ओडेट्स, क्लिफर्ड: (१८ जुलै १९०६ – १४ ऑगस्ट १९६३). आधुनिक अमेरिकन नाटककार. जन्म फिलाडेल्फिया येथे ज्यू मातापित्यांच्या पोटी. वयाच्या पंधराव्या वर्षी नट होण्यासाठी शिक्षण सोडले. ‘ग्रूप थिएटर’ ही नाट्यसंस्था स्थापन करण्यात भाग घेतला (१९३१). शहरातील टॅक्सी-ड्रायव्हरांच्या संपाचे समाजवादाच्या दृष्टिकोणातून अवलोकन करणाऱ्या वेटिंग फॉर लेफ्टी (१९३५)या पहिल्या एकांकिकेनेच त्याचे नाव झाले, कोणतेही नेपथ्य नसलेल्या रंगमंचाचा उपयोग व रंगमंचावरील नट व नाट्यगृहातील प्रेक्षक यांना एकसंध करण्याचा धाडसी प्रयोग, ही या एकांकिकेची तांत्रिक वैशिष्ट्ये. अवेक अँड सिंगमध्ये (१९३५) जीवनकलहात टिकून राहण्याच्या एका गरीब ज्यू कुटुंबाच्या धडपडीचे वास्तव चित्रण आढळते. ओडेट्सची मध्यमवर्गीय जीवनावरील गोल्डन बॉय (१९३७), रॉकेट टू द मून (१९३८), द कंट्री गर्ल (१९५०) इ. नंतरची नाटके यशस्वी झाली तरी त्यांत पूर्वीची चमक आढळत नाही. कॅलिफ (लॉस अँजेल्स) येथे तो निधन पावला.
संदर्भ : 1. Downer, A. S. The American Theatre, Princetin (N.J.), 1967.
2. Krutch , J. W. The American Drama Since 1918, New York, 1939.
नाईक, म. कृ.