ओहम, गेओर्क झिमोन : (१६ मार्च १७८७ — ७ जुलै १८५४). जर्मन भौतिकीविज्ञ. विद्युत् संवहनासंबंधीच्या नियमाकरिता विशेष प्रसिद्ध. त्यांचा जन्म एरलांगेन येथे झाला. तेथील विद्यापीठात शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी बामबेर्क (१८१६ – १७) व कलोन (१८१७ — २६) येथे गणित व भौतिकीचे अध्यापन केले. त्यांनी मांडलेल्या नवीन सिद्धांताचा अवमान झाल्यामुळे कलोन येथील प्राध्यापकपदाचा त्यांनी राजीनामा दिला व पुढे सहा वर्षे बर्लिन येथे खाजगी शिक्षकाचे काम केले. १८३३ मध्ये न्यूरेंबर्गच्या तांत्रिक विद्यालयाच्या संचालकपदावर व १८४९ मध्ये म्यूनिक विद्यापीठात भौतिकीच्या प्राध्यापकपदावर त्यांची नेमणूक झाली.
विद्युत् चालक प्रेरणा (विद्युत् मंडलात प्रवाह वाहण्यास कारणीभूत होणारी प्रेरणा) विद्युत् रोध व विद्युत् प्रवाह यांतील परस्पर संबंध दर्शविणारा त्यांचा विख्यात नियम १८२७ मध्ये त्यांनी प्रसिद्ध केला. त्यांच्या या कार्याबद्दल विद्युत् रोधाच्या एककास ‘ओहम ’ असे संबोधण्यात येते. गॅल्व्हानिक प्रवाह (स्थिर एकदिश विद्युत् प्रवाह,गॅल्व्हानी या शास्त्रज्ञांच्या नावावरून पूर्वी वापरण्यात येणारी संज्ञा) व विद्युत् मंडलातील विद्युत् चालक प्रेरणेचे वितरण यांसंबंधीही त्यांनी महत्त्वाचे कार्य केले. त्यांच्या संशोधनाचा प्रवाही विद्युताच्या सिद्धांतावर व उपयोगावर मोठा परिणाम झाला. द्रवांची विद्युत् संवाहकता, प्रकाशकी (प्रकाशाच्या गुणधर्मांचा अभ्यास करणारे शास्त्र) व ध्वनिशास्त्र यांसंबंधीही त्यानी प्रयोगकार्य केले.
त्यांचे शास्त्रीय लेखन विपुल तथापि एका निबंधाच्या अपवादाखेरीज दुय्यम दर्जाचे होते. प्रध्यापकपदाचा राजीनामा दिल्यानंतर मात्र त्यांच्या कार्याचे महत्त्व मान्य झाले. लंडनच्या रॉयल सोसायटीचे सदस्यत्व (१८४२) व सोसायटीचे कॉप्ली पदक (१८४३) हे बहुमान त्यांना मिळाले. ते म्यूनिक येथे मृत्यू पावले.
भदे, व. ग.