चिनी साहित्य : महाकाव्य हा एक काव्यप्रकार सोडल्यास बाकी सर्व साहित्यप्रकार म्हणजे स्फुट कविता, नाटके, गोष्टी, कादंबऱ्या, ललित लेख इ. चिनी साहित्यात आढळतात. चिनी साहित्यास जवळ जवळ ४,००० वर्षांची अखंड परंपरा आहे. त्यामुळे चिनी साहित्याचे भांडार प्रचंड आहे. चीनमध्ये २५० वर्षांपूर्वी जेवढे वाङ्‌मय उपलब्ध होते. तेवढे वाङ्‌मय जगातील इतर कुठल्याही भाषेत नव्हते. एवढेच नव्हे तर जगातील सर्व भाषांतील एकूण वाङ्‌मयापेक्षाही ते जास्त होते.

चिनी वाङ्‌मयाचा उगम लोकगीतांत आढळतो. ही लोकगीते एका पिढीने दुसऱ्या पिढीला पाठांतराने दिल्याने ती आजही उपलब्ध आहेत. लोकगीते ख्रिस्तपूर्व तिसऱ्या-दुसऱ्या सहस्त्रकात निर्माण झाली असावीत. चिनी संस्कृतीचे उगमस्थान म्हणजे पीत नदीचे-ह्‌वांग्- ह नदीचे–खोरे हे आद्य चिनी लोकवाङ्‌मयाचे उगमस्थान असावे. नंतरच्या काळात चिनी संस्कृतीचे केंद्र पीत नदीच्या पूर्व खोऱ्याकडे सरकले व त्यानंतर जसजसा चिनी साम्राज्याचा विस्तार दक्षिणेकडे झाला तसतसे ते दक्षिणेकडे गेले. चिनी वाङ्‌मय हे बहुतांशी राजाश्रयाने व सरकारी अधिकारीवर्गाकडून निर्माण झाले असल्यामुळे वाङ्‌मयनिर्मितीचे केंद्रही वरीलप्रमाणे बदलत शेवटी दक्षिणेकडे वळले. गेल्या सहाशे-सातशे वर्षांपासून जिआंगसी आणि ज्यांगसू हे दोन प्रांत चिनी वाङ्‌मयाचे माहेरघर बनले.

चिनी लोक परंपरापूजक आहेत. त्यामुळे चिनी समाजात नावीन्याला फारच कमी महत्त्व आहे. याचा परिणाम चिनी वाङ्‌मयावरही झालेला आहे : इसवी सनानंतरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या शतकापर्यंत जे साहित्यप्रकार प्रस्थापित झाले, तेच प्रमाण मानून त्यात नंतरच्या काळात काहीही फरक करण्यात आला नाही. फक्त एका कालखंडात एक साहित्यप्रकार जास्त लोकप्रिय, तर दुसऱ्या कालखंडात दुसरा, एवढाच फरक. याला किंचित अपवाद म्हणजे चीनमध्ये बौद्ध धर्माचा प्रसार झाल्यानंतर जातक कथा आणि तशाच प्रकारच्या पौराणिक कथांचे वाढलेले महत्त्व. तेव्हा चिनी वाङ्‌मयाची चर्चा करताना त्याचे ऐतिहासिक क्रमाने कालखंड न पाडता त्याचा साहित्यप्रकारांनुसार आढावा घेणे हेच अधिक उचित ठरते.

काव्य : काव्य हा प्रकार म्हणजे चिनी वाङ्‌मयाचा मुकुटमणी. काव्यरचना हा प्रत्येक सुशिक्षित व्यक्तीचा छंदच असतो. या नियमाला अपवाद सापडणे कठीण. चिनी शिक्षणपद्धतीतही काव्यरचनेला महत्त्व असल्यामुळे काव्याची आवड लहानपणापासूनच निर्माण होणे साहजिकच आहे. शाळेबाहेरच्या वातावरणातही काव्य भरलेले असल्यामुळे शिक्षित मनुष्याचा काव्याशी जवळचा संबंध आहे. इमारतीवरील शिलालेख, दुकानावरील पाट्या, घरातील भिंतीवर टांगलेले सुंदर हस्ताक्षरांतील काव्याचे उतारे या सर्व गोष्टींनी चिनी मनुष्याला काव्यसृष्टीत वेढून टाकलेले असते. चीनमधील प्रत्येक पुढारी हा कवी असतोच. भूतपूर्व पक्षाध्यक्ष माओ-त्से-तुंग यांच्या कविता प्रसिद्ध आहेत.

