चित्रपटगृह : चित्रपट प्रदर्शित करण्याचे स्थान. १८८९ मध्ये एडिसनच्या कायनेटोस्कोपमुळे पीप शो पद्धतीने चित्रपट पाहता येऊ लागला. या यंत्राच्या छिद्रातून एकावेळी एकाच व्यक्तीला चित्रपट पाहता येणे शक्य होते परंतु एडिसनच्या या नव्या व्हिटॉस्कोपमुळे अनेक प्रेक्षकांना एकत्र चित्रपट पाहणे शक्य झाले. न्यूयॉर्कच्या कोस्टर अँड बेट्स हॉलमध्ये २३ एप्रिल १८९६ रोजी अशा प्रकारचा पहिला प्रयोग झाला, परंतु त्याअगोदर चारच महिने २५ डिसेंबर १८९५ रोजी फोटोग्राफीच्या साहित्याचे एक विक्रेते ल्यूम्येअर बंधू अशा प्रयोगात यशस्वी झाले होते. पॅरिसमधील ‘ग्रँड कॅफे’ मध्ये चलच्चित्रपटाचा पहिला प्रयोग त्यांनी केला. ल्यूम्येअर बंधूंच्या या प्रयोगाला सिनेमॅटोग्राफ अशी संज्ञा देण्यात आली होती.
चित्रपटप्रदर्शनाचा व्यवसाय आर्थिक दृष्ट्या फायदेशीर होण्याची शक्यता निर्माण झाल्याने टॉमस एल्. टॅली याने चित्रपटप्रदर्शनासाठी स्वतंत्र चित्रपटगृह असावे, अशी कल्पना काढली व १६ एप्रिल १९०२ रोजी ‘द लॉस एंजल्स टाइम्स’मध्ये इलेक्ट्रिक थिएटर अशी जाहिरात देऊन स्त्रिया व मुले यांना चित्रपट पाहण्यासाठी आवाहन केले. हे चित्रपटगृह म्हणजे पत्र्याची शेडवजा कोंदट पण मोठी खोली होती. यापूर्वी एखाद्या दुकानातच कायनेटोस्कोप बसवून त्यात पीप शो पद्धतीने लोक चित्रपट पाहत असत. दुकानाला ड्रग स्टोअर म्हणत आणि या चित्रपटप्रदर्शन पद्धतीला ‘निकेल ओडिअन’, ‘स्टोअर शो’ किंवा ‘शॉप शो’ असे संबोधीत.
चित्रपट पाहण्यासाठी होणारी वाढती गर्दी पाहून १९०३ मध्ये बूट, सोडावॉटर व सायकल विक्रीचे दुकानदार वॉर्नर बंधू यांना कायम स्वरूपाच्या चित्रपटगृहाची कल्पना सुचली. या वॉर्नर बंधूंपैकी थोडीशी तांत्रिक माहिती असलेला सॅम्युअल हा फिल्म ऑपरेटर बनला, तर हॅरी, जॅक आणि आल्बर्ट हे बंधू अन्य कामे सांभाळू लागले. त्यांच्या चित्रपटगृहामध्ये ९९ खुर्च्यांची सोय होती आणि या खुर्च्या दिवसावर भाड्याने आणल्या जात असत.
