चित्रकूट : उत्तर प्रदेश राज्याच्या बांदा जिल्ह्यातील पुराणप्रसिद्ध यात्रास्थान व पर्वत. तो मध्य रेल्वेच्या झांशी-माणिकपूर फाट्यावरील चित्रकूट स्थानकापासून सु. ६ किमी. व करवी स्थानकापासून सु. ८ किमी. आहे. करवीहून वाहने मिळतात. पर्वताच्या पायथ्याशी मंदाकिनी (पयस्विनी) नदी आहे. अत्री ऋषींचा आणि वाल्मीकींचाही आश्रम येथेच होता आणि विष्णू, चंद्र, दत्तात्रेय इत्यादींच्या निवासामुळे तसेच दुर्वास, नलराजा, धर्मराजा इत्यादींच्या तपाचरणामुळे येथील परिसर अधिकच पवित्र मानला जाई. तथापि चित्रकूटाचे विशेष महत्त्व म्हणजे श्रीरामाने वनवासकाळात तेथे केलेले वास्तव्य, हे होय. मंदाकिनीवरील चोवीस घाटांच्या मालिकेपैकी रामघाटाजवळ श्रीरामाची पर्णकुटी होती, असे मानतात. येथील कामनानाथ (कामदगिरी), सीतारसोई, प्रमोदवन, स्फटिकशिला, गुप्त गोदावरी, जानकीकुंड, भरतकूप, हनुमानधारा, रामशय्या, लक्ष्मणमंदिर इ. स्थाने पवित्र मानली जातात. अनेक ठिकाणी उमटलेले पावलांचे ठसे म्हणजे श्रीरामाची पदचिन्हे होत, अशी भाविकांची श्रद्धा आहे. रामनवमीला, दिवाळीत व कार्तिकी अमावास्येला येथे मोठी यात्रा भरते. १७२५ च्या सुमारास छत्रसालाच्या राणीने येथे तट बांधला आणि १८९६-९७ मध्ये त्याची दुरुस्ती करण्यात आली.

संकपाळ, ज. बा.