चिलखत : (आर्मर). शरीरसंरक्षक कवच व एक युद्धोपयोगी साधन. मनुष्येतर प्राण्यांना निसर्गतःच स्वसंरक्षणाची साधने, उदा., केस, जाड कातडी, नखे, रंग बदलणे वगैरे उपलब्ध असतात; परंतु मानवाला मात्र स्वसंरक्षणासाठी अशा तऱ्हेचे एकही नैसर्गिक साधन उपलब्ध नसते. म्हणून चिलखतांचा वापर करून मानवाने आघात-प्रत्याघातापासून आपल्या स्वसंरक्षणाचा प्रश्न सोडविला आहे. प्राचीन काळी तलवार, भाला, गदा, इ. शस्त्रांच्या घातक वारापासून अगर अर्वाचीन काळी बंदुकीची गोळी, वेगाने उडणारे तोफगोळ्यांचे तुकडे इ. अस्त्रांच्या घातक माऱ्यापासून शरीरसंरक्षणासाठी शरीरावर किंवा वाहनांवर चढविण्यात येणारे युद्धोपयोगी संरक्षक साधन म्हणून चिलखताचा वापर रूढ आहे. चिलखताला संस्कृतमध्ये त्राण, वर्मन्, कवच, द्रापि, वर्त्मन् अशी नावे आहेत. शरीराच्या प्रत्येक भागाकरिता अनुरूप अशी वेगवेगळी चिलखते असतात. त्यांची नावेही वेगवेगळी आहेत. त्यांची वर्णने आर्य चाणक्याच्या अर्थशास्त्रात पुढीलप्रमाणे दिलेली आहेत. उदा., शिरस्त्राण, कंठत्राण, कंचुक (घडाकरिता), वाखाण (गुडघ्यापासून पावलापर्यंत), नागोदरिक (मांडी चिलखत) इत्यादी. धारचा राजा भोज (इ. स. सु. ११००) याने त्याच्या युक्तिकल्पतरु या ग्रंथात आदर्श चिलखतांचे वर्णन केले आहे. ते असे – चिलखत हलके व लवचिक असावे, शरीराच्या हालचालीत व शस्त्रास्त्रे चालविण्यात त्यामुळे अडथळा येता कामा नये, चिलखत घालण्या-काढण्याची क्रिया सोपी असावी, त्या क्रियेमुळे अवयवांना व्यंगत्व येऊ नये इत्यादी.
वेदकालातही चिलखते होती. चिलखताचा ‘अत्का’ हा शब्द ऋग्वेदात आढळतो. भारतीय युद्धात कवचधारक पादचारी योद्ध्यांचे वर्णन आहे. मोगल अमदानीत संरक्षक हत्यार म्हणून युद्धामध्ये चिलखताचा वापर करीत असत. मराठ्यांच्या युद्धपेहरावातही चिलखत वापरत असत. अफझलखानाच्या वधाच्या वेळी शिवाजी महाराजांनी अंगात ‘जरीकुडती’ नावाचे रेशमी धाग्याबरोबर धातूंच्या तारा विणून बनविलेले कुडत्याच्या आकाराचे चिलखत घातले होते.
