चित्तविकृति : (सायकॉसिस). चित्तविकृती या अतिशय गंभीर स्वरूपाच्या मानसिक विकृती होत. सर्वसामान्यतः ‘वेड’ या सदरात त्यांची गणना केली जाते तथापि चित्तविकृतींचे सर्वच प्रकार वेड या सदरात कायद्याच्या दृष्टीने समाविष्ट होत नाहीत. व्यक्तीस तिच्या वर्तनाबद्दल जबाबदार धरता येत नाही, या थरास जेव्हा तिची मनोविकृती जाते तेव्हाच कायद्याच्या दृष्टीने तिला वेड लागले आहे, असे समजण्यात येते.
चित्तविकृतींचे अनेक प्रकार असून त्या प्रत्येक प्रकाराचा लक्षणसमुच्चय भिन्न असतो तथापि चित्तविकृतींची सर्वसाधारण लक्षणे सांगायची तर ती अशी, की चित्तविकृती जडलेल्या व्यक्तीस सभोवतालच्या घटनांचा आणि इतरांच्या कृतींचा विपरीत बोध होत असतो, तिच्या स्मरणप्रक्रियेत दोष आढळतो विचारप्रक्रियेत, भावनिक प्रतिक्रियांत, स्वतःविषयीच्या कल्पनांमध्ये तसेच बोलण्या-वागण्यात विचित्रपणा व औचित्याचा अभाव कमीअधिक प्रमाणात आढळून येत असतो.
दोन ते तेरा वर्षे या वयात क्वचित आढळणारी छिन्नमानस ही विकृती सोडल्यास, चित्तविकृती लहान वयात फारच क्वचित आढळतात. तारुण्यकाळात चित्तविकृतींचे प्रमाण विशेष आढळते. कारण विचार, भावनिक प्रतिक्रिया तसेच वर्तन या बाबतींत व्यक्तींच्या जडलेल्या सवयी त्याचप्रमाणे तिच्या नैसर्गिक प्रेरणा व सामाजिक नीतीचे मानदंड यांच्यातील विसंवाद व संघर्ष तारुण्यकाळात तीव्र बनतो आणि व्यक्तीस तो असह्य बनण्याचा संभव फार असतो. चित्तविकृती निर्माण होण्याचा आणखी एक काळ म्हणजे स्त्रियांच्या चाळिशीनंतरचा आणि पुरुषांच्या पन्नाशीच्या सुमाराचा काळ. या वयात अंतस्रावी ग्रंथीमध्ये, विशेषतः प्रजनन ग्रंथीमध्ये, महत्त्वाचे बदल होत असतात व त्यांचा परिणाम स्त्रीपुरुषांच्या मनःस्थितीवर होण्याचा बराच संभव असतो.
चित्तविकृती आणि मनोमज्जाविकृती यांतील भेद : मनोमज्जाविकृती सौम्य स्वरूपाच्या असतात. कारण या विकृती जडलेल्या व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वाचा ऱ्हास (डिसिंटिग्रेशन) अत्यल्प प्रमाणात असतो. दुसरे म्हणजे मनोमज्जाविकृतींची लक्षणे अधूनमधून दृग्गोचर होत असतात, सतत नव्हे तसेच या विकृती जडलेल्या व्यक्तींना संत्रस्त वाटत असते हे जरी खरे, तरी त्यांची लक्षणे सोडल्यास ह्या व्यक्ती सामान्य माणसांप्रमाणेच असतात आणि त्या ‘विकृत’ म्हणून चटकन ओळखता येत नाहीत. त्यांचा दैनंदिन जीवनक्रम स्थूलमानाने सुरळीत असतो. त्यांना स्वतःच्या परिसराची यथार्थ जाणीव असते. वास्तव आणि स्वतःच्या कल्पना यांतील भेद त्यांना कळतो. त्यांची विवेकशक्ती शाबूत असते. समाजाशी त्यांचा मानसिक संपर्क तुटलेला नसतो आणि त्यामुळे सामाजिक दृष्ट्या अमुक इष्ट व अमुक अनिष्ट हा भेद त्या करू शकतात. सामाजिक वर्तनाबाबत त्यांच्या सवयीदेखील एकंदरीने ठीक असतात. त्यांच्यामुळे इतरांना क्वचित उद्वेग वाटला, तरी उपद्रव वा अपाय मात्र होत नाही. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आपल्याला परिसराशी समायोजन साधता आले नाही, आपल्याला काहीतरी मानसिक विकृती जडलेली आहे, हे त्यांना कळत असते. आपण बरे व्हावे असेही त्यांना वाटत असते. म्हणून विविध उपचार करणाऱ्यांच्या शोधात ते असतात. उपचारदृष्ट्या बोलायचे, तर मनोमज्जाविकृती विविध मानसोपचारतंत्राच्या साहाय्याने व त्या व्यक्तींच्या सहकार्यांने दूर करता येतात [⟶ मज्जाविकृति].
