ओल्बर्स, (हाइन्रिक) व्हिल्हेल्म (माथेउस) : (११ ऑक्टोबर १७५८ — २ मार्च १८४७ ). जर्मन ज्योतिर्विद. धूमकेतू व लघुग्रह (मंगळ व गुरू यांच्या दरम्यान कक्षा असलेले अनेक लहान ग्रह) यांसंबंधी त्यांनी महत्त्वाचे संशोधन केले. त्यांचा जन्म ब्रेमेन (जर्मनी) जवळच्या आरबर्जेन येथे झाला. त्यांनी गॉटिंगेन येथे वैद्यकशास्त्राचा अभ्यास केला (१७७७ — ८०) व त्याचबरोबर गणिताचा अभ्यासक्रमही पुरा केला. ब्रेमेन येथे १७८१ पासून वैद्यकीय व्यवसाय करून १८२३मध्ये ते निवृत्त झाले. पण या व्यवसायातून फावल्या वेळात त्यांनी छंद म्हणून ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला. आपल्या घराच्या गच्चीवर वेधशाळेसारखी वेध घेण्याजोगी व्यवस्था त्यांनी केली होती. ५० वर्षे त्यांनी वेध घेतले. धूमकेतूंच्या कक्षा गणिताने काढण्याची नवी पद्धत त्यांनी शोधून काढली, त्यामुळे त्यांची किर्ती सर्वत्र पसरली. बॅरन फोन त्साख हे महत्त्वाचे संशोधन प्रबंधरूपाने प्रसिद्ध केले त्यात अशा गणिताने काढलेल्या ८७ कक्षांची सूची दिली आहे. ७४ वर्षे आवर्तकाल (एका प्रदक्षिणेस लागणारा काल) असलेला १८१५ सालचा धूमकेतू ओल्बर्स यांनी शोधून काढला म्हणून तो त्यांच्याच नावाने प्रसिद्ध आहे. धूमकेतूंच्या बाबतीत त्यांना अग्रगण्य अधिकारी मानले जाते. लघुग्रहांच्या संशोधनातही त्यांनी पुढाकार घेतला होता. ‘सीरीझ’ या अगोदर माहीत असलेल्या लघुग्रहाचा त्यांनी १ जानेवारी १८०२ रोजी पुन्हा शोध लावला व त्याच वर्षाच्या २८ मार्चला ‘पालास’ या नवीन लघुग्रहाचा शोध लावला हे सर्व लघुग्रह एका मोठ्या ग्रहाच्या स्फोटामुळे झाले असावेत, अशी उपपत्ती त्यांनी मांडली. या उपपत्तीनुसार दर्शविलेल्या जागीच हार्डिंग यांना जूनो व ओल्बर्स यांना स्वतःला व्हेस्टा हे लघुग्रह सापडले. ही उपपत्ती अद्याप सिद्ध झालेली नसली तरी त्यांनी केलेली गणिते महत्त्वाची आहेत. धूमकेतूच्या शीर्षातून निघणारे सूक्ष्म कण सौर प्रारणाने (सूर्यापासून ऊर्जेच्या होणाऱ्या तरंगरूपी उत्सर्जनाने) दूर लोटले गेल्यामुळे धूमकेतूचे पुच्छ बनते असा त्यांनी शोध लावला. उल्का प्रवाहांना दीर्घ आवर्तकाल असतो असे गृहीत धरून लिओनीड (सिंह) उल्का प्रवाहाचा [→उल्का व अशनि] आवर्तकाल ३३ वर्षे असावा असा विचार त्यांनीच प्रथम मांडला. स्थिर विश्व अनंत ताऱ्यांचे बनलेले आहे, या गृहीतकाधारे ओल्बर्स यांनी आकाशाच्या तेजस्वीपणासंबंधी केलेले सैद्धांतिक संशोधन आधुनिक विश्वस्थितिशास्त्रात (विश्वाची संरचना, आकार इत्यादींसंबंधीच्या शास्त्रात ) महत्त्वाचे ठरले आहे. ते ब्रेमेन येथे मृत्यू पावले.
नेने, य. रा.