चिनी काव्याचा उगम लोकगीतांत झाला आणि ज्या ज्या वेळी कवितेमध्ये तोचतोचपणा निर्माण झाला, त्या त्या वेळी त्यातून बाहेर पडण्यासाठी कवींनी जुन्या व नव्या लोकगीतांचा उपयोग केला. अशा लोकगीतांचा पहिला संग्रह म्हणजे शृ-जिंक किंवा काव्यसूत्र हा निनावी संग्रह इ.स.पू. १००० – ५०० या काळात तयार होत गेला असावा. या संग्रहात सु. ३०० कविता आहेत. प्रेम, विरह, युद्ध, राजकारण, अन्याय हे विषय चिनी कवितेमध्ये पुनःपुन्हा आढळतात. ते सर्व या काव्यसंग्रहात आहेत. काव्यसूत्रातील सर्व कविता पीत नदीच्या उत्तरेच्या भागातील लोकगीतांवर आधारलेल्या आहेत. चिनी संस्कृतीचा दक्षिणेकडे विस्तार झाल्यावर त्या प्रदेशातील लोकगीते ‘छूत्स’ (छू राज्यातील काव्य) या सदराखाली संकलित करण्यात आली. त्यातील पहिली कविता ‘ली साव’ ही सर्वांत प्रसिद्ध आहे. च्यू युआन् या छू राज्याच्या पंतप्रधानाने या ३७४ ओळींच्या कवितेत आपले सर्व दुःख ओतलेले आहे. आपल्याविरूद्ध केलेले कट, राजाने केलेला अन्याय आणि शेवटी स्वतः आत्महत्या करण्याचा घेतलेला निर्णय याचे वर्णन च्यु युआन्‌ने एका गूढ आणि काल्पनिक प्रवासवर्णनाच्या स्वरूपात लिहिले आहे. त्यातील वर्णने अजूनही डोळ्यासमोर जिवंत चित्रे निर्माण करतात व भावना जिवंत वाटतात.

उत्तरेकडील कविता साधी, विनोदप्रचुर आणि भावनात्मक आहे, तर दक्षिणेकडील कविता गंभीर शोकपूर्ण आणि वर्णनात्मक आहे. चीनमध्ये जोपर्यंत वेगवेगळी राज्ये होती, तोपर्यंत हे काव्यप्रवाह वेगळे राहिले. परंतु इ.स.पू. तिसऱ्या शतकात ही राज्ये एकत्र होऊन चिनी साम्राज्याची स्थापना झाल्यावर दळणवळण वाढल्याने हे दोन प्रवाह एकत्र आले व तेव्हापासून चिनी काव्याला जे विशिष्ट वळण लागले, ते नंतर २,००० वर्षे कायम राहिले.


राजाश्रयामुळे चीनच्या प्रत्येक राजवटीत काव्यसंपदेत भरच पडत गेली, परंतु थांग राजवटीत (६१८–९९७) कवितेच्या वैभवाने अत्युच्च शिखर गाठले. चीनमधील प्रसिद्ध कवी ली-बो (किंवा ली बाय), दू फू, बो ज्यू-ई हे या काळातच जन्मले. थांग राजवटीतील २,३०० कवींनी लिहिलेल्या ५०,००० कवितांचा संग्रह अजूनही उपलब्ध आहे. त्यातील ३०० कविता सर्वांत अधिक प्रसिद्ध असून त्यांची अनेक परदेशी भाषांत भाषांंतरे झाली आहेत.

थांगनंतरच्या सुंग (९९८–१२०५) आणि युआन (१२०६–१३६७) या राजवटींत काव्य आणि संगीत यांचा घनिष्ठ संबंध येऊन गेय काव्यप्रकार निर्माण झाले. त्यानंतरच्या मिंग (१३६८–१६४३) आणि च्यिंग (१६४४–१९१२) या काळात काव्यप्रकार जरी जुनेच राहिले, तरी काव्यरचना प्रचंड प्रमाणावर होत गेली.

