चित्रपटातील नेपथ्य : चित्रपटात विविध दृश्यांच्या हुबेहूब निर्मितीला महत्त्व असते; कारण अनेक दृश्ये कृत्रिम रीत्याच उभी करावी लागतात. नेपथ्य ही एक खास कला असून तज्ञ कलावंतानेच ते काम केले पाहिजे, याची जाणीव जर्मनीला १९१३ साली प्रथम झाली. नेपथ्याची जबाबदारी कलादिग्दर्शकावर असते. पटकथेच्या आधारे चित्रीकरणास योग्य अशा लहानमोठ्या देखाव्यांची तो एक जंत्री तयार करतो. त्या त्या देखाव्यांची विविध दृष्टिकोनांतून रेखाचित्रे तयार केली जातात. चित्रपटाचा दिग्दर्शक ती रेखाचित्रे पाहून त्यांत हवे ते फेरबदल सुचवून आपली निवड निश्चित करतो. त्या त्या देखाव्यांतील संकल्पित मांडणीची सजावटीसह कल्पना यावी, म्हणून नंतर रंगीत चित्रे तयार होतात.
देखाव्यांची रंगीत चित्रे तयार झाल्यावर त्यानुसार अनेक कारागिरांतर्फे ते ते देखावे तयार करण्यात येतात. चित्रीकरणाच्या वेळी तो तो देखावा योग्य प्रकारे लावण्याचे काम कलादिग्दर्शक करतो.
नेपथ्याची रचना करताना ती चित्रपटकथेच्या स्वरूपानुसार करावी लागते. पौराणिक, ऐतिहासिक, कल्पनारम्य, सामाजिक इ. वेगवेगळ्या स्वरूपाच्या चित्रपटांसाठी वेगवेगळ्या जातींचे देखावे उभारावे लागतात. त्याचप्रमाणे चित्रपटातील कथानकाचा नेमका काळ कोणता आहे, हेही लक्षात घ्यावे लागते. त्या त्या काळानुरूप त्या त्या घटनेसाठी योग्य असे देखावे तयार करण्यात येतात. त्यासाठी कलादिग्दर्शकाला त्या त्या कालखंडातील वास्तू, वाहने, लोकांची वेशभूषा-केशभूषा इ. अनेक गोष्टींची माहिती असणे जरूर असते. यांशिवाय त्या त्या काळातील उपलब्ध चित्रे, छायाचित्रे, पुराणवस्तुसंग्रहालयातील विविध वस्तू यांचाही बारकाईने अभ्यास करून जरूर ती माहिती मिळवावी लागते. जो देखावा उभा करायचा असेल, तशी किंवा त्यासारखी वास्तू एखाद्या ठिकाणी उभी असेल, तर त्या त्या ठिकाणांना भेटी देऊन तेथील बारीकसारीक गोष्टी पहाव्या लागतात. वास्तूंचे देखावे तयार करताना त्यांचा जुनेपणा वा नवेपणा, त्यांची रचना, रंग, दालने, त्यांतील सजावट इ. बारीकसारीक तपशिलांचा काळजीपूर्वक विचार करावा लागतो.
जिने, पूल, किल्ले इत्यादींच्या प्रतिकृती बनवून मग त्यानुरूप त्यांचे देखावे उभारतात. यांसाठी पुठ्ठे, लाकूड, प्लॅस्टर, प्लॅस्टिक इत्यादींचा वापर करतात. नक्षीकामासाठी चिकणमाती वा तिचे साचे तयार करून वापरतात. एखाद्या जुनाट वास्तूचा अडगळीचा भाग अगर तळघर दाखवायचे असेल, तर ती जागा खरोखरच तशी आहे हे दाखविण्यासाठी कोळीष्टके दाखवावी लागतात. तीदेखील बनावटच असतात. यासाठी विशिष्ट रासायनिक द्रव्यांचा आणि खास उपकरणाचा उपयोग करतात. विशिष्ट रसायन वापरून धुक्याचाही आभास निर्माण करता येतो. रंगविलेल्या पडद्यांचा वापर तर पार्श्वभूमीच्या देखाव्यांसाठी फार मोठ्या प्रमाणावर केला जातो.
त्याचप्रमाणे एखादा देखावा उभा करताना वापरलेल्या वस्तू पोकळ वा हलक्या वापरतात. त्यामुळे खर्चाची बचत तर होतेच, शिवाय त्या कुठेही, केव्हाही व कशाही हलविता येतात. एखादा मोठा खडक दाखवावयाचा असेल, तर त्याला कागदी पोकळ उचाटा (मोल्ड) काढतात व त्याला खडकाचा रंग देतात. त्यामुळे तो खडकच वाटतो. वीर हनुमान झाड उपटून राक्षसांवर फेकतो, असे दृश्य घेताना हनुमानाचे काम करणाऱ्या नटाला उचलेल व पेलेल असेच झाड तयार करावे लागते. ते खऱ्या झाडासारखे दिसले, तरी आतून पोकळ असते. भिंतीसाठी तर कापडच वापरले जाते. देखावा बाहेर मांडताना ते कापड वाऱ्याने हलणार नाही, अशी दक्षता घ्यावी लागते. अशा वेळी प्लायवूड लाकडांचाही भिंतीसाठी वापर केला जातो. या भिंती सहजपणे हलविता येणे शक्य असल्याने चित्रीकरणाच्या वेळी ते फार सोयीस्कर होते.
