चेक साहित्य: उपलब्ध चेक साहित्य तेराव्या शतकाच्या उत्तरार्धापासूनचे आहे. ह्या शतकातील चेक साहित्य काही स्तोत्रांच्या रचनेपलीकडे गेलेले नसले, तरी चौदाव्या शतकात महाकाव्य, भावकाव्य, नाटक असे विविध साहित्यप्रकारांतील लेखन झालेले दिसते.
चौदावे शतक : Alexandreis हे सम्राट अलेक्झांडरच्या जीवनावरील महाकाव्य ह्या शतकात लिहिले गेले. ह्याचा कर्ता अज्ञात आहे. बाराव्या शतकात होऊन गेलेल्या गोत्ये द शातीयाँ ह्या फ्रेंच कवीने अलेक्झांडरवर लिहिलेल्या दशखंडात्मक महाकाव्याच्या आधारे हे चेक महाकाव्य रचिलेले आहे. तीन हजार कडव्यांच्या ह्या महाकाव्यावर रोमान्सलेखनाचा परिणाम जाणवतो. भाषेची कौशल्यपूर्ण हाताळणी आणि वेधक वर्णने ही ह्या महाकाव्याची काही लक्षणीय वैशिष्ट्ये.
महाकाव्याबरोबरच धार्मिक आणि लौकिक विषयांवर काही भावकविताही लिहिल्या गेल्या. लौकिक विषयांवरील भावकवितांवर दरबारी प्रेमसंकेतांचा प्रभाव दिसून येतो. १३४८ मध्ये प्राग विद्यापीठाची स्थापना करणारा बोहीमियाचा राजा चौथा चार्ल्स (कार. १३४७–७८) ह्याने चेक साहित्यनिर्मितीला उत्तेजन दिले. संतचरित्रांविषयी त्याला विशेष आस्था होती. त्याच्या आश्रयाने लिहिल्या गेलेल्या चेक साहित्यात संतचरित्रांचे प्रमाण अधिक आहे. पद्याच्या माध्यमातून लिहिलेल्या आख्यायिकात्मक संतचरित्रांत लेजंड ऑफ सेंट कॅथरिन हे श्रेष्ठ काव्यगुणांच्या दृष्टीने विशेष उल्लेखनीय. त्यातील प्रतिमासृष्टी प्रभावी वाटते. जर्मन रोमान्सवरून तयार केलेली काही चेक रूपांतरेही आढळतात.
Mastickar (इं. अर्थ – द क्वॅक) ह्या नावाने ओळखला जाणारा एक विनोदी नाट्यप्रवेश उपलब्ध झालेला आहे. त्यावरून ह्या शतकात काही नाट्यकृती लिहिल्या गेल्या असाव्यात, असे दिसून येते. डॅलिमिलनामक कोणा एकाच्या नावाने ओळखले जाणारे डॅलिमिल क्रॉनिकल हे इतिवृत्तही ह्याच शतकातले. सुबोध, पण वेधक शैलीत लिहिलेल्या ह्या इतिवृत्तात चेक लोकांचा १३१४ पर्यंतचा इतिहास आलेला आहे. स्पष्टपणे प्रत्ययाला येणारी राष्ट्रभक्ती व जर्मनविरोध ही ह्या इतिवृत्ताची उल्लेखनीय वैशिष्ट्ये. चेक लोकांच्या भवितव्यासंबंधीची उत्कट आस्था ह्या इतिवृत्तात व्यक्त झालेली आहे.
या शतकाच्या अखेरीअखेरीस काही वैशिष्ट्यपूर्ण उपरोधपर काव्ये रचिली गेली. त्यांत स्मिल फ्लास्का (सु. १३४९–१४०३) ह्याने लिहिलेले Nova Rada (१३९४, इं. शी. न्यू पार्लमेंट) हे विशेष महत्त्वाचे होय. बोहीमियन उमरावांच्या हक्कांची कैफियत मांडणारे हे रूपककाव्य आणि चॉसरचे पार्लमेंट ऑफ फाउल्स हे काव्य ह्यांत काही साम्यस्थळे दिसून येतात. ह्यांशिवाय काही धार्मिक व बोधवादी स्वरूपाचे गद्यलेखनही ह्या शतकात झालेले आहे.
पंधरावे आणि सोळावे शतक : पंधराव्या शतकाचा पूर्वार्ध हा ⇨ यान हुस (सु. १३७० ? – १४१५) ह्या विचारवंताने आरंभिलेल्या धर्मसुधारणेचा. जॉन विक्लिफ ह्या इंग्रज धर्मसुधारकाच्या विचारांचा बराच प्रभाव हुसवर होता. चर्चबरोबरच्या त्याच्या वादाचे पर्यवसान त्याला पाखंडी ठरवून जाळण्यात झाले. त्यानंतर चारच वर्षांनी जर्मनीचा राजा, पवित्र रोमन साम्राज्याचा सम्राट (कार. १३७८–१४००) व बोहीमियाचा राजा (कार. १३७८–१४१९) चौथा वेन्सेसलॉस ह्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा भाऊ सिजिसमंड ह्याने त्याच्या गादीवर बसण्याच्या प्रश्नावरून हुसाइट (यान हुसचे अनुयायी) व सिजिसमंडला पाठिंबा देणाऱ्या पोपचे सैन्य ह्यांच्यात युद्धे सुरू झाली. पंधराव्या शतकातील चेक साहित्याचा विचार ह्या घटनांच्या पार्श्वभूमीवर करावयास पाहिजे. ह्या वादळी कालखंडात चेक साहित्याच्या विकासाचा ओघ बराचसा कुंठित झाला. चौदाव्या शतकात हाताळल्या गेलेल्या अनेक साहित्यप्रकारांकडे ह्या काळात दुर्लक्ष झालेले दिसते. मात्र चर्चात्मक, वादप्रवण साहित्य अपरिहार्यपणे निर्माण झाले. स्तोत्रांसारखी जी काव्यरचना ह्या काळात झाली, तिच्यामागेही प्रेरणा होती धर्मसुधारणेची. ‘Ktoz jsu bozi bojovnici ’ (इं. शी. यू हू आर द वॉरिअर्स ऑफ गॉड) हे स्तोत्र ह्या संदर्भात उल्लेखनीय आहे.