याउलट चित्तविकृती जडलेल्या व्यक्तींमध्ये व्यक्तिमत्त्वाचा ऱ्हास वा व्यक्तिमत्त्वाचे विघटन बऱ्याच प्रमाणात झालेले असते व अशा व्यक्ती त्यांच्या नजरेवरून व बोलण्याचालण्यावरून चटकन ओळखता येतात. त्यांना होणारा वस्तुस्थितीचा, घटनांचा व इतरांच्या कृतींचा बोध विपरीत स्वरूपाचा असतो. त्यांच्या स्मृतीत विस्कळितपणा, सरमिसळ, अर्धवटपणा इ. दोष आढळतात. अंगावरून मुंग्या चालत आहेत, कुणी तरी बोलत आहे, आपणाला संदेश देत आहे, वाक्ताडन करीत आहे, अशा प्रकारचे निर्वस्तुभ्रम त्यांना होतात. स्वतःसंबंधी श्रेष्ठत्वाच्या किंवा लघुत्वाच्या निराधार, अवास्तव कल्पना त्यांच्या मनात असतात. सारांश या व्यक्ती एका निराळ्याच व कल्पनानिर्मित जगात वावरत असतात. त्यांच्या विचारसरणीतही वक्रता, सुसंगतीचा अभाव असतो. परिणामी त्यांच्या भावनिक प्रतिक्रिया तसेच वर्तन प्रसंगाशी विसंगत, अनुचित, विचित्र व इतरांना अनाकलनीय असे असते. या व्यक्ती केव्हा कशा वागतील, याचा नियम नसतो. त्यांच्या वर्तनावर सामाजिक जाणिवेचा अंकुश राहत नाही. त्यांचे वर्तन इतरांना उद्वेगजनक आणि उपद्रवकारकही बनू लागते. कधीकधी त्यांच्या स्वतःच्या जीवितासही ते धोकादायक ठरते. या सर्व गोष्टींमुळे हळूहळू त्यांचे इतरांशी संबंध तुटत जाऊन त्या समाजातून उठतात आणि त्यांना मनोरुग्णालयात दाखल करणे इष्ट व अनिवार्य बनते.
स्वतः या व्यक्तींना मात्र आपल्या ठिकाणी मनोविकृती निर्माण झाली आहे, हे ठाऊक नसते. आपण ‘ठीक’ आहोत या कल्पनेनेच त्या वागत-वावरत असतात. साहजिकच स्वतःवर उपचार करून घेण्याची त्यांची तयारी नसते. उद्दीपन-अवसाद चित्तविकृतीतून बरे होत जाणाऱ्या व्यक्तींपैकी काहींना मात्र स्वतःच्या विकृतीची जाणीव असते, असे काही अभ्यासक म्हणतात.
उपचारदृष्ट्या बोलायचे, तर सूचन व मनोविश्लेषणादी मानसोपचारांचा उपयोग चित्तविकृतींच्या बाबतीत (छिन्नमानस विकृतीची प्राथमिक अवस्था सोडल्यास) होत नाही. मात्र चित्तविकृती शरीरदोषोद्भव (ऑर्गॅनिक) नसल्यास तसेच व्यक्तीने सातत्याने उपचार करून घेतल्यास व तिचा जीवनपरिसर सुधारल्यास चित्तविकृती आटोक्यात आणता येतात व त्या पूर्णपणे दूर होण्याचीही शक्यता असते.