काही काही देखावे कल्पकता वापरून, तर काही खास युक्तीने दाखवावे लागतात. त्यासाठी कलादिग्दर्शक देखाव्यांची लघुरूपे (मिनिएचर्स) तयार करतो व छायाचित्रकार त्यांचा उपयोग करून भव्य देखावे मांडल्याचा आभास निर्माण करतो. मोठमोठ्या इमारती कोसळणे, आग लागणे, पूल कोसळणे, आगगाडीला अपघात होणे, आगगाड्यांची टक्कर होणे इ. दृश्ये वरील लघुरूपांच्या साहाय्याने व छायाचित्रणाच्या किमयेने अगदी हुबेहूब दाखवता येतात. प्रत्यक्ष खऱ्या समीप दृश्यांची आणि कृत्रिम नमुन्यांच्या दृश्यांची चातुर्याने सरमिसळ केली, की त्या त्या दृश्यांची भयाणता व चित्तथरारकता निर्माण करता येते.
कधी कधी चित्रपटनिर्मितिगृहात एखाद्या वास्तूच्या दोन किंवा तीन दालनांचे देखावे एकाच वेळी मांडतात व वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून त्यांचे चित्रीकरण करतात.
काळ्यापांढऱ्या चित्रपटांमध्ये जेथे पांढरा रंग दिसावा म्हणून रंगकाम करावयाचे असते, तेथे प्रत्यक्ष देखाव्यात मात्र पांढरा रंग वापरत नाहीत. कारण या पांढऱ्या रंगाने चित्रपटांतील दृश्ये एकदम भगभगीत दिसतात आणि प्रेक्षकांच्या डोळ्यांना त्रास होतो. म्हणून पांढऱ्या रंगाऐवजी फिक्का करडा, पिवळा, गुलाबी, फिक्का निळा किंवा हिरवा यांपैकी एखादा रंग वापरतात. प्रत्यक्ष पडद्यावर हे रंग पांढरेच दिसतात. रंगीत चित्रपटासाठी देखाव्यातील रंग वापरताना मात्र फार दक्षता घ्यावी लागते. एकापाठोपाठ दिसणाऱ्या देखाव्यांच्या रंगांत सुसंगती आणि सातत्य राखावे लागते. लाल, पिवळा आणि निळा हे प्राथमिक मूळ रंग फार भडक आणि एकदम उठून दिसतात. त्यांच्या समोर इतर रंगच्छटा फिक्क्या वाटतात. म्हणून कलादिग्दर्शकाला सबंध चित्रपटातील रंगसंगती साधताना बारकाईने लक्ष द्यावे लागते.
नेपथ्य कोणत्याही प्रकारचे असो, त्याचे छायाचित्रण कोणत्या प्रकारे होणार आहे, याची कलादिग्दर्शकाला यथार्थ कल्पना असावी लागते. चित्रीकरण करताना मांडलेल्या देखाव्यात कॅमेऱ्याचे कोन अनेकदा बदलावे लागतात किंवा कॅमेरा ढकलगाडी (ट्रॉली) वर ठेवून तो हवा तसा फिरवीत, वळवीत चित्रीकरण करावे लागते. अर्थात ही हालचाल सुकर व्हावी, म्हणून नेपथ्यरचना करतानाच जरूर ती खबरदारी घेण्यात येते.
देखावा मांडल्यानंतर त्याची जरूर ती साजसजावट करतात. चित्रीकरणाच्या वेळी एखादा दिवाणखाना असेल, तर त्यातील दारे खिडक्यांना पडदे लावणे. भिंतीवर तसबिरी लटकविणे, गालिचा पसरणे, साधे अगर भारी किंमतीचे फर्निचर मांडणे, त्यातील शिल्पे वा फुलदाण्या सजविणे इ. गोष्टी नंतर करतात.