पंधराव्या शतकात यान हुसने लिहिलेल्या De orthographia bohemica (सु. १४१०) ह्या ग्रंथाने चेक भाषेच्या शुद्धलेखनाच्या संदर्भात महत्त्वाच्या अशा अनेक सुधारणा सुचविल्या. चेक शुद्धलेखनाचे हुसप्रणीत नियम आजही वापरात आहे.
ह्याच शतकात प्यॉटर चेल्सीकी (सु. १३९० – सु. १४६०) ह्या यान हुसच्या अनुयायाने काही प्रवचने लिहिली. त्यांतील Siet viery prave(इं. शी. द नेट ऑफ द ट्रू फेथ) हे विशेष प्रसिद्ध आहे. हुसाइट चळवळींतून लाभलेल्या प्रागतिक विचारांचा चेल्सीकी हा वारसदार होता. त्याच्या प्रभावाने बोहीमियन बंधुत्वाच्या तत्त्वावर उभारलेल्या ‘Unitas Fratrum’ ह्या पंथाची स्थापना झाली. ह्या पंथातील काही विद्वानांनी बायबलचे चेकमध्ये भाषांतर केले (६ खंड, १५७९ – ९३). चेकमधील अभिजात गद्यलेखनशैलीचा एक आदर्शच ह्या भाषांतराने निर्माण केला. बायबल ऑफ क्रॅलिस ह्या नावाने हे भाषांतर ओळखले जाते. ह्यापूर्वी उपर्युक्त पंथाच्याच यान ब्लाहोस्लाव्ह ह्याने बायबलचे भाषांतर केले होते. सोळाव्या शतकातील मानवतावादाचा प्रभाव चेक साहित्यावरही पडला. विद्वत्ताप्रचुर असे अनेक गद्यग्रंथ ह्या शतकात निर्माण झाले. व्हिक्टॉरीन कोर्नेल ह्याने कायद्यावर लिहिले. व्हेलेस्लॅव्हिनने इतिहासावर व भाषाशास्त्रावर लिहिले, जॉन हेसिस्टजन्स्कीने वैद्यकावर लिहिले. ह्यांशिवाय काही प्रवासवृत्ते, दीर्घकथा असे साहित्यही निर्माण झाले. काव्याच्या क्षेत्रात मात्र उल्लेखनीय अशी कामगिरी झालेली दिसत नाही.
सतरावे आणि अठरावे शतक : ह्या दोन शतकात चेक भाषेची आणि साहित्याची उपेक्षा झाली. ह्या संदर्भातील ऐतिहासिक पार्श्वभूमी थोडक्यात पाहणे आवश्यक आहे. १५२६ मध्ये बोहीमिया हा हॅप्सबर्ग राजकुटुंबातील पहिल्या फर्डिनँडच्या सत्तेखाली आला. कॅथलिक विरुद्ध प्रॉटेस्टंट असे द्वंद्व बोहीमियात होतेच. १६१७ मध्ये बोहीमियाचा राजा झालेल्या दुसऱ्या फर्डिनँडच्या कारकीर्दीत प्रॉस्टेस्टंट पंथ बोहीमियातून उखडून टाकण्याचे धोरण सुरू झाले. त्यातून तेढ विकोपाला जाऊन कॅथलिक आणि प्रॉटेस्टंट ह्यांच्यामधील युद्ध अटळ झाले. १६१९ मध्ये दुसऱ्या फर्डिनँडला पदच्युत करून कॅल्व्हिनपंथीय पाचव्या फ्रीड्रिखला बोहीमियाचा राजा करण्यात आले परंतु १६२० मध्ये फर्डिनँडच्या सैन्याकडून फ्रीड्रिखचा पाडाव होऊन कॅथलिक पंथीयांच्या वर्चस्वाचा मार्ग मोकळा झाला. प्रॉटेस्टंटपंथीय जुने उमराव एक तर नष्ट करण्यात आले किंवा विजनवासी झाले. त्यांच्या जागी जे नवे उमराव आले त्यांना चेकचे ज्ञान फारसे नव्हते. चेक साहित्यपरंपरेतील प्रॉटेस्टंट पंथाचा ठसा असलेले साहित्य आक्षिप्त ठरविण्यात आले. कॅथलिक पंथीयांनी आपले साहित्य निर्माण केले. त्यात काही धार्मिक स्तोत्रे, संतचरित्रे आदींचा अंतर्भाव होतो.