ऐतिहासिक पार्श्वभूमी : चिलखताच्या प्रगतीचा इतिहास म्हणजे संहारक आक्रमी शस्त्रास्त्रे व वैयक्तिक आणि सामुहिक संरक्षक हत्यारे यांच्या स्पर्धेचाच इतिहास होय. आजपर्यंत शस्त्रास्त्रांच्या घातकपणातील प्रगतीनुरूपच बचावाच्या साधनांचीही प्रगती होत गेली. प्राथमिक चिलखते गादीची अथवा जाड कातडी कपड्यांनी बनविलेली असत; परंतु सुधारलेल्या तीक्ष्ण धारधार व वजनी शस्त्रांपुढे ती टिकेनाशी झाल्यामुळे चिलखत बनावटीतही प्रगती व सुधारणा होत गेल्या. उदा., धातूंच्या तारा विणून बनविल्या जाणाऱ्या चिलखतापासून तर लोखंडी किंवा इतर धातूंच्या एकमेकांत अडकविलेल्या कड्यांची जाळीदार चिलखते बनविण्यापर्यंत चिलखत बांधण्यात प्रगती झाली. अशा प्रकारच्या कड्या अडकवून जाळीदार बनविलेल्या चिलखतास पाश्चात्य लोक ‘मेल’ असे म्हणत; परंतु वेगाने मारल्या जाणाऱ्या तीक्ष्ण बाणांच्या माऱ्यापुढे या चिलखतांचा टिकाव लागेना. घोडेस्वाराआधी त्याचा घोडा अशा ढोबळ निशाणावर दुरूनच बाणांचा अचूक मारा करण्यात येई. म्हणून पुढे घोडेस्वार व त्याचा घोडा यांच्या अंगावर घालण्यासाठी लोखंडी पत्र्याचे बनविलेले नखशिखांत चिलखती-पोशाख बनविण्यात येऊ लागले. द्रापि, वर्मन्, वर्त्मन् अशी वेदकालीन चिलखतांची नावे असून त्या काळी वेगवेगळ्या अवयवाकरिता वेगवेगळी कवचे होती. उदा., शिरस्त्राण, अंगुलीत्राण, मणिबंध, धनुष्याच्या प्रत्यंचेच्या आघातापासून इजा होऊ नये म्हणून ‘हस्तघ्न’ इत्यादी. त्या काळी चिलखते हाडे व कासव तसेच गेंडा वगैरे प्राण्यांच्या कातड्याची बनविली जात. ‘वर्मन्’ हे मात्र धातूच्या तुकड्यांचे असे. महाभारतातही चिलखतांचे उल्लेख वरवरचे येतात. कर्णाचे कवच विचित्र म्हणजे रंगविलेले असल्याचे वर्णन असून त्या काळात लोखंडाच्या जाळ्यांची व पत्र्यांची लोहजालीकाषट्कवच, सूत्रकंकट म्हणजे रजईसारखे अंगरखे, शिरस्त्राण, कंठत्राण, कंचुक, नागोदरिका (मांडीचे चिलखत) अशी वेगवेगळी चिलखते अस्तित्वात असल्याचे दिसते. ही चिलखते बनविण्याकरिता लोखंडाखेरीज चर्म, अस्थी इ. कच्चा माल वापरला जाई. गुप्तकाळात चिलखते होती असे रघुवंश व कुमारसंभव या महाकाव्यांवरून दिसते. तसेच राष्ट्रकूटकाळातही चिलखताचा वापर असल्याचे आढळते. यादवकाळात कवचे होती हे ज्ञानेश्वरीतील निर्देश व युक्तिकल्पतरु आणि अभिलाषितार्थ चिंतामणी या तत्कालीन ग्रंथांतील कवचांच्या उल्लेखांवरून कळून येते.
महाराणा प्रतापसिंहाच्या चिलखतावरून राजपुतांच्या जिरेटोपाची चांगली कल्पना येऊ शकते. या जिरेटोपात टोपाला जोडलेली नाकपट्टी, टोपावर तुरा खोवण्याची जागा, कानांच्या व मानेच्या रक्षणासाठी लोखंडी साखळी-कवच इ. दिसते. जिरेटोपाशिवाय ते कापसाच्या गादीवजा डगल्यावर अंगत्राण घालत, तसेच पाठीच्या कवचावरील लोखंडी तुकड्यांवर लहान लहान सुळे ठोकत. त्या काळी संबंध पत्र्याचे चिलखत देखील वापरात असे, तसेच दमासनी पोलाद वा जाड कातड्यांची चिलखतेही वापरीत असत. हाताकरिता कवचे म्हणजे लोखंडी वा कातडी मोजा असून संपूर्ण चिलखतावर सुंदर नक्षीकाम केलेले असे.
