गॉल : ऱ्हाईनच्या दक्षिण व पश्चिमेकडील तसेच आल्प्सच्या पश्चिमेकडील आणि पिरेनीजच्या उत्तरेकडील प्रदेशास प्राचीन काळी दिलेली सर्वसाधारण संज्ञा. पुढे रोमनांनी पो नदीच्या खोऱ्याचा व रोमचा भाग त्यात अंतर्भूत केला. लॅटिनमध्ये त्यास गॅलिया म्हणतात. या प्रदेशास इंग्रजांनी गॉल ही संज्ञा दिली. सध्या हा भाग फ्रान्सच्या आधिपत्याखाली आहे. रोमन काळात येथे अनेक जमातींची वस्ती होती. ह्या प्रदेशात अनेक टोळ्या राहत होत्या. पण त्यांचे एकसंध असे राज्य निर्माण झाले नाही. इ.स.पू. ३९० मध्ये गॅलिक जमातींनी आल्प्स ओलांडून रोमवर स्वारी केली व ते जाळले. तेव्हा रोमनांचे प्रथम या प्रदेशाकडे लक्ष गेले. 

उत्साहवर्धक हवामान, विपुल अन्नधान्य आणि तांब्याच्या खाणी यांमुळे रोमचे त्यावर वर्चस्व मिळविण्याचे प्रयत्न सुरू झाले तथापि कित्येक वर्षे त्यांना गॉलच्या जमातींना जिंकता आले नाही. ज्यूलियस सीझरने (इ.स.पू. ५७ — ५२) गॉलवर स्वारी करून तो प्रदेश सहजगत्या जिंकला. त्याचे वर्णन सीझरने आपल्या लिखाणामध्ये केले आहे. रोमच्या अंतर्गत राजकारणात वर्चस्व मिळविण्यासाठी हा विजय त्यास उपयुक्त ठरला. पण गॉलची शासकीय व्यवस्था मात्र सम्राट ऑगस्टस याने लावली. त्याने गॉलचे शासकीय दृष्ट्या पाच विभाग पाडले व ऱ्हाईनच्या पूर्वेकडून जर्मन टोळ्यांच्या आक्रमणाचा धोका असल्यामुळे तेथे खास लष्कर ठेवले होते. गॉल वासियांच्या सांस्कृतिक जीवनात रोमनांनी हस्तक्षेप केला नाही, उलट त्यांस समान नागरिकत्वाचे हक्क दिले. म्हणून २१ व ७० साली तेथे जी बंडे झाली, त्यांचा रोख रोमन साम्राज्याविरुद्ध नसून त्या वेळच्या प्रशासकांविरुद्ध होता. २५९ ते २७३ पर्यत मात्र गॉल रोमन साम्राज्यातून फुटून स्वतंत्र झाला.

फ्रँक, व्हँडल इ. रानटी टोळ्यांनी ४०७ मध्ये गॉलवर हल्ले सुरू केले. शेवटी ४८६ मध्ये क्लोव्हिस या फ्रँक टोळीच्या प्रमुखाने गॉलमधील रोमन सत्ता नष्ट केली.

पोतनीस, चं. रा.