चिल्का सरोवर : ओरिसा राज्यातील उथळ, सर्वांत मोठे आणि प्रसिद्ध सरोवर. हे कलकत्ता-मद्रास लोहमार्गावर भुवनेश्वरपासून सु. ८९ किमी. वर आहे. हे पुरी आणि गंजाम जिल्ह्यात पसरले असून याचा विस्तार पावसाळ्यात सु. १,१६५ चौ. किमी. व उन्हाळ्यात सु. ८९१ चौ. किमी. असतो. हे सु. ७० किमी. लांब व सु. १६ ते ३२ किमी. रुंद आहे. याची खोली फक्त एक ते दीड मी. असते. बंगालच्या उपसागराच्या एका आखाताच्या तोंडाशी वाळूचा बांध साठून हे निर्माण झाले आहे. हा बांध काही ठिकाणी २०० मी. पेक्षा अधिक रुंद आहे. चिल्काच्या दक्षिणेस व पश्चिमेस सुंदर टेकड्या असून उत्तरेकडील सपाट भागातून भार्गवी व दया या नद्या यास येऊन मिळतात. बांधाच्या खिंडारांतून पुराचे पाणी समुद्रात जाते. चिल्काचे पाणी पावसाळ्यात गोडे व उन्हाळ्यात खारे असते. या सरोवरात पारिकूड आणि मालूड अशी दोन सुंदर बेटे आहेत. त्यांवर भातशेती होऊ शकते. तसेच सोलारी, भालेरी व जतिया या लहान टेकड्याही आहेत. येथील वनश्री प्रेक्षणीय असून हे मासेमारीसाठी व पाणपक्ष्यांच्या शिकारीसाठी प्रसिद्ध आहे. तसेच सागरी जीवविज्ञान व मत्स्यसंवर्धन यांच्या अभ्यासाची केंद्रे आणि विश्रामगृहेही येथे उघडण्यात आली आहेत. देशातील व परदेशातील अनेक हौशी प्रवासी या रम्य स्थळास भेट देण्यास येतात.
संकपाळ, ज. बा.