असे असले, तरी चित्तविकृती आणि मनोमज्जाविकृती या दोहोंमध्ये काटेकोर सीमारेषा आखता येत नाही. मनोमज्जाविकृतीची परिणती चित्तविकृतीत झाल्याची शेकडा चार ते सात उदाहरणे आढळली आहेत. त्यामुळे अशी परिणती होतेच असे जरी दृढपणे म्हणता येत नसले, तरी जर व्यक्तिमत्त्वाचा ऱ्हास होतच राहिला, तर मात्र तशी परिणती होणे शक्य असते.
शरीरदोषोद्भव चित्तविकृती : काही चित्तविकृतींच्या मुळाशी शरीरदोष असतात. अशा चित्तविकृतींचे प्रकार असे : (अ) उपदंशजन्य, (आ) विषाणुजन्य, (इ) विषारी द्रव्यमूलक, (ई) मद्यासक्तिमूलक, (उ) मस्तिष्क आघातजन्य, (ऊ) रुधिराभिसरणदोषमूलक, (ए) मस्तिष्क-रोहिणी-काठिण्यमूलक, (ऐ) चयापचयदोषमूलक, (ओ) वार्धक्य वा जराजन्य इत्यादी. यांपैकी काहींचे वर्णन असे :
उपदंशाच्या जंतुंमुळे मेंदूच्या पेशींचा वेगाने नाश होऊ लागतो, परिणामी व्यक्तिमत्त्वाचे विघटन होऊ लागते. प्रथम प्रथम व्यक्ती सुखभ्रमित (यूफोरिक), आनंदी व आशावादी होते पण नंतर विषप्णतेचा काळ येतो व शेवटी तर तिच्या सर्वच मानसिक शक्तींचा क्षय होतो.
विषाणूंची बाधा मध्यमेंदूपर्यंत पोहोचल्यास त्याचा दाह होऊन अतिनिद्रानामक व्याधी निर्माण होते. या व्याधीचा प्राधान्येकरून व्यक्तिमत्त्वावर परिणाम दृग्गोचर होतो. कधीकधी तर्कबुद्धी व इतर मानसिक शक्तींतही बिघाड निर्माण होतो.
शिशाचे विष, विषारी वायू, अफू, बार्बिट्यूरेटस, ब्रोमाइड्स वगैरेंचे अतिसेवन यांमुळेही चित्तविकृती जडू शकतात. अवधान टिकवून ठेवता येत नाही, स्मृतिदोष निर्माण होतो, ईर्षा व जबाबदारीची जाणीव नष्ट होते, स्वभाव संशयी बनतो. ही द्रव्ये मिळाली नाहीत, की व्यक्तीस भीती वाटू लागते, निर्वस्तुभ्रम होतात.
मद्यासक्तीमुळे विकृत विषाक्तता (पॅथॉलॉजिकल इन्टॉक्सिकेशन) होते. वर्षानुवर्ष अतिरिक्त मद्यपानामुळे मुग्धभ्रांतिकंप, कॉर्सकॉफ चित्तविकृती, तीव्र निर्वस्तुभ्रमविकृती (ॲक्यूट हॅल्यूसिनॉसिस), मानसिक ऱ्हास इ. विकृती उत्पन्न होतात. या प्रत्येक प्रकारचा लक्षणसमुच्चय निरनिराळा असतो [⟶ मद्यासक्ति].
कधी कधी पन्नाशीच्या आसपास, मेंदूतील रोहिण्या कठीण बनल्यामुळे प्रथम प्रथम अपस्माराचे झटके येतात आणि पुढे पुढे व्यक्तीची मानसिक क्षमता कमी कमी होत जाऊन स्मृतीवरही परिणाम होऊ लागतो. पुरेसे कारण नसताही कधी हसणे, तर कधी रडणे, चिडचिड वगैरे प्रकारही होऊ लागतात. तसेच संभ्रमित अवस्था, विषण्णता, संशय वगैरे लक्षणेही दिसू लागतात.
पोष, अवटू आणि अधिवृक्क या ग्रंथींतील दोषांमुळे कधीकधी छिन्नमानसाची लक्षणे दिसतात. स्त्रियांच्या बाबतीत त्यांची उद्दीपन अवसाद चित्तविकृती व त्यांच्या मासिक स्रावाचे प्रमाण यांमध्ये संबंध आढल्याचे काही संशोधकांनी नमूद केले आहे.
