ओर्छा संस्थान : मध्य प्रदेशाच्या बुंदेलखंड विभागातील पूर्वीचे एक संस्थान. उर्च्छा, ओडछा, टीकमगढ, वोडसे वगैरे नावांनीही उल्लेखिले जाई. त्याचे क्षेत्रफळ ५,३८९ चौ. किमी. असून लोकसंख्या ३,१४,६६१ (१९४१) होती व वसूल वीस लाख रुपयांपेक्षा थोडा अधिक होता. उत्तरेस व पश्चिमेस संयुक्त प्रांताचा झांशी जिल्हा, दक्षिणेस मध्ये प्रांताचा सागर जिल्हा व पूर्वेस चरखारी व बिजावर संस्थाने असे प्रदेश ह्याच्या सभोवती आहेत. पूर्वी ओर्छा हेच राजधानीचे शहर होते, पण १७८३ पासून टीकमगढ हे राजधानीचे शहर करण्यात आले. बेटवा, धसान या नद्यांच्या अंतर्वेदीत मोठमोठे तलाव, त्यांचे पाणी, खुरटे जंगल, सामान्य पिकाऊ जमीन, उष्ण हवा, सरासरी ११३ सेंमी. पर्जन्यमान असे याचे प्राकृतिक वर्णन आहे. टीकमगढनगर व ७०६ खेडी, बुंदेलखंडी (हिंदीचा प्रादेशिक प्रकार) भाषा बोलतात. या संस्थानात शिक्षणाचा प्रसार अगदी थोडा होता. ओर्छामध्ये तटबंदी राजवाडा, राजमंदिर, जहांगीर महल, चतुर्भुज मंदिर, राजपुरुषांच्या छत्र्या, हरदौल मंदिर इ. प्रेक्षणीय वास्तू आहेत.
इतिहास : या संस्थानचा बाराव्या शतकापर्यंतचा इतिहास उपलब्ध नाही. तेराव्या शतकात गाहडवाल राजवंशीय म्हणविणारा राजपूत अर्जुनपाल याने या संस्थानाची स्थापना केली. तेव्हापासून आजवर या वंशात ३४–३५ राजपुरुष होऊन गेले. अर्जुनाचा मुलगा सोहनपाल याने संस्थानाचा विस्तार केला. अकरावा वंशज रुद्रप्रताप याचे बुद्रलोल व सिकंदर लोदी यांच्याशी आणि बारावा वंशज भारतीचंद याचे शेरशाहाशी झगडे झाले. पंधरावा वंशज वीरसिंगदेव बुंदेला (१६०५—२७) याने जहांगीरसाठी अबुल फज्लचा वध केल्यामुळे (१६०२) व उभारलेल्या वास्तूमुळे प्रसिद्धीस आला व संस्थान विस्तार पावले. यानंतर सोळावा वंशज जुझारसिंग (१६२७—३५ ) याने काही कर्तबगारी दाखवली. पण आपल्या बायकोशी अनैतिक संबंध ठेवल्याच्या संशयावरून आपल्या सख्या भावास विष दिल्यामुळे याची अप्रतिष्ठा झाली. नंतर १६३५ ते १६४१च्या दरम्यान राजा नसल्यामुळे काही वर्षे अराजक माजले. पुढे सतरावा पुरुष पहाडसिंग (१६४१—५३) गादीवर आला. शिवकाळात मराठ्यांच्या खानझमान, अझमखान, शायिस्तेखान,जयसिंग, दिलेरखान इत्यादींच्या आधिपत्याखाली मोगलांच्या ज्या लढाया झाल्या, त्यांत जुझार, पहाड व एकोणिसावा पुरूष इंद्रमणी (१६७२—७५) यांचे निर्देश येतात. १७२९ मध्ये छत्रसालास साह्य करण्याच्या निमित्ताने मराठ्यांचा बुंदेलखंडात प्रवेश झाला आणि सु. ३० वर्षांच्या अवधीत कधी लढून, तर कधी सामोपचाराने मराठ्यांनी आपली अधिसत्ता बुंदेलखंडात स्थापन केली. त्यावेळचे त्यांचे तेथील मुलकी प्रशासक नारोशंकर राजेबहादर, गोविंदपंत खेर (हे बुंदेले आडनावानेच अधिक परिचित आहेत) व त्यांचे मुलगे, रघुनाथ हरी नेवाळकर व त्यांचे बंधू, मल्हार कृष्ण, अंताजी कृष्ण व त्यांचे वंशज इ. होत. पैकी शेवटच्या दोघांच्या कुटुंबांतील अनेकांचा त्यांच्यासह दग्याने खून केल्यामुळे त्यांच्या कुटुंबास बुंदेलखंडात पेशव्यांनी कायमची जाहगीर दिली. ओर्छाचे यापुढील अधिपती नामधारी झाले. अठ्ठाविसावा पुरुष विक्रमाजित याने १८१२ मध्ये इंग्रजांशी तह करून त्यांचे आधिपत्य मान्य केले. बत्तिसावा पुरुष हम्मीर सिंह (१८५४—७४) याने १८५७च्या उठावात इंग्रजांना साह्य केल्याबद्दल संस्थानाने इंग्रजांना द्यावयाची खंडणी माफ झाली व १८६२ साली त्यास दत्तक घेण्याची सनद मिळाली. त्यानंतर प्रतापसिंह (१८७४ — १९३०) गादीवर आला. त्याने रेल्वेच्या विस्तारासाठी आपल्या संस्थानातील आवश्यक ती सर्व जमीन १८८४ मध्ये देऊ केली. त्यानंतर हल्लीचे माजी संस्थानिक सवाई महेंद्र महाराज वीरसिंगदेव १९३० मध्ये गादीवर आले. १९४७ नंतर विलीनीकरणाबरोबर हे संस्थान मध्य प्रदेश राज्यात सामील झाले.
खरे, ग. ह.