एडवर्ड जी. पोर्टर यांचा द ग्रेट ट्रेन रॉबरी हा सु. २२६ मीटरचा पहिला मूकपट १९०४ साली प्रसिद्ध झाला. यापुढे चित्रपटप्रदर्शनाची नित्याची व स्वतंत्र सोय होणे अपरिहार्य होते. १९०५ च्या नोव्हेंबरमध्ये पिट्सबर्गच्या हॅरी डेव्हिस आणि जॉन हॅरिस यांनी २०० आसनांचे एक बऱ्यापैकी चित्रपटगृह उभारले. त्यांचे व्यावसायिक यश पाहून चित्रपटगृहांची संख्या उत्तरोत्तर वाढू लागली. २५ डिसेंबर १८९५ रोजी ल्यूम्येअर बंधूंनी चित्रपटप्रदर्शनाचा यशस्वी प्रयोग केल्यावर थोड्याच दिवसांत ल्यूम्येअर ब्रदर्स या संस्थेच्या एका फिरत्या प्रतिनिधीने ७ जुलै १८९६ रोजी मुंबईतील वॅटसन हॉटेलमध्ये (सध्याचे म्यूझीअमजवळचे एक्स्प्लनेड मॅन्शन) काही छोटेछोटे चलच्चित्रपट दाखविले. हाच भारतातील चलच्चित्रपट-प्रदर्शनाचा पहिला दिवस. ‘जगातील मोठे आश्चर्य’, ‘चालू शतकातील चमत्कार’, ‘पूर्णाकृती अशा जिवंत चित्रांची सलग दृश्ये पाहा’, अशी जाहिरात या चित्रपटाच्या वेळी करण्यात आली होती. तसेच कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी या नवीन शास्त्रीय शोधाची माहितीही देण्यात आली होती. एका तासाहून कमी अवधीच्या या कार्यक्रमात अरायव्हल ऑफ द ट्रेन, द सी बाथ, डिमॉलिशन, वर्कर्स लीव्हिंग द फॅक्टरी, लेडीज अँड सोल्जर्स ऑन व्हील हे लघुपट दाखविण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रवेश मूल्य एक रुपया व प्रेक्षक दोनशे होते. ल्युम्येअर ब्रदर्सचा हा कार्यक्रम वॅटसन हॉटेलमध्ये एका आठवड्यापुरता आयोजित करण्यात आला होता.
यानंतर एका आठवड्याने म्हणजे १४ जुलै १८९६ रोजी मुंबईच्या त्यावेळच्या नॉव्हेल्टी (आताचे एक्सेलशिअर) या शेडवजा चित्रपटगृहात २ आणे ते २ रुपये तिकिटांचे दर ठेवून चलच्चित्रपटांचे खेळ करण्यात आले. १४ जुलै ते १५ ऑगस्ट असा महिनाभर हा कार्यक्रम मुसळधार पावसातही चालला होता. दररोज दोन खेळ असत. या कार्यक्रमात १२ लघुपट दाखविले जात. तिकिटांचे दर मात्र पूर्वीच्या मानाने फारच महाग होते पण चलच्चित्रपटाचा चमत्कार पाहून प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन जात. बेबीज डिनर, रिजॉयझिंग इन ए मार्केट, द स्ट्रीट डान्सेस ऑफ लंडन, मॅच ॲट कार्ड्स अशा तऱ्हेचे काही लघुपट म्हणजे चित्रपटकार्यक्रम समजत. चलच्चित्रपटाबरोबर बाह्यसंगीत देण्याचा प्रयत्न याच काळात सुरू झाला.
हळूहळू कलकत्ता, मुंबई यांसारख्या मोठ्या शहरांत तंबूची चित्रपटगृहे निर्माण होऊ लागली. अशा प्रकारची चित्रपटगृहे जवळजवळ एक दशक चालू होती. या सर्वांत कलकत्त्यातील जमशेटजी फ्रामजी मादन यांनी चित्रपटव्यवसाय वृद्धिंगत होणार, हे लक्षात घेऊन १९०७ साली कलकत्त्याला एल्फिन्स्टन थिएटर सुरू केले. हेच भारतातील कायम स्वरूपाचे पहिले चित्रपटगृह होय.
त्या काळी परदेशांत प्रेक्षकांसाठी खास सूचना दिलेल्या असत. त्या आता गमतीदार वाटत असल्या, तरी त्यांतून त्या काळाची कल्पना येऊ शकते. त्या सूचना अशा :
(१) उशिरा येणाऱ्या प्रेक्षकांना दुसऱ्या खेळाचा लाभ होईल.
(२) गाण्याचा बदल उद्या ऐका.
(३) आमचे आश्रयदाते हेच आमचे मित्र.
(४) आमच्या पुढील सनसनाटीकडे लक्ष ठेवा.
(५) बायांनो, कृपया आपली हॅट जरा काढून ठेवा.
(६) फक्त एकच क्षण प्रक्षेपणतंत्रज्ञ दुसरी रीळ बदलेपर्यंत धीर धरा.
(७) कृपया धूम्रपान टाळा, ते स्त्रियांना क्रुद्ध करते.
(८) श्रेयनामावली तुम्ही स्वतःच वाचा. मोठ्याने केलेले वाचन तुमच्या शेजाऱ्याला कष्टविते.
(९) गाणे सुरू असताना शिटी वाजवू नका.
