ओदेन्से : डेन्मार्कमधील तिसऱ्या क्रमांकाचे शहर. लोकसंख्या उपनगरांसह १,३७,२८८ (१९७०). ‘ओडिन’ या स्कँडिनेव्हियन देवतेवरून हे नाव पडले असावे. येथे जहाजबांधणीचे मोठे कारखाने असून अवजड यंत्रसामग्री, साखर शुद्धीकरण, मद्ये, मोटारी, डबाबंद मासळी इत्यादींचेही कारखाने आहेत. यूरोपातील सर्वांत जुन्या शहरांपैकी हे एक असून येथील जुनी कॅथीड्रले उत्तम वास्तुकलेचे नमुने समजले जातात. येथे प्राचीन घरे तसेच ठेवलेले एक खुले संग्रहालय आहे. सुप्रसिद्ध परीकथालेखक हॅन्स अँडरसन याचे हे जन्मगाव त्याच्या राहत्या घराचे संग्रहालय प्रसिद्ध आहे.
ओक, द. ह.