चिनोपोडिएसी : (चक्रवर्त अथवा चाकवत कुल). एंग्लर आणि प्रांट्‌ल यांच्या वर्गीकरणाच्या पद्धतीप्रमाणे सेंट्रोस्पर्मी या गणामध्ये ह्या द्विदलिकित (बियांत दोन दलिका असणाऱ्या) वनस्पतींच्या कुलात अंतर्भाव होतो. ⇨ॲमरँटेसी, ⇨निक्टॅजिनेसी, बॅसेलेसी [→ मयाळ] इत्यादींचाही त्याच गणात समावेश आहे हचिन्सन यांनी चिनोपोडिएलीझमध्ये (चक्रवर्त गणात) हे कुल घातले आहे. बेंथॅम व हूकर यांच्या पद्धतीत कर्व्हेम्ब्रिई या श्रेणीत याचा समावेश केला आहे. चिनोपोडिएसी कुलात सु. १०२ वंश व १,४०० जाती येतात. (रेंडल : १०१ वंश व १,२०० जाती). त्यांचा प्रसार जगात सर्वत्र, मुख्यतः कोरड्या व लवणयुक्त जमिनीत आहे. या वनस्पती लहान, ⇨षधी, क्षुपे (झुडपे) क्वचित लहान वृक्ष असून विशेषेकरून लवणयुक्त जमिनीत वाढणाऱ्या वनस्पतींची पाने जाड, काहीशी रसाळ व लहान असतात. कधी पाने नसतात असल्यास ती एकाआड एक, क्वचित समोरासमोर व बदकाच्या पायाच्या तळाप्रमाणे असल्याने कुलवाचक लॅटिन नाव पडले आहे. फुलोरा कुंठित [→ पुष्पबंध] व फुले लहान, हिरवट, बहुधा द्विलींगी, केव्हा एकलिंगी असतात. परिदले पाच, क्वचित तीन किंवा चार, सुटी व दीर्घस्थायी (दीर्घकाल राहणारी) असतात. पुं-पुष्पात कधी परिदले नसतात. केसरदले पाच किंवा परिदलांइतकी, त्यांच्यासमोर व सुटी किंजदले बहुधा दोन, किंजपुट ऊर्ध्वस्थ, क्वचित अर्धवट अधःस्थ [→ फूल] फळे लहान, गोल, शुष्क, एकबीजी (क्लोम काष्ठफल) व परिदलवेष्टीत [→ फळ]. वायुपरागित किंवा स्वपरागित (वायूच्या साहाय्याने किंवा स्वतःच घडविलेला परागांचा प्रसार) बी सपुष्क (गर्भाबाहेरील अन्नांश असलेले) व गर्भ वक्र असतो. बीट (चुकंदर), चंदनबटवा, पालक, चाकवत इ. भाजीसाठी उपयुक्त वनस्पतींचा अंतर्भाव याच कुलात होतो. बीटपासून (जर्मनी व फ्रान्स येथे) साखर बनवितात. औषधी व इतर प्रकारे उपयुक्त वनस्पतीही या कुलात समाविष्ट आहेत. ⇨ माचुरा  समुद्रकिनारी वाढते ⇨ मयाळाचा समावेश हल्ली बॅसेलेसी अथवा मयाळ कुलात करतात पूर्वी या कुलात केला जात असे.                                   

पाटील, शा. दा.