शिवपूर्वकाळात महाराष्ट्रावर मुसलमानी अंमल होता. त्यामुळे मराठ्यांचीच अशी वैशिष्ट्यपूर्ण चिलखते नव्हती, असे म्हणावयास हरकत नाही. शिलेदार आणि उच्च अधिकारी जिर नावाचे लोखंडी जाळीचे अंगकवच व डोक्यावर जिरेटोप घालत. अंगावरच्या या चिलखतास बख्तर म्हणत. चार आयना म्हणजे चार पत्रे जोडून केलेले हे चिलखत छाती आणि बगलीच्या रक्षणासाठी ते घालीत. शिरस्त्राणाला जिरेटोप किंवा टोप म्हणत. एकंदरीत रचना राजपूती चिलखतांसारखी असे. पानीपतच्या लढाईत सदाशिवराव भाऊ व विश्वासराव यांनी चिलखतांचा वापर केल्याचे उल्लेख मिळतात.
मोगल चिलखतांची माहिती आईन-इ-अकबरीमध्ये मिळते. शस्त्रास्त्रे व चिलखते यास ते ‘सिलह’ म्हणत. त्यांची चिलखते विविध प्रकारची होती. परंतु खुद (टोप, शिरस्त्राण), बख्तर, नडगीचिलखत (राणक), पारवर (हत्तीचे चिलखत) ही महत्त्वाची चिलखते होती. निरीक्षणाच्या वेळी अधिकाऱ्यांच्या अंगात चिलखत नसल्यास, त्या त्या मनसबदाराच्या श्रेणीप्रमाणे प्रत्येकी बारा आण्यांपासून ते पाच रुपयांपर्यंत दंड केला जाई. अंगकवच म्हणजे बख्तर हे लोखंडी साखळी जाळ्यांचे बनविलेले असे. कधीकधी ते लोखंडी खवल्यांचेही असे. चार आयना चिलखतदेखील त्या काळी वापरत होते. झीर (जिर) हे बाह्या असलेले साखळी जाळ्यांचे अंगत्राण असून त्यापासून गुडघ्यापर्यंत संरक्षण मिळे. याच्यावर बख्तर किंवा चार आयना चिलखत चढविले जाई. हे बख्तर अंगावर चढविण्यापूर्वी अंगात इतर कपडे घातल्यावर खबचह म्हणजे रजईसारखे जाकीट घालत व त्यावर जिर आणि त्यानंतर चार आयना चिलखत चढवित खाली घट्ट पायजम्यावर घडीचा परकर घालीत. शिरस्त्राणाला खुद दबलधा किंवा टोप म्हणत. हे पोलादाचे असून नाकपट्टी व डोळ्यांकरिता त्याला भोके असलेली पट्टी जोडलेली असे. शिरस्त्राणाच्या खाली लोखंडी जाळी घालीत त्यांमुळे गाल, कान व मानेचे रक्षण होई. जोशन हे पोट व ओटीपोटाकरिता असलेले लोखंडी पत्र्यांचे चिलखत होय. याशिवाय अंगरखा, जाड रजईंचा घट्ट बसणारा कोट, डगला वगैरे साधी कापडाची चिलखतेही प्रचारात होती. जाम-इ-फताह म्हणजे एक झगा असे. यावर कुराणातील आयते लिहिलेले असत. तो अंगात घातल्यावर त्यावर बाकीची चिलखते चढवीत. चिहिलखद, सादिखी, कोठी, भांजु, कंबल अशीही अन्य चिलखते वापरात होती. मोगल सैनिक-स्वार जरूरीची चिलखते नेहमी वापरीत. हाताकरिता दस्तवान, पायाकरिता राणक आणि पंजाकरिता मोजा ही चिलखतेही त्यांच्या वापरात असत.