गेल्या २,५०० वर्षांच्या काळात लिहिलेल्या लक्षावधी कविता आजतागायत चिनी लोकांनी जपून ठेवलेल्या आहेत. चिनी भाषेच्या विशिष्ट रचनेमुळे त्या कविता आजही वाचून त्यांचे रसग्रहण करणे सोपे आहे. त्यामुळे चिनी पारंपारिक ठेवा इतर कुठल्याही भाषेतील कवितेपेक्षा अधिक संपन्न तर आहेच, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे तो सर्वसाधारण शिक्षित व्यक्तिच्या आवाक्यात आहे.

इतिहास : कवितेच्या खालोखाल ऐतिहासिक लिखाणाला चीनमध्ये महत्त्व आहे. चिनी साम्राज्याचा इतिहास जवळजवळ अखंड आहे. भविष्यकाळातील पिढ्यांना मार्गदर्शन व्हावे, या हेतूने चीनमध्ये फार प्राचीन काळापासून इतिहासलेखन काळजीपूर्वक करण्यात आले. इतिहासाला चिनी भाषेमध्ये काही वेळा आरसा म्हणतात कारण त्यात भविष्यकाळाचे प्रतिबिंब भूतकाळाच्या रूपाने दाखविले जाते.

चीनमधील सर्वांत प्राचीन ऐतिहासिक लिखाण म्हणजे कासवांच्या व जनावरांच्या हाडांवर कोरलेले काही लेख. या हाडांचा उपयोग कौल लावण्यासाठी होत असे. हाडे तापवल्यावर त्यांवर पडलेल्या भेगांवरून राजाने शिकारीस किंवा युद्धावर जावे की नाही हे ठरविले जाई. कौल लावण्यासाठी विचारलेला प्रश्न आणि त्याचे उत्तर ही नंतर अणकुचीदार शस्त्राने त्या हाडावर कोरली जात. अशी हजारो हाडे विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून सापडत आहेत. त्यावरून त्या काळी (इ.स.पू.१३००–५००) झालेली युद्धे, सूर्य व चंद्र यांची ग्रहणे वगैरे माहिती मिळते. त्यानंतरच्या काळात राजदरबारी इतिहासकाराचा एक हुद्दाच निर्माण झाला. लू-राज्याच्या अशा इतिहासकारांनी लिहिलेला इतिहास छ्‌वुन्-च्यव् (वसंत आणि शरद ऋतूंची बखर) या नावाने नंतर प्रसिद्ध झाला. त्याच काळात ( ७२२–४८१ इ. स. पू.) ज्यू जिंग (इतिहाससूत्र) हेही रचले गेले. हे दोन्ही ग्रंथ अत्यंत रूक्ष आहेत. मात्र त्यानंतरच्या काळात छ्‌वुन्-च्यव्  या ग्रंथावरच्या टीकेच्या स्वरूपात ⇨ज्यो ज्वान्  नावाचा एक ग्रंथ लिहिला गेला. त्यात रसाळ गोष्टी, व्यक्तीची वर्णने, इ. थोडक्यात आणि सुरस भाषेत लिहिलेली आहेत. ऐतिहासिक गोष्टी या साहित्यप्रकाराची सुरुवात या ग्रंथापासून झाली.

चीनमध्ये शास्त्रशुद्ध इतिहासलेखन खऱ्या अर्थाने इ.स.पू. दुसऱ्या शतकात स्सु-मा चि’ एन याने केले. आपला शी-ची  हा इतिहासग्रंथ लिहिण्यासाठी त्याने राजदरबारातील सर्व कागदपत्रांचा, ग्रंथालयातील जुन्या ग्रंथसंग्रहाचा व प्रचलित दंतकथा, आठवणी या सर्वांचा उपयोग करून घेतला. त्याने पूर्वीच्या राज्यकर्त्यासंबंधी मतेही व्यक्त केली. त्याचे लिखाण साधे, अत्यंत रसाळ आणि तत्कालीन घटनांनी वर्णने सत्याला धरून आहेत. या ग्रंथाचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्याची पाच विभागात केलेली रचना होय. हे पाच विभाग पुढीलप्रमाणे आहेत : (१) ऐतिहासिक प्रसंग, (२) तारखांनुसार रचलेल्या वंशावळी आणि अधिकारी लोकांच्या याद्या, (३) धार्मिक विधी, संगीत, ग्रहविज्ञान, पाटबंधारे, व्यापार इ. आठ विषयांवरचे दीर्घ लेख, (४) महत्त्वाच्या तीस कुलांचा इतिहास आणि (५) महत्त्वाच्या इतर व्यक्तींवरचे (प्रधान, अधिकारी, बंडखोर व्यक्ती, साधुसंत वगैरे) सत्तर लेख. या रचनापद्धतीप्रमाणे एक प्रसंग किंवा एक व्यक्ती निरनिराळ्या विभागांत त्या त्या  संदर्भानुसार येते. तिचे गुणदोष वस्तुनिष्ठ दृष्टीने नमूद केलेले आहेत. हा इतिहास लिहिण्याचा

