ओहारा, जॉन (हेन्री) : (३१ जानेवारी १९०५ — ११ एप्रिल १९७० ). आधुनिक अमेरिकन कादंबरीकार व कथाकार. जन्म पेन्सिल्व्हानियामधील पॉट्सव्हिल ह्या शहरी. व्यापारी जहाज, नगरोद्यान, पोलादी कारखाना, वृत्तपत्रे अशा अनेक क्षेत्रांतील व्यवसायांच्या अनुभवानंतर लेखनास सुरुवात. यंत्रयुगात, छोट्या छोट्या गावांतील उच्च मध्यमवर्गीय समाजाचे उपचार व रूढी यांच्या बंधनांनी जखडलेले विफल जीवन हा ओहाराचा आवडता विषय. तो विषय त्याने अपॉइंटमेंट इन सॅमर्रा (१९३४), अ रेज टू लिव्ह (१९४९) या कादंबऱ्यांत सफाईने हाताळला आहे. गिब्जव्हिल या छोट्या शहरातील चँपिन या श्रीमंत वकिलाच्या राजकीय महत्त्वाकांक्षेची शोकांतिका रंगविणारी टेन नॉर्थ फ्रेडरिक (१९५५) ही कादंबरी ओहाराची सर्वोत्तम साहित्यकृती मानली जाते. द डाॅक्टर्ससन (१९३५),फाइल्स ऑन परेड (१९३९), पाइप नाइट (१९४५) व हेल् बॉक्स (१९४७) हे त्याचे प्रमुख कथासंग्रह. ओहाराच्या कथा त्याच्या कादंबऱ्यांपेक्षा जास्त बांधेसूद व आशयगर्भ आहेत. समाज व व्यक्ती यांचे सूक्ष्म व वास्तववादी चित्रण करणाऱ्या आधुनिक अमेरिकन साहित्यिकांत ओहाराचे स्थान बरेच वरचे ठरेल. प्रिन्स्टन (एन्.जे.) येथे तो निधन पावला.
संदर्भ : 1. Carson, E.R.The Fiction of John O’ Hara, Pittsburgh, 1961.
2. Walcutt, C. C. John O’Hara, Minneapolis, 1969.
नाईक, म. कृ.