घोड्यांच्या पार्श्वांगासाठी कजीम, गळा-मानेकरिता गर्दिनी, तोंडासाठी मोहरा किंवा अंघियारी व पोट-छातीसाठी स्वाराच्या जीनाखाली पत्र्याची वा जाळीची चिलखते वापरात होती. हत्तीकरिता हौद्याखाली घोड्याप्रमाणेच चिलखत असे. शिवाय सोंडेवर तलवारी-सुरे असलेले चिलखतही वापरात असे.
ही चिलखते मोगली पद्धतीचीच होती. महाराजा रणजितसिंग यांचा फ्रेंच अधिकारी अलार्ड याने त्यांच्यासाठी फ्रेंच चिलखते आयात केली होती, असा उल्लेख आढळतो.
भारतीय चिलखतांवर गंगा-जमुनी व इतर नक्षीकाम केलेले असे. बिद्रीकाम आणि मीनाकारी पद्धतीनेही त्यावर नक्षीकाम केले जाई. यूरोपीय चिलखतांशी तुलना करिता भारतीय चिलखते मात्र कमी प्रतीची वाटतात.
इ. स. पू. काळात इतरांप्रमाणेच यूरोपातही कड्यासाखळ्यांची, जाळ्यांची व तुकड्यांची चिलखते होती. ती तयार करण्यासाठी कच्चामाल म्हणून कातडी, तांबे वगैरे वापरीत. पुढे पुढे चिलखतनिर्मितीमध्ये प्रगती होऊ लागली. सरंजामशाही व मध्ययुगात लष्करी उपयोगापेक्षा संरक्षणावरच अधिक भर देण्यात आला. त्यामुळे शारीरिक हालचाली कठीण होऊन सैन्याच्या हालचालीत शैथिल्य आले. साधी साखळी कड्या-जाळ्यांची चिलखते जाऊन पत्र्यांची चिलखते आली व त्यांनी डोक्यापासून पायापर्यंत स्वार चिलखतबद्ध झाला. त्यामुळे तो जणू एक चालताबोलता किल्लाच वाटू लागला. शंक्वाकाराची वा पातेल्यासारखी शिरस्त्राणे प्रचारात येऊन त्यांना फक्त डोळ्यांकरिता दोन छिद्रे व श्वासोच्छ्वासासाठी लहान भोके ठेवण्यात आली. तसेच वेगवेगळे चिलखती भाग कड्याकोयंड्यानी जोडूनही चिलखते तयार होत. परिणामः त्यातून चिलखते बनविणाऱ्यांचे कलाकौशल्य प्रगट होई. घोडेस्वार शत्रूच्या उजव्या बाजूला येऊन तो त्याच्या हृदयाच्या बाजूवर शस्त्रप्रहार करीत असे. म्हणून चिलखताची डावी बाजू अधिक मजबूत करण्यात येऊ लागली. चिलखताचा चांगुलपणा जाणण्यासाठी चाचण्या घेऊन मगच त्याला त्याप्रमाणे बरावाईट दाखला देण्यात येई. चिलखतावरील पक्षी व रंगीत काम प्रेक्षणीय असे.
सोळाव्या शतकापासून गनपावडर वापरण्यात शस्त्रे उदा., बंदुका, पिस्तूले, तोफ इ. प्रचारात येऊ लागली त्यामुळे लढाईच्या तंत्रात बदल होत जाऊन व्यापक क्षेत्रावर जलद हालचालीचे तंत्र प्रस्थापित झाले. गनपावडरमुळे अस्त्रांचा मारा लांबून व तीव्र गतीने करणे शक्य झाले. चिलखतांना भेदून जाण्याची अस्त्राची घाततीव्रताही वाढली. त्यामुळे परंपरागत स्वरूपाची चिलखते कुचकामी ठरली. शिवाय ही चिलखते ५० ते ५५ किग्रॅं. वजनाची असत त्यामुळे घोड्याला एकंदर १५० किग्रॅ. बोजा वाहावा लागत असे. तसेच चिलखतांमुळे पायी लढणे अशक्यच असे. स्वार जर घोड्यावरून खाली आला, तर त्याला दुसऱ्याच्या मदतीशिवाय परत उभे राहणे शक्य होत नसे. त्याच्या अंगी कायमचे व्यंग निर्माण होत असे. म्हणून ‘मेलो तर सुखाने, पण चिलखत नको’ अशी स्वारशिपायांची भावना होई. एकोणिसाव्या शतकात फक्त भारी घोडेस्वारच छाती-पोट-पाठीचे चिलखत (क्यूरास) वापरी.
