चेंबर म्युझिक: सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धातील इटालियन संगीतसंज्ञांमध्ये या संज्ञेची उपपत्ती मिळते. मेदीची, बॉर्जा यांसारख्या प्रसिद्ध कुटुंबांच्या घरातील संगीताला उद्देशून ‘Musica da Camera’ म्हटले जात असे. चर्चसंगीताला उद्देशून ‘Musica da Chiesa’ ही संज्ञा वापरली जाई. मध्ययुगानंतर राजेरजवाडे व धनिक यांचा संगीतास  असलेला आश्रय सुटला आणि ते सभागृहांतून अवतरू लागले तेव्हापासून लहान वाद्यवृंदाचा समावेश असलेल्या कोणत्याही संगीतप्रकाराचा निर्देश ‘चेंबर म्युझिक’ या संज्ञेने केला जाऊ लागला. अशा तऱ्हेने तीनपासून आठपर्यंत वाद्ये असणाऱ्या वृंदासाठी केलेल्या रचना चेंबर म्युझिकमध्ये समाविष्ट होतात.

सांगीतिक दृष्टीने पाहता वाद्यवृंदरचनांत संगीतकृतीच्या एकेका भागासाठी अनेक वादक असतात तर चेंबर म्युझिकमध्ये एकेका संगीतविभागासाठी एकेका वादकाचीच नियुक्ती होत असते. मुख्यतः  या संगीतप्रकारातील रचना तंतुवाद्यांसाठीच असतात. क्वचित पियानोचा त्यात समावेश झालेला आढळतो.

दोन व्हायोलिन्स, एक व्हीयोला आणि एक चेलो हे या प्रकारातील लोकप्रिय वाद्यसंमेलन होय. ह्या प्रकारच्या जवळजवळ शंभर रचना करणाऱ्या हायडनच्या काळात या संगीतप्रकाराचा विकास झाला. या पद्धतीच्या सर्वश्रेष्ठ रचना म्हणजे बेथोव्हनच्या शेवटच्या रचना होत. बेला बॉरटोकच्या सहा रचना या आधुनिक काळातील श्रेष्ठ रचना होत.

कोरेल्ली, व्हीव्हाल्डी, हँडल (विशेषतः  काँचेर्टो ग्रोसी), बाक (ब्रॉन्डेनबुर्ग काँचेर्टो ) आणि मोट्‌सार्ट व हायडन यांच्या ‘डायव्हर्टिमेंटी ’ या रचनांचा अंतर्भाव असलेल्या बरोक शैलीच्या संगीताचा आज चेंबर म्युझिकमध्ये समावेश केला जातो.       

                                                                                           

 मोदी, सोराब (इं.) रानडे, अशोक (म.)