अवटू ग्रंथींच्या अतिस्रावाशी मिथ्यात्वभाव अथवा असत् (अनरिॲलिटी) भावना, इतरांच्या कारस्थानीपणाचे दुर्भ्रम वा संभ्रम, चिंतास्थिती वगैरे लक्षणे संबंधित असतात, असे दिसून आले आहे. जर अधिवृक्क ग्रंथींची कार्यपातळी कमी असेल, तर चिंता, अस्वस्थता आणि कार्यपातळी अधिक असल्यास आक्रमकता दिसून येते. पोष ग्रंथींतील बिघाडामुळे रुची व गंध यांचे निर्वस्तुभ्रम, क्रोधाचे उद्रेक व नंतर नंतर मात्र विषण्णता व भावशून्यता वगैरे लक्षणे निर्माण होतात.
जराजन्य चित्तविकृती म्हणजे वयाच्या साठीच्या पुढे कधीकधी स्मृतीचा ऱ्हास, केवळ स्वतःच्या गरजांविषयीच आस्था, अवधानक्षमतेत घट, चिडखोरपणा इ. लक्षणे उद्भवतात.
कार्यिक चित्तवृत्ती : शरीरातील दोष हे ज्या चित्तविकृतींचे आदिकारण नसते अशा, अर्थात प्राधान्येकरून अनिष्ट सवयी, वैफल्य, असह्य ताण वगैरे मानसिक कारणांनी उत्पन्न होणाऱ्या चित्तविकृतींची गणना कार्यिक चित्तविकृती (फॅक्शनल सायकॉसिस) मध्ये होते तथापि सर्वस्वी शरीरदोषमूलक आणि सर्वस्वी मानसमूलक चित्तविकृती असे काटेकोर द्वैत न मानण्याकडे तज्ञांचा कल आहे. कारण शरीर व मन यांचे द्वैत मानता येत नाही.
कार्यिक चित्तविकृतींच्या सदरात पुढील विकृतींचा मुख्यत्वेकरून समावेश करण्यात येतो : (अ) छिन्नमानस, (आ) प्रणालित संभ्रमविकृती (पॅरनोइया), (इ) उद्दीपन-अवसाद, (ई) जराजन्य खिन्नता (इनव्होल्यूशनल मेलांकोलिया). [⟶ अपसामान्य मानसशास्त्र छिन्नमानस उद्दीपन-अवसाद चित्तविकृति].
चित्तविकृतींची कारणे : चित्तविकृती का होतात, याविषयी सामान्य लोकांच्या काही उथळ समजुती असतात. प्रियजनांचा वियोग, आर्थिक दुःस्थिती, प्रेमभंग इत्यादींमुळे होणारा भावनाक्षोभ व मानसिक ताण यांमुळे चित्तविकृती जडतात, हे सर्वार्थाने खरे नाही. वेड्याच्या संपर्कामुळे इतरांनाही वेड लागते, ही देखील अशीच उथळ समजूत आहे. चित्तविकृतींना अनुकूल अशी मनोभूमी बनलेली असेल, तरच तसे होण्याचा संभव असतो. चित्तविकृतींना आनुवंशिकता कारणीभूत असते, ही समजूतही चित्तविकृतींच्या काही प्रकारांबाबत खरी नाही. मेंदूस पोहोचलेली इजा, मेंदूतील अर्बुद, मेंदूतील रक्तस्राव यांमुळे चित्तविकृती जडते, ही समजूतही सर्वस्वी बरोबर नाही. या गोष्टींमुळे व्यक्तींच्या मनोव्यापारांत बिघाड उत्पन्न होतो, स्वभावात फरक पडतो, हे जरी खरे असले, तरी तिच्या व्यक्तिमत्त्वाचा ऱ्हास होत नाही.