सतराव्या शतकातील चेक साहित्याच्या संदर्भात दोन नावे विशेष उल्लेखनीय. चेक शिक्षणतज्ञ आणि ईश्वरशास्त्रवेत्ता ⇨जॉन एमस कोमीनिअस (१५९२ – १६७०) आणि बोहुस्लाव्ह बाल्बिन (१६२१ – ८८) ही ती होत. Labyrint sveta a raj srdce (१६३१, इं. भा. लॅबिरिंथ ऑफ द वर्ल्ड पॅराडाइस ऑफ द हार्ट, १९०१) ह्या कोमीनिअसच्या ग्रंथाची तुलना जॉन बन्यनच्या पिलग्रिम्स प्रोगेसशी केली जाते. बाल्बिनची देशभक्ती त्याच्या लेखनातून प्रकर्षाने प्रत्ययास येते. चेक भाषेचा त्याने आग्रही पुरस्कार केला आणि देशभक्तीच्या प्रेरणेतून स्वदेशाच्या इतिहासाचा अभ्यास केला.
ह्यांशिवाय जेझुइटांनी निर्माण केलेले धार्मिक साहित्य आहेच. त्यात संतचरित्रे, भक्तिपर स्तोत्रे इत्यादींचा समावेश होतो. अठराव्या शतकाच्या आरंभी चेक भाषेला समाजाच्या उच्च स्तरांत स्थान राहिले नाही. श्रेष्ठ दर्जाच्या साहित्यनिर्मितीसाठी तिचा कोणी विचार करीनासे झाले. तथापि सतराव्या शतकापासून निर्माण झालेल्या लोकसाहित्याने मात्र ह्या भाषेला पुढे उपयोगी पडणारा एक जिवंत दुवा जपला. हे साहित्य अर्थातच मौखिक होते.
राष्ट्रीय पुनरुत्थान : अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात राष्ट्रीय पुनरुत्थानाची चळवळ सुरू झाली आणि बोहीमियन देशभक्तीच्या प्रेरणांतून अनेक चेक विद्वान आपला वाङ्मयीन आणि सांस्कृतिक वारसा जाणून घेण्यासाठी साक्षेपी प्रयत्न करू लागले. अठराव्या शतकात यूरोपमध्ये प्रभावी ठरलेल्या विवेकवादाचाही त्यांच्यावर परिणाम झाला. ह्या संदर्भात ⇨यॉसेफ डॉब्रॉव्हस्की (१७५३ – १८२९) ह्याची कामगिरी विशेष उल्लेखनीय. मध्ययुगीन आणि प्रबोधनकालीन चेक भाषा-साहित्याचा त्याने गाढा व्यासंग केला. Ausfuhrliches Lehrgebaude der bohmischem Sprache (१८०९) हे चेक भाषेचे व्याकरण चिकित्सक शास्त्रीय दृष्टिकोणातून लिहून त्याने भाषासुधारणेच्या बाबतीत भरीव कामगिरी केली चेक भाषेतील अराजकाला आळा घालण्याचा प्रयत्न केला. Geschichte der bohmischem Sprache und Litteratur मध्ये (१७९२, सुधारित आवृ. १८१८) भूतकालीन चेक साहित्यातील श्रेष्ठ कृतींचा त्याने परिचय करून दिला. चेक साहित्यिकांच्या साहित्यिक आकांक्षा उंचावणे व त्या पूर्ण करण्यासाठी आवश्यक तो आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण करणे हा डॉब्रॉव्हस्कीचा हेतू होता. चेकच्या संदर्भातील त्याच्या ह्या कामगिरीचा उल्लेख करूनही, त्याने स्वत: मात्र जवळजवळ सारेच लेखन जर्मन व लॅटिन भाषांत केले, हे नमूद करणे आवश्यक आहे. यॉसेफ युंगमान (१७७३–१८४७), पाव्हेल यॉसेफ शाफारझीक (१७९५–१८६१) व फ्रांट्यिशेक पालाट्स्की (१७९८–१८७६) यांनीही चेक विकासास हातभार लावला. चेक भाषेची अभिव्यक्तिक्षमता वाढविण्याच्या दिशेने युंगमानने महत्त्वपूर्ण कार्य केले. त्या दृष्टीने परकी भाषांतील दर्जेदार साहित्यकृती त्याने अनुवादिल्या – उदा., मिल्टनचे पॅरडाइस लॉस्ट हे महाकाव्य – आणि पाच खंडांचा चेक-जर्मन शब्दकोश (१८३५–३९) तयार केला. त्याने परकी भाषांतून – उदा.,रशियन आणि पोलिश-शब्द वा संज्ञा स्वीकारल्या, स्वत: नवे, अन्वर्थक शब्द घडविले.
शाफारझीक हा एक स्लोव्हाक भाषाशास्त्रज्ञ आणि पुरातत्त्वविद्यावेत्ता. चेक राष्ट्रीय पुनरुत्थानाच्या चळवळीत त्याच्या व्यासंगी व्यक्तिमत्त्वाने आपला प्रभाव पाडला. स्लाव्ह लोकांचा इतिहास आणि भाषा ह्या विषयांवर त्याने मोलाची ग्रंथरचना केली. पालाट्स्कीने लिहिलेला बोहीमियाचा इतिहास म्हणजे एक अभिजात चेक गद्यकृती होय.
यान कॉल्लार (१७९३–१८५२) ह्याने लिहिलेली Slavy Dcera (इं. शी. द डॉटर ऑफ स्लाव्हा) ही सुनीतमाला म्हणजे ह्या राष्ट्रीय पुनरुत्थानाच्या काळातील एक उल्लेखनीय काव्यरचना. कॉल्लार हा स्लोव्हाक होता. चेक पुनरुत्थानाच्या संदर्भात स्लोव्हाकांनी जो जिव्हाळ्याचा प्रतिसाद दिला, त्यांतून स्लाव्हॉनिक बंधुत्वाची कल्पना चेक साहित्यात आली.