चित्रपटासाठी तयार करावयाचा देखावा हा बहुतेक त्रिमितीय असतो. त्यातही त्या बाजू हलविणे किंवा सरकविणे अवघड नसते. भव्य देखावा मांडला असेल, तर मात्र ते अवघड असते. पण चित्रीकरणाला जागाही मुबलक असते. म्हणून देखाव्याची एखादी बाजू सरकविण्याचा प्रश्न येत नाही. तथापि जरूर पडली, तर चौथी बाजू मात्र उभी करता येतेच. एखाद्या देखाव्यात कोणकोणत्या वस्तूंची जरूरी आहे, त्याची यादी दिग्दर्शक कलादिग्दर्शकाला देतो, त्याप्रमाणे त्या वस्तू आणल्या किंवा तयार केल्या जातात. साधारणतः कल्पक कलादिग्दर्शक काही मुद्दे आपल्या डोळ्यासमोर रहावेत, म्हणून एक तक्ताच तयार करून ठेवतो. त्या तक्त्यात पुढील मुद्दे समाविष्ट केलेले असतात : (१) वास्तूच्या भिंतीची बाहेरची बाजू, (२) भिंतींची आतील बाजू, (३) छत, (४) फरशी, (५) भिंतींचा रंग, (६) दारेखिडक्या, (७) तावदाने इत्यादी.
पुष्कळदा मोठमोठ्या खोडाची झाडे, खडक वगैरे कृत्रिम रीत्या तयार करूनही वापरावे लागतात. त्या वेळी झाड अगर खडक कोणत्या प्रकाराचा–गुळगुळीत की खडबडीत, लहान किंवा मोठा हे लक्षात घेऊन त्या त्या प्रकारची रेखाचित्रे तयार करतात आणि आराखड्याप्रमाणे मोठ्या प्रमाणाच्या व मापाच्या लाकडी पट्ट्या, दोऱ्या, जाडबारीक तारा, सळया इ. साधनांचा उपयोग करून सांगाडा बनवितात. मग त्यावर जाड कागदाचे अगर कापड-किनतानाचे वेष्टन चढवितात. त्यावर बारीक दगडमिश्रित माती-सिमेंटच्या लिबलिबीत मिश्रणाचा लेप देतात. फार मोठ्या झाडांच्या खोडाची साल फार खडबडीत व चिराभेगा गेलेली असते, म्हणून कृत्रिम झाडाची साल तशीच दिसावी यासाठी कित्येकदा हव्या असलेल्या खऱ्या झाडाच्या खोडावर प्लॅस्टर थापून त्याचा साचा तयार करतात आणि त्या साच्याच्या साहाय्याने कृत्रिम साल तयार करून ती संकल्पित कृत्रिम झाडाच्या खोडावर बसवितात. योग्य तो रंग दिला की, ते झाड खऱ्या झाडासारखेच दिसू लागते. त्या झाडावर जरूर तेथे खऱ्या अगर कृत्रिम पानाफुलांनी भरलेल्या छोट्यामोठ्या फांद्या व वेलीही लावतात. तळघर, मजल्यावरील देखावे, वाळवंट, समुद्रकिनारा, घनदाट जंगल, नदी, तलाव, हौद, विहीर, कारंजे यांचे देखावे चित्रीकरणाच्या सुकरतेसाठी चित्रपटनिर्मितिगृहात अगर मोकळ्या जागी तयार करतात. जो देखावा मांडायचा असतो, त्यात जास्तीत जास्त वास्तवता आणणे यातच कलादिग्दर्शकाचे खरे कौशल्य असते. अर्थात कॅमेऱ्याच्या कुशल उपयोगाने कृत्रिम नेपथ्याला अस्सलपणाची कळा आणणे शक्य असते.
देखाव्याच्या प्रतिकृती तयार करण्याची पद्धत प्रभात फिल्म कंपनीने प्रथम १९३८ मध्ये सुरू केली. प्रभातचा साचेकाम (मोल्डिंग) विभाग स्वतंत्र होता. या विभागात निष्णात मूर्तिकार व शिल्पकारही होते. प्रभात फिल्म कंपनीने आपल्या आवारात वने, उपवने, तळी, विहिरी, नद्यांचे घाट, पोहण्याचे तलाव, बागबगीचा यांची अतिशय योजकतेने सोय करून ठेवली होती. या कंपनीच्या चंद्रसेना या बोलपटातील नेपथ्याबद्दल त्या काळी भारतभर वाहवा झाली होती. त्यातील अविस्मरणीय वैशिष्ट्य म्हणजे भव्य व कलाकुसरीची दृश्ये, हे होते. अहिमहिरावणाच्या पाताळनगरीच्या उभारणीत शंख, शिंपले, मासे, सुसरी यांचा कलापूर्ण, खुबीदार व कल्पक वापर केला होता. तसेच पाताळवासीयांचे अलंकार हे सर्व मोठे वैशिष्ट्यपूर्ण होते. सागरी वातावरणाचा यासारखा कलापूर्ण प्रत्यय अपूर्व होता. असा प्रकारे वातावरणनिर्मितीसाठी नेपथ्याचा फार मोठा उपयोग होतो. बाबूराव पेंटर, एस्. फत्तेलाल या कल्पक कलादिग्दर्शकांची कामगिरी अजोड आहे. त्याचप्रमाणे एम्. आर. आचरेकर, बाळ गजबर, राम येडकर, कनु देसाई, जाधवराव, सुधेन्दु रॉय हे काही उल्लेखनीय कलादिग्दर्शक आहेत.
शिंदे, मा. कृ.