कॅमेरा ऑब्स्क्यूरा व कॅमेरा ल्यूसिडा : (पटछिस चित्रक व दृष्ट चित्रक ). वस्तू, चित्रे , नैसर्गिक देखावे तसेच सूर्य, तारे इ. आकाशस्थ आविष्कार अंधारात किंवा उजेडात पाहण्याची अथवा त्यांची कागदावर प्रतिकृती (नमुना) तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी साधने म्हणजे कॅमेरा ऑब्स्क्यूरा व कॅमेरा ल्यूसिडा ही होत. या साधनांत फरक इतकाच की, कॅमेरा ऑब्स्क्यूरामध्ये मिळणारे प्रतिबिंब खरे असते, तर कॅमेरा ल्यूसिडात ते भासमान असते.
कॅमेरा ऑब्स्क्यूरा : (पटछिप्त चित्रक). या साधनाचा उपयोग कित्येक शतकांपासून होत आहे. ॲरिस्टाटॅल (इ. स. पू. चौथ्या शतकात) यांना या साधनाचा उपयोग ठाऊक होता. सु. चौदाव्या शतकात या साधनाचे अंतर्भूत शास्त्रीय तत्त्व माहीत झाले व त्याचे अनेक प्रकार प्रचारात आले.
बंद खोलीच्या एका भिंतीच्या साधारण मध्यावर एक बारीक भोक पाडल्यास त्यातून बाहेरच्या देखाव्यावरून निघणारे प्रकाश किरण खोलीत शिरतात व भोकाच्या समोरील भिंतीवर सर्व देखावा उलटा दिसतो. खोलीत असणाऱ्या माणसांना तो देखावा दिसू शकतो. खोलीच्या बाहेरूनही तो पहाण्यासाठी भोके ठेवता येतात (आ. १).
भोकात बहिर्वक्र भिंग ठेवल्यास प्रतिमा पहिल्याप्रमाणेच उलटी दिसली तरी स्पष्ट दिसते. बाजूच्या भिंतीना भोक पाडण्याऐवजी तक्तपोशीला भोक पाडून त्यात बहिर्वक्र भिंग बसवतात व त्यावर एक उदग्र(उभ्या) दिशेभोवती फिरवता येईल असा आरसा बसवतात.
त्यामुळे बाहेरील देखाव्याचे समग्रचित्र खोलीत भिंगाच्या खाली ठेवलेल्या मेजावर अनेक निरीक्षकांना पहाता येते. आरसा हळूहळू फिरविला म्हणजे आसमंतातील देखावे पाहता येतात. तंबूतही अशी व्यवस्था करता येते त्यामुळे हे एक करमणुकीचे मोठे साधन म्हणून सहलीच्या किंवा जत्रेच्या ठिकाणीही वापरता येत असे. अशाच लहान तंबूवजा खोलीत वरील साधनाने देखाव्याचे च़ित्र मेजावर पाडून चित्रकार सहजपणे चित्र रेखाटीत असत(आ. २). बहिर्वक्र भिंगाबरोबर काही अंतरावर अंतर्वक्र भिंग ठेवल्यास प्रतिमा मोठी मिळते. अशा दोन भिंगांचा उपयोग प्रथम योहानेस केप्लर या प्रसिद्ध ज्योतिर्विदांनी सूर्याचे वेध घेण्याकरिता केला.
या उपकराणाचा एक सुधारलेला प्रकार म्हणजे मध्यम आकाराच्या व सुवाह्य अशा एका लहान लाकडी पेटीच्या एका बाजुला बहिर्वक्र भिंग बसवून समोरच्या बाजूस ४५० कोन करुन एक आरसा बसवतात आणि आरशावर असणाऱ्या पेटीच्या बाजूस अर्धपार्य (अर्धपारदर्शक) काच बसवतात. काचेवर बाहेरील देखाव्याची प्रतिमा पडलेली दिसते. देखाव्याची अथवा इतर कोणत्याही दृश्याची प्रतिमा अशा रीतीने पाडता आलयामुळे त्याची प्रतिकृती सहजपणे मिळते किंवा तयार करता येते(आ.३).
कॅमेरा ल्यूसिडा : (दृष्ट चित्रक). बंदिस्त जागेत देखाव्याची प्रतिमा पाडण्यापेक्षा उजेडातच प्रतिमा घेण्याचे हे साधन आहे. हे प्रथम बुलस्टन यांनी १८०७ मध्ये तयार केले. यात एका चौकोनी लोलकामधून चित्रित करावयाच्या देखाव्यापासून आलेले प्रकाशकिरण जातात व दोनदा आतल्या आत परावर्तित होऊन लोलकाच्या एका टोकावर लक्ष केंद्रित केलेल्या एका डोळ्यात शिरतात व दुसऱ्या डोळ्यास देखाव्याचे प्रतिबिंब लोलकाच्या पायथ्याजवळ इथे ठेवलेल्या कागदावर पडल्यासारखे दिसते(आ.४).डोळा योग्य ठिकाणी ठेवणे जरुर असते. त्यात थोडी फार हालचाल झाली, तर परावर्तित किरण डोळयात न शिरल्यामुळे प्रतिबिंब दिसेनासे होते किंवा काढीत असलेला आराखडा प्रतिबिंबापासून बाजूला सरकतो. ही अडचण नाहीशी करण्यासाठी कागदावर कमी शक्तीचे बहिर्वक्र भिंग ठेवतात. त्यामुळे कागद आणि परावर्तित प्रतिबिंब डोळयापासून एकाच अंतरावर आल्यासारखे वाटतात. डोळ्याच्या हालचालीस अधिक मोकळेपणा देऊन चित्राचे रेखाटन करता यावे यासाठी वरील मूळ कल्पनेत पुष्कळ सुधारणा झाल्या. उदा., डोळयासमोर प्रकाशकिरणाशी ४५० कोन करुन एक पारदर्शक आरसा ठेवतात. त्यामुळे आरशातून दिसणाऱ्या कागदावरच प्रतिबिंब पडल्यासारखे दिसते व रेखाटन सुलभ होते.
ॲबे या शास्त्रज्ञानं १८८० च्या सुमारास उदग्र सूक्ष्मदर्शकातून दिसणारे प्रतिंबब, सहजपणे कागदावर दिसण्यासाठी सूक्ष्म दर्शकाच्या नेत्रिकानलिकेच्या (ज्या भिंगाच्या जवळ डोळा नेऊन निरीक्षण करावयाचे असते त्या भिंगाच्या नलिकेच्या) वर एका लहान घनाकार काचेमध्येच वरील तऱ्हेचा आरसा ४५० कोन करून कायम बसवला आणि कागदाच्या वरील बाजूस एक कललेला (४५०कोन)आरसा ठेवला. त्यामुळे सूक्ष्मदर्शकाच्या थोड्याशा जुळणीनेही दर्शकातील प्रतिबिंब कादावर पडलेले दिसते (आ.५).
टोळे, मा. ग.
“