औंध : सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थल. लोकसंख्या ४,९७४ (१९७१). हे सातारा शहराच्या आग्‍नेयीस ४२ किमी. वसलेले असून पंतप्रतिनिधींच्या भूतपूर्व जहागिरीची राजधानी होती. राजाराम महाराजांच्या कारकीर्दीत (१६९० च्या सुमारास) सातारा जिल्ह्यातील किन्हई गावच्या त्र्यंबक कृष्णाजी कुलकर्णी यास प्रथम पंतप्रतिनिधीची वस्त्रे मिळाली [→ औंध संस्थान]. गाव खोलगट भागात वसलेले असून त्याच्या उत्तरेस व पूर्वेस टेकड्या आहेत. त्यांपैकी २४४ मी. उंचीच्या मूळपीठ टेकडीवर पाच बुरुजांची तटबंदी असलेले पंतप्रतिनिधींच्या श्री भवानी कुलदेवतेचे पुरातन भव्य देऊळ आहे व गावातील श्री यमाई मंदिराशेजारी सुबक नक्षीकाम असलेली दीपमाळ आहे. दीपमाळेचा चौथरा ४·५ मी. व्यासाचा व एकूण उंची १८ मी. असून तिच्यावर १७६ दिवे लावता येतात. पौषी पौर्णिमेस मोठी यात्रा भरते. मूळपीठ टेकडीवर प्रसिद्ध ‘श्री भवानी संग्रहालय’ हे सरकारी वस्तुसंग्रहालय आहे. गावात पूर्वीच्या संस्थानिकांचा प्रेक्षणीय वाडा व त्याच्याशेजारी श्री यमाई देवीचे मंदिर आहे.

कुलकर्णी, गो. श्री.