चिलखती गाडे : रणगाडे [→ रणगाडा] व इतर चिलखती गाड्या यांवर वेगळे असे चिलखत चढविण्यात येत नाही, तर मुळापासूनच त्यांची बांधणी व घडण विशिष्ट चिलखती जाड पत्र्यांची (आर्मर प्लेट) असून त्या पत्र्यांची जाडी ३० मिमी. ते २१६ मिमी. इतकी असते. भारत व अन्य देशांतही प्राचीन काळी रथांना जाड चामड्याचे चिलखत जडवीत. त्यांना व्याघ्रचर्म परिवेष्टीत रथ म्हणत. इ.स.पू. ३५०० वर्षांच्या अर (खाल्डिया) येथील उत्खननात सापडलेल्या चित्रात रथाला कातड्याने मढविले असल्याचे दिसते.
चिलखती लढाऊ जहाजे : (आयर्न क्लॅड फायटिंग शीप). जहाजाच्या लाकडी सांगाड्यात तोफगोळा घुसून त्याचा स्फोट होत असल्यामुळे त्यावर उपायात्मक असे चिलखताचे प्रयोग अठराव्या शतकापासून सुरू झाले. १८४० मध्ये ड्यूप्यूई द लोम याने सांगाड्यासाठी लोखंडी पत्रा वापरण्याचे काम सुरू केले. लाकडापेक्षा लोखंड हलके आहे. एंजिनाच्या सुरक्षिततेसाठी पाणरेषेजवळ १६६ मिमी. जाड व २·४ मी. रुंद अशा पत्र्यांचे थर मारावे अशी त्याची योजना होती. पुढे मॉनिटर नावाच्या तोफांची जहाजे बनविण्यात आली. त्यांचे चिलखत १०० मिमी. जाडीचे होते. परिणामतः चिलखतांना भेदणारे तोफगोळेही प्रचारात आले. त्यामुळे जहाजांचे डेक वगैरेंवर लोखंडी पत्रे बसविण्यास सुरुवात झाली. त्याच्याच जोडीला चिलखताची जाडीदेखील वाढविण्याची शर्यत सुरू झाली. जहाजावरील तोफा आणि त्यांचे गोलंदाज यांच्या संरक्षणासाठी पोलादी पत्र्याचे टरेट प्रचारात आले. शेवटी लढाऊ जहाजांच्या चिलखताची जाडी ३५ सेंमी. व टरेटचे चिलखत ४० सेंमी. इतकी ती चिलखते जाडी झाली. सर्वच ठिकाणी इतकी जाडी चिलखते नसतात. याशिवाय टार्पेडोपासून [→ पाणतीर] बचावासाठी मुख्य चिलखतावर पाणरेषेजवळ फुगीर चिलखत (अँटी टार्पेडो बल्ज) लावतात.
सांप्रत सैनिकाला उंच पर्वतावर व बर्फमय प्रदेशात लढाई करावी लागते. अशा वेळी असह्य थंडीत त्याच्या हातापायांच्या रक्षणासाठी मुद्दाम बनविलेले मोजे व बूट सैनिक घालतो. त्याच्या अंगातही विशिष्ट अंगरखे असतात. बर्फावरून परावर्तित प्रकाशातून डोळ्यांच्या रक्षणासाठी चष्मेही त्याला लावावे लागतात.