स्सु-मा चि’ एनचा हेतू भविष्यकालीन पिढ्यांनी मागील इतिहासापासून धडा शिकावा, हा होता.

शी-ची  या  इतिहासाची इतकी वाखाणणी झाली, की त्याच्या रचनेचा कित्ता त्यांनंतर दोन हजार वर्षे गिरवला गेला. इतिहासरचनेत मूलभूत फरक असा झालाच नाही. सध्या प्रत्येक राजवटीचा एक असे पंचवीस इतिहासग्रंथ उपलब्ध आहेत. त्या सर्वांची रचना तंतोतंत शी-ची सारखी आहे.

स्सु-मा चि’ एनचा इतिहास राजाश्रयाखाली लिहिला गेला. प्रत्येक राजवटीत त्याचे अनुकरण करून अधिकृत सरकारी इतिहास लिहिले गेले. नवीन राजवट स्थापन झाल्याबरोबर पूर्वीच्या राजवटीचा इतिहास लिहिणे, हे महत्त्वाचे कार्य मानले जाई. या परंपरेमुळे २,५०० वर्षांचा व्यवस्थित इतिहास चीनमध्ये उपलब्ध आहे. त्याशिवाय ऐतिहासिक ग्रंथावर टीका, खाजगी इतिहासलेखन, प्रांतांचे व शहरांचे इतिहास हे प्रत्येक राजवटीत प्रचंड प्रमाणावर लिहिण्यात आल्याने चीनच्या ऐतिहासिक वाङ्‌मयाची बरोबरी दुसऱ्या कोणत्याही भाषेतील इतिहासलेखनाला करता येणार नाही.

तत्त्वज्ञान : इतिहास या विषयाच्या खालोखाल तत्त्वज्ञानावर चिनी भाषेत प्रचंड लिखाण झाले आहे. कन्फ्यूशसचे स्वतःचे असे लिखाण उपलब्ध नाही. त्याच्या शिष्यांनी संग्रहित केलेली त्याची वचने हाच त्याच्या विचारांचा सारग्रंथ. तोही अगदी छोटा व त्रोटक आहे. त्याचा अनुयायी मेन्सियस (चिनी नाव मंग-ज) याबद्दलच्या आख्यायिका, त्याचे राजेलोकांबरोबर व इतरांशी झालेले संवाद, त्याची प्रवचने यांचाही संग्रह त्याच्या शिष्यानी केलेला आहे. त्याची भाषा सोपी व सरळ असून चर्चेची शैली प्रशंसनीय आहे. कन्फ्यूशस आणि मेन्सियस हे दोन कन्फ्यूशस तत्त्वप्रणालीचे गुरू मानले जातात. त्यांव्यतिरिक्त हान फैज लाव् ज आणि मो-ज (किंवा मो-डि) हेही मोठे तत्त्ववेत्ते होते. हे सर्व इ.स.पू. तिसऱ्या शतकाच्या सुमारास होऊन गेले. हान फैज यांचे लिखाण सरळ आणि मुद्देसुद आहे, परंतु मो-ज यांचे मात्र पाल्हाळिक आणि बोजड आहे. लाव् ज, ज्वांग-ज यांसारख्या इतर दाव-पंथी लेखकांचे लिखाण काव्यात्मक, आध्यात्मिक आणि गूढवादी आहे. त्यावर चीनमध्ये पुष्कळच टीकाग्रंथ लिहिण्यात आले. युरोपीय भाषांतही त्याची अनेक भाषांतरे झाली. दाव-द-जिंग (मार्ग-सूत्र) या लाव् ज यांच्या एकाच ग्रंथाची इंग्रजीमध्ये वेगवेगळी निदान दहा तरी भाषांतरे असावीत.


