ओपोर्तो : पोर्तुगालचे दुसऱ्या क्रमांकाचे शहर. लोकसंख्या ३,१०,४३७ (१९७०) हे डोरू नदीच्या मुखाजवळ आहे नदीच्या गाळामुळे मोठी जहाजे ओपोर्तोचे उपनगर लेशाँइश या बंदराला लागतात. या अटलांटिक महासागरावरील बंदरातून सुप्रसिद्ध ‘पोर्ट’ (ओपोर्तोवरूनच पडलेले नाव) मदिरा, बुचे, फळे, ऑलिव्ह तेल व इमारती सामान निर्यात होते. पोर्तुगालची बरीच आयातही या बंदरात होते. ओपोर्तो औद्योगिक शहर असून तेथील ३३% लोक निर्मितिउद्योगात आहेत. कापूस, रेशीम, लोकर, कापड, कपडे, हातमोजे, हॅट, पादत्राणे, कातडी सामान, चिनी मातीची भांडी, सिगारेट, पाट्या, मद्य, साबण, सोन्याचांदीचे दागिने, अन्नपदार्थ, टायर, विद्युत् उपकरणे, मोटारसायकली, रसायने इ. उद्योग येथे आहेत. मत्स्योद्योगही मोठ्या प्रमाणात आहे. रोमनपूर्वकाली याला काले व नंतर पोर्ट्स कार्ल म्हणत त्यावरूनच सबंध देशाचे पोर्तुगाल नाव पडले. अठराव्या शतकातील टॉरेडॉस क्लेरिगॉस मनोरा, से नावाचे गॉथिक कॅथीड्रल व डोरू नदीवरील डॉमलुई हा दुमजली पूल ही येथील प्रसिद्ध स्थळे होत.
ओक, द. ह.