(१०) तुम्ही प्यालेले असाल, तर आपल्या आश्रयदात्याला ते खपणार नाही.
फ्रान्सच्या पाथे आणि कंपनीचे मुंबई व कलकत्ता येथे ‘पाथे इंडिया’ हे कार्यालय १९०७ सालीच सुरू झाले. यांत्रिक सामग्री आणि चित्रपटांचा पुरवठा या कार्यालयामार्फत होत असे. तसेच १९०८ साली मुंबई येथे गिरगावमध्ये अमेरिका इंडिया थिएटर सुरू झाले. ते बरेच वर्षे लोकप्रिय होते. येथे त्यावेळी परदेशी अनुबोधपट दाखविले जात. ते अनुबोधपट भाड्याने मिळत नसत, तर ते विकत घ्यावे लागत. त्याचा दर फुटाला ६ पेन्स होता. असे ४०-५० अनुबोधपट संग्रही असावे लागत. प्रत्येकाची लांबी सु. ३१ ते ६१ मी. असे. १९१० नंतर चित्रपटगृहे हळूहळू वाढू लागली. पी. बी. मेहता यांचे अमेरिका इंडिया सिनेमा, एन्. जी. चित्रे यांचे कारोनेशन थिएटर ही चित्रपटगृहे मुंबईत सुरू झाली. अब्दुलअल्ली युसूफ अल्ली हे जावा, सुमात्रा, श्रीलंका, ब्रह्मदेश या देशांत १९०१ पासून फिरता सिनेमा घेऊन हिंडत होते. त्यांनीच १९०८ साली मुंबईमध्ये तंबूत चित्रपटप्रदर्शन सुरू केले होते. त्यांनी १९१४ साली अर्देशिर इराणी यांच्या भागीदारीत मुंबईत लोहारचाळ येथे अलेक्झांड्रा आणि १९१८ साली मॅजेस्टिक ही चित्रपटगृहे चालू केली.
अर्थात पूर्वीच्या काळी चित्रपटप्रदर्शन हा व्यवसाय आतासारखा किफायतशीर नव्हता. पुष्कळशी चित्रपटगृहे तोट्यातच चालत. दिल्लीच्या एका प्रमुख चित्रपटप्रदर्शकाने म्हटले आहे की, रोजचे उत्पन्न बहुधा ५-६ रुपये व्हायचे. चित्रपटाचा बदल आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा असे. एखादा चित्रपट बरा गेला, तर आठवडाभर ठेवत. बदल शनिवारी करण्यात येई.
त्या काळी नाटके, तमाशे, जत्रा यांच्याशी स्पर्धा करावी लागे. प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी बक्षिसांची अमिषे दाखवित. त्यांत साड्या, घड्याळे, सायकली अशा स्वरूपाची बक्षिसे असत. सुगंधी रूमाल भेट देत. लकी नंबर्स जाहीर करीत. मोठ्या शहरात चित्रपटगृहाच्या दराबाबत चढाओढ होती. दर दोन किंवा तीन पैसे असत. त्याकाळी तिकिटांना मोठी रांग, तिकिटांचा काळाबाजार हे प्रकार अस्तित्वात नव्हते. चित्रपटाची पत्रके वाजतगाजत गावभर वाटत. चित्रपटगृहाच्या आवारात बँड वाजविला जाई. लहानसहान गावांतून हा प्रकार अद्याप चालू आहे. प्रेक्षक जमावेत, हाच त्यामागचा हेतू असे.
मुंबईच्या रॉयल ऑपेरा हाउसमध्ये १९२७ च्या जून महिन्यात आवाजाचा मेळ घातलेली फोनोफिल्म दाखविली गेली परंतु हे ध्वनिमुद्रण ग्रामोफोनवर होते, फिल्मवर नव्हते. जाझ सिंगर या वॉर्नर ब्रदर्सच्या बोलपटाने १९२७ मध्येच बोलपटाचा जमाना सुरू केला. मात्र मेलडी ऑफ लव्ह हा युनिव्हर्सलचा बोलपट १९२८ साली कलकत्त्याच्या एल्फिन्स्टन पिक्चर पॅलेसमध्ये सर्व प्रथम प्रदर्शित झाला. हे भारतातील पहिले बोलपटगृह होय.