ह्याच काळात चेक साहित्यात स्वच्छंदतावादाची पूर्वचिन्हे दिसू लागली. Rukopis Kralovedvorsky (इं. शी. मॅन्यूस्क्रिप्ट क्रालॉव्ह ध्वूर) आणि Rukopis Zelenohorsky(इं. शी. मॅन्यूस्क्रिप्ट ऑफ झेलेना होरा) ह्या दोन हस्तलिखितांतील कविता मध्ययुगाच्या अगदी आरंभीच्या काळातील चेक काव्यरचनेचा नमुना म्हणून प्रसृत केल्या गेल्या. ह्या कविता म्हणजे चेक भाषाशास्त्रज्ञ व कवी व्हाट्स्लाव्ह हांका (१७९१–१८६१) ह्याने आपल्या काही सहकाऱ्यांच्या मदतीने रचिलेल्या होत्या, असे एकोणिसाव्या शतकात अखेरीस सिद्ध झाले. असे असले, तरी ह्या कविता स्वच्छंदतावादी कवितांची उदाहरणे म्हणून स्वतंत्रपणे निश्चित लक्षणीय आहेत.
⇨कारेल माखा (१८१० – ३६) हा चेक साहित्यातील सर्वश्रेष्ठ स्वच्छंदतावादी कवी. त्याच्या काव्यरचनेमागे लोकगीतांची प्रेरणा होती. जर्मन, इंग्रजी आणि पोलिश स्वच्छंदतावादी साहित्यांचा त्याने अभ्यास केला होता आणि त्यांचा प्रभाव त्याच्या काव्यावर पडलेला आहे. Maj(१८३६, इं. शी. मे) हे त्याचे भावगेय (लिरिकल) महाकाव्य विशेष प्रसिद्ध आहे. तारूण्य आणि वार्धक्य, प्रेम आणि मरण ह्यांतील विरोध माखाने परिणामकारक प्रतिमासृष्टीतून त्यात जिवंतपणे उभा केलेला आहे. आयँबिक छंदाचा चेक कवितेत प्रथम उपयोग माखाने केला.
कारेल एर्बेन (१८११ – ७०) ह्याने चेक लोककाव्यामधील बॅलडरचनेपासून स्फूर्ती घेऊन स्वच्छंतावादी शैलीने नटलेले बॅलड लिहिले. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मात्र चेक साहित्यिक वास्तववादाकडे झुकू लागले. भूतकालीन माहात्म्य आणि उज्ज्वल भविष्यकाळ ह्यांच्या स्वच्छंदतावादी चित्रांपेक्षा जिवंत, साक्षात वर्तमानकाळातील प्रश्न त्यांना अधिक प्रेरक वाटले. कारेल हाव्ह्लीचेक-बॉरॉव्हस्की (१८२१–५६) आणि बोझेना नेम्कोव्हा ही अशी साहित्यिकांपैकी दोन महत्त्वाची नावे. हाव्ह्लीचेक-बॉरॉव्हस्की हा एक पत्रकार नेम्कोव्हा ही एक कादंबरीकर्त्री. आधुनिक चेक गद्याच्या विकासाला त्यांनी मोलाचा हातभार लावला. लोकांच्या दैनंदिन जीवनातील नित्याच्या भाषेशी ह्या साहित्यिकांनी जवळचे नाते जोडले. हॅप्सबर्ग सत्तेला चेक जनतेच्या न्याय हक्कांची जाणीव करून देण्यासाठी हाव्ह्लीचेक-बॉरॉव्हस्की ह्याने अनेक प्रभावी लेख लिहिले बोचक उपरोधाने भरलेल्या कविता केल्या. ‘द बॅप्टिझम ऑफ सेंट व्हलाडि्यमीर’, ‘किंग लाव्ह्रा’ आणि ‘टिरोल एलिजीज’ ह्या त्यांतील काही विशेष उल्लेखनीय होत. टिरोल येथे त्याला परागंदा व्हावे लागले होते. त्याच्या अकाली निधनानंतर चेक जनतेच्या प्रतिकारशक्तीचे तो प्रतीक बनला. नेम्कोव्हा ही चेक साहित्यात मोलाची भर घालणारी पहिली लेखिका. Babicka(इं. शी. द ग्रँडमदर) ह्या तिच्या कादंबरीत चेक ग्रामीण जीवनाचे वेधक चित्रण आढळते. नेम्कोव्हा ही कादंबरीकर्त्री म्हणून ओळखली जात असली, तरी तिची Babicka ही ललितकृती कादंबरीपेक्षा ‘व्यक्तीचित्रे’ ह्या साहित्यप्रकाराला जास्त जवळची आहे. तिच्यातील ‘आजी’ म्हणजे एक साधीसुधी, ममताळू, शेतकरी स्त्री आहे. विलोभनीय व्यक्तिमत्व लाभलेली ही स्त्री म्हणजे Babicka मधील अनेक व्यक्तिचित्रांना जोडणारा दुवा. त्यांतून कृषिजीवनाच्या कल्पनेचे आदर्शीकरण करण्याचा प्रयत्न असला, तरी वर्णने मात्र वास्तववादी आहेत. सर्वसामान्यांच्या भाषेतून घडविलेल्या ह्या ललितकृतीत वाङ्मयीन कलात्मकतेचा एक आगळा आविष्कार प्रत्ययाला आला. आधुनिक चेक गद्याच्या विकासाचा टप्पा म्हणूनBabicka चा उल्लेख करण्यात येतो.