चिनी तत्त्वज्ञानाचे वैशिष्ट्ये हे, की जे तेरा ग्रंथ त्याचे मूळ लिखाण मानले जातात. ते सर्व इ.स.पू. तिसऱ्या शतकापूर्वीचे आहेत. त्यांत वर नमूद केलेल्या ग्रंथाशिवाय ई जिंग (अस्थिरता सूत्र),जव ली (जव राज्याचे नियम), शूू जिंग (इतिहास-सूत्र), छ्‌वुन-च्युव्स्या जिंग (पितृसेवा-सूत्र), अर् या  हा शब्दकोश आणि षृ जिंग (काव्य सूत्र) यांचा समावेश आहे. त्यानंतर २,००० वर्षे झालेले लिखाण म्हणजे या मूळ ग्रंथावर झालेली टीका होय. प्रत्येक पिढीने आपल्या काळाच्या अनुभवानुसार या ग्रंथातील वचनांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे. नवीन तत्त्वप्रणाली निर्माण करण्याचा प्रयत्न असा झालाच नाही. बौद्ध धर्माचा प्रसार झाल्यानंतरही मूळ सूत्रांचे भाषांतर व त्यांवर भाष्य असेच लिखाण झाले. नंतर साधारणपणे अकराव्या शतकाच्या सुमारास ज्यू स्यी या प्रसिद्ध तत्त्ववेत्त्याने कन्फ्यूशस तत्त्वप्रणाली आणि बौद्ध धर्म यांचा समन्वय करून चिनी तत्त्वज्ञानाला नवी कलाटणी दिली. तथापि तीही कन्फ्यूशसच्या  ल्वुन यू (लुन यू) यावर केलेल्या भाष्याच्या स्वरूपात. नवीन तत्त्वप्रणाली निर्माण न करता जुन्या तत्त्ववेत्त्यांच्या ग्रंथावर टीका लिहिण्याचा प्रकार आजही दिसून येतो. माओ-त्से-तुंगनेही आपले बरेचसे लिखाण मार्क्सवादावरचे भाष्य या स्वरूपात केले आहे.

कथासाहित्य : कथासाहित्याला सुशिक्षित वर्गाने उघडउघड महत्त्व कधीच दिले नाही. त्यामुळे ते मुख्यतः लोककथांच्या स्वरूपात तोंडीच पसरत गेले. तथापि सर्वसामान्य चिनी माणसाला गोष्टी ऐकण्याचे विलक्षण वेड असल्यामुळे विशेषतः खेडोपाडी कथाकार हा एक स्वतंत्र वर्गच निर्माण झाला. त्यांनी लोककथांचे जतन केले. इतर साहित्य प्रकारामध्ये जसे परंपरेचे वर्चस्व आहे, तसे ते कथाक्षेत्रातही आहे. सतराव्या शतकापर्यंत चालत आलेल्या सर्व कथांचे कथानक शतकानुशतके तेच कायम राहिले. त्यात काही नवीन पात्रे, नवीन प्रसंग व वर्णने ही कथाकारांनी आपल्या कल्पनेप्रमाणे भरीस घातली. चीनमध्ये सतराव्या-अठराव्या शतकांत ज्या कांदबऱ्या प्रसिद्ध झाल्या, त्यांची कथानके निदान १,५०० वर्षेतरी प्रचलित होती. या कथानकांचे विषय ऐतिहासिक, पौराणिक, भुतेखेते, जादू असे आहेत. चांगल्या वर्तणुकीचे चांगले फळ व वाईट वर्तणुकीचे वाईट फळ, हे तत्त्व सिद्ध करणाऱ्या गोष्टींचा चिनी भाषेमध्ये मोठा भरणा आहे. बौद्ध धर्माचा प्रसार करताना व नंतर एकोणिसाव्या शतकात ख्रिस्ती धर्माचा प्रसार करताना धर्मप्रसारकांनी कथाकारांचा पेशा पतकरून धर्मप्रसार केला. ऐतिहासिक गोष्टी मात्र निवळ करमणूक म्हणून अत्यंत लोकप्रिय झाल्या. त्यामुळे सर्वसामान्य चिनी माणसाचे देशाच्या इतिहासाचे ज्ञान फारच चांगले असते.