मुंबईच्या मॅजेस्टिक सिनेमात अर्देशिर इराणी यांनी ४ मार्च १९३१ रोजी इंपीरिअल कंपनीसाठी तयार केलेला आलमआरा हा पहिला भारतीय बोलपट प्रदर्शित झाला, तर ७ एप्रिल १९३२ रोजी मुंबईच्या कृष्ण सिनेमात प्रदर्शित झालेला प्रभात फिल्म कंपनीचा अयोध्येचा राजा हा पहिला मराठी बोलपट होय. त्या काळी चित्रपटगृहे ध्वनिरोधक नव्हती. अंधार पडल्यावर चित्रपटगृहाची दारे-खिडक्या उघड्या टाकीत. दारे-खिडक्या उघडल्यावर चित्रपटगृहातून आवाज स्पष्टपणे बाहेर जाई. बाहेरचे आवाज आत येत पण ते प्रेक्षकांच्या सवयीचे झाले होते. ⇨कुंदनलाल सैगल, काननबाला यांची गाणी ऐकण्यासाठी कितीतरी लोक जेवणे वगैरे उरकून चित्रपटगृहाबाहेर येऊन बसत. त्या काळात पडद्यावरून पाली हिंडत, चित्रपटगृहावर मांजरे आवाज करीत वावरत व चित्रपटगृहे धूम्रपानाच्या धुराने भरलेली असत.
पुढे चित्रपटगृहातही हळूहळू फरक होत गेले. ते अंतर्बाह्य सुशोभित करण्यासाठी चित्रपटगृहाच्या चालकांचे प्रयत्न सुरू झाले. इतरही सुखसोयी उपलब्ध होऊ लागल्या. आसने आरामदायी होऊ लागली. पहिले वातानुकूलित चित्रपटगृह म्हणून मुंबईच्या रीगल सिनेमाने मान मिळविला (१९३३) तर दिल्लीच्या रीगल सिनेमाचा सिनेमास्कोपची सोय करण्यात पहिला क्रमांक लागला (१९५२).
मूकपटाच्या जमान्यात एका प्रकाशप्रक्षेपकावर चित्रपट दाखविला जाई. बोलपटांचा जमाना सुरू झाल्यावर दोन प्रकाशप्रक्षेपकांचा वापर शहरात सुरू झाला, नाही तर एक रीळ झाल्यावर थांबावे लागे. बॉवर कंपनीने नंतर ६ रिळे राहतील एवढी मोठी स्पूल तयार केली. ती प्रकाशप्रक्षेपकामध्ये मावण्याची सोय झाल्यावर लहानसहान गावी किंवा फिरत्या चित्रपटगृहामध्ये चित्रपट प्रदर्शित होऊ लागले.
मूकपटाच्या काळी प्रकाशप्रक्षेपक हाताने चालवावा लागे. हे काम मेहनतीचे व जिकिरीचे तर होतेच, परंतु त्यामुळे चित्रपटाची गतीही कमीअधिक होत असे तथापि चित्रपट बोलू लागण्यापूर्वी थोडे दिवस अगोदर म्हणजे १९२९ मध्ये विजेवर चालणारे प्रकाशप्रक्षेपक तयार झाले होते.
चित्रपट दाखविण्याच्या सामग्रीला बोलपटाच्या जमान्यात सु. सात हजारापर्यंत खर्च येई, तोही चित्रपटगृहांना फार वाटे. म्हणून चित्रपटवितरक किंवा चित्रपटनिर्माते ही सामग्रीही पुरवीत कारण यंत्रसामग्रीवर केलेला खर्च बोलपट दाखवून वसूल होईल की नाही, याची प्रदर्शकांना खात्री नसे. तरीपण चित्रपटगृहांना पुरवठा होईल इतके चित्रपट आपल्याकडे तयार होत नव्हते. प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांपैकी ८३% चित्रपट परदेशी असत. १९३१ सालापासून मात्र हे प्रमाण बदलले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ९०% चित्रपट भारतीयच होते.
बोलपटाच्या जमान्यापूर्वीच फिरत्या चित्रपटगृहांचा जन्म झाला होत. आजही खेडोपाडी चित्रपटप्रदर्शनाचे काम फिरती चित्रपटगृहे करीत आहेत. हे फिरते चित्रपटगृह एखाद्या खेडेगावी गेल्यावर तो चित्रपट पाहून तेथील गावकऱ्यांना चित्रपटाची आवड निर्माण होई. ही आवड वाढीस लागून उत्पन्न वाढू लागले, की तेथे चित्रपटगृह उभे राही. म्हणजे खेडोपाडी चित्रपटाची गोडी निर्माण करण्याची कामगिरी या फिरत्या चित्रपटगृहांची संख्या आजही एकूण चित्रपटगृहांच्या ३०% आहे.