१८४८–१९१८ : कारेल माखाचे साहित्य आणि हाव्ह्लीचेकबॉरॉव्हस्कीने दिलेले देशभक्तीपर विचार अनेक तरुण चेक लेखकांना प्रेरक वाटले. कारेल माखाच्या Maj ह्या महाकाव्याचेच नाव घेऊन एक जर्नल काढण्यात आले (१८५८). त्यासाठी लिहिणारे साहित्यिक ‘Maj ’ अथवा ‘मे ग्रुप’ ह्या नावाने ओळखले जात. ⇨यान नेरुदा (१८३४–९१) आणि व्हीट्येस्लाव्ह हालेक (१८३५–७४) हे ह्या जर्नलसाठी लेखन करणारे प्रमुख साहित्यिक. दोघेही कवी. चेक साहित्याला यूरोपीय साहित्यात मानाचे स्थान मिळावे, ह्या विचाराने दोघेही भारलेले. Zpevy patecni (१८९६, इं. शी. गुड फ्रायडे साँग्ज) ह्या नेरुदाच्या सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रहातून त्याची राष्ट्रभक्ती प्रकर्षाने प्रत्ययास येते. नेरुदाचे गद्यलेखनही लक्षणीय आहे. Povidky malostranske मध्ये (१८७८, इं. शी. टेल्स ऑफ द लिट्ल कॉर्नर) त्याने रेखाटलेली प्रागमधील जीवनाची जिवंत शब्दचित्रे म्हणजे चेक साहित्यातील वास्तववादाची उत्कृष्ट उदाहरणे होत.
Vecerni pisne(१८५८–५९, इं.शी. ईव्हनिंग साँग्ज) आणि V prirode(१८७२–७४, इं. शी. नेचर पोएम्स) हे हालेकचे उल्लेखनीय काव्यसंग्रह. निसर्ग आणि प्रेम हे विषय स्वच्छंदतावादी पद्धतीने त्यांत हाताळले आहेत. ग्रामीण जीवनावर आधारलेल्या काही कथाही त्याने लिहिल्या.
कारोलीन् स्व्हेट्ला (खरे नाव योहाना मुझाकोव्हा) आणि आडॉल्फ हेड्यूक ही ‘मे ग्रुप’ च्या संदर्भातील आणखी दोन महत्त्वाची नावे. स्व्हेट्लाच्या कादंबऱ्यातून मनोविश्लेषणाची जाण दिसून येते. एकोणिसाव्या शतकातील नैतिक-सामाजिक प्रश्न तिने आपल्या कादंबऱ्यांतून मांडले. त्यांतही स्त्रीच्या सामाजिक स्थानाचा विचार तिने प्रामुख्याने केला. हेड्यूकच्या कवितांतून चेक व स्लोव्हाक ह्यांच्यामधील बंधुत्वाचा जिव्हाळा उमटला.
एकोणिसाव्या शतकाच्या अखेरच्या दोन-तीन दशकांतील चेक साहित्यात दोन प्रवृत्ती स्पष्टपणे जाणवतात. अन्य यूरोपीय साहित्यांतून प्रेरणा, स्फूर्ती आणि आदर्श शोधण्याचा प्रयत्न काही साहित्यकांनी केला, तर आपल्या साहित्याने आपल्याच परंपरांच्या प्रवाहातून विकासाचे नवनवे टप्पे गाठावे, ह्या विचाराचा प्रभाव काही साहित्यिकांवर पडला.
यारोस्लाव्ह व्हर्खलिट्स्की (खरे नाव एमिल फ्रिडा, १८५३–१९१२), हा पहिल्या प्रवृत्तीचा प्रतिनिधी. अन्यभाषीय साहित्यकृतींच्या संस्कारांना चेक साहित्यात एक वाट खुली करून देण्यासाठी त्याने शेक्सपिअर, गटे, दान्ते, पीत्रार्क, मोल्येर, ह्यूगी ह्यांसारख्या अनेक साहित्यिकांच्या कृतींचे चेक अनुवाद केले. त्याची स्वत:ची कविता अत्यलंकृत आहे. तिच्यातून त्याचे शब्दछंदांवरील प्रभुत्व मात्र प्रकर्षाने प्रत्ययास येते. नवनवे काव्यप्रकार व काव्यविषय त्याने चेकमध्ये आणले. लोकसाहित्याच्या परंपरेतून आलेली ज्ञापकेही त्याने उच्च दर्जाच्या चेक काव्याच्या संदर्भात नाकारली. श्रेष्ठ कवी म्हणून व्हर्खलिट्स्की ओळखला जात नसला, तरी आधुनिक चेक कवितेच्या भाषेचा विकास घडवून आणण्यासाठी आणि एकूण चेक साहित्यभाषेला बहुसंस्कारशीलता प्राप्त करून देण्यासाठी त्याने केलेले प्रामाणिक प्रयत्न निश्चितच लक्षणीय ठरतात.
स्व्हाटॉप्लुक चेख (१८४६–१९०८) हा कवी दुसऱ्या प्रवृत्तीचा प्रतिनिधी. राष्ट्रवाद आणि परंपरा ह्यांचे प्रेम त्याच्या महाकाव्य, भावकाव्यादी रचनांतून प्रकर्षाने प्रत्ययाला येते. हॅप्सबर्ग राजवट आणि तिच्या जोखडाखाली भरडली जाणारी चेक जनता ह्यांचे दर्शन त्याने निग्रो गुलाम आणि त्यांचा जुलमी धनी ह्यांच्या रूपकातून मांडले आहे. (Pisne otroka, इं. शी. साँग्ज ऑफ अ स्लेव्ह). Ve stinu lipy ( इं. शी. इन द शेड ऑफ अ लाइम ट्री ) ह्या काव्यकृतीत चेक ग्रामजीवनाचे हृद्य चित्रण आहे.