बंदूकीच्या दारूच्या शोधानंतर दूर अंतरावरून तीव्र गतीने फेकता येणाऱ्या अस्त्रांच्या निर्मितीत झपाट्याची वाढ झाल्याने लढाईचे हातघाई व मंदवेगीतंत्र यांत बदल होत गेला आणि व्यापक क्षेत्रावर जलद हालचालींचे युद्धतंत्र प्रस्थापित झाले. त्यामुळे पूर्वी वापरण्यात येणारी अवजड आणि जलद हालचालीत अडचण निर्माण करणारी धातूंच्या पत्र्यांची चिलखते मागे पडू लागली.
अलीकडे तयार झालेले नायलॉन धाग्यांचे व काचतंतूंचा स्तर असलेल्या पत्र्यांचे जाकीट एक प्रकारचे चिलखतच आहे. त्याचे वजन सु. चार किग्रॅ. असते. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धकाळात कठीण पोलादी पत्र्यांच्या शिरस्त्राणांचा वापर करण्यात आला. अलीकडे मात्र प्लॅस्टिक व काचतंतूच्या पत्र्यांची हलकी शिरस्त्राणे प्रचारात येत आहेत. या शिरस्त्राणामुळे डोके, कान, गाल व अंशतः मानेचे संरक्षण होऊ शकते.
लढाऊ विमानांच्या वैमानिकरक्षणासाठी विशिष्ट वैमानिक डगले, अंगरखे व शिरस्त्राणे असतात तसेच वैमानिकांच्या बैठकीभोवती पडदे असतात, त्यामुळे विमानविरोधी तोफगोळ्यांच्या तुकड्यांपासून त्यांना बचाव करणे शक्य होते.
अणुयुद्धाची भीती सांप्रत सर्वांना वाटते. अण्वस्त्रापासून वैयक्तिक व सामूहिक स्वसंरक्षण करण्याची समस्या अधिक गंभीर होत आहे. या अण्वस्त्रांना पर्याय म्हणून रासायनिक व जैव अस्त्रे वापरावी [→ जैव व रासायनिक युद्धतंत्र], अशी एक मतप्रणाली आहे. पहिल्या महायुद्धात विषारी वायूंचा उपयोग करण्यात आला. त्यापासून बचाव करण्यासाठी वायुमुखवटे, केप अँटिगॅस, रणांगणावर विषारी वायूंची उपस्थिती ओळखण्यासाठी निर्देशक वगैरे साधने वापरली गेली. दुसऱ्या महायुद्धात विषारी वायू वापरले गेले नाहीत; परंतु नेपाम अग्निदाहक बाँब व अग्निक्षेपक (फ्लेम थ्रोवर्स) वापरले गेले. त्यांपासून संरक्षण करणे मुळीच शक्य झाले नाही. आणखी एक युद्धतंत्र ‘परिस्थितिकीय’ युद्धतंत्र (इकॉलॉजिकल वॉरफेअर) – मोठ्या प्रमाणावर वापरले जाण्याचा बराच संभव आहे. याचा वापर अमेरिकेने इंडोचायनामध्ये (१९६५–७२) मोठ्या प्रमाणावर पारंपारिक युद्धाबरोबर केला. हे युद्धतंत्र वनस्पती, प्राणी, शेतीभाती इत्यादींची दूरगामी हानी करते तसेच पाऊसपूर आणणे असा प्रकारही या युद्धतंत्रात असतो. यामुळे संबंध राष्ट्राची आणि वैयक्तिकही हानी होते. याविरूद्ध काय योजना करावी हा आंतरराष्ट्रीय प्रश्न आहे. जिनीव्हा प्रोटोलॉग (१९२५) प्रमाणे असल्या तंत्रावर निर्बंध घातले आहेत.
दीक्षित, हे. वि.