चिपळूणकर, कृष्णशास्त्री : (१८२४–२० मे १८७८). मराठी ग्रंथकार आणि रसिक विद्वान. जन्म पुणे येथे. निबंधमालाकार विष्णुशास्त्र्यांचे वडील. पुण्याच्या पाठशाळेत कृष्णशास्त्र्यांनी संस्कृताचे अध्ययन केले. अलंकार, न्याय आणि धर्म ह्या तीन शास्त्र्यांचा त्यांचा गाढा व्यासंग होता. त्यांची कुशाग्र बुद्धिमत्ता पाहून त्यांचे गुरूजी मोरशास्त्री साठे हे त्यांना ‘बृहस्पती’ म्हणत. संस्कृताचे अध्ययन पूर्ण केल्यावर ‘पूना कॉलेज’ मधून त्यांनी इंग्रजीचे उत्तम ज्ञान संपादन केले. अर्थशास्त्र, मानसशास्त्र इ. विषयांचाही त्यांनी अभ्यास केला. १८५२ मध्ये अनुवादक म्हणून ते सरकारी नोकरीत शिरले. पुढे पुण्याच्या पाठशाळेत साहाय्यक प्राध्यापक दक्षिणा प्राइझ कमिटीचे चिटणीस, ‘पूना ट्रेनिंग कॉलेज’ चे प्राचार्य, रिपोर्टर ऑन द नेटिव्ह प्रेस इ.पदांवर त्यांनी कामे केली. ‘पूना ट्रेनिंग कॉलेज’ मध्ये असताना मराठी शालापत्रक ह्या नियतकालिकाचे त्यांनी काही वर्षे संपादन केले. ख्रिस्ती धर्मप्रचारास विरोध करण्यासाठी काढलेल्या विचार लहरी ह्या पाक्षिकाचेही ते संपादक होते.
त्यांचे बहुतेक सारे लेखन भाषांतरित वा आधारित आहे. त्यांच्या पद्यरत्नावलीत (१८६५) कालिदासाच्या मेघदूताचा अनुवाद, सुभाषित शार्ङ्गधर ह्या संस्कृत ग्रंथातील श्लोकांच्या आधारे रचिलेल्या अन्योक्ती इत्यादींचा संग्रह आहे, त्यांपैकी मेघदूताचा अनुवाद विशेष मान्यता पावला. कृष्णशास्त्र्यांचे अनुवादकौशल्य प्रशंसनीय आहे. त्यात शब्दशः अनुवाद नसून भावार्थदर्शन आढळते. म्हणूनच त्यातील सहजतेमुळे ते अनुवाद आहेत असे जाणवत नाही.
विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या सहकार्याने त्यांनी अनुवादिलेल्या आरबी भाषेतील सुरस व चमत्कारीक गोष्टींनी (१९१३) मराठीतील मनोरंजक कथावाङ्मयाचा पाया घातला. शास्त्रीय विषयांवरील लेखनही सुगम करून दाखविण्याची त्यांची हातोटी अनेकविद्या-मूल-तत्त्व संग्रहात (१८६१) प्रत्ययास येते, तसेच मराठी व्याकरणावरील त्यांचे निबंध त्यांच्या सूक्ष्म, चिकित्सक दृष्टीची साक्ष देतात.
त्याच्या अन्य लेखनात सॉक्रेटीस ह्याचे चरित्र (१८५२, एका इंग्रजी ग्रंथाधारे) आणि सॅम्युएल जॉन्सनच्या रासेलस ह्या ग्रंथाचा अनुवाद (१८७३, विष्णुशास्त्र्यांच्या सहकार्याने) ह्यांचा समावेश होतो.
पौर्वात्य व पश्चिमी अशा दोन्ही प्रकारच्या विद्याव्यासंगामुळे आधुनिक बनलेल्या कृष्णशास्त्र्यांनी अव्वल इंग्रजी काळात ज्ञानप्रवाहांचा समन्वय करण्याच्या अवघड कार्यात आपला वाटा उचलला. मराठी गद्याला त्यांच्या लेखणीने शुद्ध व डौलदार वळण लावले आणि विष्णुशास्त्र्यांच्या मराठी भाषाविषयक कार्याला आवश्यक अशी पूर्वपीठिका निर्माण करून ठेवली. पुणे येथेच ते निधन पावले.
जोग, रा. श्री.
“