चेक साहित्यातील उपर्युक्त दोन प्रवृत्तींच्या वादसंघर्षात यॉसेफ स्लाडेकसारख्या (१८४५–१९१२) कवीने समन्वयाची भूमिका घेतली. शेक्सपिअरच्या नाट्यकृतींची चेकमध्ये उत्कृष्ट भाषांतरे करून त्याने व्हर्खलिट्स्कीच्या पावलावर पाऊल टाकले तथापि त्याच्या कवितेने मात्र चेक काव्यपरंपरेशी नाते जोडणारे साधेसुधे घाट आणि रूप जोपासले.
आलॉइस यिरासेक (१८५१–१९३०) हा या काळातील एक महत्त्वाचा चेक कादंबरीकार. चेक लोकांचा इतिहास त्याने आपल्या कादंबऱ्यांतून जिवंत केला. इतिहासातील नाट्याचे नेमके भान त्याच्या कादंबऱ्यांतून जाणवते. तथापि इतिहासाशी त्याने नेहमीच इमान राखले. Mezi proudy (१८९१), Proti vsem (१८९४) आणिBratrstvo (१८९९–१९०८) ह्या हुसाइट कालखंडावर आधारलेल्या त्याच्या तीन कादंबऱ्या (ट्रिलॉजी) आणि राष्ट्रीय पुनरुत्थानाचे चित्रण करणारी F. L. Vek (५ खंड, १८८८–१९०६) ही कादंबरी विशेष उल्लेखनीय. तथापि Temno (१९१५, इं. शी. डार्कनेस) ही त्याची सर्वश्रेष्ठ कादंबरी. कादंबरीकार म्हणून त्याच्या श्रेष्ठ गुणांचा प्रत्यय तीतून प्रकर्षाने येतो.
तथापि चेक कादंबरी केवळ इतिहासातच गुंतून पडली नाही समकालीन जीवनाचाही तिने वेध घेतला. याकोब आर्बेसच्या कादंबऱ्यांतून औद्योगिकीकरणासारखे प्रश्न हाताळले गेले यान हर्बेन, कारेल रैस आणि टेरेझा नोव्हाकोव्हा ह्यांनी चेक ग्रामजीवनाचे वास्तववादी चित्रण केले.
आंटोनिन सोव्हा (१८६४–१९२८), ऑटाकार बरझेनिना (खरे नाव व्हाट्स्लाव्ह येबाव्ही, १८६८ – १९२९), प्यॉटर बेझ्रूक (खरे नाव व्ह्लाड्यिमीर व्हासेक) व यॉसेफ माखार (१८६४ — १९४२) हे या काळाच्या अखेरीचे काही उल्लेखनीय कवी.
सोव्हा आणि बरझेनिना हे फ्रेंच आणि बेल्जियन प्रतीकवादाच्या प्रभावाखालील प्रमुख कवी म्हणून ओळखले जातात. सोव्हाच्या भावकविता सूक्ष्मोत्कट आशय व जटिल घाट ह्या दृष्टींनी लक्षणीय आहेत. दृक्प्रत्ययवादी प्रतिमानिर्मिती करण्याचा त्याचा प्रयत्न त्यांतून दिसून येतो. बरझेनिना हा गूढवादी भावकवी. मानवता आणि विश्व ह्यांच्या एकात्मतेचे स्वप्न पाहणारा. आशयातील सूक्ष्म बारकावे टिपण्याचे सामर्थ्य त्याच्याही भाषेत आहे. त्याने वापरलेल्या छंदांनी नंतरच्या कवींवर संस्कार घडविले. बेझ्रूकने सायलीशियातील चेक खाण कामगार आणि कृषक ह्यांच्यावरील दडपशाहीला कवितेतून वाचा फोडली. वेधक प्रतिमासृष्टी, असांकेतिक पण नेमकी भाषा, कवितेतील लयतालांचे भान आणि तीव्र निराशेचा सूर ही त्याच्या कवितेची वैशिष्ट्ये. माखार हा वास्तववादी कवी. Tristium Vindobona (१८९३) ह्या त्याच्या काव्यग्रंथात स्वच्छंदतावादी वळणाने व्यक्त होणाऱ्या चेक राष्ट्रवादाचे टीकात्मक विश्लेषण आढळते. Svedomim veku (इं. शी. द कॉन्शन्स ऑफ द एजीस) ह्या त्याच्या काव्यमालेत त्याने जागतिक इतिहासाचे चित्रांकन केले आहे. त्यातून नीत्शेचा प्रभाव जाणवतो.
फ्रांट्यिशेक क्साव्हेर साल्डा (१८६७–१९३७) ह्या समीक्षकाचा उल्लेख आवश्यक आहे. एकूण यूरोपीय साहित्यातील विविध प्रवाहांच्या आणि प्रवृत्तींच्या पार्श्वभूमीवर चेक साहित्याचा विचार केला पाहिजे, अशी त्याची धारणा होती. उच्च व वस्तुनिष्ठ समीक्षामूल्यांचे महत्त्व त्याने प्रतिपादिले. Duse a dilo (१९१३. इं. शी. स्पिरिट अँड वर्क) ह्या त्याच्या विशेष प्रभावी ग्रंथात त्याने चेक व अन्य यूरोपीय स्वच्छंदतावादी साहित्यिकांचा परामर्श घेतलेला आहे.
