डालेन, निल्स गस्टाव्ह : (३० नोव्हेंबर १८६९–९ डिसेंबर १९३७). स्वीडिश अभियंते व संशोधक. १९१२ सालच्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचे विजेते. त्यांचा जन्म स्टेन्स्टॉर्प येथे झाला. त्यांचे शिक्षण यतेबॉर्य एंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट व झुरिक पॉलिटेक्निक येथे झाले. स्वीडिश कार्बाइड अँड ॲसिटोन कंपनीत १९०९ मध्ये त्यांची संचालकपदावर नेमणूक झाली. 

ॲसिटिलीन स्फोट होऊ न देता ॲसिटोनामध्ये विरघळविण्याची एक नाविन्यपूर्ण पद्धत त्यांनी शोधून काढली. परावर्तनशील पदार्थ व कृष्ण पदार्थ (ज्याचे तापमान प्रदीप्त अवस्थेपर्यंत वाढविले असता ज्याच्यापासून प्रकाशकिरणांचा अखंड वर्णपट उत्सर्जित होतो असा पदार्थ) यांपासून मिळणाऱ्या उष्णता प्रारणातील (तरंगरूपी ऊर्जेतील) फरकाचा उपयोग करून एखाद्या प्रकाश उद्‌गमाच्या इंधनाचा पुरवठा नियंत्रित करू शकणाऱ्या साधनाचा त्यांनी शोध लावला. सुधारलेल्या वायू संचायकाबरोबर या साधनाचा उपयोग करून त्यांनी सूर्योदयाच्या वेळी आपोआप विझणारे व सूर्यास्ताबरोबर आपोआप प्रज्वलित होणारे नवीन प्रकारचे प्रकाशसंकेतदीप तयार केले. हे संकेतदीप समुद्रातील निर्मनुष्य दीपस्तंभांकरिता विशेष उपयुक्त असल्यामुळे त्यांचा लवकरच जगभर प्रसार झाला. या कार्याकरिता त्यांना नोबेल पारितोषिकाचा बहुमान मिळाला. त्यांनी उष्ण वायू टरबाइन, वायू संपीडक ( वायूचा संकोच करून त्याचा दाब वाढविण्याचे साधन) व दूध काढण्याचे यंत्र यांत सुधारणा केल्या. 

स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसचे सदस्य म्हणून १९१३ मध्ये त्यांची निवड झाली. त्याच वर्षी प्रयोगशाळेतील एका स्फोटामुळे त्यांना अंधत्व आले, परंतु तरी सुद्धा मृत्यूपावेतो त्यांनी आपले संशोधनकार्य पुढे चालू ठेवले. ते स्टॉकहोम येथे मृत्यू पावले.

 भदे, व. ग.