अमेरिकेतील मनोरुग्णालयात दाखल झालेल्या व्यक्तींची पाहणी करता असे दिसून आले आहे, की चित्तविकृती जडलेल्यांमध्ये शहरवासीयांचे प्रमाण अधिक असते. बुद्धिमत्ता आणि शिक्षण यांचा चित्तविकृतींशी साक्षात संबंध नसतो तथापि प्रणालित संभ्रमविकृती जडलेल्या व्यक्तींत बुद्धिमान सुशिक्षितांची संख्या अधिक आणि अंश पक्षाघाताची (पॅरिसिस) विकृती जडलेल्यांमध्ये जराशा कमी बुद्धीच्या आणि अशिक्षित व्यक्तींची संख्या अधिक असल्याचे आढळून आले आहे. उद्दीपन-अवसाद तसेच जराजन्य खिन्नता या विकृती जडलेल्या व्यक्तींत पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक असल्याचे आढळले आहे. चाळिशीनंतरच्या जीवनातील ‘रितेपण’ स्त्रियांना विशेषत्वाने जाणवते आणि पुरुषांपेक्षा स्त्रिया सरासरीने सात वर्षे अधिक जगतात, हे त्याचे खरे कारण असावे. उद्दीपन-अवसाद चित्तविकृती जडलेल्यांमध्ये उच्च दर्जाच्या व अधिक कमाईच्या पेशांतील व्यक्तींचे अधिक प्रमाण आढळले आहे. छिन्नमानस व्यक्तींमध्ये हलक्या दर्जाच्या व अल्पकमाई असणाऱ्या पेशांतील व्यक्तींचा भरणा अधिक असल्याचे दिसून आले आहे.
वंश व धर्म यांचाही चित्तविकृतींशी साक्षात संबंध नाही. चित्तविकृती जडलेल्यांमध्ये सर्व वंशांच्या व धर्माच्या व्यक्ती आढळतात. चित्तविकृतींचे प्रकार मात्र त्या त्या वंशांच्या व धर्माच्या समाजांत भिन्न भिन्न असू शकतात. कारण भिन्न भिन्न समाजांत भिन्न भिन्न प्रेरणांवर सांस्कृतिक बंधने कमीअधिक असतात आणि त्या बंधनांची जाणवणारी जाचकताही कमीअधिक असते.
चित्तविकृतींच्या कारणमीमांसेत प्रवृत्तिकारी (प्रिडिस्पोझिंग) तसेच संनिकृष्ट (प्रेसिपिटेटरी) या दोन्ही प्रकारचे कारक घटक विचारात घ्यावयास हवेत. व्यक्तींचा वंशदाय, शरीरपिंड, स्वभावपिंड, शारीरिक व्यंगे, सदोष जैविक विकास, सदोष मानसिक विकास, प्रेरणांची सतत अतृप्ती, क्षोभ व वैफल्यभाव निर्माण करणारी आर्थिक स्थिती, सामाजिक दर्जा व सांस्कृतिक विधिनिषेधात्मक बंधने इ. अनेक गोष्टींचा चित्तविकृतींशी कारणपर संबंध असू शकतो.
चित्तविकृतींशी वंशदायाचा संबंध (ताण सहन करण्याच्या क्षमतेतील कमतरतेच्या रूपाने) असल्याचे दिसते. कारण उद्दीपन-अवसाद चित्तविकृती काही घराण्यांमध्ये आढळून आली आहे. तसेच छिन्नमानस जुळ्यांच्या अभ्यासावरूनही वंशदायाचा थोडाफार संबंध असतो, हे सूचित झालेले आहे. अर्थातच वंशदायातील वैगुण्यास अनिष्ट व मनोबल नष्ट करणाऱ्या परिसराचीही जोड मिळावी लागते, हेही लक्षात ठेवले पाहिजे.
शरीरपिंडाचा चित्तविकृतीशी काहीसा संबंध असावा, असे दिसते. कारण उद्दीपन-अवसाद चित्तविकृती जडलेल्यांमध्ये मेदल, स्थूल व गुटगुटीत म्हणजे तुंदिलकाय व्यक्तींचे प्रमाण अधिक असल्याचे इ. क्रेच्मर व डब्ल्यू. एच्. शेल्डन यांना आढळले आहे.
मेंदूतील दोषांशीही काही संशोधकांनी मनोविकृतींचा संबंध लावला आहे. कारण पुष्कळशा उदाहरणांत मेंदूत दोष दिसून आले आणि मेंदूतील अग्रखंडावर शस्त्रक्रिया करून काही व्यक्तींची विकृतिलक्षणे (उदा., क्षुब्धता, विषण्णता, संशयीपणा) नाहीशी झाली आहेत. तथापि छिन्नमानस विकृती जडलेल्यांच्या व न जडलेल्यांच्या मेंदूमध्ये मरणोत्तर तपासणीस काहीच फरक दिसून येत नाही, या गोष्टीकडेही काहींनी लक्ष वेधविले आहे.