पूर्वीच्या काळी एखाद्या चित्रपटाला मिळणाऱ्या उत्पन्नापैकी ५५, ५०, ४५, ४० अशा टक्केवारीने चित्रपटगृह-चालकाला उत्पन्न मिळत असे. चित्रपट नवीन असेल, तर अधिक हिस्सा वितरकाचा परंतु चित्रपट जितका जुना त्या प्रमाणात अधिक हिस्सा चित्रपटगृहाचा, असे प्रमाण असे. लहान गावातून किंवा बहुतेक फिरत्या चित्रपटगृहाकडे दिवसावर भाडे ठरवून चित्रपट पाठवून देत. ती पद्धत अद्याप पुष्कळ ठिकाणी चालू आहे.
पुढे कमीतकमी निश्चिती (मिनिमम गॅरंटी) पद्धत अमलात आली. चित्रपटनिर्मितीचा खर्च वाढू लागला. कलावंतांचे मोबदलेही वाढू लागले. म्हणून वितरक आपल्या पैशाची सुरक्षितता पाहू लागले. त्यामुळे चित्रपटगृह-चालकांना ठराविक रकमेची जोखीम पत्करावी लागे. त्यापेक्षा अधिक फायदा झाला, तर त्यात वितरकाचा हिस्सा असेच.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात चित्रपटनिर्मिती बरीच वाढली. चित्रपटगृहांना भरपूर चित्रपट उपलब्ध होऊ लागले, त्यामुळे त्यांना वितरकाकडे जाण्याची गरज उरली नाही. वितरकाला चित्रपटगृह मिळविणे अवघड होऊ लागले. कित्येक दिवस थांबावे लागू लागले. कलकत्ता, मद्रास, मुंबई, दिल्ली इ. मोठ्या शहरांतून वितरकाने आठवड्याचे भाडे ठरवून चित्रपटगृह भाड्याने घेण्याची प्रथा सुरू झाली. चित्रपट चालो वा न चालो, चित्रपट-चालकाचा आठवड्याच्या भाड्याचा पैसा नक्की झाला. पूर्वीच्या काळी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाची प्रसिद्धी चित्रपटगृह-चालकालाच करावी लागे परंतु आता ती वितरकाला करावी लागते.
चित्रपटावर १९२२ पासून करमणूक कर सुरू झाला. अलीकडे तर चित्रपटगृहाच्या करात बरीच वाढ झाली आहे. चित्रपटगृहाला मिळणाऱ्या उत्पन्नापैकी ५५% उत्पन्न राज्य सरकार कररूपाने घेते. शिवाय ४ टक्के स्थानिक कर व १ टक्का मध्यवर्ती सरकारला त्यांचे लघुपट दाखविण्याबद्दल द्यावे लागतात. म्हणजे रुपयातले ६० पैसै करातच जातात. वितरक व प्रदर्शक यांचा हिस्सा देऊन शेवटी निर्मात्याच्या वाट्याला रुपयातले फक्त १० ते १२ पैसे उरतात. याचा सरळ अर्थ निर्मात्याचा झालेला खर्च भरून निघण्यासाठी दसपट तरी उत्पन्न झाले पाहिजे.
सर्व भारतीय भाषा मिळून १९७५ मध्ये ४७० बोलपट प्रदर्शित झाले व सर्व चित्रपटगृहांचा मिळून २०० कोटींची गल्ला जमा झाला. त्यांतील १४० कोट रुपये सरकारला कराच्या रूपाने मिळाले.
चित्रपटगृहाच्या व्यवसायावर जगात आज सु. ५० लाख लोक उदरनिर्वाह करीत आहेत. एकट्या भारतात दीड लाख लोक या व्यवसायावर जगत आहेत आणि सु. ९० लाख लोक रोज चित्रपट पाहत असतात.