१९१८ नंतर : चेकोस्लोव्हाकियाचे स्वतंत्र प्रजासत्ताक १९१८ मध्ये अस्तित्वात आले. स्वातंत्र्याच्या चैतन्यदायी वातावरणाचा प्रभाव वाङ्मयीन सर्जनशीलतेवरही अपरिहार्यपणे पडला आणि भावकविता, नाटक, कादंबरी इ. विविध साहित्यप्रकारांतील लेखनाला नवा जोम प्राप्त झाला.
यॉसेफ होरा (१८९१–१९४५), यिर्झी वोल्कर (१९००–२४), फ्रांट्यिशेक हालास (१९०१– ५०), व्हिट्येलाव्ह नेझ्व्हाल (१९००–५८), यारॉस्लाव्ह सेफर्ट (१९०१– ) हे आधुनिक चेक कवींपैकी काही उल्लेखनीय कवी.
१९२० नंतरच्या काही वर्षांत साम्यवादाच्या सोव्हिएट प्रयोगाने काही कवी भारावून गेले. श्रमिक वर्गासंबंधीची उत्कट सहानुभूती व्यक्त करणाऱ्या कविता त्यांनी लिहिल्या. Pracujici den (१९२०, इं. शी. द वर्किंग डे) हा यॉसेफ होराचा काव्यसंग्रह त्या दृष्टीने उल्लेखनीय आहे. त्यानंतर मात्र त्याचे मन भूतकाळात विशेष रमलेले दिसते. Jan houslista (१९३९, इं. शी. यान द फिड्लर) ह्या आपल्या महकाव्यात त्याने प्राचीन बोहीमियाचे चित्र रेखाटले आहे. यिर्झी वोल्कर हाही साम्यवादाचे सूर जोपासणारा कवी.
मृत्यू, वृद्धत्व, विनाश आणि जीवनाची अर्थशून्यता ह्या विषयांनी हालासच्या कविता झपाटलेल्या आहेत. नेझ्व्हाल आणि सेफर्ट ह्यांची नावे चेक साहित्यातील ‘पोएटिझम’ ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या काव्यसंप्रदायाशी निगडित आहेत. ह्या संप्रदायातील कवींनी नागरी जीवन, तांत्रिक प्रगती, जीवनातील आनंद आपल्या काव्यांतून मुख्यत्त्वेकरून चित्रीत केला. चित्रपट, संगीत रेव्ह्यू ह्यांसारखे कलाप्रकार आणि सर्कशीसारखे मनोरंजनप्रकार ह्यांचे संस्कार त्यांच्या काव्यावर झालेले आहेत. ‘विशुद्ध कविता’ हे त्यांचे ध्येय होते. नेझ्व्हालच्या Pantomima मध्ये (१९२४) पोएटिझमचा प्रभाव जाणवतो. नेझ्व्हाल हा पुढे अतिवास्तववादाकडे वळला. Basne noci मधील (१९३०) कविता हा प्रभाव दर्शवितात.
Na Vlnach T. S. F(१९२५, इं. शी. ऑन वायरलेस वेव्हज) हा सेफर्टचा पोएटिझम संप्रदायातील काव्यसंग्रह विशेष उल्लेखनीय. त्याची पुढील कविता उत्कट आत्मपरतेकडे वळली. Ruce Venusiny मधील (१९३६, इं. शी. हँड्स ऑफ व्हीनस) कविता ह्या दृष्टीने लक्षणीय आहेत.
व्हाट्स्लाव्ह क्लीमेंट क्लिक्पेरा (१७९२–१८५९) आणि यॉसेफ टिल (१८०८–५६) ह्या दोन नाटककारांचे नाट्यलेखन आज फार मोलाचे मानले जात नसले, तरी चेक नाट्यलेखनाची परंपरा निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता, हे नमूद करणे आवश्यक आहे. तथापि १८८३ मध्ये राष्ट्रीय रंगभूमीची स्थापना झाल्यावरची चेक नाटकाचा फारसा विकास झाला नाही. चेक नाट्यलेखनाने प्रगतीचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला पहिल्या महायुद्धानंतर ⇨ कारेल चापेक ह्या श्रेष्ठ नाटककाराचे नाव ह्या संदर्भात विशेष उल्लेखनीय आहे. आपल्या नाटकांतून त्याने यंत्रप्रधान, भौतिकवादी अशा आधुनिक समाजातील विविध प्रश्नांचे व समस्यांचे भेदक चित्रण केले. R. V. R. (१९२०) हे त्याचे प्रसिद्ध नाटक. Bila Nemoe(१९३७, इं. भा. पॉवर अँड ग्लोरी, १९३८) व Matka (१९३८, इं. भा. द मदर, १९३९) ह्या नाटकांतून फॅसिझमचा यूरोपामधील वाढता प्रसार आणि त्यांतील धोके ह्यांची जाणीव त्याने व्यक्त केली.