अंतःस्रावी ग्रंथींचा तसेच रुधिराभिसरणाचा काही संबंध असावा, हे सुचविणारा पुरावाही प्रस्तुत करण्यात आला आहे. उदा., छिन्नमानस व्यक्तींच्या जननग्रंथीत, पोष ग्रंथीत, अवटू ग्रंथीत तसेच रुधिराभिसरणात बदल झाल्याचे एफ्. डब्ल्यू. मॉट यांना आढळले आहे.
चित्तविकृतींना परिसरात्मक आणि मानसिक घटकही कारणीभूत असतात. व्यक्तीचे जीवन म्हणजे तिच्या भौतिक-सामाजिक परिसराशी तिचा चालणारा दैनंदिन व्यवहार होय. ह्या व्यवहारास प्रेरणात्मक व भावनात्मक मानसिक बाजू असते. म्हणूनच मन व शरीर या दोहोंची दखल घेण्याकडे आता मानसोपचारज्ञांची अधिकाधिक प्रवृत्ती दिसून येत आहे. आडोल्फ मायर यांनी म्हटले आहे, की शारीरिक पातळीवरील उणिवा व दोष, मानसिक संघर्ष, निराशा, कल्पनाजाल वा दिवास्वप्ने, कौटुंबिक संबंध व इतर व्यक्तिव्यक्तींतील संबंधांच्या निमित्ताने झालेले मानसिक आघात, सामाजिक, आर्थिक व अन्य परिसरात्मक बाबी या सर्वांचा चित्तविकृतींपैकी कारणपर संबंध असण्याची शक्यता असते, हे मत आता मान्य झाले आहे.
साध्यासाध्यता आणि उपचार : चित्तविकृती म्हटली, की ती असाध्यच, ही समजूत बरोबर नाही. मात्र एवढे खरे, की शरीरदोषमूलक चित्तविकृतींच्या बाबतीत व्यक्ती संपूर्णपणे बरी होण्याची आशा कमी असते. योग्यवेळी उपचार केल्यास आणि ते सातत्याने चालू ठेवल्यास, कार्यिक चित्तविकृतींपैकी काहीचे निर्मूलन करता येणे शक्य असते.
मद्यासक्तिमूलक चित्तविकृतींत दिवसातून चार वेळा स्ट्रिक्वीन आणि ॲट्रोफीन सल्फेटचे मिश्र इंजेक्शन व पोटातून घेण्यासाठी सिंकोनाची साल देतात. मुग्धभ्रांतिकंप हा प्रकार असल्यास झोपेची औषधे तसेच कटिसूचिवेध (लंबर पंक्चर) हे उपाय करून पाहतात. उद्दीपन-अवसाद चित्तविकृतीत, उद्दीपन अवस्थेमध्ये बार्बीटल, ल्यूमिनाल, पेंटोथल इ. प्रशमकारी द्रव्यांचा वापर तसेच स्वच्छ हवेत निद्रा आणि विश्रांती यांचा उपयोग होतो. मेट्रॅझॉलजन्य तसेच विद्युतजन्य धक्केही उपयुक्त असल्याचे आढळून आले आहे. अवसाद दशेमध्ये, उष्णस्नान, काम करण्यास प्रोत्साहन व आश्वासने उपयोगी पडतात.
विषण्णता घालविण्यासाठी बेंझिड्रीन सल्फेटसारखे उत्तेजक द्रव्य तसेच ‘बी’ व्हिटॅमीन उपयुक्त ठरते. स्त्रियांच्या चाळिशीनंतरच्या विषण्णतेवर ‘सि’ व्हिटॅमीन थोडेसे साहाय्यभूत ठरते. प्रक्षोभात्मक व आत्महत्येस प्रवृत्त करणारी विषण्णता असल्यास विद्युतजन्य धक्के उपयुक्त ठरतात. कधीकधी ललाटास्थीवर शस्त्रक्रियाही करून पाहतात.
संदर्भ : 1.. Coleman, J. D. Abnormal Psychology and Modern Life, Chicago, 1956.
2. Doreus, R. M. Shaffer, G.W. Textbook of Abnormal Psychology, Baltimore, 1945.
3. Murphy, Gardner, Ed., An Outline of Abnormal Psychology, New York, 1929.
4. Quay, H. The Psychosis, New York, 1966.
अकोलकर, व. वि.
“