भारतात १९२१ साली ११७ चित्रपटगृहे होती. ३१ मार्च १९७५ अखेर चित्रपटगृहांचे जे आकडे हाती आले आहेत, त्यावरून चित्रपटगृहांच्या संख्येत वाढ झाली, हे स्पष्ट होते. या दिवसापर्यंत कायम, फिरत्या व सैनिकी चित्रपटगृहांची संख्या ८,७३४ झाली. कायम स्वरूपाची चित्रपटगृहे सर्वांत अधिक (८४३) आंध्र प्रदेशात असून त्या खालोखाल (७४३) तमिळनाडूत आहेत. मात्र तिन्ही प्रकारची चित्रपटगृहे धरून तमिळनाडूतील चित्रपटगृहे सर्वाधिक म्हणजे १,४२५ असून त्या खालोखाल (१,४०९) आंध्र प्रदेशात आहेत. तिसरा क्रमांक महाराष्ट्राचा असून त्यात कायमची ६३६, फिरती २७० व सैनिकी १५ अशी सर्व मिळून ९२१ चित्रपटगृहे आहेत.
भारतात १९४८ च्या ऑगस्टमध्ये सरकारी आदेशानुसार नव्या चित्रपटगृहांचे बांधकाम जवळजवळ थांबलेच होते, हा नियम १९६२ मध्ये सैल करण्यात आला व पुन्हा नवी चित्रपटगृहे उभी राहू लागली, तरी आंतरराष्ट्रीय तज्ञांच्या मते भारतात सध्या आहे त्यापेक्षा साडेतीनपट म्हणजे जवळजवळ २६,००० चित्रपटगृहांची अजूनही गरज आहे. तसे झाल्यास सध्या आहेत त्यापेक्षा साडेतीनपट कामगार या चित्रपटगृहाच्या व्यवसायावर जीवन जगू शकतील.
चित्रपटगृहाचे स्थान, रचना व त्यातील सुखसोयी यांसंबंधी अलीकडे काही शासकीय नियम करण्यात आले आहेत. शहरातील एकूण लोकसंख्येच्या दृष्टीने किती चित्रपटगृहे आवश्यक आहेत, चित्रपटगृह कोठे असावे, त्याची रचना कशी असावी इत्यादींसंबंधी काही शासकीय नियम केलेले आहेत. भारतातील प्रत्येक राज्यात या प्रकारचे नियम थोड्याफार फरकांनी लागू करण्यात आले आहेत. चित्रपटगृहातील आसने केवढी असावी, प्रेक्षकांच्या येण्याजाण्याची व्यवस्था कशी असावी, प्रसाधनकक्ष किती आणि कसे असावे इ. गोष्टीसंबंधी नियम असतात. सु. ९·२९ चौ. मीटरमध्ये १० आसने असावी असा नियम आहे. मात्र चित्रपटगृह किती प्रशस्त असावे, याला नियम नाही. तसेच तिकिटांचे दर चित्रपटगृहाचे चालकच ठरवीत असले, तरी शासनाला त्याची कल्पना द्यावी लागते. दरात बदल करावयाचा असेल, तर तोही शासनाला अगोदर कळवून व त्याची मान्यता घेऊनच करावा लागतो.
अधिकृत तंत्रज्ञाकडून चित्रपटगृहाची तपासणी वर्षातून एकदा तरी करून सर्व विद्युत उपकरणे, यंत्रे वा इतर साधने सुस्थितीत असल्याचे लेखी प्रमाणपत्र चित्रपटगृह-चालकाला घ्यावे लागते. चित्रपटगृहात अग्निशामकाची व्यवस्थाही ठेवावी लागते. चित्रपटगृहाच्या आवारातून पायवाट असता कामा नये, असाही नियम आहे. त्याचप्रमाणे पूर्वपरवानगीशिवाय कुठल्याही मोकळ्या किंवा बंदिस्त जागेचा चित्रपटगृह म्हणून उपयोग करता येत नाही. चित्रपटगृहाचे स्थान निश्चित करण्यापूर्वी चित्रपटगृहापासून शाळा, रुग्णालये, धार्मिक वास्तू इ. किती अंतरावर आहेत, याचाही कटाक्षपूर्वक विचार केला जातो.
मुख्यतः प्रेक्षकांच्या आणि नागरी जीवनाच्या सर्व प्रकारच्या सोयी-गैरसोयी विचारात घेऊन, असे नियम केलेले असतात.
वाटवे, बापू
“