फ्रांट्यिशेक लँगर (१८८८–१९६५) हा एक चतुरस्त्र नाटककार. हलक्या फुलक्या नाटकांपासून (Velbloud uchem jehly, १९२३) मनोविश्लेषणात्मक नाटकांपर्यंत (Periferie, इं. शी. द पेरीफरी, १९२५) विविध प्रकारची नाटके त्याने लिहिली. कादंबरीच्या संदर्भात कारेल मातेज चापेक-चॉड (१८६०–१९२७), इग्नाट हर्मन (१८५४–१९३५), इव्हान ओल्ब्राक्ट (१८८२–१९५२), व्हलाड्यिस्लाव्ह व्हांचुरा (१८९१–१९४२), मारी माजेरोव्हा (१८८२–१९५८) व मारी पुज्मानोव्हा (१८९३–१९५८) ही नावे उल्लेखनीय आहेत.
चेकोस्लोव्हाकियामधील बूर्झ्वा आणि श्रमिकवर्ग ह्यांचे वास्तववादी चित्रण चापेक-चॉडच्या कादंबऱ्यांत आढळते. Antonin Vondrejc मध्ये (१९१७ – १८) त्याने प्रागमधील कलावंतांच्या जीवनावर औपरोधिक, पण वास्तववादी टीका केली आहे. प्रागमधील कनिष्ठ मध्यमवर्गीयांचे जीवन चित्रित करणाऱ्या इग्नाट हर्मनच्या कादंबऱ्यांत विनोद व भावस्पर्शित्व आढळते. Nikola Suhaj loupeznik (१९३३) ह्या आपल्या सर्वश्रेष्ठ कादंबरीत इव्हान ओल्ब्राक्टने रूथीनीयामधील गरीब, उपेक्षित लोकांची शोकात्मिका ताकदीने उभी केली आहे. हिचा नायक आहे एक रूथीनीयन ‘रॉबिनहूड’. चेक गद्याचा एक सामर्थ्यशाली आविष्कार त्याने ह्या कादंबरीतून घडविला. व्हांचुराच्या कादंबऱ्यातील विषयवैविध्य लक्षणीय आहे. Tri reky मध्ये (१९३६, इं. शी. थ्री रिव्हर्स) पहिल्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर माणसामाणसांतील नात्यांचे आणि बंधांचे चित्रण आहे. Utek do Budina मध्ये (१९३२, इं. शी. फ्लाइट टू ब्यूडा) स्लोव्हाक तरुण आणि चेक तरुणी यांचे प्रेमसंबंध उत्कटपणे रंगविले आहेत. Marketa Lazarova (१९३१) ही त्याची ऐतिहासिक कादंबरी. व्हांचुराचे भाषेवर विलक्षण प्रभुत्व होते. भाषेचे माध्यम जास्तीत जास्त परिणामकारकपणे वापरण्याच्या दृष्टीने त्याने लोकभाषेतील शब्द तसेच अनेक आर्ष वाक्यप्रयोग आपल्या लेखनात वापरले. बरोक साहित्यशैलीची अनेक वैशिष्ट्ये त्याने आत्मसात केली होती. अभिव्यक्तीच्या तीव्र जाणिवेतून व्हांचुराने जे प्रयोग-प्रयत्न केले, त्यांनी चेक साहित्यभाषेच्या शक्तिमत्तेचे क्षेत्र विस्तारले. त्याच्या कादंबऱ्यांतून शैलीची जाणीव स्पष्टपणे प्रतीत होत असली, तरी ह्या शैलीनेच अनेकांना प्रभावित केले. चेक कादंबरीच्या संदर्भात मारी माजेरोव्हा आणि मारी पुज्मानोव्हा ह्या स्त्रीलेखिकांचा उल्लेखही आवश्यक आहे. साम्यवादी श्रद्धेने प्रेरित होऊन माजेरोव्हाने चेक श्रमिक जीवन आपल्या कादंबऱ्यांतून रंगविले. १९१८ नंतरच्या चेक समाजजीवनातील अंतर्गत ताण व समस्या पुज्मानोव्हाने आपल्या कादंबऱ्यांतून मांडल्या. यान ओट्सेनासेक (१९२४– ) हा अलीकडचा एक श्रेष्ठ कादंबरीकार.
१९३९ ते १९४५ ह्या काळात चेकोस्लोव्हाकियाला नाझी हुकूमशाहीला तोंड द्यावे लागले. ह्या खडतर परिस्थितीतून मूलभूत मानवी मूल्यांच्या जपणुकीची जी तीव्र आणि वाढती जाणीव निर्माण झाली, तिचे पडसाद चेक साहित्यविश्वातही उमटल्यावाचून राहिले नाहीत. साहित्यिकाने सामाजिक जबाबदारीचे व्यापक भान बाळगणे आवश्यक आहे, हा विचार विस्तारला. समाजवादी वास्तववादाने प्रेरित होऊन अनेक साहित्यिकांनी साहित्य व प्रत्यक्ष जीवन यांच्या एकात्म आविष्काराचा ध्यास घेतला. त्यातून अनेकदा येणारा ठरीवपणा आणि बोधवाद काही साहित्यकृतींतून आढळतोच तथापि सखोल मर्मदृष्टीचा प्रत्यय देणाऱ्या दर्जेदार कृतीही निर्माण झाल्या आहेत. १९४८ नंतर चेक साहित्याचा देशांतर्गत वाचकवर्ग फार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. प्रागतिक विचारांच्या अंतिम विजयावर विश्वास ठेवून चेक साहित्यिक आपले लेखन करीत आहेत.
संदर्भ : 1. Chudoba, F. A Short Survey of Czech Literature, 1924.
2. Lutzow, Count, A Histroy of Bohemian Literature, 1907.
3. Selver, P. Czechoslovak Literature, An Outline, 1942.
कुलकर्णी, अ. र.
“