंतर साचाच्या साहाय्याने गुंड्या तयार होऊ लागल्या.
सर्वसाधारणतः गुंड्या चपट्या, माथा गोल किंवा पसरट असलेल्या उभट इ. स्वरूपांच्या असतात. चपट्या गुंड्या विविध आकारांच्या असून त्या वस्त्रांना शिवण्यासाठी भोके असतात. काही चपट्या गुंड्यांना तळाशी एक वेढा असतो. हा वेढा वस्त्राच्या काज्यातून ओवून त्यात एक कडी अडकवितात. काही गुंड्यांवर जे कापडी आवरण असते त्याच्या साहाय्याने त्या वस्त्रावर शिवतात. उभट गुंड्यांत तळभाग पसरट असून माथा चपटा व गोल असतो. हे भाग दंडगोलाकृती भागाने जोडलेले असतात. गुंडीचा माथा चपटा असल्यास त्यावर मौल्यवान खडे, रत्ने, चित्रे इ. जोडलेली असतात. सामान्यतः स्त्रियांच्या वस्त्रांना वापरावयाच्या गुंड्या चापाच्या असतात. त्यांत नर व मादी हे दोन भाग असतात. तसेच आकडा व डोळा या प्रकारच्या गुंड्याही असतात. हल्ली गुंड्यांऐवजी काहीवेळा झिपरचा वस्त्रे जोडण्यासाठी — सोडण्यासाठी उपयोग केला जातो. चपट्या गुंड्या वस्त्राच्या दुसऱ्या भागाच्या काज्यातून ओढून घेऊन वस्त्र जोडले जाते. उभट गुंड्यांसाठी दोन्ही भागांना काजी असतात. ह्याशिवाय बाहीच्या भागासाठी असणाऱ्या गुंड्या काज्यातून ओवून जोडता — सोडता येतात. ह्या चापाच्या किंवा साखळीने जोडलेल्या अशा असून त्या विविध स्वरूपांत मिळतात.
सोने, चांदी, रत्ने, हस्तिदंत, लाकूड, कागद, हाडे, शिंगे, खूर, शिंपले, मुक्ताद्रव्य (काही शिंपल्यांच्या आतील भागावर असणारा कठीण व परावर्तनाने विविध रंग देणारा पदार्थ, मदर ऑफ पर्ल), नारळाच्या करवंट्या, काच, मृत्तिका, प्लॅस्टिक, पोलाद, तांबे, ॲल्युमिनियम, कासे, कापड, दोरा इत्यादींपासून गुंड्या विविध आकारांत बनवितात. प्लॅस्टिकच्या गुंड्या विविध रंगांत, आकारांत व आकारमानांत करता येतात. शिंपले, हस्तिदंत, अंबर इ. मौल्यवान पदार्थांच्या गुंड्यांसारख्या दिसणाऱ्या प्लॅस्टिकच्या गुंड्या तयार करता येतात. हल्ली गुंड्या बहुतांशी यांत्रिक पद्धतींनी बनवितात.
गुंड्यांचा उपयोग वस्त्रे जोडण्या-सोडण्याशिवाय वस्त्रे सुशोभित करण्यासाठी तसेच पदके, मानचिन्हे इत्यादींसाठीही केला जातो. विविध प्रकारच्या गुंड्या गोळा करणे हा एक छंदही आहे.
भारतात सुताची गुंडी बराच काळ वापरात होती. तथापि भारतात गुंडीचा वापर कधी सुरू झाला हे सांगता येत नाही. १९१० पर्यंत गुंड्यांची आयात होत होती. काही थोड्या प्रमाणात सोन्याचांदीच्या गुंड्या स्थानिक कारागीर करीत. १९१० नंतर स्वदेशी चळवळीमुळे बंगालमध्ये गुंड्या बनविण्यास सुरुवात झाली. ह्यागुंड्या मुक्ताद्रव्याच्या होत्या. पहिल्या महायुद्धाच्या काळात शिंगांच्या गुंड्या बनविण्यास सुरुवात झाली. अशा गुंड्या बंगाल, तमिळनाडू, आसाम, महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, पंजाब येथे अद्यापिही बनवितात. कासे, ॲल्युमिनियम इ. धातूंच्या गुंड्या १९२० पासून बनविण्यात येऊ लागल्या. दुसऱ्या महायुद्धापर्यंत जपान, जर्मनी, व झेकोस्लोव्हाकिया येथून भारतात गुंड्यांची आयात केली जात होती. आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, दिल्ली, पंजाब येथे धातूंच्या गुंड्या बनवितात. गुंड्या बनविण्याचा व्यवसाय कुटीरोद्योग म्हणूनही काही प्रमाणात केला जातो.
संदर्भ : 1. Albert, L. S. Kent, The Complete Button Book, New York, 1949.
2. Chamberlin, E.C. Miner, M. Button Heritage, New York, 1967.
मिठारी, भू. चिं.
“