कथाकारांनी मुखोद्‌गत केलेल्या गोष्टी स्मृतीला चालना देण्यासाठी टिप्पणीच्या रूपाने लिहिल्या जाऊ लागल्या. त्यात नावे व ठळक प्रसंग एवढेच असे. बाकी सर्व कथाकाराने आपल्या कल्पनेप्रमाणे रचावे. काही काळानंतर कथाकारांनी संपूर्ण कथा लिहिण्यास आरंभ केला. यांपैकी काही कथांचे कादंबऱ्यांत रूपांतर करण्यात आले.

सुशिक्षित वर्गामध्ये कथा-कादंबऱ्या हा प्रकार छचोर मानला गेल्यामुळे, जरी काही लेखकांनी कथालेखन केले, तरी त्यांनी ते निनावी केल्यामुळे प्रसिद्ध कादंबऱ्यांचे लेखक कोण याबद्दल अजूनही वाद आहेत. कथा छचोर मानल्या गेल्या, तरी त्यांचा वाचकवर्ग खूप मोठा होता. फक्त त्यांचे वाचन उघडउघड होत नसे.

सध्या उपलब्ध असलेल्या जुन्या चिनी कादंबऱ्यांमध्ये सर्वांत प्रसिद्ध कादंबऱ्या सान् ग्वो जृ (तीन राज्यांची बखर), हूंग लौ मंग (लाल इमारतीचे स्वप्न), जिन पींग मे (सुवर्ण कमल), श्वय् हू ज्वान (दलदलीच्या प्रदेशाची कथा), रू लिन वाय षृ (पांढरपेशा वर्गाचा खाजगी इतिहास) इ. होत.

नाटक : चिनी नाटकांचा वाङ्‌मय या सदरात उल्लेख थोडा जबरदस्तीनेच करावा लागेल, कारण कथानक व संवाद हे नाटकात फक्त टेकू म्हणून वापरले जातात. चिनी नाटकांची खरी लज्जत ती पाहण्यात व ऐकण्यात आहे. भडक पोषाख, मुखवटे, नाच, कसरत, गाणी आणि एक विशिष्ट हेल काढून बोलायची पद्धत यांमुळे नाटक हा एक स्वतंत्र्य कलाप्रकार बनतो. चीनमध्ये नाट्यकला निदान इ.स.पू. तिसऱ्या शतकापासून चालत आलेली आहे. सुरुवातीची नाटके म्हणजे नाच, गाणी, कसरत, जादू, विदूषक, वगैरे एकत्र करून त्यांना कसेबसे गोष्टीच्या साच्यात एकत्र बसवत. हळूहळू नाटकांची कथानके सुसूत्र बनत गेली. तथापि नाटक म्हणजे करमणुकीच्या सर्व प्रकारांचे कडबोळे, हे समीकरण अजूनही कायम आहे. ह्या कल्पनेचा उदय प्रामुख्याने युआन राजवटीत (१२७६–१३६८) झाला. याच काळात नाटके लिहून ठेवण्याची प्रथाही सुरू झाली. त्यानंतर नाटकांच्या लोकप्रियतेत झपाट्याने वाढ झाली. आजही नाटक हे चिनी समाजात लोकप्रिय आहे.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून चिनी वाङ्‌मयावर पाश्चात्त्य वाङ्‌मयाचा प्रभाव पडू लागला. नवे काव्य, लघुकथा, कादंबऱ्या आणि नाटके प्रचंड प्रमाणावर लिहिली गेली. या शतकातील लू स्युन, लाव श, माव दुन, बा जिन व इतर अनेक चिनी लेखक चीनच्या बाहेरही प्रसिद्ध झालेले आहेत. तथापि या नव्या वाङ्‌मयामुळे जुन्या पारंपारिक वाङ्‌मयाच्या लोकप्रियतेत काहीच फरक पडलेला नाही. चीनमध्ये साम्यवादी राजवट आल्यानंतर तिच्या तत्त्वप्रणालीचा परिणाम साहित्यनिर्मितीत होणे अटळ होते. साम्यवादी विचारसरणीचा पुरस्कार करण्याचे कार्य चिनी साहित्यिकांवर येऊन पडले आहे. साहित्यनिर्मितीवर सरकारी नियंत्रणेही आहेत.

देशिंगकर, गि.द.